मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Wednesday, October 7, 2009

राम-कृष्ण तौलनिक मुक्तचिंतन आणि रामाचं अवतारकार्य

सूचना: या लेखाचं मूळ प्रकाशन - ऑर्कुटवरील कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण समूहातर्फे प्रकाशित "अंतर्याम" मासिकाचा ऑक्टोबर २००९ अंक (दिवाळी विशेषांक)

श्रीविष्णूंच्या दशावतारांपैकी राम आणि कृष्ण हे दोन अवतार सर्वाधिक लोकप्रिय आहेत. महाभारतात अर्जुनाला गीतेचा उपदेश करताना "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति" असं श्रीकृष्णाने म्हटलं आहे. अर्थात धर्मसंस्थापना आणि दुष्कृतींचा नाश ही या अवतारांमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. रामाआधी विष्णूचा "परशुराम" हा अवतार होता. परशुराम चिरंजीव आहे असं मानलंय. मग विष्णूला रामाचा अवतार घेण्याची गरज का पडली असावी? असा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो. या अवतारांमागील ढोबळ उद्दिष्ट जरी एक असलं, तरी त्यात परिस्थितीजन्य फरक होते. ज्याप्रमाणे रोगाने ग्रस्त असलेल्या शरीरात आरोग्यस्थापना करण्यासाठी त्या रोगानुसार औषधाची योजना होते, त्याप्रमाणेच विष्णूने आपलं अवतारकार्य समाजात धर्माची ग्लानी झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार निश्चित केलं असावं. सीतास्वयंवराच्या वेळी रामाने शिवधनुष्य तोडल्यावर रामाची व परशुरामाची प्रत्यक्ष भेट झाली. विष्णूच्याच दोन अवतारांचं असं समोरासमोर येण्याचा हा क्षण एकमेवाद्वितीयच होता. रामात जन्मापासून विष्णूचा अंश होताच. या भेटीत शक्तिसंक्रमणाद्वारे परशुरामातला विष्णूचा अंशदेखील रामाकडे गेला. परशुरामाचं अवतारकार्य संपलं आणि रामाचं अवतारकार्य सुरू झालं याचे संकेत या क्षणाने दिले. रामात आणि परशुरामात विष्णूचे "अंश" होते, पण कृष्णात विष्णूचा अंश नसून स्वतः विष्णूच कृष्ण म्हणून पृथ्वीवर अवतरले होते. त्यामुळे कृष्णाला पूर्णावतार मानलं जातं.

राम आणि कृष्ण या दोन अवतारांमध्ये काही घटनांमध्ये साधर्म्य आहे. राम रावणाचा वध करतो आणि बिभीषणाला लंकेचा राजा बनवतो. कृष्ण कंसाचा वध करतो आणि उग्रसेनाला मथुरेचा राजा बनवतो. दोन्ही प्रसंगांमध्ये खलनायकाच्या वधानंतर त्याचं राज्य स्वतः न स्वीकारता राज्यातल्याच "योग्य" व्यक्तीला सुपूर्त करून स्वतः अलिप्त राहणे हे साम्य चटकन नजरेस पडतं. राम एकपत्नी होता. कृष्णाला मात्र सोळाहजार एकशे आठ बायका होत्या असं मानलं जातं. या संदर्भात काही वर्षांपूर्वी पुण्यात योगेश्वर प्रतिष्ठान, कोथरूड तर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एका कार्यक्रमात राहुल सोलापुरकर यांनी आकर्षक माहिती दिली होती - "बालक जन्माला येतं तेव्हा निरोगी आणि सुदृढ असल्यास त्याच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांची संख्या सोळाहजार एकशे आठ इतकी असते. (पूर्वीच्या काळातल्या संस्कृतीनुसार) पत्नी ज्याप्रमाणे पतीच्या नियंत्रणात असते, आधीन असते, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने योगसामर्थ्याने या सोळाहजार रक्तवाहिन्या आपल्या नियंत्रणात ठेवल्या होत्या. म्हणून त्यांना श्रीकृष्णाच्या बायका म्हटलं आहे. आणि श्रीकृष्णाला योगेश्वर म्हटलंय." सोळाहजार बायका असूनही श्रीकृष्णाचा उल्लेख फक्त 'राधेश्याम' असाच का बरं होतो? याबद्दल श्री. सोलापुरकर पुढे म्हणाले - "मानवी शरीरात मस्तकात चैतन्याचा स्त्रोत असतो त्याची धारा अधोगामी असते. कुंडलिनी शक्ती मूलाधारचक्रापाशी स्थित असते. चैतन्याची अधोगामी 'धारा' कुंडलिनी शक्तीला जागृत करून उलटगतीने 'राधा' बनून मस्तकाकडे परतते. या कुंडलिनीरूपी राधेवर कृष्णाची प्रीती होती आणि 'धारा'चं 'राधा' करण्याचं त्याचं योगसामर्थ्य होतं. म्हणून "राधाधर", "राधेश्याम" अशा नावांनी श्रीकृष्णाचा उल्लेख केला जातो."

