मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Wednesday, June 17, 2009

मराठीचा विकास - प्रतिशब्दांनी की शब्दांच्या मराठीकरणाने?

"मराठी वाचवा - कोणती?" या शीर्षकाचा निबंध शांता शेळके यांच्या "गुलाब काटे कळ्या" या पुस्तकात काही वर्षांपूर्वी वाचला होता. मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल आणि विकासाबद्दल आस्था असलेल्यांनी अवश्य वाचावा असाच निबंध होता तो. आज मराठी साहित्याच्या संगणकीय युगाचा उगम आणि विकास झाला असल्यामुळे त्याबद्दल लिहिणं अप्रस्तुत ठरणार नाही.

इंटरनेटवरील मराठी साहित्यासाठी व्यासपीठ निर्माण करणार्‍या मायबोली, मनोगत, उपक्रम, मिसळपाव व गुगल, याहू, वर्डप्रेसने ब्लॉगलेखनासाठी उपलब्ध करून दिलेली माध्यमं लोकप्रिय होऊन अनेक वर्षे झालीत. मी तसा या मराठी-ई-विश्वात फार नवीन नसलो, तरी फारसा जुनाही नाही. ब्लॉगलेखन वगळल्यास इतर ठिकाणी फारसा सक्रिय नाही. (मायबोलीवरील दोन वर्षाच्या काळात दोन हायकू, तीन प्रतिक्रिया आणि तीन सदस्यांची विचारपूस केल्याने कोणी मायबोलीकर होत नाही.) या काळात मराठी संकेतस्थळांवरची शितं वेचल्यावर "महाजाला"वरील भाताबद्दल जे ज्ञान झालं, ते शांता शेळके यांनी उपरोक्त निबंधात मांडलेल्या विचारांपेक्षा फारसं वेगळं नाही. "उद्घाटन"ऐवजी "विमोचन", "साजरा होणे"ऐवजी "संपन्न होणे", इत्यादि वाक्प्रचारांचा भडिमार होत असल्याबद्दल शांताबाईंनी त्यांच्या निबंधात चिंता व्यक्त केली होती.

इंटरनेटवरील इंग्रजी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द सुचवताना बर्‍याच प्रमाणात असं होतंय असं मला वाटतं. मराठीच्या नावाखाली संस्कृत शब्दांचा भडिमार होतोय. उदा. महाजाल, जालनिशी, इत्यादि. विरोप ह्या शब्दाचं मूळ मात्र समजलं नाही. हा शब्द शब्दबंधच्या सदस्यांच्या पत्रव्यवहारांअंतर्गत मीसुद्धा वापरला होता एकदा, पण मला तो पटला नव्हता. त्यापेक्षा "ई-पत्र" हा शब्द जास्त सुटसुटीत वाटतो. मायबोलीवरील "वीकांत" हा शब्द मात्र मनापासून आवडला. "वीक एंड" या इंग्रजी शब्दाला मराठीत कौशल्याने रुजवल्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. "वीकांत" हा धेडगुजरी शब्द वापरण्यापेक्षा "सप्ताहांत" हा शब्द जास्त सरस आहे असं काही दिवसांपूर्वी एका ब्लॉगर सदस्याने ई-पत्राद्वारे सुचवलं होतं, पण मी त्याकडे (सोयीस्करपणे ;) ) दुर्लक्ष्य केलं. "सप्ताहांत" शब्दात इंग्रजीचा अंश नसला, तरी "सप्ताह" आणि "अंत" या दोन्ही संस्कृत(च) शब्दांपासून निर्माण झालेला हा शब्द (संस्कृतभाषेत वापरायला चांगला असला तरी) मराठी भाषेला सगोत्र विवाहित दांपत्याच्या पोटी जन्मणार्‍या जनुकीय दोषयुक्त अपत्याप्रमाणे खिळखिळं करणारा वाटतो.

संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, पैशाची, अर्धमागधी, पाली या सहा मूळ भाषांपासून जन्मलेल्या व फार्सी, अरबी व इतर अनेक भाषांच्या संस्कारांनी बाळसं धरलेल्या मराठीला संस्कृत शब्द भविष्यात गिळणार की काय, अशी भीती वाटते. "संस्कृत ही भाषांची जननी आहे" किंवा भाषा गंगेच्या पाण्यासारखी निर्मळ, पवित्र असावी, वगैरे गोष्टी मलाही पटतात. पण, गंगा नदी गंगोत्रीतून उगम पावते, तिला पुढे असंख्य झरे सामील होतात आणि अशाप्रकारे वाढत वाढत ती सतत पुढे वाहत समुद्राला जाऊन मिळते म्हणून मोठी आणि पवित्र होते. मात्र, ती जर उलट्या दिशेनं गंगोत्रीकडे वाहू लागली, तर गंगोत्रीतच लोप पावेल. संतकवी दासगणू यांनी म्हटल्याप्रमाणे "ओहोळ पोटी घे गोदावरी | म्हणुनी म्हणती तीर्थ तिला ||" .

तात्पर्य, मराठी प्रतिशब्द शोधण्यात काहीच गैर नाही. पण मराठी प्रतिशब्दांपेक्षा जर इतर भाषांमधल्या शब्दांचं मराठीकरण करता आलं, तर ते मराठीच्या भव्यतेचं व समृद्धतेचं एक प्रतीक होईल. नाही का?

4 comments:

Dk said...

१००% सहमत आहे. आग्रह असावा अट्टाहास नव्हे. :)

मनिषा लिमये said...

मराठी प्रतिशब्द शोधण्यात काहीच गैर नाही. पण मराठी प्रतिशब्दांपेक्षा जर इतर भाषांमधल्या शब्दांचं मराठीकरण करता आलं, तर ते मराठीच्या भव्यतेचं एक प्रतीक होईल. नाही का?<<<<<<

प्रशांत या वाक्याला १००% अनुमोदन


******************
मला स्वता:ला अस वाटत की समोरच्याला आपलं म्हणणं १००% समजणं महत्वाच , आपल्याला जे सांगायचय ते त्याच्यापर्यंत पोचणं महत्वाच. मग हे हिंग्लिश असो की मिंग्लिश. भाषेच्या भाषांतराचा अतिरिक्त वापर क्लिष्टता वाढवुन जनसामान्यांना त्या भाषेपासुन दुर नेतो.
प्रशांत मागे आपलं यावर खुप बोलणं झालं होत. ते गुबोल वगैरे मला काही पट्ल नाही. लोक तो शब्द वेगळेपण म्हणुन वापरतायत त्यांनी मराठीकरण स्विकारलय म्ह्यणुन नव्हे. त्यामुळे लांबलचक आणि अवघड प्रतिशब्द शोधत बसण्यापेक्षा आपल म्हणण थोडक्यात पण अचुक मांडा म्हणजे ते इतरांना समजेल.
ते "दुग्धशर्करायुक्त घनगोल गट्टु" वापरण्यासाठी नसतात.
आणि भाषेची अभ्यासक म्हणुन सांगते.....प्रत्येक भाषेत बॉरोईंग हा प्रकार असतो जो भाषेला जीवंत ठेवतो आणि तिचा विकास करत असतो. त्यामुळे इतर भाषेतील शब्द वापरण्यास काहीच हरकत नसावी. ते भाषेच्या जीवंतपणाचे लक्षण आहे. मात्र त्याच्व्हा अतिरेक होऊ देऊ नये हे तत्व सांभाळले तर कोणत्याच भाषेला कधीही मरण नाही.

आशा जोगळेकर said...

खरंय भाषेचा विकास होण्या साठी अन् भाषेला वाहातं अन जिवंत टेवण्या साठी इतर भाषां चे शब्द सामावले जातात अन ते जावेत. इंग्रजीत सुध्दा हिंदी मराठी शब्द शिरले आहेतच . पंडित हा शब्द किवा गुरु हा शब्द.
सप्ताहांत पेक्षा वीकांत हा सुटसुटीत आहे हे नक्कीच.

Parag Vasekar said...

प्रशांत, 'वीकांत' साठी तू दिलेले सगोत्र दाम्पत्याचे उदाहरण फारच चपखल आहे, आता हा शब्द माझ्या कायमचा लक्षात राहणार आहे !