मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Saturday, June 23, 2007

नवं कोरं

नुकतंच एन्.सी.एल्.मध्ये नवं कॅन्टीन सुरू झालं. बर्‍याच दिवसांपासून या नव्या कॅन्टीनबद्दल एन्.सी.एल्.च्या साइंटिफिक व नॉन्-साइंटिफिक स्टाफमध्ये चर्चा सुरू होती. अर्थात, बहुतांश लोक त्याबद्दल उत्सुक होते हे वेगळं सांगायला नको. तसं एन्.सी.एल्.मध्ये कॅन्टीन नव्हतं अशातला भाग नाही. पण, एकंदरीत तिथल्या सेवेचा दर्जा पाहिला की खाण्यापिण्याच्या बाबतीत आकर्षणापेक्षा अनासक्तीच निर्माण होत असे. वैज्ञानिक संशोधनात भारतात आघाडीवर असलेली ही प्रयोगशाळा तिच्या कर्मचार्‍यांच्या जेवणाखाण्याच्या बाबतीत मात्र संपूर्ण उदासीन! सरकारी कचेरीतलं "लोएस्ट कोटेशन"चं तत्व म्हटलं की आणखी काय अपेक्षा करणार?

पण, या नव्या कॅन्टीनचं तसं नाहीये. नवं कॅन्टीन दिवसभर सुरू राहणार असून रात्रीचं जेवणही तिथे उपलब्ध असल्यामुळे इथे कॉलनीत पेइंग गेस्ट म्हणून राहणार्‍या रिसर्चच्या विद्यार्थ्यांची खूप मोठी सोय झाली आहे. खाजगी पार्टीकडे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे चहापासून जेवणापर्यंत सगळ्याचा दर्जा उत्कृष्ठ आहे. एकंदरीतच स्वच्छता, नीटनेटकेपणा व टापटीप म्हणून गेल्या दोन-तीन दिवसांपासून या कॅन्टीनमध्ये लोकांनी गर्दी करायला सुरवात केली. काचेच्या भिंती असल्यामुळे कॅन्टीनच्या बाहेरची हिरवळ प्रसन्न करून जाते. त्यात पाऊस पडत असेल तर... क्या बात है! .... हातात चहाचा कप, समोर डिशमध्ये गरमगरम बटाटावडा .... दिवसभरातला कामाचा शीण कसा एका झटक्यात पळून जाईल! केवळ "खाण्यापिण्याची उत्तम सोय" म्हणून या घटनेला महत्त्वं नाहीये. दिवस-रात्र एक करून संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना (विशेषत: बाहेरगावांहून आलेल्यांना) यापूर्वी जेवणासाठी बराच खर्च करूनही तडजोड करावी लागायची. जुन्या कॅन्टीनमध्ये दुपारचं जेवण ज्यांनी केलंय त्यांना हे विशेषत: जाणवेल. त्यांच्या कष्टाला न्याय मिळाला हे निश्चितच महत्त्वाचं आहे.

मी सध्या थिसिस जमा होऊन व्हायवाची वाट पाहणार्‍या व्यक्तींपैकी एक असल्यामुळे आवराआवर हेच सध्याचं माझं मुख्य काम आहे. लॅबमधल्या नव्या सदस्यांना मदत करणे, लॅबमधले प्रोग्रॅम्स, प्रोग्रॅमिंग स्ट्रॅटेजी, समजावून सांगणे इत्यादि गोष्टीही आहेतच. काल असंच एका ज्युनिअरला एक डेरिव्हेशन समजावण्यासाठी बसायचं होतं. रुचिपालट म्हणून आज नव्या कॅन्टीनमध्ये बसायचं ठरलं. दुपारची वेळ असल्यामुळे कॅन्टीनमध्ये गर्दी अजिबात नव्हती. चहा बनायला अजून वेळ होता. त्यामुळे त्या प्रसन्न वातावरणात मस्त काम झालं. खरंच! निसर्गाच्या सान्निध्यात चहा पितानाही महत्त्वाची कामं हसत खेळत होऊ शकतात! हे कॅन्टीन पूर्वीही असतं तर माझ्यासारख्या थिअरॉटिकल - कॉम्प्यूटेशनल केमेस्ट्रीच्या संशोधन-विद्यार्थ्यांनी त्याचा किती तरी उपयोग करून घेतला असता या विचारातून मला त्या ज्युनिअरचा हेवा वाटला. कामाविषयीची चर्चा झाल्यावर आम्ही दोघांनी चहा घेतला आणि बाहेर पडलो.

