मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Monday, October 27, 2008

धार्मिक कृत्ये व पंचाग - भाग १: लक्ष्मीपूजन

सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नरकचतूर्दशी, लक्ष्मीपूजन इ. केव्हा आहे, हे पाहण्यासाठी दाते पंचाग उघडलं, व काही महत्त्वाच्या बाबी चटकन डोक्यात आल्यात. विषय मोठा असल्यामुळे एकाच पोस्टात सांगणं अवघड आहे. त्यामुळे "धार्मिक कृत्ये व पंचांग" हे नवीन सदर सुरू करतोय. त्याचे सर्व भाग लागोपाठच देईन असं नाही. वेगवेगळ्या सणांच्या वेळी (आवश्यक तेव्हा) या सदरात माहिती देत राहीन. आता दिवाळी सुरू असल्यामुळे पहिल्या भागात यंदाच्या लक्ष्मीपूजनाबद्दल माहिती देत आहे.

तिथी, वार, योग, करण व नक्षत्र या कालमापनाच्या पाच अंगांपासून हिंदू पंचाग बनलं आहे. हिवाळा, उन्हाळा, पुन्हा पावसाळा असं काळाचं चक्र ज्याप्रमाणे विशिष्ट गतीने चालू असतं, त्याप्रमाणे पंचांगातील या पाच अंगांची आवर्तनेही कालमर्यादेत बांधली आहेत. या समन्वयाचा उपयोग ऋतुमानानुसार जे सण साजरे करतात त्यांचा काळ/मुहूर्त ठरवण्यासाठी केला जातो. हिंदूंच्या बहुतांश सणांशी धार्मिक कृत्ये निगडित असतात. आकाशस्थ ग्रह-तार्‍यांना हिंदू धर्मात देवता मानल्यामुळे विशिष्ट धार्मिक कृत्याचे वेळी आकाशात विशिष्ट स्थितीत ग्रह-तारे असावेत असा धर्मशास्त्राचा विचार आहे. यामध्ये काही प्रमाणात वैज्ञानिक कारणे आहेत, तर काही बाबतीत सामाजिक सोयींचा विचार आहे. व्रतवैकल्यांमध्ये काळानुरूप बदल करायचे असल्यास त्यातील वैज्ञानिक बाबी कोणत्या व सामाजिक सोयींशी निगडित बाबी कोणत्या, हे समजून घ्यायला हवं.

परदेशस्थ भारतीयांमध्ये सुटीच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावं म्हणून सणानजीकच्या वीकांतात तो सण साजरा होतो व ते योग्यच आहे. परंतु, त्या त्या सणांशी निगडित असलेली धार्मिक कृत्ये घरातल्या घरात करायची असल्यामुळे ती वेळाच्या वेळीच करावी अशी अनेकांची इच्छा असते, आग्रह असतो व त्यानुसार सर्व विधी यथासांग करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतं. भारतामध्ये राहणार्‍या लोकांना भारतातलं पंचाग सहज उपलब्ध असल्यामुळे व्रतवैकल्यांसाठी योग्य दिवस, वेळ निवडणं अत्यंत सोपं आहे. परंतु, इथे अमेरिकेत व्रतवैकल्ये साजरी करताना पंचाग सहजपणे उपलब्ध होत नाही. पंचाग उपलब्ध झालं, तरी त्यातल्या महत्त्वाच्या बाबी माहित नसल्यामुळे "चार-लोकं करतात तसे करावे" किंवा भारतापेक्षा साधारणपणे अर्धा दिवस मागे असल्यामुळे भारतात ज्या तारखेला सण साजरा होतो, ती तारीख अमेरिकेत उजाडल्यावर अमेरिकेत साजरा करायचा, असं अनेकांचं मत आहे. परंतु, ते प्रत्येकवेळी बरोबरच असेल असं नाही. किंबहुना, "तिथी" या अंगावर अवलंबून असलेले बरेच विधी करताना दिवस चुकू शकतो. धार्मिक कृत्यांपैकी "तिथी"शी जी कृत्ये अवलंबून आहेत, त्यांत काहींसाठी सूर्योदयाचे वेळी, काहींसाठी सूर्यास्ताचे वेळी ती तिथी असणं आवश्यक असतं, तर काही व्रतवैकल्यांमध्ये दिवसभरात ती तिथी किती वेळ असते याच्याशी संबंध असतो.

सध्या दिवाळी सुरू असल्यामुळे त्यातलंच उदाहरण देतो. अश्विन कृष्ण द्वादशी (गोवत्सद्वादशी - वसुबारस) पासून कार्तिक शुक्ल द्वितीया (यमद्वितीया - भाऊबीज) या दिवसांमध्ये घरात पहाटे व सायंकाळनंतर पणत्या प्रज्वलित करायचा तो हा सण : दिवा + आळी = दिवाळी. यात अश्विन अमावस्येच्या दिवशी सायंकाळी लक्ष्मीपूजन केलं जातं. धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार सूर्योदयापासून सूर्यास्तानंतर १ घटिकेपेक्षा जास्त (१ घटिका = सुमारे २४ मिनिटे) अमावस्या असल्यास त्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे. दोन दिवस अमावस्या असेल, तर दुसर्‍या दिवशी सूर्योदयानंतर साडेतीन प्रहरांपेक्षा जास्त (साडेदहा तासांहून जास्त) वेळ अमावस्या असल्यास दुसर्‍या दिवशी, अन्यथा पहिल्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे.

