मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Wednesday, April 4, 2018

होतं असं कधीकधी

होतं असं कधीकधी, की तुम्ही मित्र असता
अन् नंतर कधीतरी ... तुम्ही मित्र नसता
मैत्री सरते
सरतात दिवसरात्री
आणि रितं होऊन जातं
एक कारंजं

होतं असं कधीकधी, की तुम्ही जिवलग असता
अन् नंतर कधीतरी ... तुम्ही जिवलग नसता
प्रेम सरतं
सरतात दिवसरात्री
आणि रितं होऊन जातं एक कारंजं
बागेमध्ये

कधीतरी मग वाटतं तिच्याशी बोलावंसं
पण ... नाही वाटत मग बोलावंसं
अन्  मग वेळ गेली असते निघून
राख होऊन
स्वप्ने जातात विरून
अचानक

आणि मग असं होतं, की कुठेच जायचं नाहीये
पण ...आहे!  कुठेतरी जायचंय!
सगळं ओलांडून
मग जाता तुम्ही पुढे
आणि युगे सरतात
जणु निमिषार्धात

आता काहीच नाहीये कमवण्यासारखं
किंवा काही गमवण्यासारखं
"काही फ़रक तर पडणार नाही?" - विचार करता तुम्ही
आणि विचार करू लागता - "काय फ़रक पडतो?"
फ़रक पडणं सरलंय आता
फ़िकीर करणं नुरलंय आता
आणि रितं होऊन गेलंय एक कारंजं
बागेमध्ये


ब्रायन पॅटर्न यांच्या "समटाईम्स् इट् हॅपन्स्" ह्या कवितेचा स्वैर भावानुवाद करण्याचा प्रयत्न केलाय. कसा जमलाय हे तुम्हीच ठरवा. मूळ कविता मी फ़ेसबुकवर वाचली. इंटरनेटवर शोधल्यावर ह्या ब्लॉगपोस्टमध्ये सापडली.

Saturday, July 2, 2016

आंबा

गालिबचे आंब्यावरील प्रेम, त्यातून गालिबने आंब्यावर लिहिलेली कविता आणि एकंदरीतच मुसलमान राजे, कवींनी आंब्याचा शौकसुद्धा शेरोशायरीसारखाच किती आकर्षकपणे जतन केला होता अशा काहीशा आशयाचे एक पोस्ट फ़ेसबुकवरील ग्रुपवर साधारणतः एक-दोन वर्षांपूर्वी चित्तरंजन भट यांनी टाकले होते. त्यात त्यांनी एक खंतही व्यक्त केली होती, की मराठी साहित्यात आंब्याविषयी कवितांचा विचार करता "आंबा पिकतो, रस गळतो" या बालगीताव्यतिरिक्त पटकन् काही आठवत नाही आणि खरोखरच ही खंत किती रास्त आहे, हे पटले. फ़ेसबुकवर पुन्हा त्यांनीच आंब्यांचा विषय काढल्यावर त्यांचे ते जुने पोस्ट व खंत आठवले आणि विचार केला, की प्रयत्न करायला काय हरकत आहे? तर, "आंबा" या विषयावर मला सुचलेली ही कविता चित्तरंजन भटांसाठी.

गर तो आंबटगोड, रसाळ
मऊ, मधुर पिकलेले साल
ऊष्ण प्रदेशी प्रिय घरोघरी
चव 'बेगमपल्ली'ची न्यारी

मधुर रसाचा आंबा 'केशर'
कांती हिरवी, पीत, लालसर
रसाळ आंबा तसा 'दशहरी'
सुरकुतलेली त्वचा असे जरि

आकाराने लहान-मध्यम
वळिवानंतर भेटे 'नीलम'
चोखण्या हवा 'गावरान' परि
मोरांब्याला अन् 'तोतापुरि'

चाखावे 'वलसाड', 'रायवळ'
'मलगोबा', 'लड्डु', 'हिमसागर'
उत्तरेकडे तसा रसीला
'चौसा' आणिक आम 'रतौला'

नाव जरी आंब्याचे 'लंगडा'
'पायरी'परी चवीस तगडा
मंद चव, गंध दरवळे सुरस
स्वादासाठी घ्यावा 'हापुस'

Monday, May 20, 2013

आस्तिक, नास्तिक, अध्यात्मिक

देवावर श्रद्धा असणारा, देवाचं अस्तित्व मानणारा तो आस्तिक व देवाचं अस्तित्व नाकारणारा तो नास्तिक हे आस्तिक-नास्तिक या शब्दांचे रूढार्थ आहेत.

