मनोगत
"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.
आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत
Sunday, July 29, 2012
Friday, July 20, 2012
जो जे वांछील तो ते लाहो
मूल जन्माला येतं तेव्हा सुरुवातीला भूक, झोप आणि मलमूत्रत्याग याच क्रिया त्याच्या आयुष्यात असतात, पैकी मलमूत्रत्याग आणि झोप या सहज प्रवृत्ती असल्यामुळे "भूक" हीच मूलभूत इच्छा असते. भूक लागली की बाळ रडतं. मग आई त्याला पाजायला घेते. भूक शमल्यावर बाळ शांत होतं. कधीकधी बाळ भूक लागली नसतानाही रडतं. भयावह स्वप्न पडणे, थंडी वाजणे, उकडणे, डास, मुंगी किंवा इतर काही चावणे, अशी काहीही कारणं असू शकतात. त्यांचं निराकरण होताच बाळ पुन्हा शांत होते. थोडक्यात, कशाची तरी कमतरता जाणवली किंवा असुरक्षितता/असहाय्यता जाणवली की बाळ रडतं. मला अमूक हवंय हे सांगण्याकरता रडणे हेच एकमेव साधन असतं त्याच्याकडे. हे अमूक म्हणजे अन्न, सुरक्षिततेची हमी देणारा स्पर्श किंवा देहाला होणारा त्रास दूर करण्याचे उपाय. ते पूर्ण होताच बाळ शांत होतं! इथे वांछिणे बाळाला बोलून व्यक्त करता येत नसलं तरी आपण नेमकं भुकेसाठी रडतोय की भीती वाटल्यामुळे की उकडतंय म्हणून की अन्य काही कारण आहे, हे त्याला अचूक समजलेलं असतं. पण रडून व्यक्त झालेल्या बाळाने नेमके काय वांछिले आहे हे इतरांना समजणं कठीण आहे. मग ते रडणं थांबवण्याचे उपाय सुरू होतात. योग्य उपाय होताच वांछिलेले "लाहल्याची" पावती मात्र बाळ तत्परतेने देतं. पुढे बाळ मोठं झालं की इच्छा व्यक्त करण्यासाठी चेहऱ्यावरील भाव, हातवारे, खुणा करणे, बोलणे इ. गोष्टी हळू हळू अवगत होतात तेव्हा त्याला त्याच्या इच्छा जास्त प्रभावीपणे मांडता येतं. पण हे सगळं एकाच जीवाबद्दल झालं. आणि तेही त्याच्या साध्या इच्छांबद्दल!
वय वाढत जात त्याबरोबर इच्छांचे प्रकारही वाढत जातात. या जगात मी एकटा नसून माझ्यासारखे अनेक आहेत आणि त्या सर्वांनाच इच्छा-आकांक्षा आहेत याची जाणीवही होते. मग या इच्छा-आकांक्षा बाळगण्यापासून त्या पूर्ण करण्यापर्यंत स्पर्धा सुरू होते. उदा. एखाद्या राज्य/देशपातळीवरील स्पर्धेत/परीक्षेत पहिल्या क्रमांकावर यायची माझी महत्त्वाकांक्षा आहे तशी इतर काही लोकांचीसुद्धा आहे. ग्राहक म्हणून मला किराणा, गृहोपयोगी वस्तू स्वस्त हव्यात. पण दुकानदार म्हणून मला नफ़ाही मिळायला हवा. मला मधुमेहाचा त्रास असल्यामुळे गोडपदार्थ शरीराला अपायकारक आहेत. पण माझ्या जिभेला सतत गोड खाण्याची इच्छा होते!
इच्छापूर्तीच्या स्पर्धांची व्याप्ती वाढत जाते आणि त्यातून महत्त्वाकांक्षा, दुराग्रह, इ. इच्छेची उग्र रूपे जन्म घेतात. त्यानंतर माझी महत्त्वाकांक्षा त्याच्या/तिच्या महत्त्वाकांक्षेपेक्षा जास्त महत्त्वाची कशी आहे हे स्वतःलाच समजावण्याचा "स्वार्थ"ही जन्माला येतो आणि पाठोपाठ स्वार्थजन्य आकांक्षा येतात त्या वेगळ्याच! मग माझा देश त्यांच्या देशापेक्षा कसा श्रेष्ठ आहे यापासून माझा प्रांत, माझं शहर, माझी कॉलनी, माझे जातीबांधव, इ. पर्यंत स्पर्धा चालूच राहतात आणि सगळ्याच इच्छा पूर्ण होत नसल्यामुळे/वेळेवारी पूर्ण न झाल्यामुळे अतृप्त झालेला माणूस कायदे मोडतो, शिष्टाचार पाळत नाही, धर्मबाह्य वर्तन करतो.
