मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Thursday, August 27, 2009

पश्चिमेचा गार वारा - भाग १

दिवस किती पटापट निघून जातात! नाही? इथे पिलाणीला येऊन महिना होत आला, कळलंसुद्धा नाही. सध्याच्या काळात इथे प्रचंड उकडतं. हवामानशास्त्रीय भाषेत बोलायचं, तर वातावरण उष्ण आहे आणि हवेत आर्द्रता आहे. त्यामुळे दुपारी अर्ध्या मिनिटासाठी जरी पंखा बंद झाला, तरी "घर्मस्नान" घडतं. आज मात्र रोजच्यापेक्षा थोडं थंड वाटलं. इथली सवय झाल्यामुळेही असेल कदाचित. संध्याकाळी घरी आल्यावर सगळ्या खिडक्या उघडल्या तेव्हा मस्त गार वारा अंगावर आला. तसा तो रोजच येतो. पण आज तो जाणवला. अमेरिकेत माझ्या घरातल्या स्वयंपाकघराचं दार उघडं ठेवल्यावर असाच वारा यायचा पश्चिमेकडून.

दोन महिन्यांपूर्वी मी अमेरिकेच्या घरातच होतो. पॅकिंग सुरू होतं आणि रिझाइन करूनही झालं होतं. त्यामुळे पाहुणेपणाची जाणीव मनाला सतावत होती. त्याच्या आधीच्या महिन्यात लॅबमधलं काम संपण्याच्या मार्गावर आलं होतं. काम पूर्ण होण्याचा आनंद, भारतात परतणार याचा आनंद, इ. इ. त्याच्या आधी?... असं करत करत अमेरिकेत घालवलेल्या पावणे दोन वर्षांमध्ये मन दोन मिनिटांत फिरून आलं. आपण जिथे काम करतो, जिथे आपलं वास्तव्य असतं, तिथल्या आठवणी मनात घर करून जातातच. पण अमेरिकेच्या आठवणींचा थोडा जास्त नॉस्टॅल्जिया आहे आज. त्याचं कारण, तिथल्या आठवणी आहेत मन भारावणार्‍या, मनात कोरल्या गेलेल्या.

अमेरिकेतली माझ्या स्मरणात कायम राहील ती गोष्ट म्हणजे ऑगस्ट २००८ मध्ये लॅबमधल्या सहकार्‍यांबरोबरचं हाईक. शनिवार दि. ९ ऑगस्ट रोजी प्रो. ऍना क्रिलाव त्यांचा बॉय फ़्रेंड आणि आम्हीसर्व लॅबमेट्स रिव्हरसाईड काउंटीतल्या मॅरियन् माउंटनपाशी ठरल्याप्रमाणे दुपारी चारच्या सुमारास पोहोचलो. सगळे जण जेवण करूनच तिथे पोहोचले होते, त्यामुळे थोडे स्नॅक्स घेऊन आपापले तंबू ठोकले. आसपासच्या परिसरात थोडंसं फिरून संध्याकाळी बार बी क्यूच्या तयारीला लागलो. ग्रुपबरोबर लॅबच्या बाहेर असं पहिल्यांदाच गेलो असल्यामुळे गप्पा भरपूर एंजॉय केल्या. त्यात सगळे अमेरिकेबाहेरचे. त्यामुळे कॅंप फ़ायरच्या वेळी, त्या विस्तवात मार्शमेलोज वितळवून कुकीजवर लावून खाण्यापासून "हे सप्तर्षी, हा ध्रुवतारा, ही उत्तरदिशा"पर्यंत सांस्कृतिक गाठोडी उघडून बरीच देवाणघेवाण झाल्यामुळे जास्त मजा आली. दुसर्‍या दिवशी (दि. १० ऑगस्ट २००८ रोजी) तिथून सव्वापाच मैलांवर व साडेचार हजार फूट उंच असलेल्या सॅन हॅसिंटो (San Jacinto) या शिखरापाशी पोहोचायचं असल्यामुळे सकाळी लवकरच हाइकिंगला सुरुवात करायची होती. त्यामुळे साधारणपणे रात्री साडेदहा-अकरा वाजता आपापल्या तंबूत जाऊन निद्रादेवीची आराधना केली.

