मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Friday, November 30, 2007

चहाचा कप

आज सकाळी उशिरा जाग आली. लॅबला जायला उशीर नको म्हणून नित्यकर्मे झटपट उरकून घराबाहेर पडलो. लॅबमध्ये पोहोचल्यापासून साधारणत: तास-दीड तास बेचैन होतो.

काहीतरी विसरलोय वाटतं. काय विसरलो? घड्याळाला किल्ली दिली का मी? माझं रिस्टवॉच किल्लीवर चालणारं आहे. आजोबांचं आहे. ते गेल्यापासून मीच वापरतोय....ते जाऊ दे. काय विचार करत होतो मी? घड्याळाला किल्ली दिली का मी? हे काय! दिली आहे. चांगलं सुरू तर आहे घड्याळ! मग काय विसरलो असेन...?छोड ना यार! आठवेल तेव्हा आठवेल. आत्ता काय त्याचं? असा विचार केला आणि कामाला लागलो.

दुपार झाली आणि जेवायला कॅफेटेरियामध्ये गेलो. जेवत असताना, कुणीतरी कोणालातरी "इट्स नॉट माय कप ऑफ टी" म्हणालं, आणि एकदम ट्यूब पेटली... चहा! आज सकाळी चहा घ्यायचा राहिला! चऽला. म्हणजे काही महत्त्वाचं नाही राहिलं.

"काही महत्त्वाचं राहिलं नाही" हे फक्त सुस्कारा टाकण्यापुरतं. चहाचं महत्त्व चहा पिणार्‍यांखेरीज कोणाला कळेल? चहा! या शब्दातच किती चैतन्य आहे!"चहा" किंवा "चाय" असं जिथे म्हटलं जातं ती माझी मायभूमी धन्य आहे! तिथे नुसते चहा बनवण्याचे कितीतरी प्रकार आहेत. साधा चहा, मसाला चहा, स्पेशल चहा, आल्याचा चहा, .... न संपणारी यादी आहे.

माझी चहाची सुरवात दहावीमध्ये असताना झाली. मी आणि माझे काही मित्र, कधी माझ्या घरी तर कधी त्यांच्यापैकी कोणाकडे, रात्री जागून अभ्यास करायचो. तेव्हा, म्हणजे नागपूरला असताना, "लवकर निजे -लवकर उठे"ची सवय आजी-आजोबांमुळे होती. त्यामुळे, रात्री ९ नंतर घड्याळ पाहण्याचा योग एकदम सकाळी ६ वाजता यायचा. मी दहावीत गेल्यानंतर १०, ११.. घड्याळात रात्री वाजलेले पाहू लागलो. मग इतका वेळ कसं जागायचं? म्हणून मग चहा सुरू झाला. अगदी उत्साहात आलं किसून चहा करायचो. रात्री साडेदहा वाजता. मग काय? झाली सवय. कधीकधी (म्हणजे नेहमीच) कंटाळा यायचा अभ्यासाचा. पण चहा हवाच. अभ्यासाच्या निमित्याने चहा.. करता करता अभ्यास अगदी निमित्तमात्र झाला. असो. पण, मजा असायची त्यावेळी. बारावीत तर टपरीवर जाऊन चहा प्यायचो कधीकधी. रात्री सगळीकडे शांत शांत असताना टपरीचा चहा पिण्याचा मज़ा औरच आहे! नंतर मग शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये असताना अजनी रेल्वे स्टेशनचा चहा.. मग पुण्यात विद्यापीठात अनिकेत, युनिव्हर्सिटी कँटीन, शांतीनिकेतन, ७० एम.एम., इंटरनॅशन कँटीन, सगळं सगळं झालं. पण मला 'अनिकेत'चा चहाच आवडायचा.

तसा एन.सी.एल्.मधल्या जुन्या कँटीनमध्ये सकाळी १० वाजता मिळणारा चहाही चांगला असायचा. एन्.सी.एल्.मध्येही चहाचा वेगळाच मज़ा असे. आम्ही सर्व लॅबमेट्स आमच्या बॉसबरोबर चहा घ्यायचो. आणि त्यावेळी साईंटिफिक डिसकशनपासून क्रिकेट, फुटबॉल, डास मारण्याच्या पद्धती, वाईन, बॉलिवुड,.. कुठल्याही विषयावर तासभर चर्चा, वादविवाद चालायचे. गेले ऽऽऽ ते दिन गेले ऽऽऽ ....