मग प्रश्न पडतो, की "जो जे वांछील तो ते लाहो" हे मागणे अशक्य आहे काय? अर्थातच नाही! "वांछील" आणि "लाहो" हे शब्द वाटतात तितके सोपे खचितच नाहीत. वर पाहिलेल्या उदाहरणात आपण परस्परविरोधी इच्छांमध्ये स्पर्धा कशी निर्माण होते ते पाहिलं. यात जिंकलेल्या स्पर्धकांची काय अवस्था होते? स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर आल्यावर आनंद होतो, पण तो क्षणभंगुर आहे. तो संपताच पुढल्या स्पर्धेच्या तयारीला लागायचं. पुन्हा जिंकल्यास पुन्हा आनंद होईल, पण तोही क्षणभंगुर असेल! थोडक्यात, स्पर्धा जिंकणे ही इच्छा असली तरी "जिंकल्याचा आनंद नष्ट संपलेला असणे" ही बाब पुढल्या स्पर्धेत भाग घेण्यास कारण होते. मधुमेहाचा त्रास असताना गोड खाल्ल्यास त्रास होत असला तरी गोड खाल्ल्याबरोब्बर जिभेला जे क्षणिक समाधान होते, त्याची पुनरावृत्ती व्हावी असे वाटल्यामुळे त्रास होत असूनही गोड खाण्याची जिभेला इच्छा होते. बाळसुद्धा भूक शमल्यावर, भीती संपल्यावर, इ. शांत होते ते या आनंदानुभवामुळे!
मग नेमकी इच्छा कशाची? स्पर्धेत पहिला येण्याची, की गोड खाण्याची की तो (क्षणिक का होईना!) आनंद अनुभवण्याची? ती स्पर्धाच नसती, तर? देवाने जिभेला चवच दिली नसती तर? तर कदाचित् त्या त्या इच्छाही उद्भवल्या नसत्या! यावरून असे वाटते की "जो जे वांछील" मधल्या "वांछिणे"चा गर्भित अर्थ म्हणजे या आनंदापासून दूर असण्याचे नेमके कारण. इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन कर्तव्यनिष्ठ राहून हे कारण दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत राहिल्यास ते कारण कधीतरी पूर्णतः संपेल आणि जीवाला तो आनंद अखंड अनुभवण्याची स्थिती प्राप्त होईल. या स्थितीला जाऊन मिळणे (to attain the state of equibrium) म्हणजेच "लाहणे" असेल. “गांधीगिरी", “गेट वेल् सून कार्ड पाठवणे" यातला गंमतीचा, करमणुकीचा भाग सोडा. पण दोन किंवा अधिक माणसं असोत किंवा प्रांत, राज्य, देश इ. समाजातले गट असोत. त्यांच्यातील भांडणांचं/शीतयुद्धांचं मूळ अपूर्ण राहिलेल्या इच्छांमध्ये आहे हे १००% खरं आहे.
संत ज्ञानेश्वरांचे हे मागणे इतके व्यापक आणि सर्वसमावेशक आहे, की त्याचा वेध घ्यायला बुद्धी आणि ज्ञान अपुरे पडतात आणि त्यातून जे आकलन होईल ते व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात. त्यामुळे यावर अधिक लिहिण्यापेक्षा देवाला हीच प्रार्थना की "जो जे वांछील तो ते लाहो".
Friday, March 16, 2012
आयुष्य (२)
असेल निरस
करण्या सुरस
देव स्मरा
आयुष्याची चाल
आडवळणांची
लीला ही देवाची
अप्रमेय
आयुष्याचे चित्र
गूढ नी अमूर्त
कोण साकारित
देवावीण?
देवाने घातले
आयुष्यात रंग
तयांमध्ये दंग
जीव झाला
Sunday, January 22, 2012
प्रचंड गारठा
भाग १:
------
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......!
बर्फ़च घेऊन जणु बाहेर वाहतोय सुसाट वारा !
