देवावर श्रद्धा असणारा, देवाचं अस्तित्व मानणारा तो आस्तिक व देवाचं अस्तित्व नाकारणारा तो नास्तिक हे आस्तिक-नास्तिक या शब्दांचे रूढार्थ आहेत.
देवाबरोबरच किंवा देवाऐवजी इतर कशावरही (उदा. संत, गुरू, आईवडिल, विशिष्ट व्यक्ती, वस्तु, स्वतः, इ.) "श्रद्धा" असणे अशी आस्तिकतेची व्यापक व्याख्याही देता येईल. पण तूर्तास देवावरील श्रद्धेबद्दलच पाहू. देवाच्या नावाचा जप करणे, देवाची पूजा करणे, पोथ्यापुराणं वाचणे इ. गोष्टी आस्तिक लोकं करतात. अध्यात्मिक उन्नती साधायची असल्यास या गोष्टी "सेवा" म्हणून निःस्वार्थपणे करणे यात अपेक्षित आहे. पण हा "निस्वार्थपणा" येणं फारच अवघड आहे. अगदी रोजची देवपूजा करताना "ती केल्याने मन शांत होते, आनंदित होते" या भावनेपेक्षा "ती न केल्यास देवाचा कोप होईल, आपले काही तरी राहिले आहे असे मनाला वाटत राहील" हीच भावना जास्त बळावत राहते. अर्थात् याला अपवाद आहेतच, पण तूर्त ते बाजूला ठेवू. अगदी देवळात देवाला दाखवलेला नैवेद्य आपल्या हातावर प्रसाद म्हणून पडतो तेव्हा "अरे वा! आज कंदीपेढे!" पासून "इथल्या खिचडीला कायम एक कुजट वास येतो" इ. व तत्सम प्रतिक्रिया मनात येतात. म्हणजे त्या प्रसादाला "प्रसाद" म्हणून स्वीकारायला मन तयार नसतं ते फक्त कंदीपेढा, खिचडी, इ. स्वीकारतं.
गजानन महाराजांच्या पोथीत मोक्षाच्या तीन मार्गांबद्दल विवेचन आहे त्यात आपापल्या मार्गावरील अर्धवट प्रवास झालेल्यांना पंथाभिमान असतो त्यामुळे त्यांच्यामध्ये भांडणे होतात असं सांगितलंय. खरंतर मोक्षाचे अनेक मार्ग असू शकतात. त्यातले काही आपल्याला माहित असतील, काही नसतीलही. "नास्तिकता हा मार्ग नाहीच" ह्या म्हणण्याला कुठला आधार आहे? नास्तिक लोकांकडे नाकं मुरडून पाहण्याची किंवा "हे स्वतःला ग्रेट समजतात", वगैरे वगैरे विचार करून पाहण्याची आस्तिक लोकांना सवय असते. इथे नास्तिक लोकांच्या व्यक्त नास्तिकतेमुळे आस्तिक लोकांना त्रास होतो याचा अर्थ अजूनतरी मनाला षड्रिपूंवर विजय मिळालेला नाही.
अध्यात्माच्या उच्च पातळीवर पोहोचण्यासाठी मनाने षड्रिपूंवर विजय मिळवणे, निराभिमान होणे आवश्यक असते, जे सर्वांना जमतेच असे नाही. सगळं सुरळीत चाललंय तोवर देवाचं नाव नाही आणि एखादं संकट आलं की नवसांची लाईन लागली अशी आस्तिक लोकं भरपूर असतात. या बहुतांश लोकांच्या आस्तिकतेपेक्षा थोडी वरची पायरी गाठलेली माणसंही असतात. नाही असं नाही. देवावर श्रद्धा असते, रोज नियमितपणे दैनंदिन स्वार्थ नसूनसुद्धा साधना करणारे आस्तिक लोकंही बऱ्यापैकी असतात. पण कधीतरी परिस्थिती सहनशक्तीबाहेर बिघडते आणि देवावरची श्रद्धा क्षणभर का होईना, पण ढळते, कमी होते. थोडक्यात, या पायरीपर्यंत पोहोचल्यावरही आस्तिक माणसाच्या आस्तिकतेस मर्यादा येतातच. पण, सातत्याने साधना सुरू ठेवल्यास त्यावर मात करता येते, विकल्प कमी होऊन अध्यात्मिक उन्नती होते व या मर्यादा येण्याचे प्रमाण कमी होत जाऊन मोक्षापर्यंतचा प्रवास साधता येऊ शकतो, असे अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहेच. खरेतर "मोक्षाची इच्छा" हीसुद्धा मनालाच असल्यामुळे तो एका प्रकारचा स्वार्थच आहे. या इच्छेचाही त्याग करून सतत साधना करत राहायची, देवाला इच्छा झाल्यास मोक्ष मिळेल!
