मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Tuesday, December 25, 2007

तू येशील कधी

मेघांनी नभ झाकले, पसरला काळोख सर्वत्र हा
वारा वाहतसे अचानक पुन्हा ही वीज वाजे पहा
वर्षेची सर आज चिंब करण्या येऊन गेली जशी
तू येशील कधी मला बिलगण्या, आता तरी सांगशी

थंडी व्याकुळ घोर ती करितसे जीवास रात्रंदिनी
पानेही झडली तरूंवरुन ती, झाली हवा कोरडी
पुष्पांचा मधुगंध तो पसरुनी वाहे हवा मंदशी
तू येशील कधी मला बिलगण्या, आता तरी सांगशी

थंडी ती सरता धुके विरतसे कालांतराने मग
बैसोनी मग कोकिळा करितसे मंद स्वरे कूजन
येता नूतन पालवी बहरती झाडे वसंती जशी
तू येशील कधी मला बिलगण्या, आता तरी सांगशी


'शार्दूलविक्रीडित' या वृत्तात आज अचानक ही कविता जुळून आली (चाल- रामो राजमणि: सदा विजयते).

2 comments:

A woman from India said...

आमच्या इथे दुष्काळ पडलेला असताना तुमच्या LA मधे मात्रं पाऊस पडतो आहे वाटतं?
इतक्या आतुरतेने जिची वाट बघत आहात ती लवकरच तुम्हाला येऊन भेटावी ही सदिच्छा.

आशा जोगळेकर said...

वा ! वा ! वा ! प्रशांत काय आतुरता ओथंबतेय कवितेतून कसंकाय प्रमाणे मी ही म्हणते
येऊ दे झणि तुझी ती प्रिया
बहरती ही रातराणी जशी