सूर्यकिरणांनी चकाकतोय दवबिंदू... की पारा?
निसर्गाने उघडलाय बघ! सौंदर्याचा गाभारा....
माझ्या हातात तुझा हात उबदार जरा...
तुझ्यासवे चालत चालत सरावा जन्म सारा....
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......!
तुझ्यासह घालवलेला क्षण अन् क्षण न्यारा....!
------
भाग २:
------
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......!
पहाटे पहाटे पेपरवाल्याने बेल वाजवली कराकरा..
आज रविवार! पुन्हा दुलई ओढून साखरझोप घ्यावी जरा.

सकाळी सकाळी "ही" का आवरतेय आज घरातला पसारा?
मिळेल का आज अंथरुणातच गरमागरम चहा जरा?
"अहो, उठा! .... इतका आळस नाही बरा."
प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा...... !
आता उठा राव लवकर.. चढण्याआधी "हिचा" पारा.....!!
Thursday, February 10, 2011
मोहोरी
Thursday, September 30, 2010
तुझ्या-माझ्यात
शांतता नभात
अशा रम्य वेळी
आणि तुझी साथ
आकाश निरभ्र
रात्र चांदण्याची
अन् तुझा चेहरा
आभा चंद्रमाची
एक हास्य तुझे
गालावर खळी
मिटता पापणी
गुलाब-पाकळी
मंद वाहे वारा
हवेत गारवा
आणि तुझा स्पर्श
सुगंधी मरवा
तू माझ्या मनात
मी तुझ्या मनात
आणि तुझे माझे
हातांमध्ये हात
Monday, August 30, 2010
पाऊस-कविता
"पाऊस" या विषयावर अनेक कवींनी अनेक कविता केल्या असल्या, तरी पाऊस जसा हवाहवासा वाटतो तशा कविताही हव्या हव्याशा वाटतात. दोन-तीन वेळा पावसावर एक-दोन ओळी सुचल्या, पण सलग कविता काही सुचली नाही. :( मग विचार केला, की मराठी ब्लॉगबांधवांची मदत घ्यायला काय हरकत आहे? या पूर्वी "जे जे उत्तम", "आवडलेले थोडे काही", "साखळी हायकू" किंवा अगदी अलिकडच्या "मावसबोलीतल्या कविता" अशा अनेक उपक्रम मराठी ब्लॉगजगतात छानच प्रतिसाद मिळाला. त्यातून असा विचार आला, की पावसावरील कडव्यांची साखळी का करू नये?
तेव्हा, ब्लॉगबंधु-भगिनींनो, "पाऊस-कविता" पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम -
१. शक्यतो छंदबद्ध कडवे तयार करू. अगदीच नाही जमलं तर मुक्तछंद चालेल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? कविता गुंफ़ायची असल्यामुळे आधीचा कडव्याशी थोडासा तरी संबंध असावा.
२. छंदाचं नाव माहिती असल्यास ते कळवावे. त्याबद्दल माहिती दिली तर छानच. अर्थात नाही दिली तरी चालेल.
३. किमान एक व जास्तीत जास्त चार ब्लॉगबांधवांना खो देता येईल. संबंधित ब्लॉगलेखकास प्रतिसाद देऊन तसे कळवावे.
४. खो मिळाल्यावर ज्याच्या/जिच्याकडून खो मिळाला आहे त्या ब्लॉगलेखकाच्या पोस्टाचा दुवा आपल्या पोस्टात द्यावा व शक्य असल्यास आधीची कडवीही उतरवावीत. तसेच आपण खो स्वीकारल्यावर त्या पोस्टाचा दुवा खो देणाऱ्या पोस्टाच्या प्रतिसादात कळवावा, जेणेकरून आधीच्या लोकांनाही नोंद ठेवता येईल.
५. हे नियम सर्वांच्या सोयीसाठी डकवावे.
६. बस्स. आणखी काही नियम नाही. :-) आता फक्त पाऊस-कविता....
मग करायची सुरुवात?
माझं कडवं - (भुजंगप्रयात छंद)
न क्रोधी असा पावसा रे सख्या रे
तुझी वाट पाहे सखी मी तुझी रे
झणी येउनी वर्ष रे थेंब थेंब
तुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब
माझा खो -चक्रपाणि, क्रांती, गायत्री, अ सेन मन यांना