मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Sunday, June 29, 2008

रिऍलिटी शो

"कडवट टीकेमुळे स्पर्धक मुलीला नैराश्याचा झटका" ही बातमी ई-सकाळमध्ये वाचली. वाढती लोकसंख्या, वाढती स्पर्धा, वाढत्या महत्त्वाकांक्षा, वाढत्या अपेक्षा..... वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा....

अकराव्या इयत्तेत शिकणार्‍या सिंजिनी दासगुप्ता हिची "राजा मेरी नाच धूम मचा दे" या रिऍलिटी शो मधली कामगिरी न आवडल्याने परीक्षिकेनं दिलेल्या प्रतिक्रियेचा हा परिणाम आहे असं बातमीतून दिसतं. नेमका प्रसंग काय घडला व नेमकं कोण काय बोललं, यापेक्षा, अशा "रिऍलिटी शो"ला आलेलं अवाजवी महत्त्व ही बाब कितीतरी पटीने गंभीर आहे. अशा स्पर्धांमधील विविध पैलूंकडे आता थोडं लक्ष्य देऊ.

"अशा स्पर्धात्मक कार्यक्रमांत मुलांची कामगिरी फारशी चांगली झाली नाही, तरी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे." असं सिंजिनीच्या वडिलांचं म्हणणं वरील बातमीत वाचलं. प्रोत्साहन महत्त्वाचं आहेच व परीक्षकांनी सौम्य शब्द वापरावेत हेही मान्य. पण तसं करून तरी हा प्रश्न सुटणार आहे का? साधारणतः वर्षभरापूर्वी झी-टीव्हीवरील "सारेगमप"मध्ये एका व्यक्तीला नैराश्य आलं होतं. त्याही पूर्वी एकदा एका स्पर्धेच्या वेळी "आपली मुलगी जिंकते की नाही" या चिंतेने एका स्पर्धिकेची आई आजारी पडली होती. सुदैवानं ती मुलगी त्या दिवशी जिंकली व तिच्या आईची प्रकृती सुधारली. स्पर्धा म्हटली की इतर स्पर्धकांपेक्षा थोडं कमी, जास्त होणारच. "कामगिरी चांगली झाली नाही" हे परीक्षकांनी कितीही सौम्य शब्दांत सांगितलं, तरी त्या क्षणाला दुःख होणारच. स्पर्धेत यशाप्रमाणेच अपयशही पचवण्याची मानसिक तयारी स्पर्धकाची/स्पर्धकाच्या कुटुंबीयांची असते का? स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टीकोण आपण बदलायला हवा. मानसिकता बदलायला हवी. मागच्या विश्वचषक क्रिकेटमधून भारतीय संघ सुरवातीलाच बाद झाला तेव्हा किती क्रिकेटप्रेमी हा पराभव पचवू शकलेत? स्पर्धेकडॆ/खेळाकडे खिलाडू वृत्तीने आपण का बघू शकत नाही?

"रिऍलिटी शो"मध्ये सहभागी होणार्‍या स्पर्धकांच्या वयाचाही विचार व्हायला हवा. स्पर्धकांचं वय काय? त्यांच्याकडून अपेक्षा काय? अकराव्या इयत्तेतली मुलंमुली जेव्हा स्पर्धेत उतरतात, तेव्हा पौगंडावस्थेत त्यांच्यात होत असलेल्या शारीरिक, मानसिक, वैचारिक बदलांचा विचार केला जातो का? या वयात भावनिक प्रकटीकरणावर नियंत्रण नसतं, नैराश्य, चिडचिड, हळवेपणा अशा अनेक छटा त्यात असतात व सभोवतालच्या टेन्शन्समुळे मन थार्‍यावर नसतं. अशा अस्थिर अवस्थेत त्यांच्याकडून अपयश पचवण्याची अपेक्षा करणं अवाजवी तर ठरत नाहीये ना? या वयात स्पर्धेत भाग घेण्याची पात्रता असते का? या सर्व प्रश्नांवर अंतर्मुख होऊन विचार करायला हवा.

