मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Sunday, November 4, 2007

पश्चिमरंग

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथून पी.एच्.डी केल्यावर उदरनिर्वाहासाठी मी सध्या लॉस् एन्जेलिस् (कॅलिफ़ोर्निया) येथे आलो आहे. इथे येण्यापूर्वी भारतातून अमेरिकेत जाणार्‍या लोकांना ज्या परिस्थितीतून जावं लागतं त्यातून मीही गेलो. "प्रशांत मनोहर अमेरिकेला जाणार" यावरून अनेकांची मतं, तर्क, अनुभव, इत्यादि कानांवर पडली. " आता अमेरिकेत गेल्यावर कुठे परत येणार आहेस तू! तिथेच सेटल होशील.", अमेरिकन डॉलरची घसरलेली किंमत, भारत-अमेरिका राजकीय संबंध, इत्यादि सर्व विषयांची पारायणं झालीत. या सर्व चर्चांचा केंद्रबिंदू असताना माझ्या सर्व आप्तस्वकीयांकडून भरपूर लाड करून घेतले. या दरम्यान काही दुर्मीळ गाठीभेटीही झाल्यात. या सर्व संवादानंतर "अमेरिकेत असं असेल... तसं असेल....." इत्यादि विचार सुरू असताना कल्पनेतल्या अमेरिकेचं चित्र तयार झालं.

माझा अमेरिकेत फक्त दोन वर्ष मुक्काम असणार आहे. त्यानंतरचं अजून ठरलं नसलं, तरी अमेरिकेतच मुक्काम वाढण्याची शक्यता कमी आहे. असं असूनही "तू कसला परत येतोय?..." हे किंवा या स्वरूपाचे प्रश्न लोकांना पडले, कारण इथे आलेले भारतीय सहसा भारतात परतत नाही असंच आतापर्यंत झालं आहे.

असो. व्हिसा झला, तिकिट काढलं, ठरल्याप्रमाणे प्रवास झाला आणि पाहता-पाहता अमेरिकेत येऊन एक महिना सरलाही. या दरम्यान वास्तवातल्या अमेरिकेनं माझ्या 'कल्पनेतल्या' अमेरिकेची चांगलीच विकेट घेतली. अमेरिकेत सोशल सिक्युरिटी नंबरसाठी लवकरात लवकर अर्ज करावा लागतो. कारण सर्व कार्यालयीन गोष्टी सोशल सिक्युरिटीवर अवलंबून असतात. हा अर्ज करण्यासाठी किमान दहा दिवस थांबावं लागतं, कारण ज्या विमानाने आपण अमेरिकेत येतो, त्या कंपनीकडून आवश्यक माहिती सोशल सिक्युरिटी ऑफिसमध्ये यायला तेवढा वेळ लागतो. इथे आल्यावर दहाव्या दिवशी मी अर्ज करायला गेलो असताना इमिग्रेशनच्या वेळी माझ्या नावाचं स्पेलिंग चुकवण्यात आल्याचा मला साक्षात्कार झाला. "म्हणजे आता सोशल सिक्युरिटीचं काम आणखी लांबणार! अरे देवा!... अमेरिकेतही असल्या चुका होतात!" असे विचार मनाला चाटून गेले. काम लांबल्याचं दुःख आणि "इथेही चुका होतात"चा असुरी आनंद.

स्वाभाविकच होतं. इथे आल्या आल्या खर्च बराच असतो पण पुरेसे पैसे नसतात. जे पैसे मिळणार असतात त्यासाठी सोशल सिक्युरिटी आवश्यक असते व त्याला दोन-चार आठवडे लागतात. त्यात नवा देश, नवी माणसं व त्यांबद्दल पुरेशी माहिती नसते. आपला देश, आपली माणसं यांना सोडून आल्यावर पहिल्या क्षणापासून तुलना सुरु होते. त्यात, पहिल्यांदाच आपला देश प्रिय असल्याची तीव्र जाणीव झाल्यामुळे जरा कुठे काही खुट्ट झालं, की "भारतात काय वाईट होतं? कुठून दुर्बुद्धी झाली मला इथे येण्याची? इथे काय मोठं अगदी सोनं चिकटलंय अमेरिकेला! इथल्या भारतीयांनी तरी काय पाहिलं अमेरिकेत? देव जाणे!" असे विचार पदोपदी येतात. पण ही तात्पुरती अवस्था असते. एकदा सोशल सिक्युरिटीचा अर्ज केला, की कामांना वेग येतो आणि मग याच गोष्टींकडे सकारात्मक दुष्टिकोणातून पाहू लागतो.

