मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Saturday, January 30, 2010

मांडवपरतणी

नव्या गावी जाणे आले
चालणे शोधीत वाट
मागे वळून पाहता
दिसे धुके घनदाट

नव्या गावामध्ये माझ्या
सारेच दिसे नवीन
पोचताच दिमाखात
स्वागत करती जन

सरबराई होतसे
प्रेमाने भरभरून
जुन्या आठवांत पण
आज हरवले मन

फिरूनिया एकदाच
मन जाई जुन्या गावा
सग्यासोयर्‍यां भेटून
क्षणभर घे विसावा

घेई गगनभरारी
विसावून क्षणभर
नवे गाव वाटू लागे
प्रेममायेचे आगर

जुने वाटे दूर आता
वाटे हेच माझे घर
नवीन गावच माझी
स्वप्ने आता साकारेल

8 comments:

Rahul said...

wah, kya baat hain!!! Keep it up!!! I wish you succeed at every station in life. But be sure to cherish your home all throughout your life. And if you ask where is your home, then my answer is "Home is where the heart is". Great!!!

Naniwadekar said...

> पोचताच दिमाखात
> स्वागत करती जन
>

श्री मनोहर : असल्या ओळी पद्‌यरचनेत अजिबात शोभत नाहीत. तीन अक्षरी शब्दांनी सुरवात होणार्‍या ओळीही अष्टाक्षरीत सहसा बसत नाहीत, पण अपवादानी ('भासते भू तारकांच्या - आसवांनी ओलसर') अशी एखादी ओळ चालू शकते. तुम्ही मात्र अशा पाच ओळी लिहिल्या आहेत. हे ज़रा-अति नाही तर अति-अति होतंय.

अनुष्टुभही अष्टाक्षरीचा प्रकार असला तरी त्यात मात्र तीन अक्षरी शब्दाची सुरवात चालते.
गिरीचे मस्तकी गंगा - तेथूनी लोटिली बळे
धबाबा लोटल्या धारा - धबाबा तोय आदळे
(सगळेच चरण तीन अक्षरी सुरवात)
- किंवा
कर्मण्ये वाधिकारस्ते

- नानिवडेकर

प्रमोद देव said...

छान आहे कविता...चालही लागलेय. ;)

प्रशांत said...

राहुल, नानिवडेकर, देवकाका,
अभिप्रायांबद्दल खूप खूप धन्यवाद.


नानिवडेकर,
छंदबद्ध कविता लिहिताना आशय १००% पोचवतानाच यमक आणि अक्षरसंख्या-मात्रादि नियम काटेकोरपणे पाळण्यात ज्या प्रमाणात कौशल्य प्रमाणात लागतं, त्या मानाने त्याची दखल (कौतुक असो किंवा टीका) क्वचितच घेतली जाते. तुम्ही आवर्जून माझ्या कवितेतले दोष सांगितले याबद्दल मी आभारी आहे. अष्टाक्षरी छंदामध्ये आठ अक्षरांच्या ओळी आणि समक्रमांकांच्या ओळींमध्ये यमक एवढंच माहिती होतं. पण तुमच्या अभिप्रायामुळे माझ्या ज्ञानात भर पडली. आशयाला धक्का न लागता योग्य बदल करण्याचा प्रयत्न नक्की करेन. अशी परखड वैचारिक देवाणघेवाण होवो ही इच्छा.
धन्यवाद.
-प्रशांत

आशा जोगळेकर said...

प्रशांत मस्तच आहे कविता . नवं ते स्वीकारावं इतकंच नव्हे तर तिथे भरभरून यशस्वी व्हावं. । परत पिलानी ला ना ?

क्रांति said...

सुंदर!

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

नानिवडेकर,
कर्मण्ये वाधिकारस्ते हे जरा अति अतिच झाले! संस्कृतमध्ये असा आपल्या मनाप्रमाणे शब्द तोडता येत नाही. एक तर कर्मण्येवाधिकारस्ते किंवा कर्मणि एव अधिकार: ते ।

Naniwadekar said...

श्री फडणीस : माहितीबद्‌दल धन्यवाद. मला संस्कृत येत नसल्यामुळे मी वाक्ये वेबवरून ज़शीच्या तशी टाकतो. मी हे वाक्य कुठून उचलले हे आता आठवत नाही. 'जगत: पितरौ वन्दे' हे अनुष्टुभातले तीन अक्षरी चरणारम्भाचेही उदाहरण चालले असते.