अशा या स्पर्धांमधून नेमकं काय साध्य होतं हा एक वेगळाच प्रश्न आहे. स्पर्धा काटेकोरपणे पार पडल्यावर त्यातला "सर्वोत्तम स्पर्धक" विजयी होतो. "सर्वोत्तम" व "चांगला" या शब्दांमध्ये आपण गल्लत करतोय का? चांगला कलाकार निर्माण होण्यासाठी सतत परिश्रम घ्यावे लागतात, चालू ठेवावे लागतात, कलेचं ज्ञान देण्यास योग्य असलेल्या गुरूचं मार्गदर्शन आवश्यक असतं व योग्य वेळ येण्याची वाट पहावी लागते. आज शिकले आणि उद्या सादर केले इतकं सोपं नसतं ते. मुलांना प्रसिद्धीच्या झोतात आणलं म्हणजे कलेची साधना करण्यासाठी प्रोत्साहन दिलं असा गैरसमज केव्हा दूर करणार आपण? या स्पर्धांमध्ये पोषाख, प्रकाश योजना व "सस्पेन्स" निर्माण करणारी यंत्रणा बंद करावी असं माझं स्पष्ट मत आहे. झी-मराठीवरील "सारेगमप"मध्येही या गोष्टी खूप खटकल्यात. चारचौघात उठून दिसण्याबद्दल आक्षेप नाही, पण स्पर्धा गाण्याची आहे की वेशभूषेची आहे हे आधी स्पष्ट असायला हवं. असो.

स्पर्धेतला विजय जर केवळ सूज्ञ परीक्षकांच्या प्रामाणिक परीक्षणातून मिळणार असेल तर निदान "सर्वोत्तम" ठरलेला हा स्पर्धक काही प्रमाणात तरी चांगला आहे किंवा थोड्या परिश्रमांनी भविष्यात चांगली प्रगती करू शकतो अशी आशा करता येईल. पण दुर्दैवानं तसं होत नाही. "कहानी में ट्विस्ट" येतो तो इथे. या स्पर्धांमध्ये स्पर्धकाचा कलेतला दर्जा ठरवण्यासाठी विशिष्ट पातळीनंतर "परीक्षक" हे पात्र टप्प्याटप्प्याने गौण होत जातं आणि त्याची जागा घेतो "एस्.एम्.एस्." सगळा शाईनिंग इंडिया त्या स्पर्धेत कलेतल्या आपल्या "शायनिंग" ज्ञानाचा प्रकाश टाकून साक्षात् सरस्वतीच्या डोळ्यांत काजवे चमकवतो.

मग प्रश्न पडतो, फक्त कलाकारच "एस.एम्.एस्."ने का निवडले जावेत? डॉक्टर, इंजिनीअर, वकील, शिक्षक इत्यादि लोकंही "एस.एम्.एस्."ने का निवडले जाऊ नयेत? "एस.एम्.एस्." करणारी जनता खरंच इतकी सुज्ञ असेल, तर लोकसभा-विधानसभांच्या निवडणुकींमध्ये "एस.एम्.एस्."ने मतदान करण्याची तरतूद का करण्यात येऊ नये? त्यामुळे भारतीय जनतेचा बहुमोल वेळ वाचेलच, त्याप्रमाणे निवडणूकीतला व त्याआधीच्या प्रचारसभांमधला खर्चही वाचेल. लोकसुद्धा निवडून येणार्‍या नेत्याला पाच वर्षे सहन करायचंय याचा सारासार विचार करूनच "एस.एम्.एस्." करतील.

"रिऍलिटी शो"चं हे महाभारत कधी संपणार? देव जाणे! महाभारतात द्रौपदी वस्त्रहरण झालं, इथे कलोपासनेचं वस्त्रहरण होतंय. महाभारतातल्याप्रमाणे इथे कलेला पणात हरलेला "धर्मराज"ही आहे, वस्त्रहरण करणारा (करणारं?) दुःशासनही आहे, विवश झालेले गुरू व कुटुंबीयही आहेत. राजा तर आंधळाच आहे. कमतरता आहे ती द्रौपदीला वस्त्र पुरवणार्‍या व धर्मयुद्धात धर्माच्या बाजूचं सारथ्य करणार्‍या श्रीकृष्णाची.

Tuesday, June 10, 2008

नव्या पिढीबद्दल सदैव नाराजीचा सूर का?

