मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Thursday, December 10, 2009

बदक आणि राजहंस













"नको लाजवु बदकास राजहंसा
पुरे आता लटकी तुझी प्रशंसा
दैवयोगे तू हंस जाहलासी
मित्र बदकाला परी विसरलासी

लाभली तुजला मान डौलदार
मानसी तूझा त्यामुळे विहार
रसिकजन ते भाळले मानसाला
राजहंसाचा होय बोलबाला."

राजहंसाला बदक वदे ऐसे
हंसमन ते जाहले हरवलेसे
आठवे त्याते बाल्य लोपलेले
कुरूपाला तै लोक हासलेले

मित्र बदकाला राजहंस बोले,
"स्मृती बाल्यातिल आठवू नको रे
जरी मैत्री दृढ आपुली असे रे
भेटता दोघां यातना किती रे!

कटू बाल्यावर सोडिले जळासी
रसिकजन मी रिझविले मानसासी
जाणतो मी, लटकी असे प्रशंसा
मानसास्तव पाहती राजहंसा

जोवरी माझी डौलदार मान
तोवरी माझा मानसात मान
लोपता हे सौंदर्य विसरतील
बदकरूपाते कोण भाळतील?

क्षणिक प्रेमाला मला चाखु दे रे
असे मिथ्या जरि, सौख्य भोगु दे रे
तयानंतर मानसास त्यागून
तुझ्या दारी शेवटी विसावेन."

नमन तुला मयूरेश्वरा

नमन तुला
वक्रतुंडा गणेशा
मयूरेश्वरा

नमन तुला
एकदंता गुणेशा
मयूरेश्वरा

नमन तुला
ढुंढे कृष्णपिंगाक्षा
मयूरेश्वरा

नमन तुला
विघ्नहर्त्या विकटा
मयूरेश्वरा

Sunday, November 22, 2009

प्रवास

मजसाठी जेव्हा वाट ही संपणार
मावळेल भास्कर अन् होइल अंधार
सोपस्कार नको मजला काळोखातिल
का खंत करावी कुणी मुक्त झाल्यावर?

मज स्मरा तुम्ही परि थोडक्याच वेळाला
नच अश्रू ढाळा आणिक मज स्मरताना
आठवा प्रेम जे दिले-घेतले आपण
आठवा कधी मजला तुम्ही जाउ द्या पण

हा प्रवास अपुल्या सर्वांना अनिवार्य
एकटेच जाणे पुढे, संपता कार्य
चालला खेळ हा मोठ्या दरबारातिल
जाण्यासाठी स्वगृही एक हे पाउल

एकाकी वाटुन मन होता कधि हळवे
भेटण्या सोयर्‍यासग्यांस तेव्हा जावे
अश्रु सुकवा त्यांच्यात प्रेम वाटून
आठवा कधी मजला तुम्ही जाउ द्या पण


एड्गर अल्बर्ट गेस्ट यांची "मिस मी, बट लेट मी गो" ही कविता काही दिवसांपूर्वी वाचली आणि अनुवाद करण्याचा मोह अनावर झाला. गेस्ट यांची क्षमा मागून या ब्लॉगवर हा स्वैर अनुवाद प्रकाशित करतो.

Wednesday, October 7, 2009

राम-कृष्ण तौलनिक मुक्तचिंतन आणि रामाचं अवतारकार्य

सूचना: या लेखाचं मूळ प्रकाशन - ऑर्कुटवरील कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण समूहातर्फे प्रकाशित "अंतर्याम" मासिकाचा ऑक्टोबर २००९ अंक (दिवाळी विशेषांक)