महाभारताचं कथानक कौरव-पांडवांवर केंद्रित असल्यामुळे आणि कंसाचा वध कृष्णजन्मानंतर काही वर्षांतच झाल्यामुळे कृष्णाची महत्त्वाची भूमिका असूनही तो महाभारतातलं मुख्य पात्र नव्हता. नंदगावात असतानाच्या कृष्णलीला किंवा नंतरच्या काळातल्या शिशुपालवध, द्रौपदी वस्त्रहरण, द्रौपदीची थाळी, इत्यादि लहानसहान कथा कृष्णाशी निगडित असल्या, तरी एकूण अवतारकार्यातल्या या प्रसंगांची तुलना रामायणातल्या त्राटिका वध, अहल्येची श्यापमुक्ती, वालीवध, अशा तुलनात्मक कमी महत्त्वाच्या प्रसंगांशीच करावी लागेल. महाभारतात कंसवधानंतर कृष्ण खर्‍या अर्थाने झळकतो तो थेट पांडवांच्या अज्ञातवासानंतरच्या काळात. कुठल्याही समस्येवर युद्ध हा अंतिम मार्ग मानला आहे. धर्मयुद्ध टळावं यादृष्टीने पांडवांचा शांतिदूत बनून स्वतः श्रीकृष्ण हस्तिनापुरात जातो. तरीसुद्धा दुर्योधन युद्धाच्याच हट्टाला अडून बसतो. तिथे राजसभेमध्ये कृष्ण आपल्या असामान्य सामर्थ्याची चुणूक 'कृष्णशिष्टाई'द्वारे दाखवतो. रामायणात रामाने युद्धापूर्वी "शेवटचा करि विचार फिरुन एकदा" असं म्हणून शरण येण्यासाठी रावणाला एक संधी दिली होतीच. कृष्णशिष्टाईशी साधर्म्य असलेला प्रसंग रामायणात नसला, तरी रामाचा दूत म्हणून सीतेला भेटायला लंकेत पोहोचलेल्या हनुमानाने लंका जाळली तो प्रसंगही अलौकिक होता. (लंकादहन व कृष्णशिष्टाई या दोन्ही गोष्टी पूर्वनियोजित नव्हत्या.)

शांततेचा प्रस्ताव मांडल्यानंतरसुद्धा कौरवांनी युद्ध पुकारल्यामुळे त्या परिस्थितीत क्षत्रियधर्म म्हणून युद्ध करणंच योग्य आहे असा उपदेश अर्जुनाला श्रीकृष्णाने केला, हाच कृष्णाचा अवतारकार्यातला मुख्य भाग म्हणावा लागेल. आपल्या लोकांना क्षमा करावी, पण सुधारण्याची संधी दिल्यावरही ते सुधारायला तयार नसतील किंवा अधर्माला पाठिंबा देत असतील, तर त्यांना शासन केलंच पाहिजे आणि तसं करताना "हा माझा अमुक अमुक.." वगैरे नातेसंबंध आड येता कामा नये हा महत्त्वाचा संदेश भगवद्गीतेत मिळतो.

