मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Sunday, September 28, 2008

लतादीदींना

अंगाई वा प्रेमगीत वा असो ईश्वराचे ध्यान
विरह असो वा गाण्यात असो देशभक्ती महान
अंखंड राहो बरसत तुमच्या गळ्यामधुनिया तान
तृप्त करित राहो संतत ते रसिकश्रोत्यांचे कान
ध्रुवतार्‍यासम अचल "लता" हे संगीतातिल स्थान
शब्दांमध्ये अशक्य कथणे कीर्तीचे महिमान
सदा मिळो नवपिढीस तुमच्या गाण्यातुन प्रेरणा
"जुग जुग जिये लतादीदी" ही ईशचरणी प्रार्थना



आज २८ सप्टेंबर. ज्यांच्या गाण्याने "सुबह चले, शाम ढले" अशी लाखो रसिकांची दैनंदिनी आहे, त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या गायिका, भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लतादीदींचा आज वाढदिवस. लतादीदींबद्दल लिहिण्याइतकी माझी योग्यता नाही. त्यांच्या प्रतिभेला साजेसे तोलामोलाचे शब्द सुचत नसले, तरी पण एक रसिक म्हणून मला जे काही सुचलं, ते आदरणीय दीदींना प्रेमपूर्वक अर्पण करतो. त्यांना आयुरारोग्य लाभो व त्यांचा संगीतप्रवास असाच अखंडपणे चालत राहो व रसिकांना मोहिनी घालत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Saturday, September 27, 2008

आवडलेले थोडे काही

संवेदने सुरु केलेला खो-खो चा उपक्रम आवडला व त्यात सहभागी होण्याची इच्छा त्याच्या ब्लॉगवर व्यक्त केल्यावर विरोपाद्वारे त्याने मला खो दिला. तो स्वीकारून मला आवडलेल्या कविता इथे देत आहे, त्यापूर्वी संवेदने दिलेले खो-खोचे नियम इथे सर्वांच्या सोयीसाठी देतो.

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा.
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेवढ्या कविता तेवढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सार्‍यांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तिचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा.
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही.
५. अजून नियम नाहीत :)

संवेदने "एक से मेरा क्या होगा" सिंड्रोमबद्दल सांगितलं. मला तर "दो से मेरा क्या होगा" सिंड्रोमही आहे. पण तरी त्याला आवरतो आणि मला आवडणार्‍या दोन कविता इथे देतो.

पहिली कविता -

"वीज म्हणाली धरतीला" या नाटकातली आहे.
कवी -कुसुमाग्रज

चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार कंठी बांधलेली एक होती साखळी

दोन होत्या त्यांत हंसी, राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती

शुभ्र पंखांतून त्यांच्या वीज होती साठली
ना कळे एकीस की माझी लियाकत कोठली

तोडुनी आंधी तुफाने चालल्या, ती चालली
तीन होत्या दीपमाला एक होती सावली

बाण आला एक कोठुन, जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली, जात माझी कोकिळा

कोकिळेने काय केले, गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपली
साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली

ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर झाले यात सारे पावले


(ता.क. संपूर्ण कविता "आठवणीतली गाणी" या संकेतस्थळावर अत्ताच सापडली. त्यानुसार वरील कवितेत बदल केले आहेत.
-प्रशांत, २१ जून २००९)

दुसरी कविता -

कोठेही जा!
कवी - सुरेश भट

कोठेही जा दूरदूर तू माझ्यापासुन ...
माझे गीत तुला तेथेही काढिल शोधुन!

न्हाउन जेव्हा केस मोकळे देशिल सोडुन
दरवळेल हा मंदमंदसा सुगंध होउन

सहज अहेतुक तू एकांती करशिल गुणगुण ...
तुझिया नकळत स्वरात मिसळत जाइल हे पण-

वा गाण्याचा होता आग्रह सखीजनांतुन
अनाहुतासम तुझिया ओठी बसेल जाउन

आणि शेवटी असाच तुजला येता अनुभव,
तुजला माझ्या ह्या असण्याचा होइल आठव


आणि आता वेळ आली खो देण्याची -
माझा खो नीरजाआदित्य यांना.

