मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Friday, July 20, 2012

जो जे वांछील तो ते लाहो

एक-दोन आठवड्यांपूर्वी बाबा पसायदान म्हणत असताना “जो जे वांछील तो ते लाहो"  या ओळीकडे सहज लक्ष्य गेलं. या ओळीचा सरधोपट अर्थ असा आहे, की ज्याची जी इच्छा असेल ती‌ पूर्ण होवो. वर वर पाहता हे फारच सोपं आणि सामान्य आहे असं वाटतं, पण खोलवर विचार करायचा प्रयत्न केल्यास हे मागणे किती गहन आणि व्यापक आहे हे लक्ष्यात येतं.

मूल जन्माला येतं तेव्हा सुरुवातीला भूक, झोप आणि मलमूत्रत्याग याच क्रिया त्याच्या आयुष्यात असतात, पैकी मलमूत्रत्याग आणि झोप या सहज प्रवृत्ती असल्यामुळे "भूक" हीच मूलभूत इच्छा असते. भूक लागली की बाळ रडतं. मग आई त्याला पाजायला घेते. भूक शमल्यावर बाळ शांत होतं. कधीकधी बाळ भूक लागली नसतानाही रडतं. भयावह स्वप्न पडणे, थंडी वाजणे, उकडणे, डास, मुंगी किंवा इतर काही चावणे, अशी काहीही कारणं असू शकतात. त्यांचं निराकरण होताच बाळ पुन्हा शांत होते. थोडक्यात, कशाची तरी कमतरता जाणवली किंवा असुरक्षितता/असहाय्यता जाणवली की बाळ रडतं. मला अमूक हवंय हे सांगण्याकरता रडणे हेच एकमेव साधन असतं त्याच्याकडे. हे अमूक म्हणजे अन्न, सुरक्षिततेची हमी देणारा स्पर्श किंवा देहाला होणारा त्रास दूर करण्याचे उपाय. ते पूर्ण होताच बाळ शांत होतं! इथे वांछिणे बाळाला बोलून व्यक्त करता येत नसलं तरी आपण नेमकं भुकेसाठी रडतोय की भीती वाटल्यामुळे की‌ उकडतंय म्हणून की अन्य काही कारण आहे, हे त्याला अचूक समजलेलं असतं. पण रडून व्यक्त झालेल्या बाळाने नेमके काय वांछिले आहे हे इतरांना समजणं कठीण आहे. मग ते रडणं थांबवण्याचे उपाय सुरू होतात. योग्य उपाय होताच वांछिलेले "लाहल्याची" पावती मात्र बाळ तत्परतेने देतं. पुढे बाळ मोठं झालं की इच्छा व्यक्त करण्यासाठी चेहऱ्यावरील भाव, हातवारे, खुणा करणे, बोलणे इ. गोष्टी हळू हळू अवगत होतात तेव्हा त्याला त्याच्या इच्छा जास्त प्रभावीपणे मांडता येतं. पण हे सगळं एकाच जीवाबद्दल झालं. आणि तेही त्याच्या साध्या इच्छांबद्दल!

वय वाढत जात त्याबरोबर इच्छांचे प्रकारही वाढत जातात. या जगात मी एकटा नसून माझ्यासारखे अनेक आहेत आणि त्या सर्वांनाच इच्छा-आकांक्षा आहेत याची जाणीवही होते. मग या इच्छा-आकांक्षा बाळगण्यापासून त्या पूर्ण करण्यापर्यंत स्पर्धा सुरू होते. उदा. एखाद्या राज्य/देशपातळीवरील स्पर्धेत/परीक्षेत पहिल्या क्रमांकावर यायची माझी महत्त्वाकांक्षा आहे तशी इतर काही लोकांचीसुद्धा आहे. ग्राहक म्हणून मला किराणा, गृहोपयोगी वस्तू स्वस्त हव्यात. पण दुकानदार म्हणून मला नफ़ाही मिळायला हवा. मला मधुमेहाचा त्रास असल्यामुळे गोडपदार्थ शरीराला अपायकारक आहेत. पण माझ्या जिभेला सतत गोड खाण्याची इच्छा होते!

इच्छापूर्तीच्या स्पर्धांची व्याप्ती वाढत जाते आणि त्यातून महत्त्वाकांक्षा, दुराग्रह, इ. इच्छेची उग्र रूपे जन्म घेतात. त्यानंतर माझी महत्त्वाकांक्षा त्याच्या/तिच्या महत्त्वाकांक्षेपेक्षा जास्त महत्त्वाची कशी आहे हे स्वतःलाच समजावण्याचा "स्वार्थ"ही जन्माला येतो आणि पाठोपाठ स्वार्थजन्य आकांक्षा येतात त्या वेगळ्याच! मग माझा देश त्यांच्या देशापेक्षा कसा श्रेष्ठ आहे यापासून माझा प्रांत, माझं शहर, माझी कॉलनी, माझे जातीबांधव, इ. पर्यंत स्पर्धा चालूच राहतात आणि सगळ्याच इच्छा पूर्ण होत नसल्यामुळे/वेळेवारी पूर्ण न झाल्यामुळे अतृप्त झालेला माणूस कायदे मोडतो, शिष्टाचार पाळत नाही, धर्मबाह्य वर्तन करतो.