भावार्थ दीपिका, गीतारहस्य इत्यादि भाष्यांद्वारे भगवद्गीता बहुचर्चित असल्यामुळे कृष्णाचं अवतारकार्य ठळकपणे समोर येतं. रामाचं अवतारकार्य त्या तुलनेत कमी चर्चिलं गेलं. रामायणात रावणाचा वध कथानकाच्या जवळजवळ मध्यभागी झाल्यामुळे "रावणवध" हेच रामाचं मुख्य अवतारकार्य आहे असा प्रथमदर्शनी समज होतो. रावणवध आणि कंसवध यांमध्ये दुष्कृतींचा विनाश होता आणि त्यानंतर अनुक्रमे, लंकेत आणि मथुरेत धर्मसंस्थापना झाली हे जरी खरं असलं, तरी महाभारतकथा हस्तिनापुरावर केंद्रित आहे त्याप्रमाणे रामायणाची कथा अयोध्येवर केंद्रित होती. रावणवध झाल्यावरही रामायणात अजून अयोध्येचा प्रश्न सुटलेला नव्हता. रामाचं अवतारकार्य भगवद्गीतेएवढं लोकप्रिय होऊ शकलं नाही. किंबहुना, उत्तररामायणात रामाने सीतेचा त्याग केल्यामुळे रामाचं कार्य बाजूला पडून जनसामान्यांच्या नजरेत राम जणु खलनायक होऊन बसला.

रामाने सीतेचा त्याग केला यात लौकिकार्थाने सीतेवर रामाने अन्याय केला असा समज होतो. पण ही गोष्ट वाटते तेवढी सरधोपट नाही. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्ष्यात घ्यायला हवी, ती म्हणजे राम हा विष्णुचा अवतार आहे आणि धरणीकन्या सीता म्हणजे लक्ष्मीचंच रूप आहे. संपूर्ण विश्वाचं पालन करणार्‍या विष्णुला आणि लक्ष्मीला संसार करण्यासाठी पृथ्वीवर येण्याची काय आवश्यकता असणार? त्यांनी अवतार घेतले ते विशिष्ट प्रकल्प पूर्ण करण्यासाठीच. आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं तर एकाच कार्यालयात एखाद्या प्रकल्पावर काम करणारे आदर्श सहकारी एकमेकांचे नवरा-बायको असले तरी कार्यालयात असताना आपापल्या कामांशी जसे एकनिष्ठ असतात तसेच विष्णू-लक्ष्मी त्यांच्या अवतारांमध्ये आपापल्या कर्तव्यांशी एकनिष्ठ होते. संपूर्ण रामायणात "कर्तव्यपालन" ही भावना रामाच्या आणि सीतेच्या वर्तनातून व्यक्त होते. रामाने वनवास स्वीकारला कारण पित्याची आज्ञा पाळणे हे कर्तव्यच होतं. मंथरा ही कैकेयीची दासी होती. तिने कैकेयीचे कान भरले हे रामाला कळलं नसेल का? पण ते फक्त निमित्तं होतं. रावणवध होण्याकरता ही घटना घडणं आवश्यकच होतं. शिवाय एखाद्या माणसाचं नसणं त्याचं महत्त्व जितक्या चांगल्या रीतीने पटवून देतं, तितकं तो जवळ असताना ध्यानात येत नाही हेही राम जाणत होता. अर्थातच तेही साध्य झालं. रावणाचा वध होण्यासाठी केवळ राम वनवासाला जाऊन उपयोग नव्हता; सीतेलाही त्याच्याबरोबर जाणं आवश्यक होतं. "निरोप कसला माझा घेता" या गाण्यात सामान्य पत्नीचे विचार मांडण्यात आले असले तरी "जेथे राघव तेथे सीता"मध्ये सांकेतिक भाषेत सीतेला वरील गोष्ट तर सुचवायची नसेल?

