मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Tuesday, December 25, 2007

तू येशील कधी

मेघांनी नभ झाकले, पसरला काळोख सर्वत्र हा
वारा वाहतसे अचानक पुन्हा ही वीज वाजे पहा
वर्षेची सर आज चिंब करण्या येऊन गेली जशी
तू येशील कधी मला बिलगण्या, आता तरी सांगशी

थंडी व्याकुळ घोर ती करितसे जीवास रात्रंदिनी
पानेही झडली तरूंवरुन ती, झाली हवा कोरडी
पुष्पांचा मधुगंध तो पसरुनी वाहे हवा मंदशी
तू येशील कधी मला बिलगण्या, आता तरी सांगशी

थंडी ती सरता धुके विरतसे कालांतराने मग
बैसोनी मग कोकिळा करितसे मंद स्वरे कूजन
येता नूतन पालवी बहरती झाडे वसंती जशी
तू येशील कधी मला बिलगण्या, आता तरी सांगशी


'शार्दूलविक्रीडित' या वृत्तात आज अचानक ही कविता जुळून आली (चाल- रामो राजमणि: सदा विजयते).

Monday, December 24, 2007

सहस्रचंद्रदर्शन

हिंदू संस्कृतीत जन्मदिवस साजरा करण्याची प्रथा फार जुनी आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे जन्मदिवस साजरा करण्याची पाश्चात्य पद्धतही भारतात आता चांगलीच रूढ झाली आहे. तरी, निदान काही जन्मदिवस आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरे करावेत अशी विचारधाराही अस्तित्वात आहे व त्यातून एकसष्ठी, पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन, इत्यादि सोहळे लोकप्रिय झालेत. संस्कृतीचं जतन करणे ही बाब निश्चितच स्तुत्य आहे. पण, हल्ली प्रत्येक गोष्टीत घाई करण्याची सवय असते त्यानुसार विशेषत: सहस्रचंद्रदर्शनसोहळा लवकर साजरा केल्याचे प्रकार हल्ली अनेकदा घडले. या सोहळ्याविषयी मला काही जेष्ठ व्यक्तींकडून मिळालेली माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेखनप्रपंच. यात कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नाही.

सर्वप्रथम आपण हिंदू कालगणनेबद्दल थोडी माहिती करून घेऊ. हिंदू कालगणना चांद्र-सौर पद्धतीची आहे. म्हणजे, चांद्रमास प्रचलित असून अमावस्येच्या वेळी सूर्याच्या राशीवरून महिन्यांचं नामकरण केलं जातं. उदा. मीन राशीत सूर्य असताना अमावस्या झाली, की त्यानंतर सुरू होणार्‍या महिन्याला 'चैत्र' हे नाव देण्यात आलं व याप्रमाणे पुढील महिन्यांचं नामकरण केलं गेलं. सूर्य एकाच राशीत असताना दोन अमावस्या झाल्या, तर अनुक्रमे अधिक व निज असे एकाच नावाचे दोन महिने होतात. (उदा. अधिक श्रावण, निज श्रावण.) अधिक महिना दर तीन वर्षांनी येतो. याचा अर्थ, हिंदू कालगणनेनुसार तीन वर्षांत १२X३+१ = ३७ महिने येतात. (क्षयमासाचा अपवाद वगळला आहे.) म्हणजे, ३ वर्षांत ३७ पौर्णिमा (३७ वेळा पूर्णचंद्र दिसतो) त्यानुसार ८१ वर्षांत ३७X२७ = ९९९ वेळा पूर्ण चंद्र दिसतो.

याचा अर्थ, पौर्णिमेचा जन्म असल्यास ८२व्या जन्मदिवशी (पंचागानुसार ८१ वर्षे पूर्ण होतात तो दिवस) व इतर कोणत्याही तिथीचा जन्म असल्यास ८२व्या जन्मदिवसानंतर येणार्‍या पहिल्या पौर्णिमेला १०००वा पूर्णचंद्र दिसेल. हाच सहस्रचंद्रदर्शनसोहळ्याचा दिवस.