सोशल सिक्युरिटी ऑफिसमध्ये सांगितल्यानुसार युनिव्हर्सिटीतील संबंधित अधिकार्‍याशी संपर्क केला व नाव दुरुस्तीसाठी संबंधित कार्यालयाचा पत्ता घेतला. सुदैवानं माझा पुनःनामकरणविधी लवकर पार पडला आणि मी सोशल सिक्युरिटीचा अर्ज भरला. त्यानंतर जेव्हा भारत-अमेरिका यांच्या कामकाजाच्या पद्धतीविषयी किंवा संस्कृतीबद्दल मी तुलना करू लागलो, तेव्हा निरीक्षणातून बरंच शिकलो आणि दृष्टिकोण अधिक प्रगल्भ होत गेला.

इथे प्रत्येक कामात सुसूत्रता दिसून येते. हेच बघा ना. मी इथे आल्यावर पे-रोल, ओरिएंटेशन इत्यादि कार्यालयीन कामांसाठी गेलो असताना पासपोर्ट, व्हिसा, डी.एस्.२०१९, आय. ९४ ही डॉक्युमेन्टस् दाखवलीत. त्यावेळी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची फोटोकॉपी काढून संबंधित अधिकार्‍यांनी मला मूळ कागदपत्रं सुपूर्त केलेत. यात माझा फोटोकॉपी काढण्याचा वेळ आणि खर्च तर वाचलाच, पण 'अटेस्टेशन'ची गरज पडली नाही. "भारतातही हे आता सहज शक्य आहे..."(मनांत). इथल्या कामकाजात सर्वप्रथम नजरेत भरलेली गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा. नियमांना धरून चालणे आणि 'कस्टमर देवो भव' या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. वेळ लागला तरी चालेल, पण नियम मोडून कुणी वाहतुकीला अडथळा देण्याचे प्रकार इथे घडत नाहीत. इथे अगदी लहानातलं लहान काम असो. ते करणार्‍याला स्वतःबद्दल आणि कामाबद्दल अभिमान असतो. तो स्वाभिमान मनाला भावला - 'खालच्या प्रतीचं', 'वरच्या प्रतीचं' अशा विचारांना थारा न देणारा, माझं काम हे उत्तमच असणार असा आत्मविश्वास निर्माण करणारा. समर्पण, प्रामाणिकपणा आणि आत्मपरीक्षण यांचा अवलंब केला तर का येणार नाही आत्मविश्वास? मदत करायला सदैव तत्पर आणि 'वर्क इज वर्शिप' असं मानणारे लोक भेटू लागले आणि एकंदरीतच 'मी', 'माझा देश', 'माझी संस्कृती' या नावाखाली मी स्वतःचाच अहंकार कुरवाळतोय याची जाणीव झाली.

अहंकार? हो. अहंकारच. स्वाभिमान नाहीच. कारण, त्यात आत्मपरीक्षण नाही आणि असलेच, तर ते प्रामाणिक नाही कारण कामात समर्पण नाही. कुठल्या गोष्टींचा अहंकार बाळगत होतो? माझ्या संस्कृतीचा? नाही. कारण, संस्कृतीला जाणून घ्यायला वेळ कुणाला आहे? वेळ का नाही? - कारण, संस्कृती रामराज्याच्या गोष्टी करते. प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचार पसरला आहे. चरांचरांत!

पण मग रामराज्य म्हणजे काय? - राम हा स्वतः विष्णुचा अवतार. आणि त्याची पत्नी, धरणीकन्या सीता, ही लक्ष्मीचंच रूप होती. तिच्या पावित्र्याबद्दल रामाला तिळमात्र शंका नव्हती. तिलाही ते माहित होतं. धोब्याला मात्र शंका आली म्हणून सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. ही अग्निपरीक्षा सीतेची किंवा रामपत्नीची नव्हतीच. ती होती अयोध्येच्या राणीची. या प्रकाराबद्दल धोब्याला दंड झाला नाही. का? - कारण, आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती शुद्ध चारित्र्याची असावी हा त्याचा विचार योग्यच होता. आणि त्यासाठी वेळ पडली तर देशाची राणीही अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे हा त्या धोब्याला सीतेचा आणि रामाचा संदेश होता. जिथे प्रत्येक नागरिकाच्या पावित्र्याबद्दल धोब्यासारखी सामान्य व्यक्ती आग्रही आहे व जिथे देशाची राणीही अग्निपरीक्षेला तयार आहे तिथे रामराज्य येणारच - नव्हे, असणारच!