देवाबरोबरच किंवा देवाऐवजी इतर कशावरही (उदा. संत, गुरू, आईवडिल, विशिष्ट व्यक्ती, वस्तु, स्वतः, इ.) "श्रद्धा" असणे अशी आस्तिकतेची व्यापक व्याख्याही देता येईल. पण तूर्तास देवावरील श्रद्धेबद्दलच पाहू. देवाच्या नावाचा जप करणे, देवाची पूजा करणे, पोथ्यापुराणं वाचणे इ. गोष्टी आस्तिक लोकं करतात. अध्यात्मिक उन्नती साधायची असल्यास या गोष्टी "सेवा" म्हणून निःस्वार्थपणे करणे यात अपेक्षित आहे. पण हा "निस्वार्थपणा" येणं फारच अवघड आहे. अगदी रोजची देवपूजा करताना "ती केल्याने मन शांत होते, आनंदित होते" या भावनेपेक्षा "ती न केल्यास देवाचा कोप होईल, आपले काही तरी राहिले आहे असे मनाला वाटत राहील" हीच भावना जास्त बळावत राहते. अर्थात् याला अपवाद आहेतच, पण तूर्त ते बाजूला ठेवू. अगदी देवळात देवाला दाखवलेला नैवेद्य आपल्या हातावर प्रसाद म्हणून पडतो तेव्हा "अरे वा! आज कंदीपेढे!" पासून "इथल्या खिचडीला कायम एक कुजट वास येतो" इ. व तत्सम प्रतिक्रिया मनात येतात. म्हणजे त्या प्रसादाला "प्रसाद" म्हणून स्वीकारायला मन तयार नसतं ते फक्त कंदीपेढा, खिचडी, इ. स्वीकारतं.

गजानन महाराजांच्या पोथीत मोक्षाच्या तीन मार्गांबद्दल विवेचन आहे त्यात आपापल्या मार्गावरील अर्धवट प्रवास झालेल्यांना पंथाभिमान असतो त्यामुळे त्यांच्यामध्ये भांडणे होतात असं सांगितलंय. खरंतर मोक्षाचे अनेक मार्ग असू शकतात. त्यातले काही आपल्याला माहित असतील, काही नसतीलही. "नास्तिकता हा मार्ग नाहीच" ह्या म्हणण्याला कुठला आधार आहे? नास्तिक लोकांकडे नाकं मुरडून पाहण्याची किंवा "हे स्वतःला ग्रेट समजतात", वगैरे वगैरे विचार करून पाहण्याची आस्तिक लोकांना सवय असते. इथे नास्तिक लोकांच्या व्यक्त नास्तिकतेमुळे आस्तिक लोकांना त्रास होतो याचा अर्थ अजूनतरी मनाला षड्रिपूंवर विजय मिळालेला नाही.