श्रीविष्णूंच्या दशावतारांपैकी राम आणि कृष्ण हे दोन अवतार सर्वाधिक लोकप्रिय आहेत. महाभारतात अर्जुनाला गीतेचा उपदेश करताना "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति" असं श्रीकृष्णाने म्हटलं आहे. अर्थात धर्मसंस्थापना आणि दुष्कृतींचा नाश ही या अवतारांमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. रामाआधी विष्णूचा "परशुराम" हा अवतार होता. परशुराम चिरंजीव आहे असं मानलंय. मग विष्णूला रामाचा अवतार घेण्याची गरज का पडली असावी? असा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो. या अवतारांमागील ढोबळ उद्दिष्ट जरी एक असलं, तरी त्यात परिस्थितीजन्य फरक होते. ज्याप्रमाणे रोगाने ग्रस्त असलेल्या शरीरात आरोग्यस्थापना करण्यासाठी त्या रोगानुसार औषधाची योजना होते, त्याप्रमाणेच विष्णूने आपलं अवतारकार्य समाजात धर्माची ग्लानी झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार निश्चित केलं असावं. सीतास्वयंवराच्या वेळी रामाने शिवधनुष्य तोडल्यावर रामाची व परशुरामाची प्रत्यक्ष भेट झाली. विष्णूच्याच दोन अवतारांचं असं समोरासमोर येण्याचा हा क्षण एकमेवाद्वितीयच होता. रामात जन्मापासून विष्णूचा अंश होताच. या भेटीत शक्तिसंक्रमणाद्वारे परशुरामातला विष्णूचा अंशदेखील रामाकडे गेला. परशुरामाचं अवतारकार्य संपलं आणि रामाचं अवतारकार्य सुरू झालं याचे संकेत या क्षणाने दिले. रामात आणि परशुरामात विष्णूचे "अंश" होते, पण कृष्णात विष्णूचा अंश नसून स्वतः विष्णूच कृष्ण म्हणून पृथ्वीवर अवतरले होते. त्यामुळे कृष्णाला पूर्णावतार मानलं जातं.

राम आणि कृष्ण या दोन अवतारांमध्ये काही घटनांमध्ये साधर्म्य आहे. राम रावणाचा वध करतो आणि बिभीषणाला लंकेचा राजा बनवतो. कृष्ण कंसाचा वध करतो आणि उग्रसेनाला मथुरेचा राजा बनवतो. दोन्ही प्रसंगांमध्ये खलनायकाच्या वधानंतर त्याचं राज्य स्वतः न स्वीकारता राज्यातल्याच "योग्य" व्यक्तीला सुपूर्त करून स्वतः अलिप्त राहणे हे साम्य चटकन नजरेस पडतं. राम एकपत्नी होता. कृष्णाला मात्र सोळाहजार एकशे आठ बायका होत्या असं मानलं जातं. या संदर्भात काही वर्षांपूर्वी पुण्यात योगेश्वर प्रतिष्ठान, कोथरूड तर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एका कार्यक्रमात राहुल सोलापुरकर यांनी आकर्षक माहिती दिली होती - "बालक जन्माला येतं तेव्हा निरोगी आणि सुदृढ असल्यास त्याच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांची संख्या सोळाहजार एकशे आठ इतकी असते. (पूर्वीच्या काळातल्या संस्कृतीनुसार) पत्नी ज्याप्रमाणे पतीच्या नियंत्रणात असते, आधीन असते, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने योगसामर्थ्याने या सोळाहजार रक्तवाहिन्या आपल्या नियंत्रणात ठेवल्या होत्या. म्हणून त्यांना श्रीकृष्णाच्या बायका म्हटलं आहे. आणि श्रीकृष्णाला योगेश्वर म्हटलंय." सोळाहजार बायका असूनही श्रीकृष्णाचा उल्लेख फक्त 'राधेश्याम' असाच का बरं होतो? याबद्दल श्री. सोलापुरकर पुढे म्हणाले - "मानवी शरीरात मस्तकात चैतन्याचा स्त्रोत असतो त्याची धारा अधोगामी असते. कुंडलिनी शक्ती मूलाधारचक्रापाशी स्थित असते. चैतन्याची अधोगामी 'धारा' कुंडलिनी शक्तीला जागृत करून उलटगतीने 'राधा' बनून मस्तकाकडे परतते. या कुंडलिनीरूपी राधेवर कृष्णाची प्रीती होती आणि 'धारा'चं 'राधा' करण्याचं त्याचं योगसामर्थ्य होतं. म्हणून "राधाधर", "राधेश्याम" अशा नावांनी श्रीकृष्णाचा उल्लेख केला जातो."

