मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Monday, November 26, 2007

समुद्रलाटा

खळखळ खळखळ गर्जत येती समुद्रलाटा
किनार्‍यास चुंबुनिया फिरती समुद्रलाटा

दूरदेशि जी स्थिरावली पाखरे तयांना
मायभूमिचा निरोप देती समुद्रलाटा

कधी निरागस मुलांपरी त्या बागडती अन्
नाचत नाचत खेळत येती समुद्रलाटा

नवतरुणीसम करूनिया शृंगार साजरा
लाजत लाजत ठुमकत येती समुद्रलाटा

रविकिरणांसह आणिक रात्री चांदण्यासवे
मनमुराद त्या क्रीडा करिती समुद्रलाटा

कोलाहल जो विश्वामध्ये अखंड चाले
प्रतिबिंबित त्याला नित करिती समुद्रलाटा

त्यागियले विश्वाने जे जे, सर्व सर्व ते
स्वीकारुन उदरी साठविती समुद्रलाटा

अंतरीच्या वेदना सागरा असह्य होता
रौद्ररूप मग धारण करिती समुद्रलाटा

2 comments:

Asha Joglekar said...

प्रशांत, खूपच सुंदर समु्द्र लाटांचं वर्णन. मला समुद्रच खूप आवडतो. अन तुमचया लाटा तर फारच भावल्या. एक नवी कविता प्रवास मी पण चाकली आहे ब्लॉग वर

प्रशांत said...

धन्यवाद आशाताई.
-प्रशांत