मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Tuesday, May 27, 2008

निसर्ग, मन, सुटीचा दिवस आणि आळस

निळ्याभोर नवलाईने पानोपान बहरली झाडे
घालित वाटेवर पायघड्या पडले कुसुमांचे सडे

अंगावर ग्रीष्मात ऊन पडता ही वसुंधरा तापे
लाल, धवल, पिवळ्या, गुलाबी रंगांनी परी नटली रोपे

मध्येच कधी येऊन जाई हळूच एक पावसाची सर
पुन्हा होई आकाश मोकळे पुन्हा पडे ऊन प्रखर

असेच रम्य वातावरण घेऊन आला एक सुटीचा दिवस
भटकंती वाटे करावी, पहावा निसर्ग, फिरावे सहज

क्षणैक होई विचार ऐसा परी मन देई प्रचंड आळस
"शांतपणे बैस घरातच" म्हणे, "कशाला तो उन्हाचा प्रवास?

निसर्ग तो का पळून जाई? होते की दर्शन प्रतिदिन!
गंध फुलांचा दरवळे तोच, काय आज त्यामध्ये नवीन?

नाही आज कामावर जाणे, निवांत मग घ्यावी झोप
रंगीबेरंगी फुलांची स्वप्नातच पहावी महिरप"

Wednesday, May 21, 2008

वीकांतातला बोनस

काही काही गोष्टी अपघातानेच आयुष्यात घडत असतात. नाही का? बर्‍याचदा आपण एखादं काम हाती घेतो किंवा एखादी वस्तू मिळवण्याच्या मागे लागतो तेव्हा आपण अपेक्षा करतो एक आणि होतं भलतंच. थोडक्यात सांगायचं तर आपले अंदाज चुकतात. चुकतात म्हणजे ते काम अजिबात होतच नाही किंवा ती वस्तू मिळतच नाही असंच मात्र नाही. एखादी वस्तू शोधता शोधता आपण कल्पनाही केली नसेल असं काही तरी आपल्याला सापडतं आणि ते अनपेक्षित असल्यामुळॆ "बोनस" मिळाल्यासारखं वाटतं. असंच काहीसं मध्यंतरी माझ्या दैनंदिन आयुष्यात झालं.

"अल्मंड बटर"बद्दल ऐकल्यापासून तो काय प्रकार आहे हे पाहण्याची इच्छा झाली होती. इथे घराजवळच्या दुकानांमध्ये बराच शोध घेतला. तिथे पीनट-बटर, अल्मंड-मिल्क इत्यादि प्रकार सापडलेत पण अल्मंड बटर सापडे ना. व्हिगन स्टोअरमध्ये अल्मंड बटर हमखास मिळेल असं वाटल्याने इंटरनेटवर व्हिगन स्टोअर्स शोधून काढलीत. त्यात लॉस एन्जेलिस् डाऊनटाऊनमधला एक पत्ता शोधत निघालो. ते दुकान सापडलं, पण अल्मंड-बटर काही मिळालं नाही. पण या भटकंतीमुळे अलिबाबाची गुहा सापडावी तसं झालं आणि डाऊनटाऊनमधलं ग्रँड सेंट्रल मार्केट सापडलं.

हे मार्केट १९१७ सालापासून म्हणजे तब्बल ९१ वर्षांपासून अस्तित्वात आहे, तेव्हा त्याला लॉस एन्जेलिसचा "सांस्कृतिक ठेवा" म्हटलं तर वावगं ठरू नये. मेट्रो रेड लाईन लोकलच्या पेर्शिंग स्क्वेअर स्टेशनपासून उत्तरेकडे अगदी पायी चालण्याच्या अंतरावर असलेल्या या बाजारात हिल स्ट्रीट व ब्रॉडवे या दोन्ही रस्त्यांवरून जाता येतं. या बाजाराचं वैशिष्ठ्य असं, की तो "शॉपिंग मॉल" नाही. भाज्या, फळांची दुकानं अगदी भारतातल्या मंडईची आठवण करून देतात. विविध प्रकारची धान्ये, मसाले, इत्यादींची स्वतंत्र दुकानं तिथे आहेत. तसंच बेसमेंटमध्ये गृहोपयोगी वस्तुभंडार आहे. एवढंच नव्हे, तर खाण्यापिण्याची सोयसुद्धा आहे. चायनीज, मंगोलियन, जपानी, मेक्सिकन, इत्यादि विविध प्रकारच्या पदार्थांचे स्वतंत्र स्टॉल्स जत्रेची आठवण करून देतात. ताज्या फळांचे रस (रासायनिक किंवा इतर कुठलीही प्रक्रिया न केलेले) उत्तम मिळतात.

मला सर्वात जास्त आनंद झाला तो या बाजारात मिळणार्‍या कोथिंबिरीमुळे. स्वयंपाकात कोथिंबीर वापरल्याचं जाणवेल असा मस्त स्वाद त्या कोथिंबिरीला असल्यामुळे घराजवळच्या दुकानांमधून कोथिंबिरीसारखं दिसणारं गवत आता अजिबात विकत घेत नाही. कोथिंबीरच नव्हे; सर्वच भाज्या अगदी ताज्या मिळतात. लहान आकारातले कांदे, बटाटे, लिंबू - सगळंकाही ताजं, प्रक्रिया विरहित व त्यामुळे स्वस्त आणि मस्त. खरंतर फार्मर्स मार्केटमध्येही अशा भाज्या मिळातात, पण तिथे अशी मजा नाही. तिखट, तमालपत्र, काळी मिरी इत्यादि मसाले; तसेच राजमा, वाटाणे, चणे, इत्यादि पदार्थही तिथे मिळतात. हे पदार्थ भारतीय दुकानांमध्येही मिळत असले, तरी ग्रँड सेंट्रल मार्केटमध्ये जाऊन ते पदार्थ विकत घेण्यात एक वेगळीच मजा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इथे क्रेडिट/डेबिट कार्ड चालत नाही. रोख रक्कमच स्वीकारली जाते.

प्रत्येक गावाचं एक वैशिष्ठ्य असतं. लोक लॉस् एन्जेलिस् मध्ये युनिव्हर्सल सिटी, गेटी विला किंवा अनेक लोकांनी भेट दिल्यामुळे प्रसिद्धीस आलेली इतर प्रेक्षणीय स्थळं पाहायला येतात. पण सांस्कृतिक ठेवा असलेला हा बाजार खरोखर पाहण्यासारखा आहे.

असो. तर, या बाजाराविषयी माहिती मिळाल्यापासून आठवडाभराची भाजी आणायच्या निमित्ताने त्या पुरातन वास्तूचं दर्शन घेणे हा माझा सध्याचा वीकांतातला मुख्य उद्योग बनलाय. एकंदरीत, वीकांतातला हा बोनस फारच उपयुक्त ठरलाय.


विशेष सूचना: "वीकांत" हा शब्द मी प्रथम सुमेधाकडून ऐकला व तो आवडल्यामुळॆ तत्परतेने वापरू लागलो. :)