सीतेलाही अग्निपरीक्षा चुकली नाही. मग मला ती द्यावी लागली तर मी तयार होईन? मी अमुक आहे, मी अमक्याच अमूक, तमक्याचा तमुक, इत्यादि मुखवट्यांतून बाहेर पडेन?..... पण मीच का बाहेर पडू यातून? मी अग्निपरीक्षा देणाने काय साध्य होणार आहे? आणि जोपर्यंत समाज सुधरत नाही तोपर्यंत माझ्या प्रामाणिकपणाचा काय उपयोग? .........

9 comments:

आशा जोगळेकर said...

प्रशांत छान आहेत कविता अन् लेख सुद्धा । आपण मराठी लोक तुसडे असतो का ? एकमेकांचं चांगलं बघायचा कौतुक करायचा गुण आपल्या कडे कां नाही हा प्रश्न सारखा सतावतो. हिदी ब्लॉग वर तुम्हाला एक तरी कमेंट मिळतेच. आपण लिहावं ते छानच पण इतरांचं वाचाव पण म्हणजे खरं खुरं नेटवर्क तयार होईल . काय म्हणता ?

Unknown said...

Dear Prashant,
Excellent work man! I really like reading your blog. I am former PU Chem Ph.D.

Keep up the good work! You got really giftet talent for this.

Best wishes,
Uday

A woman from India said...

Welcome to USA.
Hope you stayed away and safe from all the wild fires.
Hope you will enjoy your stay here.

आशा जोगळेकर said...

प्रशांत परत एकदा तुझा लेख वाचला । तुझा दृष्टीकोन आवडला । तू प्रत्येक जण कसा विचार करतो ते बघतोस अन त्या मागची त्याची भूमिका समजावून घेतोस । रामाला किंवा धोब्याला बोल न लावण्या ची भूमिका आवडली । पण मी कशाला प्रामाणिक राहू हा प्रामाणिकपणा मला काय साध्य करून देणार असा विचार करू नकोस प्रामाणिकपणा इतरां करता नसून आपल्या करता असतो अन त्यानी जीवन सुखकर होतं थोडा त्रास झाला तरी ।

Chinmay 'भारद्वाज' said...

Hi,

Thanks for the comment. I will try to make changes in the Script.

It was nice to see yours and Kaku's blog.
I am from Dhantoli only.

Thanks

Chinmay 'भारद्वाज' said...

Thanks for the commment. I will make the suggested changes in the Script.

It was nice seeing you after long time. Your's and Kaku's blogs are really nice.

shrirang said...

Nice Blog !!
Farach chan anubhav lihile ahet tu,, excellent expressing skills buddy.
Lets see more stuffs on this subject in future.

प्रशांत said...

आशाताई,
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
तुमचे दोन्ही मुद्दे वाचलेत.
१. मराठी ब्लॉगमध्येही परखडपणे प्रतिक्रिया मिळतात. प्रमाण कदाचित कमी असेल.
२. या लेखात "मी कशाला प्रामाणिक राहू? ..." हे प्रश्न माझे वैयक्तिक प्रश्न नसून समाजाचाच घटक असलेल्या एका सामान्य 'मी'चे आहेत.

sangeetagod,
Thank you for the greetings.
The fire in San diego was really a disaster. However, my place is quite distant as far as fire is concerned. I also hope to enjoy the stay here.

Dr. Uday,
Thank you for the comment. Nice to know that you are also from PU.

चिन्मय आणि श्रीरंग,
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद आणि तुमच्या ब्लॉगलेखनाबद्दल अनेक शुभेच्छा!

Anonymous said...

Prashant your 'lekh' is excellent, it really conveys the feelings and thoughts of any person, who first comes here and then feels the difference as he gets slowly accustomed to the ways of life here!..Keep it up ..>Shripad Rege