सकाळ झाली. तेव्हा अलार्म न लावताही जाग आली. निसर्गाच्या सान्निध्यात झोप तर छान होतेच, शिवाय, सकाळी उजाडल्यावरचं वातावरण इतकं प्रसन्न असतं, की त्यावेळी लोळत पडल्याने खूप काहीतरी मिस करतोय असं वाटतं. एकापाठोपाठ सगळेजण उठले. प्रातर्विधी उरकून चहा, कॉफ़ी, नाश्ता करण्यासाठी तयारी झाली. आणि हे सगळं उरकून साधारणपणे सकाळी साडेआठच्या सुमारास सगळेजण हाइकसाठी सज्ज झाले. नकाशांचं वाटप झालं आणि कुठून कसं जायचं, कुठे हॉल्ट घ्यायचे, इ. चर्चा करून हाईकला सुरुवात झाली. "सव्वापाच मैल म्हणजे साधारण आठ किलोमिटर. चार तासात हे अंतर पार करायचं असल्यास अर्ध्या तासात एक किलोमिटर चालायला हवं. तीस मिनिटांऐवजी चाळीस मिनिटं लागली तर मधले हॉल्ट वगैरे पकडून सहा तासांत तरी पोहोचू...." अशी कॅल्क्युलेशन्स माझ्या मनात ताबडतोब सुरू होतात. आणि ते करत करत चाललं, की वेळ पटपट जातो आणि अंतर सरलेलं कळतही नाही. (अर्ध्यातासात एक किलोमिटर म्हणजे अती हळू चालणं होईल पण आधीच जास्त वेळ गृहित धरला की लवकर पोहोचल्यावर जास्त आनंद होतो. ;) )

एक दोन ठिकाणी हॉल्ट झाला तेव्हा मी, कदीर, एलिज़ा, झेनिया, लॉरा, मेलानिया आणि रेहाना रेंगाळत रेंगाळत २-३ मिनिटं उशीरा पोहोचलो. आम्ही "पाणी"ग्रहण करतोय न करतोय तोवर प्योटर, लुकाज़, वॅदीम, विताली, स्टॅस, किरिल आणि प्रो. क्रिलाव आणि जे ह्यांची विश्रांती झालेली असायची. त्यामुळे पुढल्या हॉल्टांच्यावेळी आम्ही क्रमाक्रमाने मागे पडत गेलो. रेहाना आणि मेलानिया यांना आपल्याला पाच मैल चालणं जमणार नाही असं केव्हातरी वाटलं आणि त्या मॅरियन माउंटनपाशी परतल्या. अत्तापर्यंत साधारण तीन-साडेतीन मैल आणि दोन-तीन हॉल्ट पार पडले होतो. यानंतर दर दहा मिनिटांनी मी आणि कदीर अंतर किती संपलं याचा अंदाज घेऊ लागलो. आणखी थोडं, आणखी थोडं करत करत आणखी एक मैल पार पडला.

या काळात पाठीवरील साडेचार लिटर पाण्यापैकी चार-सव्वाचार लिटर संपलं होतं. पण सोबत घेतलेली सँडविचेस तशीच होती. माझ्याजवळ तर आदल्या दिवशी "इंडियन डेझर्ट" म्हणून आणलेला आणि अर्ध्याच्या वर उरलेला शिरा होता एका डब्यात. पण तहान इतकी लागली होती, की काही खाण्याची इच्छाच होत नव्हती. आता फक्त अर्धा मैल अंतर राहिलं होतं. झेनिया आणि लॉरा थकले होते आणि त्यांनी तिथेच काहीवेळ थांबून परतण्याचा निर्णय घेतला. खरंतर मी, कदीर आणि एलिज़ाही खूप थकलो होतो. पण हत्ती गेला, शेपूट राहिलं अशी स्थिती असल्यामुळे थांबत थांबत का होईना, पण शिखरापर्यंत पोहोचायचंच, असं आम्ही ठरवलं. मग उरलेलं पाणी संपवून, दर चार-पाच मिनिटांनी एक-दोन मिनिटांची विश्रांती घेत घेत सॅन हॅसिंटो या साडेचार हजार फूट उंचावर असलेल्या शिखरावर एकदाचे पोहोचलो. थकलो होतो, पण इतक्या उंचावर पोहोचल्याचा आनंदही होता.

(क्रमशः)

1 comment:

Asha Joglekar said...

अरे वा, मस्त जमलंय हाइक चं वर्णन पुढे काय ही उत्सुकता आहेच. पिलानी ला जॉइन झाला तर.