अध्यात्माच्या उच्च पातळीवर पोहोचण्यासाठी मनाने षड्रिपूंवर विजय मिळवणे, निराभिमान होणे आवश्यक असते, जे सर्वांना जमतेच असे नाही. सगळं सुरळीत चाललंय तोवर देवाचं नाव नाही आणि एखादं संकट आलं की नवसांची लाईन लागली अशी आस्तिक लोकं भरपूर असतात. या बहुतांश लोकांच्या आस्तिकतेपेक्षा थोडी वरची पायरी गाठलेली माणसंही असतात. नाही असं नाही. देवावर श्रद्धा असते, रोज नियमितपणे दैनंदिन स्वार्थ नसूनसुद्धा साधना करणारे आस्तिक लोकंही बऱ्यापैकी असतात. पण कधीतरी परिस्थिती सहनशक्तीबाहेर बिघडते आणि देवावरची श्रद्धा क्षणभर का होईना, पण ढळते, कमी होते. थोडक्यात, या पायरीपर्यंत पोहोचल्यावरही आस्तिक माणसाच्या आस्तिकतेस मर्यादा येतातच. पण, सातत्याने साधना सुरू ठेवल्यास त्यावर मात करता येते, विकल्प कमी होऊन अध्यात्मिक उन्नती होते व या मर्यादा येण्याचे प्रमाण कमी होत जाऊन मोक्षापर्यंतचा प्रवास साधता येऊ शकतो, असे अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहेच. खरेतर "मोक्षाची इच्छा" हीसुद्धा मनालाच असल्यामुळे तो एका प्रकारचा स्वार्थच आहे. या इच्छेचाही त्याग करून सतत साधना करत राहायची, देवाला इच्छा झाल्यास मोक्ष मिळेल!

नास्तिकतेची व्याख्या देवाला न मानण्यापुरती संकुचित नसून त्यात आंधळेपणाने कशावरच विश्वास न ठेवणे अभिप्रेत आहे. इतरांचे संदर्भ वापरायचे नाहीत असे नाही, पण ते वापरण्यापूर्वी आपल्या बुद्धीच्या, ज्ञानाच्या आधारे त्यांची तर्कशुद्ध तपासणी करून ते योग्य प्रकारे व उचित प्रमाणातच स्वीकारणे अपेक्षित आहे. नास्तिक लोकं बुद्धीला न पटणाऱ्या कशालाच मानत नाही, त्यामुळे परिस्थितीकडे त्रयस्थपणे पाहणे त्यांना जास्त सोपे जाते. हा त्रयस्थपणा विरक्तीसाठी फारच उपयुक्त असतो. एखाद्या संकटप्रसंगी आस्तिक व्यक्तीची भावना "देवा, हे कठीण गणित मला सोडवून दे" अशी असेल तर नास्तिक माणूस त्या गणिताचे आकलन करून ते आपल्या बुद्धीनुसार कसे सोडवता येईल याचा विचार करून त्यानुसार पावले उचलेल. आस्तिक माणूस देवालाही घाबरतो व देव कोपला तर गणित सुटणार नाही या (त्याच्या दृष्टीने असलेल्या) वास्तवासही घाबरतो. गणित सुटत नसल्यास असे घाबरत बसण्यापेक्षा नास्तिक माणसाचा परिस्थिती स्वीकारण्याकडे कल असतो. ते गणित फारसे महत्त्वाचे नसल्यास ऑप्शनमध्ये सोडून देणे नास्तिक माणसाला सहज जमते, कारण त्याला पास-नापास होण्यची चिंता नसते. नास्तिक माणूस दुधा-मधाने देवाचा अभिषेक करत नाही, की बोकडाचा बळी देऊन यज्ञ करत नाही. कुणाला मदत करायची झाल्यास मुहूर्त, अमावस्या, तिन्ही सांजेची वेळ, जात, वैधव्य, अशौच, इ. गोष्टी नास्तिक माणसाच्या आड येत नाहीत. तो "देव" ही संज्ञा मानत नसला तरी माणसातला देव त्याला उमगला आहे. त्यामुळे एकंदरीत सुरुवातीलाच त्याची अध्यात्मिक पातळीही आस्तिक माणसाच्या तुलनेत थोडी वरची असते.

