मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Tuesday, June 23, 2009

दोन वाटा

वळणदार ही रम्य वाट, घनदाट तरू चहुकडे; दुभंगे जाता इथुनी पुढे
वाट एक त्यांतली ही, हिच्या दोबाजूंना लांब; पसरले पहा दिव्याचे खांब
दुसर्‍या वाटेवरी न पथिक न गाड्याही धावल्या; परि तिथे काटे आणिक कळ्या
दोन्ही वाटा अखेर मिळती एका रस्त्याला; जाई जो माझ्या गावाला

दुवा दिव्यांचा ह्या वाटेवर पांथिक बहु चालले; धरावी ही हे मी ठरविले
प्रवास इथला सुलभ, फक्त चालणे अखंडितपणे; आणि निजधामाला पोचणे
धरली त्याने वाट, जी न वहिवाट, चालला पुढे; फुलांचे जेथे पडले सडे
पाचोळा अन् काटेही पण वाटेवर त्याच्या; आणि ना दिशा ओळखीच्या

गावी मी पोचलो, जणू मिळवले सर्व सर्व; मला जाहला असा गर्व
स्वतःभोवती फिरत राहिलो, विसरलो जगाला; येइ अंधारी नयनांना
"तो न पोचला गावी अजुनी? फसला काट्यांत!"; गर्जलो मीऽ मदासक्त
"वहिवाटेवर तो न चालला, पोचला न गावी; न झाले कार्यही वेळेवरी"

अवचित आला एके दिवशी माझ्या गावाला; तो मला सहज भेटण्याला,
तो येता मी कुत्सित वदलो, "उशीर बहु झाला; तुजला गावी पोचण्याला!"
आणिक वदलो काहीबाही टाकुनि त्यां अतिउणे; परी ना लक्ष्य दिले त्याने
प्रेमे मग पाहुनी तयाने मंदस्मित केले; आणि मज वदला शांतपणे

"उशीर झाला मला खरोखर तुला भेटण्याला; मागतो क्षमा तयाची तुला
वाटेवर काटे होते, होती पण तेथे फुले; ज्यांमध्ये मन हे माझे झुले
तिथे एक वठलेले होते वृक्ष, तयापासुन; शिल्प मी घडवियले तासुन
शिल्पाच्या भोवती पसरले वन्यफुलांचे सडे; गंध त्यांचा पसरे चहुकडे

मी न निवडल्या चालण्यास त्या वाटा नित्याच्या; नि धरिला रस्ता काट्यांचा
परि उभारला जीव ओतुनी स्वर्ग मन्मनीचा; न वर्णवे आनंद तयाचा"

कुसुमाग्रजांची "कोलंबसाचे गर्वगीत" ही कविता वाचल्यापासून त्या वृत्तात कविता करून पाहण्याची इच्छा होती. मध्यंतरी रॉबर्ट फ़्रॉस्ट यांची "द रोड नॉट टेकन" ही कविता इंटरनेटवर वाचली. त्या कवितेतल्या पहिल्या ओळीत वनराईमध्ये दुभंगून रस्ते दूर जाण्याची कल्पना आवडली आणि ही कविता सुचली. या कवितेचा आशय मात्र, "द रोड नॉट टेकन"पासून पूर्णपणे निराळा आहे. काही ओळींमध्ये मात्रा थोड्या कमीजास्त झाल्या आहेत. तसेच, यमकांचा पॅटर्न मी थोडा बदलला आहे.

Wednesday, June 17, 2009

मराठीचा विकास - प्रतिशब्दांनी की शब्दांच्या मराठीकरणाने?

"मराठी वाचवा - कोणती?" या शीर्षकाचा निबंध शांता शेळके यांच्या "गुलाब काटे कळ्या" या पुस्तकात काही वर्षांपूर्वी वाचला होता. मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल आणि विकासाबद्दल आस्था असलेल्यांनी अवश्य वाचावा असाच निबंध होता तो. आज मराठी साहित्याच्या संगणकीय युगाचा उगम आणि विकास झाला असल्यामुळे त्याबद्दल लिहिणं अप्रस्तुत ठरणार नाही.