Saturday, September 20, 2008

पाऊलवाट

सरला पाऊस तरी ओली पाऊलवाट
साठले धुके मनी आठवणींचे दाट

आठवे मोगरा स्वप्नांत बहरलेला
आठवती तरंग उठलेले पाण्यात

घर उभारले वाळूचे नयनमनोहर
घटकेत मोडले येता सागरलाट

दवबिंदू टिपण्या बागेमध्ये गेलो
पण सांज जाहली येण्याआधी पहाट

जाणीव तुझ्या नसण्याची होई नित्य
तळपे भास्कर परी अंधारले घरात

Friday, September 12, 2008

साखळी हायकू

मागच्या आठवड्यात संवेदनी काव्यमय खो खो सुरु केला. सागरनी सुमेधाच्या कवितेवर कवितारुपी प्रतिक्रिया धाडली आणि या सगळ्यातून साखळी हायकूची (हाईकूची?) कल्पना तिला सुचली.

"साखळी हायकू"साठी नियम:
१) खाली दिलेल्या सुमेधाच्या हायकूप्रमाणे तीन ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम. शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा.
३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्‍या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सूचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्‍त होणार्‍या भावनेनुसार किंवा अजून काही असेल!
४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास सुमेधाच्या ब्लॉगवर तिला कळवायचं. कळवायचा हेतू इतकाच की ती सगळ्या कड्या एकत्र करू शकेल.
५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय (ज्याच्याकडून/जिच्याकडून खॊ मिळालाय त्याची/तिची कडी) ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगचा दुवा द्या.

मला चक्रपाणिकडून खो मिळालाय. तो स्वीकारून त्यात माझी कडी ओवण्यापूर्वी सुमेधाच्या हायकूपासून माझ्यापर्यंत आलेली हायकूंची साखळी मी देत आहे. शेवटची हायकू माझी आहे. हायकू या काव्यप्रकाराबद्दल सईने तिच्या ब्लॉगवर छान माहिती दिली आहे. त्याचा उपयोग अवश्य करून घ्यावा.

माझ्यापर्यंत हायकूची साखळी आली आहे ती खालीलप्रमाणे:

रस्त्यातल्या फुलांचा
धुंद गंध दरवळला
मुक्कम तिथेच हरवला!
(इति सुमेधा)


जुन्या शर्टाच्या खिशात सापडली
रस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी
(इति चक्रपाणि)


आणि आता हायकूच्या या साखळीतली माझी कडी:

कोमेजलेली फुलं
गंध तसाच कायम तरी
तुझ्या अथांग प्रेमापरी


आणि माझा खॊ आशाताई, आनंदसौरभ यांना

Wednesday, September 10, 2008

पंखांतलं आभाळ

एक मी आभाळ आहे ठेविले पंखांत माझ्या
सप्तरंगी रंगले किरणांत जे नित भास्कराच्या

एक मी आभाळ आहे ठेविले पंखांत माझ्या
चांदण्याने बहरले जे रात्रसमयी पौर्णिमेच्या

एक मी आभाळ आहे ठेविले पंखांत माझ्या
वर्षवी मेघांमधुन जे अमृताते चातकाच्या

एक मी आभाळ आहे ठेविले पंखांत माझ्या
छ्त्र जे सर्वां तयांचे, आप्त ना विश्वामध्ये ज्यां

एक मी आभाळ आहे ठेविले पंखांत माझ्या
विरळ परी विस्तीर्णही जे, थांग नच लागे जयाचा

एक मी आभाळ आहे ठेविले पंखांत माझ्या
सांगते मज, "हे न क्षितिज, न बिंदु तुझिया थांबण्याचा"