द्वैताकडून अद्वैताकडे जाताना देवाच्या स्वतंत्र अस्तित्वाची, वेगळेपणाची जाणीवही नाहीशी झाली तरच  "अहं ब्रह्मास्मि"ची अवस्था गाठता येईल. आस्तिक माणूस हा त्याग अगदी शेवटच्या पायरीवर करत असतो, तर नास्तिक माणसाने तो सुरुवातीलाच केलेला असतो. मग नास्तिकता ही आस्तिकतेपेक्षा सदैव श्रेष्ठ असे म्हणायचे का? तर, नाही. किंबहुना, सांगता येणार नाही. खरं तर आपण, आपल्यातली बहुतांश माणसे काही प्रमाणात आस्तिक व काही प्रमाणात नास्तिक असतो. आस्तिकतेच्या आधारे अध्यात्मोन्नती साधण्यासाठी अनेक संदर्भग्रंथ, उदाहरणे, मार्गदर्शनासाठी उपलब्ध असल्यामुळे आस्तिकतेचा अध्यात्मिकतेशी संबंध आपण सहज लावतो, इतकेच. किंबहुना, परिस्थितीकडे त्रयस्थपणे पाहण्याच्या नास्तिक लोकांच्या पिंडामुळे त्यांना अध्यात्मिक उन्नती कदाचित् जास्त प्रभावीपणे साधता येईल. नास्तिकतेच्या व्याप्तीचा विचार केल्यास ती आत्मसाथ करणे आस्तिकतेपेक्षा कितीतरी पटीने कठीण आहे, हे मात्र खरे. ज्यांना ती साधली, त्यांच्या अध्यात्मिकतेकडे आस्तिकतेच्या चष्म्यातून पाहणे योग्य ठरणार नाही.

तात्पर्य, आस्तिकता व नास्तिकता या दोन स्वतंत्र विचारधारा आहेत, ज्या एकाच वेळी आत्मसाथ करणे अध्यात्मिक प्रवासासाठी गैरसोयीचे आहे.  बहुतांश लोकं पूर्णतः आस्तिक किंवा पूर्णतः नास्तिक नसल्यामुळे उन्नत अध्यात्मिक अवस्थेपासून दूर असतात.

Sunday, July 29, 2012

आयुष्य (३)

वास्तव पोळी
भावनांचे लोणचे
आयुष्य जेवी

Friday, July 20, 2012

जो जे वांछील तो ते लाहो

एक-दोन आठवड्यांपूर्वी बाबा पसायदान म्हणत असताना “जो जे वांछील तो ते लाहो"  या ओळीकडे सहज लक्ष्य गेलं. या ओळीचा सरधोपट अर्थ असा आहे, की ज्याची जी इच्छा असेल ती‌ पूर्ण होवो. वर वर पाहता हे फारच सोपं आणि सामान्य आहे असं वाटतं, पण खोलवर विचार करायचा प्रयत्न केल्यास हे मागणे किती गहन आणि व्यापक आहे हे लक्ष्यात येतं.

मूल जन्माला येतं तेव्हा सुरुवातीला भूक, झोप आणि मलमूत्रत्याग याच क्रिया त्याच्या आयुष्यात असतात, पैकी मलमूत्रत्याग आणि झोप या सहज प्रवृत्ती असल्यामुळे "भूक" हीच मूलभूत इच्छा असते. भूक लागली की बाळ रडतं. मग आई त्याला पाजायला घेते. भूक शमल्यावर बाळ शांत होतं. कधीकधी बाळ भूक लागली नसतानाही रडतं. भयावह स्वप्न पडणे, थंडी वाजणे, उकडणे, डास, मुंगी किंवा इतर काही चावणे, अशी काहीही कारणं असू शकतात. त्यांचं निराकरण होताच बाळ पुन्हा शांत होते. थोडक्यात, कशाची तरी कमतरता जाणवली किंवा असुरक्षितता/असहाय्यता जाणवली की बाळ रडतं. मला अमूक हवंय हे सांगण्याकरता रडणे हेच एकमेव साधन असतं त्याच्याकडे. हे अमूक म्हणजे अन्न, सुरक्षिततेची हमी देणारा स्पर्श किंवा देहाला होणारा त्रास दूर करण्याचे उपाय. ते पूर्ण होताच बाळ शांत होतं! इथे वांछिणे बाळाला बोलून व्यक्त करता येत नसलं तरी आपण नेमकं भुकेसाठी रडतोय की भीती वाटल्यामुळे की‌ उकडतंय म्हणून की अन्य काही कारण आहे, हे त्याला अचूक समजलेलं असतं. पण रडून व्यक्त झालेल्या बाळाने नेमके काय वांछिले आहे हे इतरांना समजणं कठीण आहे. मग ते रडणं थांबवण्याचे उपाय सुरू होतात. योग्य उपाय होताच वांछिलेले "लाहल्याची" पावती मात्र बाळ तत्परतेने देतं. पुढे बाळ मोठं झालं की इच्छा व्यक्त करण्यासाठी चेहऱ्यावरील भाव, हातवारे, खुणा करणे, बोलणे इ. गोष्टी हळू हळू अवगत होतात तेव्हा त्याला त्याच्या इच्छा जास्त प्रभावीपणे मांडता येतं. पण हे सगळं एकाच जीवाबद्दल झालं. आणि तेही त्याच्या साध्या इच्छांबद्दल!