Wednesday, December 19, 2007

हॅपी बर्थ डे

सप्रेम नमस्कार.

वाचकहो, या ब्लॉगला आज एक वर्ष पूर्ण झालं याचा मला अत्यंत आनंद होतोय. आज माझ्या लेखणीतून उमटलेल्या शाईकडे पाहतो, तेव्हा अनेक गोष्टी आठवतात.

"ब्लॉग लिहिणे" ही कल्पना जरी जुनी असली, तरी मला त्याबद्दलचं ज्ञान जरा उशिराच झालं. या ब्लॉगचा जन्म अचानकच झाला. या ब्लॉगच्या जन्माची गंमत आठवते. ऑर्कुटवरील "टेस्टिमोनियल" हा प्रकार मला आवडायचा. (अजूनही आवडतो.) आपल्या मित्रमैत्रिणींबद्दल आपल्याला जे काही वाटतं ते त्यात लिहायचं असतं. पण, ते टेस्टिमोनियल केवळ ऑर्कुटवर प्रोफाईल असणार्‍यांसाठी लिहिता येतं व ते लिहिणारे व वाचणारेही ऑर्कुटचे सदस्य असावे लागतात. एकदा आर्कुटमध्ये माझ्या "फ्रेंडलिस्ट" मधील तुहिना केळकर (एन्. सी. एल्. मधील माझी लॅबमेट) हिचा ब्लॉग सापडला व "आपले विचार मांडण्यासाठी असंही काही अस्तित्वात आहे" हे कळलं. पण तो ब्लॉग इंग्लिशमध्ये आहे. मराठीत (देवनागरीत) असं काही असल्याचा बोध योगेश दामले यांच्या "आयुष्यातील काही पाने" या ब्लॉगमुळे झाला. त्यातलं वैविध्य पाहून उत्साह, मत्सर, महत्वाकांक्षा, इत्यादींनी त्यावेळी मी ग्रासलो होतो हे कबूल करतो. मग, कुणाबद्दल लिहिण्यापेक्षा एखाद्या विषयावर लिहिणं सोपं म्हणून मग "व्यक्तिरेखा" लिहिण्याचा विचार मागे पडला. आपण काहीतरी लिहायला हवं असं सारखं वाटत होतं. काय लिहावं?..... माझे व्हायोलिनक्लासचे गुरुबंधु, डॉ. मुकुंद जोगळेकर यांच्याकडे गेलो असताना एक विषय मिळाला व कुण्या एका भाग्यवेळी "वाहनयोग" हा विषय घेऊन दोन तासात "ऑन लाईन" लेखन केलं. ते "सेव" करून ठेवण्यासाठी "पब्लिश" वर टिचकी मारली. याहूच्या जिओसिटीजवर पूर्वी वेबपेज करून पाहिलं होतं. तेवढ्या तोडक्या ज्ञानाच्या आधारे माझं हे ब्लॉगलेखन प्रत्यक्षात इंटरनेटवर उपलब्ध होण्यासाठी एच.टी.एम.एल. चं प्रोग्रॅमिंग वगैरे काहीतरी करावं लागेल असं वाटलं होतं. पण नंतर लक्ष्यात आलं, की ते लेखन त्या क्षणीच इंटरनेटवर उपलब्ध झालं होतं. ब्लॉगलेखन इतकं सोपं असेल असं वाटलं नव्हतं. तर अशाप्रकारे, अपघाताने लेखणीतली शाई उमटली.

लहानपणी मी कविता करायचो. पण मधल्या काळात माझा तो छंद बंद पडला होता. या ब्लॉगमध्ये लिहिण्याच्या हेतूने का होईना, पुन्हा मी कविता करू लागलो. या ब्लॉगचे वाचक म्हणजे केवळ माझ्या संपर्कातील व्यक्ती असा माझा पूर्वी समज होता. पण, कालांतराने, मला अपरिचित असलेल्या व्यक्तींकडून प्रतिक्रिया मिळाल्या तेव्हा हुरूप वाढला.