पुण्याहून नागपुरला जायचो तेव्हाचं आठवतं. मामीआजी आणि मामाआजोबा थकलेले होते. पण मी त्यांच्याकडे गेल्यावर कपभर चहा व्हायचाच व्हायचा. मला त्यांच्याकडे चहा अगदी हवाच असायचा, असं अजिबात नाही. पण मी चहा घेतल्याने तेही खुश व्हायचे. आपल्याकडे कोणीतरी आलं, आपण कोणासाठी तरी चहा केला याचं, विशेषत: म्हातारपणी मानसिक समाधान मिळतं ते महत्त्वाचं असतं. लहानपणी तर मी आणि चिन्मय मामीआजीकडे जवळजवळ दररोज कॉफी प्यायचो. आता अगदी पुसटसं आठवतंय. घारेसरांकडे (पं. प्रभाकरराव घारे) व्हायोलिन शिकत असताना दर महिन्यात एका विद्यार्थ्याकडे संगीतसभा ठरायची तेव्हाही चहा असायचाच. अजूनही नागपूरला सरांकडे गेल्यावर चहा होतोच. आणि पुण्यातल्या सरांकडच्या (ख़ाँसाहेब उ. फ़ैयाज़ हुसेन ख़ाँसाहेब) तर कितीतरी आठवणी चहाशिवाय अपुर्‍या ठरतील. गुरुपौर्णिमा, गज़लांजलि असो किंवा सरांचा कार्यक्रम असो. कार्यक्रमाच्या रिहर्सलस्, बैठकी ... चहाशिवाय शक्य आहे का?

भूतकाळात कसा, खेचून गेला नाही चहा? पण, आता चहाचा "टी" झाल्यापासून ते कुठेतरी हरवलंय. इथे केफेटेरियामध्ये पेपरमिंट टी, लेमन टी, ग्रीन टी, असे अनेक प्रकार आहेत. हे सर्व प्रकार चवीला चांगले आहेत यात वाद नाही. पण, यांपैकी कुठल्याही "टी"ला चहाची सर नाही. दॅट्स नॉट माय कप ऑफ टी! कारण, त्यात गरम पाणी, साखर, चहापत्ती इत्यादि "टी" बनवणारे पदार्थ आहेत, पण त्याचा चहा होण्यासाठी आवश्यकता असते ती गप्पागोष्टींमध्ये रंगून चहाचा आस्वाद घेणार्‍या चहाबाज कंपनीची आणि त्यांच्या प्रेमाची.

Monday, November 26, 2007

समुद्रलाटा

खळखळ खळखळ गर्जत येती समुद्रलाटा
किनार्‍यास चुंबुनिया फिरती समुद्रलाटा

दूरदेशि जी स्थिरावली पाखरे तयांना
मायभूमिचा निरोप देती समुद्रलाटा

कधी निरागस मुलांपरी त्या बागडती अन्
नाचत नाचत खेळत येती समुद्रलाटा

नवतरुणीसम करूनिया शृंगार साजरा
लाजत लाजत ठुमकत येती समुद्रलाटा

रविकिरणांसह आणिक रात्री चांदण्यासवे
मनमुराद त्या क्रीडा करिती समुद्रलाटा

कोलाहल जो विश्वामध्ये अखंड चाले
प्रतिबिंबित त्याला नित करिती समुद्रलाटा

त्यागियले विश्वाने जे जे, सर्व सर्व ते
स्वीकारुन उदरी साठविती समुद्रलाटा

अंतरीच्या वेदना सागरा असह्य होता
रौद्ररूप मग धारण करिती समुद्रलाटा

Sunday, November 4, 2007

पश्चिमरंग

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथून पी.एच्.डी केल्यावर उदरनिर्वाहासाठी मी सध्या लॉस् एन्जेलिस् (कॅलिफ़ोर्निया) येथे आलो आहे. इथे येण्यापूर्वी भारतातून अमेरिकेत जाणार्‍या लोकांना ज्या परिस्थितीतून जावं लागतं त्यातून मीही गेलो. "प्रशांत मनोहर अमेरिकेला जाणार" यावरून अनेकांची मतं, तर्क, अनुभव, इत्यादि कानांवर पडली. " आता अमेरिकेत गेल्यावर कुठे परत येणार आहेस तू! तिथेच सेटल होशील.", अमेरिकन डॉलरची घसरलेली किंमत, भारत-अमेरिका राजकीय संबंध, इत्यादि सर्व विषयांची पारायणं झालीत. या सर्व चर्चांचा केंद्रबिंदू असताना माझ्या सर्व आप्तस्वकीयांकडून भरपूर लाड करून घेतले. या दरम्यान काही दुर्मीळ गाठीभेटीही झाल्यात. या सर्व संवादानंतर "अमेरिकेत असं असेल... तसं असेल....." इत्यादि विचार सुरू असताना कल्पनेतल्या अमेरिकेचं चित्र तयार झालं.