महाभारताचं कथानक कौरव-पांडवांवर केंद्रित असल्यामुळे आणि कंसाचा वध कृष्णजन्मानंतर काही वर्षांतच झाल्यामुळे कृष्णाची महत्त्वाची भूमिका असूनही तो महाभारतातलं मुख्य पात्र नव्हता. नंदगावात असतानाच्या कृष्णलीला किंवा नंतरच्या काळातल्या शिशुपालवध, द्रौपदी वस्त्रहरण, द्रौपदीची थाळी, इत्यादि लहानसहान कथा कृष्णाशी निगडित असल्या, तरी एकूण अवतारकार्यातल्या या प्रसंगांची तुलना रामायणातल्या त्राटिका वध, अहल्येची श्यापमुक्ती, वालीवध, अशा तुलनात्मक कमी महत्त्वाच्या प्रसंगांशीच करावी लागेल. महाभारतात कंसवधानंतर कृष्ण खर्‍या अर्थाने झळकतो तो थेट पांडवांच्या अज्ञातवासानंतरच्या काळात. कुठल्याही समस्येवर युद्ध हा अंतिम मार्ग मानला आहे. धर्मयुद्ध टळावं यादृष्टीने पांडवांचा शांतिदूत बनून स्वतः श्रीकृष्ण हस्तिनापुरात जातो. तरीसुद्धा दुर्योधन युद्धाच्याच हट्टाला अडून बसतो. तिथे राजसभेमध्ये कृष्ण आपल्या असामान्य सामर्थ्याची चुणूक 'कृष्णशिष्टाई'द्वारे दाखवतो. रामायणात रामाने युद्धापूर्वी "शेवटचा करि विचार फिरुन एकदा" असं म्हणून शरण येण्यासाठी रावणाला एक संधी दिली होतीच. कृष्णशिष्टाईशी साधर्म्य असलेला प्रसंग रामायणात नसला, तरी रामाचा दूत म्हणून सीतेला भेटायला लंकेत पोहोचलेल्या हनुमानाने लंका जाळली तो प्रसंगही अलौकिक होता. (लंकादहन व कृष्णशिष्टाई या दोन्ही गोष्टी पूर्वनियोजित नव्हत्या.)

शांततेचा प्रस्ताव मांडल्यानंतरसुद्धा कौरवांनी युद्ध पुकारल्यामुळे त्या परिस्थितीत क्षत्रियधर्म म्हणून युद्ध करणंच योग्य आहे असा उपदेश अर्जुनाला श्रीकृष्णाने केला, हाच कृष्णाचा अवतारकार्यातला मुख्य भाग म्हणावा लागेल. आपल्या लोकांना क्षमा करावी, पण सुधारण्याची संधी दिल्यावरही ते सुधारायला तयार नसतील किंवा अधर्माला पाठिंबा देत असतील, तर त्यांना शासन केलंच पाहिजे आणि तसं करताना "हा माझा अमुक अमुक.." वगैरे नातेसंबंध आड येता कामा नये हा महत्त्वाचा संदेश भगवद्गीतेत मिळतो.