महत्त्वाची सूचना:
जुन्या पिढीतले बुजुर्ग संगीतज्ञ (गायन, वादन, नृत्य यांच्याशी संबंधित सर्व कलाकार - अभिजात शास्त्रीय संगीतापासून चित्रपट गीत, लोकगीत, इत्यादि सर्व प्रकार त्यात येतात), चित्रकार, शास्त्रज्ञ, पत्रकार, व्यावसायिक, समाजसुधारक, इतर क्षेत्रांतले कर्तृत्ववान लोक तसेच सामान्य माणूस, या सर्वांबद्दल मला आदर आहे. त्यांच्या विचारांचा मी आदर करतो. एवढंच नव्हे, तर नव्या पिढीला त्यांनी उच्च आदर्श प्रदान केल्यामुळॆ त्यांचा ऋणी आहे. जुन्या पिढीबद्दल भाष्य करण्याइतकी माझी कुवत नाही व तसा माझा दावाही नाही. कुठल्याही क्षेत्रातलं प्रतिनिधित्व करण्याइतका कर्तृत्ववान मी नाहीये; पण नव्या पिढीतल्या सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करण्याइतका सामान्य निश्चितच आहे. म्हणून, एका सामान्य माणसाच्या भूमिकेतून मी काही विचार इथे व्यक्त करणार आहे. त्यात कुणाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. तरी, कळत-नकळत अनेकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, त्यामुळे सर्वप्रथम मी जुन्या पिढीतल्या सर्वांची क्षमा मागतो.

आज बर्‍याच दिवसांनी ई-सकाळला भेट दिली. "खेळ सातबाराचा" या भावी चित्रपटातलं कविवर्य ग्रेस यांनी लिहिलेलं व पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं गीत जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्याबद्दलची बातमी व व्हिडिओ क्लिप पाहिली. हे तीन दिग्गज एकत्र आल्यावर होणारा कलाविष्कार अप्रतीम होता हे सांगावं लागलं तरच नवल. खरोखर बातमीच्या शीर्षकाप्रमाणे "ग्रेसफुल शब्दांना ग्रेसफुल आवाज" - ग्रेसफुल संगीतही. व्हिडिओ क्लिपमध्ये रेकॉर्डिंग रूम मध्ये आशाताईंच्या गाण्याची जेमतेम पाऊण मिनिटाची झलक प्रसन्न करून गेली. त्यानंतर आशाताईंची पत्रकारांनी घेतलेली मुलाखत व नेहमीप्रमाणे अतिशय नम्रपणे आणि मोनमोकळेपणे आशाताई बोलल्या. त्यावेळी पूर्वीच्या रेकॉर्डिंगच्या वेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती सांगितली. आगामी काळात त्या स्पेन व पोर्तुगाल येथे वर्ल्ड म्युझिक फेस्टिवलमध्ये जाणार आहेत. वयाची सत्तरी ओलांडली तरी अजूनही त्या सतत व्यस्त असतात हे आमच्या पिढीला खरोखर शिकण्यासारखं आहे. मुलाखतीदरम्यान आशाताईं म्हणाल्यात, "खरं म्हणजे आम्ही ज्यावेळी गाणी गात होतो, त्याला कॅब्रे म्हणायचे, आणि त्यावेळचे लोकं आम्हाला नावं ठेवायचे; मला विशेषतः फार नावं ठेवायचे. तर आत्ताची हिरॉइनची गाणी बघितल्यानंतर असं वाटतं की मी त्यावेळेला भजनं गात होते.... आताचे ड्रेस आणि आताच्या ऍक्शन इतक्या व्हलगर असतात, की मला वाटतं की फॉरेनचे लोकंपण इतक्या व्हलगर ऍक्शन घेतात की नाही, माहिती नाही; इतकं व्हलगर आपल्या फिल्ममध्ये आता यायला लागलंय."

चित्रीकरणामध्ये अश्लीलतेचं प्रमाण आता वाढलंय हे कटु सत्य आहे. परंतु नव्या कलाकृतींना असं सरसकटं नावं ठेवणं खटकलं; व यशाची सर्वोच्च शिखरं पार करूनही विनम्र असलेल्या व अगदी साध्या माणसाप्रमाणे नव्या पिढीशी आनंदाने समरस होणार्‍या, लीलया संवाद साधणार्‍या आशाताईंसारख्या दिग्गज गायिकेने असं जनरलाईझेशन करावं याचं दुःख झालं. आशाताईंच्या विचारांचा मी नितांत आदर करतो. त्यांनी रिऍलिटी शोजबद्दल केलेली वक्तव्ये पटतातही. तरी या सर्व परिस्थितीबद्द्ल नव्या पिढीला दोषी ठरवणं मला पटत नाही. आशाताईंची क्षमा मागून आता मी काही गोष्टी इथे मांडू इच्छितो.