वनवास संपवून अयोध्येत परतल्यावर अयोध्येचं राज्यपद रामाने स्वीकारलं. सीतेच्या पावित्र्याबद्दल रामाला अजिबात शंका नव्हती. रामाला शंका असती तर चारचौघांसमोर अग्निपरीक्षा देण्याआधी सीतेला रामासमोरच ती इतरांच्या अपरोक्ष द्यावी लागली असती. राम अयोध्येचा राजा होता. आजच्या भारतातल्या राजकीय व्यवस्थेनुसार पाहिल्यास राम राष्ट्रपती होता, पंतप्रधानही होता आणि सर्वोच्च न्यायालयातला मुख्य न्यायाधीशदेखील. सीता अयोध्येची राणी, राज्यातली उच्च पदस्थ व्यक्ती होती - आजच्या राजकीय परिभाषेनुसार केबिनेट मिनिस्टर होती. धोबी हा अयोध्येतला सामान्य नागरिक – आम आदमी. त्याला सीतेच्या चारित्र्याविषयी शंका आली, म्हणून त्याच्या समाधानासाठी रामाने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली. ही पतीने पत्नीला सांगितलेली अग्निपरीक्षा नसून केबिनेट मिनिस्टरवर आरोप झाल्यामुळे त्याचा न्यायनिर्वाळा करण्यासाठी न्यायाधीशाने मागितलेले पुरावे होते. अग्निपरीक्षेनेही धोब्याचं समाधान झालं नाही त्यामुळे अयोध्येचा राजा या नात्याने (आजच्या परिभाषेत पंतप्रधानाच्या भूमिकेतून) रामाने सीतेला 'राणी'पदावरून काढाव लागलं. त्या काळात राजाच्या पत्नीला 'राणी' व्हावंच लागत असल्यामुळे तिचा त्याग करावा लागला. तिला त्यागल्यानंतर रामाने दुसरा विवाह केला नाही ही गोष्ट विसरून चालणार नाही. सीतेला त्यागलं तेव्हा ती गरोदर होती हेही रामाला माहिती होतंच. त्यामुळे तिच्यासाठी योग्य ती सोय वाल्मिकी आश्रमात करण्यात आली होती. तिचं गर्भारपण हेसुद्धा राम आणि सीता यांचं कर्तव्यचं होतं - अयोध्येचं राज्य सोपवण्यासाठी वंशवृद्धी आवश्यकच होती. सीतेला त्यागलं नसतं, तर भविष्यात कदाचित् त्या संततीच्या औरस असण्याबद्दलही अयोध्येतल्या आम-जनतेने शंका व्यक्त केली असती आणि त्या परिस्थितीत लवांकुशांवर राज्यकारभार सोपवणं अशक्यप्राय झालं असतं. त्यामुळे सीतेचं अयोध्येपासून दूर असणंच हितावह होतं. यानंतर लवांकुशांना जन्म देऊन त्यांना योग्य वेळी रामाकडे सुपूर्त करणे एवढंच सीतेचं अवतारकार्य उरलं होतं. यथाकाल तो दिवसही उजाडला. सीतेने अग्निपरीक्षा देऊनही पूर्वी धोब्याचं समाधान झालं नव्हतं हे राम विसरला नव्हता. लवांकुशांना भविष्यात राज्यकारभार सोपवायचा होता. तेव्हा त्यांना रामाने जरी स्वीकारलं असलं तरी अयोध्यावासियांच्या मनात कुठलाही किंतू राहू नये म्हणून अयोध्यावासियांसमक्ष सीतेला रामाने तिच्या पावित्र्याबद्दल पुन्हा प्रश्न (मुद्दाम) विचारला. आणि "वन्स फ़ॉर ऑल" उत्तर म्हणून धरणीमध्ये सीता विलीन झाली... तिचं अवतारकार्य तसंही संपलंच होतं तेव्हा. "मज आणुनि द्या तो हरिण अयोध्यानाथा" आणि "डोहाळे पुरवा" या प्रसंगांमध्ये वर वर पाहता सीतेचा अल्लड स्वभाव दिसत असला तरी त्यांमध्ये सीतेने रामाला कर्तव्याची आठवण करून दिली आहे. रामायणात सीता जणु कर्तव्यनिष्ठेचा एक मापदंडच होती. सीतेचा उल्लेख "रामपत्नी सीता" असा फार कमीवेळा आहे. रामाचा उल्लेख मात्र सदैव "सीतावर", म्हणजे "सीतेला योग्य असा वर" असाच झालाय, हे त्यामुळेच.