वय वाढत जात त्याबरोबर इच्छांचे प्रकारही वाढत जातात. या जगात मी एकटा नसून माझ्यासारखे अनेक आहेत आणि त्या सर्वांनाच इच्छा-आकांक्षा आहेत याची जाणीवही होते. मग या इच्छा-आकांक्षा बाळगण्यापासून त्या पूर्ण करण्यापर्यंत स्पर्धा सुरू होते. उदा. एखाद्या राज्य/देशपातळीवरील स्पर्धेत/परीक्षेत पहिल्या क्रमांकावर यायची माझी महत्त्वाकांक्षा आहे तशी इतर काही लोकांचीसुद्धा आहे. ग्राहक म्हणून मला किराणा, गृहोपयोगी वस्तू स्वस्त हव्यात. पण दुकानदार म्हणून मला नफ़ाही मिळायला हवा. मला मधुमेहाचा त्रास असल्यामुळे गोडपदार्थ शरीराला अपायकारक आहेत. पण माझ्या जिभेला सतत गोड खाण्याची इच्छा होते!

इच्छापूर्तीच्या स्पर्धांची व्याप्ती वाढत जाते आणि त्यातून महत्त्वाकांक्षा, दुराग्रह, इ. इच्छेची उग्र रूपे जन्म घेतात. त्यानंतर माझी महत्त्वाकांक्षा त्याच्या/तिच्या महत्त्वाकांक्षेपेक्षा जास्त महत्त्वाची कशी आहे हे स्वतःलाच समजावण्याचा "स्वार्थ"ही जन्माला येतो आणि पाठोपाठ स्वार्थजन्य आकांक्षा येतात त्या वेगळ्याच! मग माझा देश त्यांच्या देशापेक्षा कसा श्रेष्ठ आहे यापासून माझा प्रांत, माझं शहर, माझी कॉलनी, माझे जातीबांधव, इ. पर्यंत स्पर्धा चालूच राहतात आणि सगळ्याच इच्छा पूर्ण होत नसल्यामुळे/वेळेवारी पूर्ण न झाल्यामुळे अतृप्त झालेला माणूस कायदे मोडतो, शिष्टाचार पाळत नाही, धर्मबाह्य वर्तन करतो.

मग प्रश्न पडतो, की "जो जे वांछील तो ते लाहो" हे मागणे अशक्य आहे काय? अर्थातच नाही! "वांछील" आणि "लाहो" हे शब्द वाटतात तितके सोपे खचितच नाहीत. वर पाहिलेल्या उदाहरणात आपण परस्परविरोधी इच्छांमध्ये स्पर्धा कशी निर्माण होते ते पाहिलं. यात जिंकलेल्या स्पर्धकांची काय अवस्था होते? स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर आल्यावर आनंद होतो, पण तो क्षणभंगुर आहे. तो संपताच पुढल्या स्पर्धेच्या तयारीला लागायचं. पुन्हा जिंकल्यास पुन्हा आनंद होईल, पण तोही क्षणभंगुर असेल! थोडक्यात, स्पर्धा जिंकणे ही इच्छा असली तरी "जिंकल्याचा आनंद नष्ट संपलेला असणे" ही बाब पुढल्या स्पर्धेत भाग घेण्यास कारण होते. मधुमेहाचा त्रास असताना गोड खाल्ल्यास त्रास होत असला तरी गोड खाल्ल्याबरोब्बर जिभेला जे क्षणिक समाधान होते, त्याची पुनरावृत्ती व्हावी असे वाटल्यामुळे त्रास होत असूनही गोड खाण्याची जिभेला इच्छा होते. बाळसुद्धा भूक शमल्यावर, भीती संपल्यावर, इ. शांत होते ते या आनंदानुभवामुळे!

