गालिबचे आंब्यावरील
प्रेम, त्यातून गालिबने आंब्यावर लिहिलेली कविता आणि एकंदरीतच मुसलमान
राजे, कवींनी आंब्याचा शौकसुद्धा शेरोशायरीसारखाच किती आकर्षकपणे जतन केला
होता अशा काहीशा आशयाचे एक पोस्ट फ़ेसबुकवरील ग्रुपवर साधारणतः एक-दोन वर्षांपूर्वी चित्तरंजन भट यांनी टाकले होते. त्यात त्यांनी एक खंतही व्यक्त केली होती, की मराठी
साहित्यात आंब्याविषयी कवितांचा विचार करता "आंबा पिकतो, रस गळतो" या
बालगीताव्यतिरिक्त पटकन् काही आठवत नाही आणि खरोखरच ही खंत किती रास्त आहे,
हे पटले. फ़ेसबुकवर पुन्हा त्यांनीच आंब्यांचा विषय काढल्यावर त्यांचे ते
जुने पोस्ट व खंत आठवले आणि विचार केला, की प्रयत्न करायला काय हरकत आहे?
तर, "आंबा" या विषयावर मला सुचलेली ही कविता चित्तरंजन भटांना अर्पण करतो.
गर तो आंबटगोड, रसाळ
मऊ, मधुर पिकलेले साल
ऊष्ण प्रदेशी प्रिय घरोघरी
चव 'बेगमपल्ली'ची न्यारी
मधुर रसाचा आंबा 'केशर'
कांती हिरवी, पीत, लालसर
रसाळ आंबा तसा 'दशहरी'
सुरकुतलेली त्वचा असे जरि
आकाराने लहान-मध्यम
वळिवानंतर भेटे 'नीलम'
चोखण्या हवा 'गावरान' परि
मोरांब्याला अन् 'तोतापुरि'
चाखावे 'वलसाड', 'रायवळ'
'मलगोबा', 'लड्डु', 'हिमसागर'
उत्तरेकडे तसा रसीला
'चौसा' आणिक आम 'रतौला'
नाव जरी आंब्याचे 'लंगडा'
'पायरी'परी चवीस तगडा
मंद चव, गंध दरवळे सुरस
स्वादासाठी घ्यावा 'हापुस'