नास्तिकतेची व्याख्या देवाला न मानण्यापुरती संकुचित नसून त्यात आंधळेपणाने कशावरच विश्वास न ठेवणे अभिप्रेत आहे. इतरांचे संदर्भ वापरायचे नाहीत असे नाही, पण ते वापरण्यापूर्वी आपल्या बुद्धीच्या, ज्ञानाच्या आधारे त्यांची तर्कशुद्ध तपासणी करून ते योग्य प्रकारे व उचित प्रमाणातच स्वीकारणे अपेक्षित आहे. नास्तिक लोकं बुद्धीला न पटणाऱ्या कशालाच मानत नाही, त्यामुळे परिस्थितीकडे त्रयस्थपणे पाहणे त्यांना जास्त सोपे जाते. हा त्रयस्थपणा विरक्तीसाठी फारच उपयुक्त असतो. एखाद्या संकटप्रसंगी आस्तिक व्यक्तीची भावना "देवा, हे कठीण गणित मला सोडवून दे" अशी असेल तर नास्तिक माणूस त्या गणिताचे आकलन करून ते आपल्या बुद्धीनुसार कसे सोडवता येईल याचा विचार करून त्यानुसार पावले उचलेल. आस्तिक माणूस देवालाही घाबरतो व देव कोपला तर गणित सुटणार नाही या (त्याच्या दृष्टीने असलेल्या) वास्तवासही घाबरतो. गणित सुटत नसल्यास असे घाबरत बसण्यापेक्षा नास्तिक माणसाचा परिस्थिती स्वीकारण्याकडे कल असतो. ते गणित फारसे महत्त्वाचे नसल्यास ऑप्शनमध्ये सोडून देणे नास्तिक माणसाला सहज जमते, कारण त्याला पास-नापास होण्यची चिंता नसते. नास्तिक माणूस दुधा-मधाने देवाचा अभिषेक करत नाही, की बोकडाचा बळी देऊन यज्ञ करत नाही. कुणाला मदत करायची झाल्यास मुहूर्त, अमावस्या, तिन्ही सांजेची वेळ, जात, वैधव्य, अशौच, इ. गोष्टी नास्तिक माणसाच्या आड येत नाहीत. तो "देव" ही संज्ञा मानत नसला तरी माणसातला देव त्याला उमगला आहे. त्यामुळे एकंदरीत सुरुवातीलाच त्याची अध्यात्मिक पातळीही आस्तिक माणसाच्या तुलनेत थोडी वरची असते.
द्वैताकडून अद्वैताकडे जाताना देवाच्या स्वतंत्र अस्तित्वाची, वेगळेपणाची जाणीवही नाहीशी झाली तरच "अहं ब्रह्मास्मि"ची अवस्था गाठता येईल. आस्तिक माणूस हा त्याग अगदी शेवटच्या पायरीवर करत असतो, तर नास्तिक माणसाने तो सुरुवातीलाच केलेला असतो.
मग नास्तिकता ही आस्तिकतेपेक्षा सदैव श्रेष्ठ असे म्हणायचे का? तर, नाही. किंबहुना, सांगता येणार नाही. खरं तर आपण, आपल्यातली बहुतांश माणसे काही प्रमाणात आस्तिक व काही प्रमाणात नास्तिक असतो. आस्तिकतेच्या आधारे अध्यात्मोन्नती साधण्यासाठी अनेक संदर्भग्रंथ, उदाहरणे, मार्गदर्शनासाठी उपलब्ध असल्यामुळे आस्तिकतेचा अध्यात्मिकतेशी संबंध आपण सहज लावतो, इतकेच. किंबहुना, परिस्थितीकडे त्रयस्थपणे पाहण्याच्या नास्तिक लोकांच्या
पिंडामुळे त्यांना अध्यात्मिक उन्नती कदाचित् जास्त प्रभावीपणे साधता येईल. नास्तिकतेच्या व्याप्तीचा विचार केल्यास ती आत्मसाथ करणे आस्तिकतेपेक्षा कितीतरी पटीने कठीण आहे, हे मात्र खरे. ज्यांना ती साधली, त्यांच्या अध्यात्मिकतेकडे आस्तिकतेच्या चष्म्यातून पाहणे योग्य ठरणार नाही.
तात्पर्य, आस्तिकता व नास्तिकता या दोन स्वतंत्र विचारधारा आहेत, ज्या एकाच वेळी
आत्मसाथ करणे अध्यात्मिक प्रवासासाठी गैरसोयीचे आहे. बहुतांश लोकं पूर्णतः
आस्तिक किंवा पूर्णतः नास्तिक नसल्यामुळे उन्नत अध्यात्मिक अवस्थेपासून
दूर असतात.