मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Sunday, January 7, 2007

शास्त्र आणि कला

दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अध्ययनाच्या दृष्टिकोणातून, ज्योतिषशास्त्राला "शास्त्र" म्हणून विद्यापीठांत मान्यता मिळावी किंवा मिळू नये, या विषयावर बरीच चर्चा झाली. त्यात दोन्ही बाजूंनी अनेक मान्यवरांचे विचार प्रकाशात आलेत. शेवटी ती मान्यता मिळाली नाही.

तसं पाहिलं, तर बहुतांश व्यक्तींचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असल्याचंच आढळेल. ज्योतिषशास्त्राला कटाक्षाने न मानणारे दुर्मीळच आहेत. दैनिक भविष्यावर अगदी विसंबून राहणारे कदाचित कमी असतील. पण कुतुहल म्हणून तरी अनेकजण वर्तमानपत्रातील भविष्य आवर्जून वाचतात. अर्थात, राशिभविष्यात काही अर्थ नसतो, त्यासाठी सूक्ष्म अभ्यास आवश्यक आहे असं अनेक नामवंत ज्योतिषी सांगतात. त्यातील अनेक ज्योतिषांनी अनेकदा आश्चर्यकारक अशी अचूक भविष्यं सांगितल्याचेही अनेक दाखले आहेत.

मग नेमका प्रश्न काय आहे? या कुतुहलापोटी, मी, ज्योतिषशास्त्रावरील काही पुस्तकं वाचायचा निर्णय घेतला. वाचन करता करता त्यातल्या अनेक गोष्टी आवडायलाही लागल्यात. उदाहरणार्थ, कुंडलीतील केवळ सूर्य व चंद्र या ग्रहांच्या स्थितीवरून महिना (मराठी), तिथी व वेळ यांचा सहज बोध होतो. त्यात गुरू, शनी, हर्शल, नेपच्युन, इत्यादि संथगती ग्रहांच्या राशिगत स्थितीवरून नेमके वर्षही कळू शकेल. असो. वाचनानंतर कळलं, की ज्योतिषशास्त्र हा एक अत्यंत व्यापक आणि तितकाच गुंतागुंतीचा विषय आहे. फार पूर्वीच त्यात खगोलशास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यास झाल्याचं समजतं. केवळ सूर्यमालिकाच (Solar system) नव्हे, तर त्याही पलिकडली सविस्तर माहिती त्यात मिळते. त्यामुळे, ज्योतिषशास्त्रातील निदान हा भाग तरी जनसामान्यांपर्यंत पोहचावा असं राहून राहून वाटतं. "फलज्योतिष" हा या शास्त्राचा केवळ एक भाग आहे. त्यातही ग्रहांना राशींचं स्वामित्व देताना पूर्वीच्या ज्योतिषांनी बराच अभ्यास केल्याचं दिसतं. त्यात तर्कशास्त्राचा भागही आहेच.

ज्योतिषशास्त्राचे नवीन ग्रंथ वाचता वाचता सुप्रसिद्ध ज्योतिषी श्रीयुत् व. दा. भट यांचा "असे ग्रह अशा राशी" हा ग्रंथ हाती लागला. त्यात, प्रत्यक्ष अभ्यासाच्या दृष्टीने कुंडली कशी पहावी? याबद्दल उहापोह केला आहे. प्रत्येक कुंडलीसाठी ज्योतिषशास्त्राचे नियम जरी सारखेच असले, तरी ते अचूकपणे वापरणे ही एक कला आहे, असं लेखकानं त्यात म्हटलं आहे. (ज्योतिषशास्त्राबद्दल अधिकारवाणीने बोलण्याची माझी पात्रता नाही, त्यामुळे काही चुकलं असेल तर गुणिजनांनी कृपया क्षमा करावी.) पण या मुद्यावरून एक विचार चमकून गेला. कला म्हणून ज्योतिषशास्त्राकडे बघितलं तर..? "शास्त्र" या शब्दाऐवजी "कला" ही संज्ञा वापरणं कितपत योग्य आहे? इत्यादि. इत्यादि. विचारांचं चक्र सुरू झालं....

भारतात एकूण चौसष्ट कला प्रचलित होत्या, असं म्हटलं जातं. त्या सर्वांची नावं माहित नाही. पण, निदान आजच्या काळात त्यापैकी संगीत, नाट्य, चित्र, शिल्प, इत्यादि अनेक कला प्रचलित आहेत. [आधुनिक कलांमध्ये प्रचार (publicity) हीदेखील एक कला (??) आहे, व ती पासष्टावी नसून पहिल्या कलेलाही मागे सारणारी आहे असंही कुठल्याशा दिवाळी अंकात वाचल्याचं मला आठवतंय. असो.] प्रत्येक कलेचं एक शास्त्र आहेच. संगीताचंच पहा ना. रागातील वादी-संवादी स्वर, वर्ज्य स्वर, आरोह, अवरोह, न्यासस्वर, ताल, लय, यांच्या अभ्यासासाठी संगीतशास्त्राचे अनेक ग्रंथ आहेत. पण तास-दीडतास मैफलीत रंग भरणं, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणं, खिळवून ठेवणं, ही कला आहे. संगीतातच काय? प्रत्येक कलेतच शास्त्र आहे, नव्हे - प्रत्येक शास्त्रात कला आहे. रांगोळीत रंग भरण्याचं शास्त्र आहे. तरीही, रांगोळी काढणं एक कला आहे. अन्न शिजवण्यासाठी पाकशास्त्र आहे, त्यातही कला आहे. म्हणून, काही स्त्रियाच "सुगरण" असतात. मानवजन्मात धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी शास्त्र आहे. असं असलं, तरी जीवन जगणं ही कलाच आहे.

तात्पर्य, शास्त्र आणि कला या दोन वृत्ती आहेत. "फलज्योतिष" या विषयाकडे कलेच्या दृष्टिकोणातून पाहिले तर "ज्योतिषकला" नामक पासष्टावी (किंवा सहासष्टावी) कलासुद्धा लवकरच जनसामान्यात घर करू शकेल, असं वाटतं.


Monday, January 1, 2007

नव्या वर्षाचे स्वागत

दोन वर्षांचे मीलन, संगम जुन्या-नव्याचा;
साजरा करिती जन, क्षण हा आनंदाचा.

सरले जुने वर्ष, दिन कष्टाचे सरले;
नवे संवत्सर आता, भाग्य घेऊनिया आले.

नव्या वर्षाची चाहूल, नव्या आशा, स्वप्ने नवी;
वठलेल्या वृक्षा आता, फुटेल नवी पालवी.

नव्या वर्षाचा आरंभ, उगवला सूर्य नवा;
घेऊनि आकाशझेप, उडे पाखरांचा थवा.

नव्या वर्षाच्या स्वागता, शीळ घालितसे वारा;
आनंदोत्सवी नाहला, आज आसमंत सारा.