आता यंदाचं पंचांग पाहू (शालिवाहन शक १९३०). यंदाच्या दाते पंचागात सांगितल्यानुसार भारतीय प्रमाणवेळेनुसार दि. २८ ऑक्टोबर २००८ रोजी पहाटे ३:३३ वाजता अमावस्या सुरू होऊन दि. २९ ऑक्टोबर २००८ ला पहाटे ४:४४ वाजेपर्यंत अमावस्या तिथी राहणार आहे. याचा अर्थ, भारतामध्ये २८ तारखेला दिवसभर अमावस्याच असणार व पुढील वार सुरू होईल तेव्हा (दुसर्‍या दिवशी सूर्योदय होईल तेव्हा) प्रतिपदा सुरू झालेली असेल. त्यामुळे (दाते पंचांगात सांगितल्यानुसार) भारतात मंगळवार दि. २८ रोजी सायंकाळी लक्ष्मीपूजन करणं शास्त्राला अभिप्रेत आहे.

आता अमेरिकेमध्ये अमावस्या केव्हा आहे ते पाहू. कॅलेंडरवरील तारीख सूर्योदयास्तावर अवलंबून असली, तरी तिथीचं तसं नसतं. कालनिर्णय डॉट कॉम या वेबसाईटवर न्यू यॉर्क, शिकागो व सॅन फ़्रॅन्सिस्को या तीन शहरांसाठी पंचांग दिलं आहे. ढोबळमानाने नजीकच्या शहरांमध्ये त्यांचा आधार घेता येऊ शकतो.
न्यूयॉर्कमध्ये सोमवार दि. २७ रोजी अमावस्या सुरू होत असून दि. २८ रोजी सूर्यास्तानंतरपर्यंत अमावस्या आहे (साडेतीन प्रहराहून अधिक काळ). शिकागोमध्ये दि. २७ रोजी अमावस्या सुरू होते आहे व सूर्योदयापासून साडेतीन प्रहराहून थोड्या जास्त वेळासाठी अमावस्या आहे. सॅनफ़्रॅन्सिस्कोमध्ये २७ तारखेला अमावस्या सुरू होत आहे व दि. २८ ला साडेतीन प्रहरांपेक्षा जवळ जवळ दोन तास कमी वेळ अमावस्या आहे. याचा अर्थ, सॅनफ़्रॅन्सिस्कोपेक्षा साधारणपणे दोन तास आगोदर सूर्योदय होतो त्या शहरांमध्ये व त्यांच्या पूर्वेकडे मंगळवार दि. २८ रोजी लक्ष्मीपूजन करणं शास्त्राला अभिप्रेत असून पश्चिम अमेरिकेत मात्र सोमवारी म्हणजे दि. २७ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करणं उचित ठरेल. अलास्का व हवाई बेटांवरसुद्धा २७ तारखेलाच लक्ष्मीपूजन करणं योग्य ठरेल.


भाग १ चे संदर्भ:

१. श्री. कृ. वि. सोमण - सुलभ ज्योतिषशास्त्र
२. दाते पंचाग (शालिवाहन शक १९३० - सर्वधारीनाम संवत्सर)
३. http://kalnirnay.com/

Saturday, October 18, 2008

पहाट-प्रभात

पहाट झाली
नभ झाले केशरी
उजळे प्राची

पक्षी जमले
किलबिल करण्या
झाडांवरती

अंगणातला
मोगरा बहरला
सडा सांडला

गंध फुलांचा
हळूच पसरुन
वाहे समीर

पानांवरती
चमचम करती
माणिक मोती?

रविकिरणे
अंगावर सांडली
दवबिंदूंच्या

हा हा म्हणता
तम विरले आणि
लख्ख जाहले

प्राचीवरती
अरुणोदय झाला
प्रभात झाली


सुमेधाने सुरू केलेला साखळी हाईकूचा खेळ, सईने हाईकुबद्दल दिलेली माहिती आणि त्यानंतर सुमेधाने केलेली चांद लबाड ही हाईकु-कविता, या सगळ्यांतून प्रेरणा घेऊन मीसुद्धा हाईकु करण्याचा प्रयत्न केला. नंतर सईशी गुगल-गप्पांमध्ये चर्चा झाल्यावर हाइकु म्हणजे केवळ तीन ओळींची कविता (कडवं नव्हे!) हे कळलं. असो. तर हाइकुमधलं ५-७-५ असं अक्षरांचं बंधन जरी या कवितेत असलं, तरी या कवितेत अनेक कडवी असल्यामुळे याला हाइकु म्हणणं योग्य ठरणार नाही. "हाइकु"च्या वृत्ताची (किंवा वृत्तीची?) कविता असं या रचनेकडे पाहता येईल का?