माझा अमेरिकेत फक्त दोन वर्ष मुक्काम असणार आहे. त्यानंतरचं अजून ठरलं नसलं, तरी अमेरिकेतच मुक्काम वाढण्याची शक्यता कमी आहे. असं असूनही "तू कसला परत येतोय?..." हे किंवा या स्वरूपाचे प्रश्न लोकांना पडले, कारण इथे आलेले भारतीय सहसा भारतात परतत नाही असंच आतापर्यंत झालं आहे.

असो. व्हिसा झला, तिकिट काढलं, ठरल्याप्रमाणे प्रवास झाला आणि पाहता-पाहता अमेरिकेत येऊन एक महिना सरलाही. या दरम्यान वास्तवातल्या अमेरिकेनं माझ्या 'कल्पनेतल्या' अमेरिकेची चांगलीच विकेट घेतली. अमेरिकेत सोशल सिक्युरिटी नंबरसाठी लवकरात लवकर अर्ज करावा लागतो. कारण सर्व कार्यालयीन गोष्टी सोशल सिक्युरिटीवर अवलंबून असतात. हा अर्ज करण्यासाठी किमान दहा दिवस थांबावं लागतं, कारण ज्या विमानाने आपण अमेरिकेत येतो, त्या कंपनीकडून आवश्यक माहिती सोशल सिक्युरिटी ऑफिसमध्ये यायला तेवढा वेळ लागतो. इथे आल्यावर दहाव्या दिवशी मी अर्ज करायला गेलो असताना इमिग्रेशनच्या वेळी माझ्या नावाचं स्पेलिंग चुकवण्यात आल्याचा मला साक्षात्कार झाला. "म्हणजे आता सोशल सिक्युरिटीचं काम आणखी लांबणार! अरे देवा!... अमेरिकेतही असल्या चुका होतात!" असे विचार मनाला चाटून गेले. काम लांबल्याचं दुःख आणि "इथेही चुका होतात"चा असुरी आनंद.

स्वाभाविकच होतं. इथे आल्या आल्या खर्च बराच असतो पण पुरेसे पैसे नसतात. जे पैसे मिळणार असतात त्यासाठी सोशल सिक्युरिटी आवश्यक असते व त्याला दोन-चार आठवडे लागतात. त्यात नवा देश, नवी माणसं व त्यांबद्दल पुरेशी माहिती नसते. आपला देश, आपली माणसं यांना सोडून आल्यावर पहिल्या क्षणापासून तुलना सुरु होते. त्यात, पहिल्यांदाच आपला देश प्रिय असल्याची तीव्र जाणीव झाल्यामुळे जरा कुठे काही खुट्ट झालं, की "भारतात काय वाईट होतं? कुठून दुर्बुद्धी झाली मला इथे येण्याची? इथे काय मोठं अगदी सोनं चिकटलंय अमेरिकेला! इथल्या भारतीयांनी तरी काय पाहिलं अमेरिकेत? देव जाणे!" असे विचार पदोपदी येतात. पण ही तात्पुरती अवस्था असते. एकदा सोशल सिक्युरिटीचा अर्ज केला, की कामांना वेग येतो आणि मग याच गोष्टींकडे सकारात्मक दुष्टिकोणातून पाहू लागतो.

सोशल सिक्युरिटी ऑफिसमध्ये सांगितल्यानुसार युनिव्हर्सिटीतील संबंधित अधिकार्‍याशी संपर्क केला व नाव दुरुस्तीसाठी संबंधित कार्यालयाचा पत्ता घेतला. सुदैवानं माझा पुनःनामकरणविधी लवकर पार पडला आणि मी सोशल सिक्युरिटीचा अर्ज भरला. त्यानंतर जेव्हा भारत-अमेरिका यांच्या कामकाजाच्या पद्धतीविषयी किंवा संस्कृतीबद्दल मी तुलना करू लागलो, तेव्हा निरीक्षणातून बरंच शिकलो आणि दृष्टिकोण अधिक प्रगल्भ होत गेला.