भावार्थ दीपिका, गीतारहस्य इत्यादि भाष्यांद्वारे भगवद्गीता बहुचर्चित असल्यामुळे कृष्णाचं अवतारकार्य ठळकपणे समोर येतं. रामाचं अवतारकार्य त्या तुलनेत कमी चर्चिलं गेलं. रामायणात रावणाचा वध कथानकाच्या जवळजवळ मध्यभागी झाल्यामुळे "रावणवध" हेच रामाचं मुख्य अवतारकार्य आहे असा प्रथमदर्शनी समज होतो. रावणवध आणि कंसवध यांमध्ये दुष्कृतींचा विनाश होता आणि त्यानंतर अनुक्रमे, लंकेत आणि मथुरेत धर्मसंस्थापना झाली हे जरी खरं असलं, तरी महाभारतकथा हस्तिनापुरावर केंद्रित आहे त्याप्रमाणे रामायणाची कथा अयोध्येवर केंद्रित होती. रावणवध झाल्यावरही रामायणात अजून अयोध्येचा प्रश्न सुटलेला नव्हता. रामाचं अवतारकार्य भगवद्गीतेएवढं लोकप्रिय होऊ शकलं नाही. किंबहुना, उत्तररामायणात रामाने सीतेचा त्याग केल्यामुळे रामाचं कार्य बाजूला पडून जनसामान्यांच्या नजरेत राम जणु खलनायक होऊन बसला.

रामाने सीतेचा त्याग केला यात लौकिकार्थाने सीतेवर रामाने अन्याय केला असा समज होतो. पण ही गोष्ट वाटते तेवढी सरधोपट नाही. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्ष्यात घ्यायला हवी, ती म्हणजे राम हा विष्णुचा अवतार आहे आणि धरणीकन्या सीता म्हणजे लक्ष्मीचंच रूप आहे. संपूर्ण विश्वाचं पालन करणार्‍या विष्णुला आणि लक्ष्मीला संसार करण्यासाठी पृथ्वीवर येण्याची काय आवश्यकता असणार? त्यांनी अवतार घेतले ते विशिष्ट प्रकल्प पूर्ण करण्यासाठीच. आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं तर एकाच कार्यालयात एखाद्या प्रकल्पावर काम करणारे आदर्श सहकारी एकमेकांचे नवरा-बायको असले तरी कार्यालयात असताना आपापल्या कामांशी जसे एकनिष्ठ असतात तसेच विष्णू-लक्ष्मी त्यांच्या अवतारांमध्ये आपापल्या कर्तव्यांशी एकनिष्ठ होते. संपूर्ण रामायणात "कर्तव्यपालन" ही भावना रामाच्या आणि सीतेच्या वर्तनातून व्यक्त होते. रामाने वनवास स्वीकारला कारण पित्याची आज्ञा पाळणे हे कर्तव्यच होतं. मंथरा ही कैकेयीची दासी होती. तिने कैकेयीचे कान भरले हे रामाला कळलं नसेल का? पण ते फक्त निमित्तं होतं. रावणवध होण्याकरता ही घटना घडणं आवश्यकच होतं. शिवाय एखाद्या माणसाचं नसणं त्याचं महत्त्व जितक्या चांगल्या रीतीने पटवून देतं, तितकं तो जवळ असताना ध्यानात येत नाही हेही राम जाणत होता. अर्थातच तेही साध्य झालं. रावणाचा वध होण्यासाठी केवळ राम वनवासाला जाऊन उपयोग नव्हता; सीतेलाही त्याच्याबरोबर जाणं आवश्यक होतं. "निरोप कसला माझा घेता" या गाण्यात सामान्य पत्नीचे विचार मांडण्यात आले असले तरी "जेथे राघव तेथे सीता"मध्ये सांकेतिक भाषेत सीतेला वरील गोष्ट तर सुचवायची नसेल?