लॅबमध्ये परतताना जुन्या कॅन्टीनकडे लक्ष्य गेलं आणि अनेक विचार मनात आले. पूर्वी चहा-नाश्ता करण्याचं आमचं एकमेव ठिकाण असलेलं हे कॅन्टीन आज नव्या कॅन्टीनमुळे रिकामं रिकामं वाटतंय. तिथे अगदीच कुणी जात नाही असं नाही, पण नेहमीपेक्षा गर्दी कमी झाली आहे. काल तर त्या कॅन्टीनमध्ये व्हेज-कटलेट असूनही गर्दी कमी होती! व्हेज-कटलेट हा त्या कॅन्टीनमध्ये मिळणार्‍या चांगलं म्हणावं अशा काही निवडक पदार्थांपैकी एक होता. पूर्वी कॅन्टीनमध्ये उशिरा जाणारे व्हेज-कटलेटपासून वंचित असायचे, आणि काल, व्हेज-कटलेट लोकांपासून वंचित होतं! तिथला चहासुद्धा खूप चांगला नसला, तरी म्हणावा तेवढा वाईटही नसायचा. त्यामुळे, त्या कॅन्टीनची ही अवस्था पाहून थोडं दुःख झालं. पण, नव्या कॅन्टीनमुळे लोकांसाठी पर्याय उपलब्ध झाल्यामुळे "आता दोन्ही कॅन्टीन आपापल्या सेवेचा दर्जा उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करतील" अशी आशा करून कामाला लागलो.

नवीन कॅन्टीनच्या स्वागताला पावसाळाही सुरू झाला आहे. त्यानं कॅन्टीनचा परिसरच नव्हे, तर सर्वांची मनंही प्रसन्न केली आहेत. हा नवा पाऊस मला नेहमी बालपणात घेऊन जातो. उन्हाळ्याची सुटी संपून पुन्हा शाळा सुरु होते. शाळेतल्या मित्रांची पुन्हा नव्यानं भेट, नवीन वर्ग, नवीन बाक, नवीन वह्या-पुस्तकं, सगळं कसं नवं कोरं. नवीन सुरवात करायला हा पावसाळा दरवर्षी एक नवा उत्साह घेऊन येत असतो.

पण कालांतरानं सगळं सवयीचं होऊन जातं. वह्या-पुस्तकांचा कोरेपणा चार-पाच दिवसांतच नाहीसा होतो. रोजच्या गोष्टींमधलं नाविन्यही जाणवेनासं होतं. पावसातली प्रसन्नता संपते आणि मागे उरते फक्त दलदल आणि चिखलाने माखलेले रस्ते. चौकांतले महात्म्यांचे पुतळे जसे रोजचे झाल्यामुळे दुर्लक्षित होतात तसं काहीसं होतं. खरंच, नव्या कॅन्टीनचं हे कौतुक किती दिवस राहील? कदाचित जुनं कॅन्टीन - नवं कॅन्टीन असे दोन्ही पर्याय लोक निवडू लागतील व जुन्या कॅन्टीनला पुन्हा थोडी उभारी येईल. किंवा लोकांनी पाठ फिरवल्यामुळे जुनं कॅन्टीन बंद पडेल व नवीन कॅन्टीन हाच भविष्यातला एकमेव पर्याय असेल. सवयीचं झाल्यावर नवीन कॅन्टीनचाही दर्जा खालावणार नाही असं खात्रीपूर्वक म्हणता येईल? कॅन्टीनचं काय किंवा आयुष्याचं काय? त्यातलं नाविन्य व कोरेपणा अबाधित ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला हवं. तरंच त्यात चहातला ताजेपणा व पावसाचा ओलावा टिकून राहणार.

4 comments:

कोहम said...

chaan...avadala..

Prashant Uday Manohar said...

धन्यवाद निलेश..

manali said...

Fantastic!!!

Prashant Uday Manohar said...

Thank you, Manali.