मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Wednesday, June 30, 2010

पाच तीन दोन

काल रात्री बऱ्याच दिवसांनी घरी जेवणानंतर पत्ते खेळत बसलो होतो. लहानपणी शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली की भावंडांमध्ये आणि बालमित्र-मैत्रिणींमध्ये खेळलेले पत्ते शाळा सुटल्यापासून दूर गेले होते ते अनेक वर्षांनी काल आयुष्यात आले. या बावन पत्त्यांमधून किती खेळ निर्माण झाले असतील कोणास ठाऊक! पाच-तीन-दोन, सात-आठ, लॅडिस, तीनशे चार, बदाम सात/सत्ती लावणी, झब्बू, भिकार-सावकार, पेनल्टी, गुलाम चोर, जजमेंट, नॅट-ऍट-होम, रमी, ब्लफ, बिझिक, ब्रिज..... संपणारी यादी आहे. यातले काही खेळ लहानपणी खेळलो होतो तर काहींची नुसती नावं ऐकली होती.

पण पत्त्यांचे घरगुती खेळ म्हटल्यावर माझ्या मेंदूच्या रॅम मेमरीत फ़्लॅश होणारा खेळ म्हणजे पाच-तीन-दोन. दोघंच असले तर रमी, किंवा अगदीच टुकारपणा करायचा असल्यास सात-आठ किंवा भिकार-सावकार, चार भिडू असल्यास लॅडिस, जास्त डोकं चालवायचं असल्यास तीनशे चार, पाच किंवा जास्त मंडळी असल्यास बदाम सात, झब्बू, गुलाम चोर, नॉट-ऍट-होम किंवा जजमेंट, . अनेक खेळ असले, तरी पाच-तीन-दोन ची सर यांपैकी कुठल्याच खेळाला नाही. या खेळाइतकी आयुष्याशी जवळीक साधणारा दुसरा खेळ (पत्त्यांचा) नाही.

पूर्ण जोड वापरता खेळल्या जाणाऱ्या इतर खेळांहून असलेला या खेळाचा वेगळेपणाही अगदी ठळकपणे जाणवणारा आहे. तीन सदस्यांना प्रत्येकी दहा पत्ते यानुसार एकूण तीस पत्ते वापरले जात असल्यामुळे अठ्ठी, नेहली, देहली, गुलाम, राणी, राजा,एक्का यांची चारही रंगांची पानं, तर सत्तीची फक्त बदाम आणि इस्पिकची पानं यात वापरली जातात. तीन भिडूंच्या पत्ते-वाटपात समानता साधतानाच पत्ते निवडीतला हा वर्णभेद मात्र अपरिहार्य आहे! दोन, तीन पाच हात बनवण्याची जबाबदारी असलेले हे तीन भिडू समाजातल्या श्रीमंत, मध्यमवर्गीय गरीब जनतेचे प्रतिनिधित्व करतात.

दोन हात बनवणारा भिडू सर्वात सुखवस्तू - श्रीमंत. पत्ते वाटण्यापलिकडे फारशी कटकट डोक्याला नाही. इतर भिडूंप्रमाणे याला दहा पत्ते मिळत असले, तरी जबाबदारी फक्त दोन हातांची. ती सहज पार पडते. एवढंच नव्हे, तर क्षमता जास्त असल्यामुळे जास्त हातही साधतात. हे 'अतिरिक्त' हात अर्थातच इतर (तुलनात्मक गरीब) भिडूंचे ओढलेले. हे साधले नाहीत, तरी भविष्यात फक्त एका हाताची जबाबदारी वाढणार. म्हणजे गर्भश्रीमंती टिकली नाही, तरी भीक मागण्याची पाळी नजीकच्या भविष्यात नसणार हे नक्की.

पाच हात बनवणारा भिडू हा मात्र गरीब बिचारा आहे. दहा पत्त्यांपैकी पाचांपासून हात बनवण्याची जबाबदारी असते बिचाऱ्यावर. शिवाय हुकूमही यानेच बोलायचा. तोही पहिल्या पाच पानांच्या आधारे! पहिल्या पावसावरून शेतीचा अंदाज बांधावा लागतो तसंच सगळं राम भरौसे! शिवाय, कदाचित पूर्वी सावकाराकडून कर्ज घेतलेलं असल्यास पाचांपेक्षा अधिक हात बनवून ते कर्ज फेडणेही आलंच.

तीन हात बनवणारा तसा भाग्यवानच म्हणावा लागेल. याच्या वाट्याला 'पाच'वाल्यासारखं राबणंही नाही आणि 'दोन'वाल्यासारखा 'आराम'ही नाही. तीन हात बनवावे निवांत रहावं. पूर्वी जर गुंतवणूक केलेली असेल (स्वतः 'दोन'वाला असताना) तर त्यातून झालेल्या लाभांचा उपभोगही घेता येतो. हा पत्ते वाटत नाही आणि हुकूमही बोलत नाही. मध्यमवर्गीयाप्रमाणे बहुतांशांना हवीहवीशी वाटणारी जीवनशैली असलेला पण वैयक्तिक 'आवाज' नसलेला.

कालमानापरत्वे परिस्थिती बदलल्यामुळे किंवा अध्यात्मिक विचारप्रणालीनुसार जन्म बदलल्यामुळे आलटून पालटून दोन, तीन आणि पाच हातांच्या जबाबदाऱ्या येतात, त्या जबाबदाऱ्या कधी पार पडतात, तर कधी पार पडल्यामुळे भविष्याबद्दलची चिंता वाढवतात. आणि 'पाच-तीन-दोन'च्या डावांचं हे चक्र अखंड चालू राहतं.

11 comments:

केदार said...

एक्दम छान लिहिल आहे. प्त्यांच्या डावांची नावं वाचुन अगदि लहानपणात गेल्यासारख वाटल. आणि हो पाच तीन दोन च तुलनात्मक विश्लेशण तर झकासच.

मनराव said...

झक्कास कॉम्पारीझन....

Aadesh said...

good
keep it up

tumachi aakalan shakti khup jabardast aahe

thanks for share

अमोल केळकर said...

पाच , तीन , दोन - या खेळाचे विश्लेषण आवडले. या विश्लेषणाचा मला नकीच फायदा होईल. मी ही पत्त्यांशी खेळतो पण ते पत्ते भविष्य सांगणारे असतात ( टॅरो कार्ड )

आपल्या या विश्लेषणाचा ( गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत ) मला नक्कीच फायदा होईल. एक नवीन प्रकारे भविष्यपाहण्याचा मार्ग मला दिसतो आहे.

धन्यवाद

अमोल केळकर
http://www.juily.blogspot.com

Anonymous said...

खूप सुंदर लिहिलं आहेस....मनापासून आवडलं

Asha Joglekar said...

पाच तीन दोन अन जीवन याची मस्त सांगड घातली प्रशांत . प्रत्येकालाच कधी पांट तर कधी दोन हात बनवावे लागतात. सुंदर लिहिलंय .

Aruna Kapoor said...

...वाचून खूप बरे वाटले!... लहान पणी खेळलेल्या पांच, तीन,दोन ची आठवण ताजी झाली!

Rahul said...

While reading your article, I just remembered the excitement in playing the game of 5 3 2 in my childhood days. Good one!!!

a Sane man said...

ही तुलना मजेशीर आहे!

Saurabh Khare said...

Excellent post. I never thought that someone can compare पाच तीन दोन with real life! Keep Blogging...:)

dc360 said...

सात आठ चे रूल्स लिहाल का। विसर पडला