मग प्रश्न पडतो, की "जो जे वांछील तो ते लाहो" हे मागणे अशक्य आहे काय? अर्थातच नाही! "वांछील" आणि "लाहो" हे शब्द वाटतात तितके सोपे खचितच नाहीत. वर पाहिलेल्या उदाहरणात आपण परस्परविरोधी इच्छांमध्ये स्पर्धा कशी निर्माण होते ते पाहिलं. यात जिंकलेल्या स्पर्धकांची काय अवस्था होते? स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर आल्यावर आनंद होतो, पण तो क्षणभंगुर आहे. तो संपताच पुढल्या स्पर्धेच्या तयारीला लागायचं. पुन्हा जिंकल्यास पुन्हा आनंद होईल, पण तोही क्षणभंगुर असेल! थोडक्यात, स्पर्धा जिंकणे ही इच्छा असली तरी "जिंकल्याचा आनंद नष्ट संपलेला असणे" ही बाब पुढल्या स्पर्धेत भाग घेण्यास कारण होते. मधुमेहाचा त्रास असताना गोड खाल्ल्यास त्रास होत असला तरी गोड खाल्ल्याबरोब्बर जिभेला जे क्षणिक समाधान होते, त्याची पुनरावृत्ती व्हावी असे वाटल्यामुळे त्रास होत असूनही गोड खाण्याची जिभेला इच्छा होते. बाळसुद्धा भूक शमल्यावर, भीती संपल्यावर, इ. शांत होते ते या आनंदानुभवामुळे!

मग नेमकी इच्छा कशाची? स्पर्धेत पहिला येण्याची, की गोड खाण्याची की तो (क्षणिक का होईना!) आनंद अनुभवण्याची? ती स्पर्धाच नसती, तर? देवाने जिभेला चवच दिली नसती तर? तर कदाचित् त्या त्या इच्छाही उद्भवल्या नसत्या! यावरून असे वाटते की "जो जे वांछील" मधल्या "वांछिणे"चा गर्भित अर्थ म्हणजे या आनंदापासून दूर असण्याचे नेमके कारण.  इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन कर्तव्यनिष्ठ राहून हे कारण दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत राहिल्यास ते कारण कधीतरी पूर्णतः संपेल आणि जीवाला तो आनंद अखंड अनुभवण्याची स्थिती प्राप्त होईल. या स्थितीला जाऊन मिळणे (to attain the state of equibrium) म्हणजेच "लाहणे" असेल. “गांधीगिरी", “गेट वेल् सून कार्ड पाठवणे" यातला गंमतीचा, करमणुकीचा भाग सोडा. पण दोन किंवा अधिक माणसं असोत किंवा प्रांत, राज्य, देश इ. समाजातले गट असोत. त्यांच्यातील भांडणांचं/शीतयुद्धांचं मूळ अपूर्ण राहिलेल्या इच्छांमध्ये आहे हे १००% खरं आहे.

संत ज्ञानेश्वरांचे हे मागणे इतके व्यापक आणि सर्वसमावेशक आहे, की त्याचा वेध घ्यायला बुद्धी आणि ज्ञान अपुरे पडतात आणि त्यातून जे आकलन होईल ते व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात. त्यामुळे यावर अधिक लिहिण्यापेक्षा देवाला हीच प्रार्थना की "जो जे वांछील तो ते लाहो".

4 comments:

durit said...

आपण हे उत्स्फूर्त वर्गात लिहिलेलं... तितकेच ते आहे, उत्स्फूर्त!

उदाहरणाने व्यक्त केलेले ज्ञानेश्वरांचे तत्त्वविचार खचितच मला आवडतात.. त्यांचे भुलवणारे शब्द तर अर्थाहून अधिक गर्भित आहेत, असे वाटते कधी कधी..

Anonymous said...

आपण म्हणता ते आनंद या ब्रह्मानंदाच्या अनुभूतीच्या छाया आहेत. या छायांद्वारेच ब्रह्मानंदाकडे पोचता येईल असा ज्ञानेश्र्वरांचा अभिप्राय आहे असे मला वाटते.

Asha Joglekar said...

आनंद सतत टिकणारा ज्यांत दुःखाला यत्किंचित वाव नाही । असा आनंद मिळवण्या साठी परमार्था ची वाट चाल करावी लागते । नाहीतर आपल्या आनंदात च दुःख ही लपलेलं असतंच आनंद नाहीसा होण्याचं दुःख ।

आज एकदम आध्यात्म ......

Anonymous said...

जो जे वांछील तो ते लाहो ही हिंदूधर्माची ज्ञानेश्र्वरानी मांडलेली व्याख्या आहे.