इथे प्रत्येक कामात सुसूत्रता दिसून येते. हेच बघा ना. मी इथे आल्यावर पे-रोल, ओरिएंटेशन इत्यादि कार्यालयीन कामांसाठी गेलो असताना पासपोर्ट, व्हिसा, डी.एस्.२०१९, आय. ९४ ही डॉक्युमेन्टस् दाखवलीत. त्यावेळी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची फोटोकॉपी काढून संबंधित अधिकार्‍यांनी मला मूळ कागदपत्रं सुपूर्त केलेत. यात माझा फोटोकॉपी काढण्याचा वेळ आणि खर्च तर वाचलाच, पण 'अटेस्टेशन'ची गरज पडली नाही. "भारतातही हे आता सहज शक्य आहे..."(मनांत). इथल्या कामकाजात सर्वप्रथम नजरेत भरलेली गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा. नियमांना धरून चालणे आणि 'कस्टमर देवो भव' या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. वेळ लागला तरी चालेल, पण नियम मोडून कुणी वाहतुकीला अडथळा देण्याचे प्रकार इथे घडत नाहीत. इथे अगदी लहानातलं लहान काम असो. ते करणार्‍याला स्वतःबद्दल आणि कामाबद्दल अभिमान असतो. तो स्वाभिमान मनाला भावला - 'खालच्या प्रतीचं', 'वरच्या प्रतीचं' अशा विचारांना थारा न देणारा, माझं काम हे उत्तमच असणार असा आत्मविश्वास निर्माण करणारा. समर्पण, प्रामाणिकपणा आणि आत्मपरीक्षण यांचा अवलंब केला तर का येणार नाही आत्मविश्वास? मदत करायला सदैव तत्पर आणि 'वर्क इज वर्शिप' असं मानणारे लोक भेटू लागले आणि एकंदरीतच 'मी', 'माझा देश', 'माझी संस्कृती' या नावाखाली मी स्वतःचाच अहंकार कुरवाळतोय याची जाणीव झाली.

अहंकार? हो. अहंकारच. स्वाभिमान नाहीच. कारण, त्यात आत्मपरीक्षण नाही आणि असलेच, तर ते प्रामाणिक नाही कारण कामात समर्पण नाही. कुठल्या गोष्टींचा अहंकार बाळगत होतो? माझ्या संस्कृतीचा? नाही. कारण, संस्कृतीला जाणून घ्यायला वेळ कुणाला आहे? वेळ का नाही? - कारण, संस्कृती रामराज्याच्या गोष्टी करते. प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचार पसरला आहे. चरांचरांत!

पण मग रामराज्य म्हणजे काय? - राम हा स्वतः विष्णुचा अवतार. आणि त्याची पत्नी, धरणीकन्या सीता, ही लक्ष्मीचंच रूप होती. तिच्या पावित्र्याबद्दल रामाला तिळमात्र शंका नव्हती. तिलाही ते माहित होतं. धोब्याला मात्र शंका आली म्हणून सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. ही अग्निपरीक्षा सीतेची किंवा रामपत्नीची नव्हतीच. ती होती अयोध्येच्या राणीची. या प्रकाराबद्दल धोब्याला दंड झाला नाही. का? - कारण, आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती शुद्ध चारित्र्याची असावी हा त्याचा विचार योग्यच होता. आणि त्यासाठी वेळ पडली तर देशाची राणीही अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे हा त्या धोब्याला सीतेचा आणि रामाचा संदेश होता. जिथे प्रत्येक नागरिकाच्या पावित्र्याबद्दल धोब्यासारखी सामान्य व्यक्ती आग्रही आहे व जिथे देशाची राणीही अग्निपरीक्षेला तयार आहे तिथे रामराज्य येणारच - नव्हे, असणारच!

सीतेलाही अग्निपरीक्षा चुकली नाही. मग मला ती द्यावी लागली तर मी तयार होईन? मी अमुक आहे, मी अमक्याच अमूक, तमक्याचा तमुक, इत्यादि मुखवट्यांतून बाहेर पडेन?..... पण मीच का बाहेर पडू यातून? मी अग्निपरीक्षा देणाने काय साध्य होणार आहे? आणि जोपर्यंत समाज सुधरत नाही तोपर्यंत माझ्या प्रामाणिकपणाचा काय उपयोग? .........