मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Friday, April 30, 2010

ग्रीष्मातला पाऊस

निंबवृक्ष दारचे, आज बोलले जणू
तेजसे तुझ्या रवे, माझि त्रासली तनू

वृक्ष मी इथे उभा, देत सावली चरां
उष्णता तुझी मला, सोसवे न भास्करा

तापली वसुंधरा, तापल्या दिशा दहा
तापल्या हवे अता, शीतळून तू वहा

ग्रीष्मकाळप्रकृती, तापवी धरा रवी
आज मात्र वृक्षही, नीरदेव आळवी

हृदय द्रावले तदा, नीरदेव जागले
वाहला समीर अन्, गगनि मेघ दाटले

वीज ती कडाडली, घन क्षणात वर्षले
वृक्ष, वेलि, प्राणि, सर्व, तृप्त तृप्त जाहले

4 comments:

Rahul said...

bahut achche, keep it up Mr. Shagird!!!

Naniwadekar said...

'माझि त्रासली तनू' शब्द वापरले तर पहिली तीनही कडवी गा-ल-गा-ल---गा-ल-गा या 'सुकामिनी' वृत्तांत बसतात. तर एकच चरण 'मदीय' वगैरे लिहून ८ वर्णांचा का केला? 'स्वभाव ग्रीष्मकाळचा' मधे परत ८ वर्ण आले. तिथून गोंधळ वाढतच गेला. ज़रा जास्त काळजी घेतली, कविता छापायची घाई केली नाही, योग्य शब्दांची निवड केली तर ही सुकामिनी-तली दोषरहित चांगली रचना ठरू शकेल.

प्रशांत said...

नानिवडेकर,
अभिप्रायाबद्दल आणि ई-पत्रव्यवहाराबद्दल धन्यवाद.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे थोडा विचार केला आणि सर्व कडवी मात्रांमध्ये बसवण्याचा प्रयत्न केलाय. संबंधित बदल कवितेत केले आहेतच. शेवटच्या कडव्याची शेवटची ओळ अपवाद आहे. तिथे "सर्व" ऐवजी "ते" वापरल्यास मात्रांमध्ये बसेल ओळ. पण "सर्व"मधला अर्थबोध नष्ट होईल. त्यामुळे ती ओळ तशीच ठेवली आहे.

Asha Joglekar said...

वीज ती कडाडली, घन क्षणात वर्षले
वृक्ष, वेलि, प्राणि, सर्व, तृप्त तृप्त जाहले
अगदी पहिल्या वर्षावाचा आनंद झाला .