इंटरनेटवरील मराठी साहित्यासाठी व्यासपीठ निर्माण करणार्‍या मायबोली, मनोगत, उपक्रम, मिसळपाव व गुगल, याहू, वर्डप्रेसने ब्लॉगलेखनासाठी उपलब्ध करून दिलेली माध्यमं लोकप्रिय होऊन अनेक वर्षे झालीत. मी तसा या मराठी-ई-विश्वात फार नवीन नसलो, तरी फारसा जुनाही नाही. ब्लॉगलेखन वगळल्यास इतर ठिकाणी फारसा सक्रिय नाही. (मायबोलीवरील दोन वर्षाच्या काळात दोन हायकू, तीन प्रतिक्रिया आणि तीन सदस्यांची विचारपूस केल्याने कोणी मायबोलीकर होत नाही.) या काळात मराठी संकेतस्थळांवरची शितं वेचल्यावर "महाजाला"वरील भाताबद्दल जे ज्ञान झालं, ते शांता शेळके यांनी उपरोक्त निबंधात मांडलेल्या विचारांपेक्षा फारसं वेगळं नाही. "उद्घाटन"ऐवजी "विमोचन", "साजरा होणे"ऐवजी "संपन्न होणे", इत्यादि वाक्प्रचारांचा भडिमार होत असल्याबद्दल शांताबाईंनी त्यांच्या निबंधात चिंता व्यक्त केली होती.

इंटरनेटवरील इंग्रजी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द सुचवताना बर्‍याच प्रमाणात असं होतंय असं मला वाटतं. मराठीच्या नावाखाली संस्कृत शब्दांचा भडिमार होतोय. उदा. महाजाल, जालनिशी, इत्यादि. विरोप ह्या शब्दाचं मूळ मात्र समजलं नाही. हा शब्द शब्दबंधच्या सदस्यांच्या पत्रव्यवहारांअंतर्गत मीसुद्धा वापरला होता एकदा, पण मला तो पटला नव्हता. त्यापेक्षा "ई-पत्र" हा शब्द जास्त सुटसुटीत वाटतो. मायबोलीवरील "वीकांत" हा शब्द मात्र मनापासून आवडला. "वीक एंड" या इंग्रजी शब्दाला मराठीत कौशल्याने रुजवल्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. "वीकांत" हा धेडगुजरी शब्द वापरण्यापेक्षा "सप्ताहांत" हा शब्द जास्त सरस आहे असं काही दिवसांपूर्वी एका ब्लॉगर सदस्याने ई-पत्राद्वारे सुचवलं होतं, पण मी त्याकडे (सोयीस्करपणे ;) ) दुर्लक्ष्य केलं. "सप्ताहांत" शब्दात इंग्रजीचा अंश नसला, तरी "सप्ताह" आणि "अंत" या दोन्ही संस्कृत(च) शब्दांपासून निर्माण झालेला हा शब्द (संस्कृतभाषेत वापरायला चांगला असला तरी) मराठी भाषेला सगोत्र विवाहित दांपत्याच्या पोटी जन्मणार्‍या जनुकीय दोषयुक्त अपत्याप्रमाणे खिळखिळं करणारा वाटतो.

संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, पैशाची, अर्धमागधी, पाली या सहा मूळ भाषांपासून जन्मलेल्या व फार्सी, अरबी व इतर अनेक भाषांच्या संस्कारांनी बाळसं धरलेल्या मराठीला संस्कृत शब्द भविष्यात गिळणार की काय, अशी भीती वाटते. "संस्कृत ही भाषांची जननी आहे" किंवा भाषा गंगेच्या पाण्यासारखी निर्मळ, पवित्र असावी, वगैरे गोष्टी मलाही पटतात. पण, गंगा नदी गंगोत्रीतून उगम पावते, तिला पुढे असंख्य झरे सामील होतात आणि अशाप्रकारे वाढत वाढत ती सतत पुढे वाहत समुद्राला जाऊन मिळते म्हणून मोठी आणि पवित्र होते. मात्र, ती जर उलट्या दिशेनं गंगोत्रीकडे वाहू लागली, तर गंगोत्रीतच लोप पावेल. संतकवी दासगणू यांनी म्हटल्याप्रमाणे "ओहोळ पोटी घे गोदावरी | म्हणुनी म्हणती तीर्थ तिला ||" .

तात्पर्य, मराठी प्रतिशब्द शोधण्यात काहीच गैर नाही. पण मराठी प्रतिशब्दांपेक्षा जर इतर भाषांमधल्या शब्दांचं मराठीकरण करता आलं, तर ते मराठीच्या भव्यतेचं व समृद्धतेचं एक प्रतीक होईल. नाही का?