मग नेमकी इच्छा कशाची? स्पर्धेत पहिला येण्याची, की गोड खाण्याची की तो (क्षणिक का होईना!) आनंद अनुभवण्याची? ती स्पर्धाच नसती, तर? देवाने जिभेला चवच दिली नसती तर? तर कदाचित् त्या त्या इच्छाही उद्भवल्या नसत्या! यावरून असे वाटते की "जो जे वांछील" मधल्या "वांछिणे"चा गर्भित अर्थ म्हणजे या आनंदापासून दूर असण्याचे नेमके कारण.  इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन कर्तव्यनिष्ठ राहून हे कारण दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत राहिल्यास ते कारण कधीतरी पूर्णतः संपेल आणि जीवाला तो आनंद अखंड अनुभवण्याची स्थिती प्राप्त होईल. या स्थितीला जाऊन मिळणे (to attain the state of equibrium) म्हणजेच "लाहणे" असेल. “गांधीगिरी", “गेट वेल् सून कार्ड पाठवणे" यातला गंमतीचा, करमणुकीचा भाग सोडा. पण दोन किंवा अधिक माणसं असोत किंवा प्रांत, राज्य, देश इ. समाजातले गट असोत. त्यांच्यातील भांडणांचं/शीतयुद्धांचं मूळ अपूर्ण राहिलेल्या इच्छांमध्ये आहे हे १००% खरं आहे.

संत ज्ञानेश्वरांचे हे मागणे इतके व्यापक आणि सर्वसमावेशक आहे, की त्याचा वेध घ्यायला बुद्धी आणि ज्ञान अपुरे पडतात आणि त्यातून जे आकलन होईल ते व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात. त्यामुळे यावर अधिक लिहिण्यापेक्षा देवाला हीच प्रार्थना की "जो जे वांछील तो ते लाहो".

Friday, March 16, 2012

आयुष्य (२)

आयुष्याचे काव्य
असेल निरस
करण्या सुरस
देव स्मरा

आयुष्याची चाल
आडवळणांची
लीला ही देवाची
अप्रमेय

आयुष्याचे चित्र
गूढ नी अमूर्त
कोण साकारित
देवावीण?

देवाने घातले
आयुष्यात रंग
तयांमध्ये दंग
जीव झाला

आंतरजालावरील एका चिरतरुण मित्राला अर्पण. तो मित्र कोण, हे जालावरील चाणाक्ष लोकांनी ओळखले असेलच. :-)

Sunday, January 22, 2012

प्रचंड गारठा

------
भाग १:
------

प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......!
बर्फ़च घेऊन जणु बाहेर वाहतोय सुसाट वारा !

सूर्यकिरणांनी चकाकतोय दवबिंदू... की पारा?
निसर्गाने उघडलाय बघ! सौंदर्याचा गाभारा....

माझ्या हातात तुझा हात उबदार जरा...
तुझ्यासवे चालत चालत सरावा जन्म सारा....

प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......!
तुझ्यासह घालवलेला क्षण अन् क्षण न्यारा....!

------
भाग २:
------

प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......!
पहाटे पहाटे पेपरवाल्याने बेल वाजवली कराकरा..

आज रविवार! पुन्हा दुलई ओढून साखरझोप घ्यावी जरा.
सकाळी सकाळी "ही" का आवरतेय आज घरातला पसारा?

मिळेल का आज अंथरुणातच गरमागरम चहा जरा?
"अहो, उठा! .... इतका आळस नाही बरा."

प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा...... !
आता उठा राव लवकर.. चढण्याआधी "हिचा" पारा.....!!