"एक मी आभाळ आहे ठेविले पंखात माझ्या" ही ओळ एके ठिकाणी वाचली व त्यावरून कविता सुचली. इंटरनेटवर शोधल्यावर कळलं की ही ओळ चंद्रशेखर सानेकर यांच्या "स्पंदने या माणसांची" या ग़ज़लेतल्या एका शेरात आहे. असो. कविता रचली तेव्हा सानेकरांची ग़ज़ल वाचलेली नव्हती तसंच माझ्या कवितेचा आशयही त्या ग़ज़लेहून भिन्न आहे. तरीसुद्धा अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या ग़ज़लेमुळेच ही कविता करण्यास मला प्रेरणा मिळाली आहे, त्यामुळे इथे ते नमूद करणं आवश्यक वाटतं.

Monday, September 8, 2008

प्रसूतिवेदना... थीसिसच्या

पी.एच्.डी. करताना "थीसिस-लेखन" या महत्त्वाच्या टप्प्यात आलेली व्यक्ती लॅबमध्ये "हाय प्रायर्टी पर्सन" झालेली असते. "थीसिस एकं थीसिस" असं आयुष्य बनलं असताना अशा परिस्थितीत चिडचिड, वैताग, काळजी, अधीरता, इत्यादि भावना उफाळून येत असतात. माझा एक मित्र मध्यंतरी या परिस्थितीतून गेला होता व सध्या ऑर्कुटवरील एक मित्र मास्टर्सच्या प्रोजेक्टचा थीसिस लिहिताना त्याच परिस्थितीतून जातोय. या दोघांशीही गप्पा झाल्या तेव्हा त्यांना "चिंता करू नकोस. इट्स जस्ट अ स्मॉल फ़ेज इन लाईफ़" वगैरे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझं थीसिस-लेखन, त्यावेळची माझी झालेली चिडचिड आणि त्याआधीचं माझ्या सीनियर्सचं थीसिस-लेखन आणि त्यांची झालेली चिडचिड, इत्यादि सर्व गोष्टी आठवल्यात आणि हसू आलं. थीसिस-लिहिणार्‍या व्यक्तीची ही परिस्थिती आणि थीसिस सबमिट केलेल्या व्यक्तीच्या जीवनातली "झाले मोकळे आकाश" ही परिस्थिती या सर्वांचं अवलोकन करता थीसिस सबमिशनला "थीसिसची प्रसूति" म्हणायला हरकत नाही असं वाटलं. तर, या थीसिसच्या "प्रसूतिवेदना" सोसणारी व्यक्ती स्वतःशीच स्वतःच्या भावना व्यक्त करतेय अशी कल्पना करून कविता करण्याची इच्छा अनावर झाली. अचानक, कविवर्य मंगेश पाडगांवकरांची कविता आठवली व त्यावर विडंबन केलं - अर्थातच पाडगांवकरांची क्षमा मागून.



दिवस माझे हे बोचायचे
प्रसूतिवेदना सोसायचे

कामांना उरकत जाणे
त्यावरी थीसिस लिहिणे
लायब्ररीत रेफ़रन्स चाळायचे
प्रसूतिवेदना सोसायचे

गाठावी लॅबेची खोली
करावी इच्छांची होळी
चार तास फक्त झोपायचे
प्रसूतिवेदना सोसायचे

थरारे मस्तक फार
सोसेना कामांचा भार
बरेच "पापड बेलायचे"
प्रसूतिवेदना सोसायचे

अशा या नाजुक परिस्थितीत काही लोकांचे नाजुक संबंध जुळल्याची उदाहरणंही माझ्या माहितीत आहेत. खालील कडवं त्यांच्यासाठी-

माझ्या या लॅबेच्यापाशी
थांब तू गडे जराशी
तुझ्याच आशेने जगायचे
प्रसूतिवेदना सोसायचे