खोलात निरीक्षण केल्यावर लक्ष्यात येतं की केवळ आशाताईंच्या किंवा इतर मान्यवर संगीतज्ञांच्या विधानांपुरता किंवा संगीतकलेपुरता हा विषय मर्यादित नाही. एकंदरीतच नव्या पिढीबद्दल हल्ली जुन्या पिढीने नाराजीचा सूरच काढावा ही भारताची संस्कृती होते की काय? असं वाटायला लागलं आहे.संगीताचा विषय निघालाय म्हणून आधी गेल्या दहा-बारा वर्षांतल्या संगीताचा आढावा घेऊ. रिमिक्सबद्द्ल नव्या पिढीला नावं ठेवली जातात. माझ्या माहितीप्रमाणे भारतीय संगीताच्या इतिहासातला पहिला रिमिक्स "पर्सनल मेमरीज - राहुल ऍन्ड आय" हा होता व तो जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी काढला होता. त्याला आता तब्बल बारा वर्षे होऊन गेली. (चूक भूल द्यावी घ्यावी.) नव्या पिढीने रिमिक्स केल्यावर "जुन्याच गाण्यांना नव्याने चाली लावण्यात काय अर्थ आहे?" असा सवाल केला जातो. जुन्या पिढीला मी विचारू इच्छितो, की एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार करणार्‍या सिव्हिल इंजिनिअरला नवीन इमारत बांधता येत नाही असं आपल्याला वाटतं का? रिमिक्सच्या गाण्यांची मंदिराशी बरोबरी करू इच्छित नाही. पण "पिया तू अब तो आजा", "परदे में रहने दो", "सैया दिल में आना रे" इत्यादि गाणी त्या त्या काळात लोकप्रिय असूनही साधारणपणे १५ वर्षांपूर्वी तितकीशी ऐकली जात नव्हती. रिमिक्स निघाल्यावर मूळ गाणीही लोकं नव्यानं ऐकू लागले हे तरी मान्य कराल ना?

"रिऍलिटी शो"बद्दल म्हणायचं तर, "सारेगमप" जेव्हा "सारेगम" होतं तेव्हा स्पर्धकांचा दर्जाही चांगला होता व तरीसुद्धा त्यात पार्श्वगायक/पार्श्वगायिका निवडणे हा मुद्दा कधी नव्हताच. पार्श्वगायनासाठी कलाकार निवडणारा "मेरी आवाज सुनो" हा पहिला रिऍलिटी शोसुद्धा रीमिक्सप्रमाणेच एका तपाएवढा जुना. तेव्हा सर्वसामान्यांपर्यंत मोबाईल फोन पोहोचले नसल्यामुळॆ केवळ जाणकारांच्या परीक्षणातून कलाकार निवडले जात होते. अशा स्पर्धांमध्ये विजयी होणे म्हणजे सर्वस्व नव्हे, तर ती केवळ एक सुरवात करण्याची संधी हे त्यांत विजयी झालेले स्पर्धकही जाणतात. रिऍलिटी शोचं बाजारीकरण झालं ते मोबाईल फोन सर्वसामान्यांना परवडायला लागला तेव्हापासून. एस.एम.एस.च्या जोरावर स्पर्धकांमधून महागायक/महागायिका निवडली जाणं ही बाब आमच्या पिढीलाही पटत नाही. पण त्याला एस.एम.एस करणार्‍यांबरोबरच त्यात सहभागी होणारे संगीतज्ञही जबाबदार नाहीत का? संगीतासारख्या अभिजात कलेचा असा बाजार होत असताना हे संगीतज्ञ स्वतः नामवंत कलाकार असूनसुद्धा कडाडून विरोध करण्याऐवजी स्वतःच प्रोत्साहन देतात याहून मोठं दुर्दैव कोणतं? ज्या पिढीसमोर असे आदर्श असतील तर त्या पिढीकडून चांगल्या कलाकृतींची अपेक्षा कशी करणार?