या ब्लॉगवरील लेखनाची नोंद करण्यासाठी "मराठीब्लॉग विश्व"सारखी संकेतस्थळं असल्याची माहिती मात्र फार उशिरा झाली. एक दिवस सहज गुगल सर्च इंजिनमध्ये "लिस्ट ऑफ पब्लिकेशन्स" शोधता येतात का? ते पाहण्यासाठी माझं नाव टाकलं असताना हा बोध झाला. हा शोध लागल्यावर जणु काही अलिबाबाची गुहा हाती लागली असं वाटलं. माझ्यासारखं ब्लॉगलेखन करणारे इहलोकी कितीतरी आहेत हे कळलं आणि त्यांचे ब्लॉग वाचण्याची सवय लागली. त्यातून माझ्या ज्ञानात भर पडली आणि माझी विचारक्षमताही वृद्धिंगत होत गेली. मग, अभिप्रायांची देवाण-घेवाण सुरू झाली व वर्गमित्र, ई-मित्र, यांप्रमाणे "ब्लॉगमित्र" निर्माण झाले.

आज या लेखणीतल्या शाईचा वर्धापनदिन असल्यामुळे, या ब्लॉगला सामावून घेणार्‍या "मराठी ब्लॉगविश्व"चे अभिवादन करण्यासाठी माझ्या कुवतीप्रमाणे लहानशी कविता केली आहे. ("सॉनेट" या काव्यप्रकारासारखा "१,२,२,१ ; ३,४,४,३ ; ५,६,६,५ ; ७,७" या क्रमानुसार यमक जुळवण्याचा अत्यंत ओबडधोबड प्रयत्न केला आहे.) त्यात मराठी ब्लॉगविश्वात नोंद झालेल्या ब्लॉगांना गुंफण्याचा लहानसा प्रयोग आहे.

बसलो होतो चाळत माझ्या आयुष्यातली काही पानं
नकळत केव्हातरी उमटली लेखणीतली शाई एकदा
मराठी ब्लॉगविश्व भेटलं स्वैरपणे ती चालत असता
तिच्या मनातलं विश्व मग कधी तिचं तिला उलगडलं

कसं काय? म्हणाली शाईला हळूच झुळुक वार्‍याची,
ती उत्तरली, "माझी कोहम?ची शोधयात्रा चाले."
कथापौर्णिमा कुणाच्या अन् विखुरलेले मोती कुणाचे
संदिग्ध अर्थाचे उखाणे नित विचारांना प्रगल्भ करती

ब्लॉगविश्वी कुणी प्रकाशित करी 'माझे शब्द माझे गाणे'
विडंबन मग करण्या त्यांचे उपजली तेंडूची पाने
घडविला माझ्यातील लेखक..!! या लेखणीतल्या शाईने
दिलखुलास साहित्य चाळता होऊनी वाचक मनसोक्तपणे

अनुदिनी अनुतापे करी मनोमंथन लेखणीतली शाई
आनंद क्षण हा अस्तित्वास तिच्या आज वर्ष पुरे होई


कविता रटाळ न होऊ देता शक्य तितके ब्लॉग कवितेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्तही अनेक ब्लॉगांची नावं यात गुंफण्याची इच्छा होती. पण, माझ्या कल्पनाशक्तीच्या मर्यादांमुळे ते शक्य झालं नाही. या सर्वांकडून अशीच साहित्यिक मेजवानी मिळत राहो. आज मागे वळून पाहिल्यावर या ब्लॉगमित्र-मैत्रिणींच्या ऋणाची जाणीव होते. त्यातून मुक्त व्हावं अशी अजिबात इच्छा नाही. पण या ठिकाणी त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक वाटतं. तुमच्यापैकीही काही त्यांतले असाल. वाचक म्हणून तुमचेही मनःपूर्वक आभार. असं प्रेम करत रहा.

धन्यवाद.

आपला
प्रशांत उदय मनोहर


ता. क.
आपल्या माहितीतील व्यक्तींबद्दल काहीतरी लिहावं ही इच्छा अजूनही मनात आहे. योग्य वेळ आल्यावर तीही पूर्ण होईल असा विश्वास आहे.

-प्रशांत