सीतेच्या पश्चात लवांकुश जाणते होईपर्यंत केवळ कर्तव्य म्हणून राम अयोध्येचा राज्यकारभार करीत होता. लवांकुशांवर जबाबदारी सोपवण्याची योग्य वेळ जवळ आली होती तेव्हाच चर्चेसाठी त्याने काळाला पाचारण केलं. काळाशी चर्चा सुरू झाली त्यावेळी द्वारपाल म्हणून लक्ष्मणाला ठेवलं होतं. त्यानंतर महर्षि दुर्वास यांचं अयोध्येत अचानक येणं, लक्ष्मणाने त्यांना आधी अडवणं, नंतर त्यांच्या श्यापापासून त्रैलोक्याला वाचवण्यासाठी रामाची आज्ञा मोडणं, आणि घडलेल्या पूर्ण प्रकाराबद्दल प्रायश्चित्त म्हणून आधी लक्ष्मणाने आणि नंतर रामाने शरयूत जलसमाधी घेणं या घटना एकापाठोपाठ घडतात तिथे रामाचं अवतारकार्य संपतं. संपूर्ण रामायणात कर्तव्यपालनाचं सूत्र तर आहेच. पण खर्‍याखुर्‍या लोकशाहीची संकल्पनादेखील दिली आहे. जिथे मंथरा, धोबी अशा सामान्य जनतेच्या शब्दाला किंमत आहे आणि जिथे राज्यकर्ता अग्निपरीक्षा देण्यास आणि वेळ पडली तर जनतेच्या इच्छेचा मान राखून पदच्युत होण्यास तत्पर आहे तिथे "रामराज्य" असणारच.

॥इति॥

7 comments:

Anonymous said...

योगवसिष्ठातील तत्त्वज्ञानावरून ६राम हा जागृत आणि स्वप्नावस्था या दोनच स्थितीत सुखदुःखाची जाणीव होते व त्याच पातळीवर सुखदुःखाचा विचार करावयास हवा असे मानणाय्रा हिंदू धर्माच्या संप्रदायाचा होता, तर कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे जागृती, स्वप्नावस्था व निद्रावस्था या तिन्हीवर नियंत्रण ठेवणारी मानवाची चौथी स्थिती असून त्या स्थितीनुसार सुखदुःख या फक्त घटना आहेत. त्या योग्य वा अयोग्य असू शकतात.

प्रशांत said...

@anonymous
योगवसिष्ठातील महत्त्वपूर्ण माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. :)

Parag Vasekar said...

Nice article. Got new dimensions to already known contexts.

Asha Joglekar said...

ही सगळी राजकीय भाषा वापरून कितीही उदात्तीकरण केलं तरी रामानी पती धर्म पाळला नाही हेच खरं । सीते च्या बाजूने तो कधी ही ठाम पणे उभा राहिला नाही । शेवटी तिला एकटी ला वनांत सोडतण्या ची जबाबदारी ही तो लक्ष्मणा वर सोडून मोकळा झाला । त्याला फक्त लोक काय म्हणतील हाच प्रश्न सतत छळत राहिला ।

Rahul Apte said...

'निराशा' करणारी प्रतिक्रिया. देह धारण करणार्याला स्थळ, काळ आणि परिस्थितीच्या मर्यादा येतात. जनरीत पाळावी लागते. अवतार असला तरी! नाही तर ज्ञानदेवांना 'शुद्धी पत्र' देण्याच्या लायकीचा माणूस या भूतलावर होता तरी का? 'राजकीय', 'उदात्तीकरण' हे सगळं अनाठायी आहे. अर्वाचीन काळाचे मापदंड त्या काळी लागू होत नव्हते हे लक्षात घ्यायला हवं.

Nikhil Sheth said...

लोकापवादम बलवान मतो मे

प्रभाकर कुळकर्णी said...

excellent blog. very good posts.