तरीसुद्धा, अनेक उत्तमोत्तम कलाकृती नवीन पिढीने रसिकांना दिल्या आहेत. हिंदी व मराठी चित्रपटांच्या विषयांमध्ये हल्ली पूर्वीच्या तुलनेत वैविध्य वाढलंय ही गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. हिंदीतले दिल चाहता है, ब्लॅक, कलियुग, आजा नच ले, तारे जमीं पर इत्यादि चित्रपट तसेच मराठीतले तू तिथं मी, सातच्या आत घरात, नितळ, उत्तरायण, आम्ही असू लाडके, डॊंबीवली फास्ट, सावली इत्यादि चित्रपट स्वतःचा वेगळेपणा सांगून जातात. संगीताबद्दल म्हणायचं तर आयुष्यावर बोलू काही, साद तुझी इत्यादि मराठी अल्बम किंवा हिंदीमधील फाल्गुनी पाठक, सोनू निगम, अदनान सामी यांचे अनेक अल्बम तसेच दिल है के मानता नही, कुछ कुछ होता है, हम आप के दिल में रहते है, हम दिल दे चुके सनम, रेफ़्युजी, कलियुग, दिल चाहता है, तेरे नाम, परिणीता, यहा, वो लम्हे, टॅक्सी नं ९२११, तारे जमीं पर असे कितीतरी चित्रपट आहेत ज्यांतली गाणी (काव्यही आणि संगीतही) सरस आहेत व अजिबात व्हल्गर नाहीत. त्यांचं प्रमाण इतर व्हल्गर गाण्यांच्या तुलनेत कमी आहे हे मान्य. पण आजच्या काळात हवासुद्धा पूर्वीइतकी शुद्ध नाही. जसं हवेत प्रदूषण आहे तसंच प्रत्येक क्षेत्रात आलंय. हे जे चित्र आहे, ते एका रात्रीत बदललेलं नाही.

जी गत कलाक्षेत्रांत तीच शिक्षणक्षेत्रामध्ये. पूर्वी मॅट्रिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरही उत्तम नोकरी मिळायची, आता ते शक्य आहे का? वाढलेली लोकसंख्या त्यामुळे वाढत आलेली स्पर्धा आणि शिक्षणाचा व्यापार (यात दोष नव्या पिढीचा की जुन्या पिढीचा?) या सर्व गोष्टी त्यास कारणीभूत आहेत. मी शाळेत असताना, "मी शेंगा खालल्या नाहीत म्हणून मी टरफलं उचलणार नाही" हे लोकमान्यांचे उद्गार "स्पष्टवक्तेपणा"च उदाहरण द्यायला वापरलं जायचं. खरोखर आज शिक्षकाला एखादा विद्यार्थी असं म्हणाला तर त्याला त्या विद्यार्थ्याचा स्पष्टवक्तेपणा म्हणतात की उर्मटपणा/उद्धटपणा? मग, स्वतःला न पचलेल्या गोष्टी नव्या पिढीने मात्र लीलया पचवाव्यात हा अट्टहास कशासाठी? "आमच्या काळात कमी रिसोर्सेस असूनही किती कामं करायचो! नव्या पिढीला मात्र कष्ट करायला नको" अशा स्वरूपाची वाक्य ऐकण्याचीही नव्या पिढीला आता सवय झालीये. पूर्वीच्या पिढीसमोर टार्गेट किती होतं, आजच्या पिढीसमोर किती आहे; याचा विचार व्हायला नको का? वाढत्या प्रदूषणात नवी पिढीला रोज मैलोंमैल वाहन चालवत जावं लागतं तरी सर्व कामांमध्ये अतिशय उत्साहाने ही पिढी सहभागी होते हे जुन्या पिढीला जाणवलं का? तरी त्याबद्द्ल कुणालाही कौतुक नाही, करण संपूर्ण पिढीच त्यातून जातेय. पूर्वीची स्पर्धा लाखोंमध्ये होती आताची अब्जांमध्ये आहे. या नव्या पिढीला जन्माला कुणी घातलं? तिच्यावर संस्कार कोणी केलेत? जुन्या पिढीनेच ना?

जुन्या पिढीतल्या लोकांबद्द्ल नव्या पिढीला नेहमीच आदर होता व आहे. जुन्या पिढीतल्या आदर्शांप्रमाणे वाटचाल करण्यासाठी व सृजनशीलता जपण्यासाठी नवी पिढी सदैव प्रयत्नशील आहे. म्हणून, नवीन पिढीच्या वतीनं माझं जुन्या पिढीला एक मागणं आहे. आमच्यावर प्रेम करा. आमच्यावर विश्वास ठेवा. आमच्या चुका अवश्य दाखवा, पण त्याबरोबर त्या सुधारण्याचा मार्गही दाखवा. यशस्वी होण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची व आशिर्वादाची नव्या पिढीला गरज आहे.