वनवास संपवून अयोध्येत परतल्यावर अयोध्येचं राज्यपद रामाने स्वीकारलं. सीतेच्या पावित्र्याबद्दल रामाला अजिबात शंका नव्हती. रामाला शंका असती तर चारचौघांसमोर अग्निपरीक्षा देण्याआधी सीतेला रामासमोरच ती इतरांच्या अपरोक्ष द्यावी लागली असती. राम अयोध्येचा राजा होता. आजच्या भारतातल्या राजकीय व्यवस्थेनुसार पाहिल्यास राम राष्ट्रपती होता, पंतप्रधानही होता आणि सर्वोच्च न्यायालयातला मुख्य न्यायाधीशदेखील. सीता अयोध्येची राणी, राज्यातली उच्च पदस्थ व्यक्ती होती - आजच्या राजकीय परिभाषेनुसार केबिनेट मिनिस्टर होती. धोबी हा अयोध्येतला सामान्य नागरिक – आम आदमी. त्याला सीतेच्या चारित्र्याविषयी शंका आली, म्हणून त्याच्या समाधानासाठी रामाने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली. ही पतीने पत्नीला सांगितलेली अग्निपरीक्षा नसून केबिनेट मिनिस्टरवर आरोप झाल्यामुळे त्याचा न्यायनिर्वाळा करण्यासाठी न्यायाधीशाने मागितलेले पुरावे होते. अग्निपरीक्षेनेही धोब्याचं समाधान झालं नाही त्यामुळे अयोध्येचा राजा या नात्याने (आजच्या परिभाषेत पंतप्रधानाच्या भूमिकेतून) रामाने सीतेला 'राणी'पदावरून काढाव लागलं. त्या काळात राजाच्या पत्नीला 'राणी' व्हावंच लागत असल्यामुळे तिचा त्याग करावा लागला. तिला त्यागल्यानंतर रामाने दुसरा विवाह केला नाही ही गोष्ट विसरून चालणार नाही. सीतेला त्यागलं तेव्हा ती गरोदर होती हेही रामाला माहिती होतंच. त्यामुळे तिच्यासाठी योग्य ती सोय वाल्मिकी आश्रमात करण्यात आली होती. तिचं गर्भारपण हेसुद्धा राम आणि सीता यांचं कर्तव्यचं होतं - अयोध्येचं राज्य सोपवण्यासाठी वंशवृद्धी आवश्यकच होती. सीतेला त्यागलं नसतं, तर भविष्यात कदाचित् त्या संततीच्या औरस असण्याबद्दलही अयोध्येतल्या आम-जनतेने शंका व्यक्त केली असती आणि त्या परिस्थितीत लवांकुशांवर राज्यकारभार सोपवणं अशक्यप्राय झालं असतं. त्यामुळे सीतेचं अयोध्येपासून दूर असणंच हितावह होतं. यानंतर लवांकुशांना जन्म देऊन त्यांना योग्य वेळी रामाकडे सुपूर्त करणे एवढंच सीतेचं अवतारकार्य उरलं होतं. यथाकाल तो दिवसही उजाडला. सीतेने अग्निपरीक्षा देऊनही पूर्वी धोब्याचं समाधान झालं नव्हतं हे राम विसरला नव्हता. लवांकुशांना भविष्यात राज्यकारभार सोपवायचा होता. तेव्हा त्यांना रामाने जरी स्वीकारलं असलं तरी अयोध्यावासियांच्या मनात कुठलाही किंतू राहू नये म्हणून अयोध्यावासियांसमक्ष सीतेला रामाने तिच्या पावित्र्याबद्दल पुन्हा प्रश्न (मुद्दाम) विचारला. आणि "वन्स फ़ॉर ऑल" उत्तर म्हणून धरणीमध्ये सीता विलीन झाली... तिचं अवतारकार्य तसंही संपलंच होतं तेव्हा. "मज आणुनि द्या तो हरिण अयोध्यानाथा" आणि "डोहाळे पुरवा" या प्रसंगांमध्ये वर वर पाहता सीतेचा अल्लड स्वभाव दिसत असला तरी त्यांमध्ये सीतेने रामाला कर्तव्याची आठवण करून दिली आहे. रामायणात सीता जणु कर्तव्यनिष्ठेचा एक मापदंडच होती. सीतेचा उल्लेख "रामपत्नी सीता" असा फार कमीवेळा आहे. रामाचा उल्लेख मात्र सदैव "सीतावर", म्हणजे "सीतेला योग्य असा वर" असाच झालाय, हे त्यामुळेच.

सीतेच्या पश्चात लवांकुश जाणते होईपर्यंत केवळ कर्तव्य म्हणून राम अयोध्येचा राज्यकारभार करीत होता. लवांकुशांवर जबाबदारी सोपवण्याची योग्य वेळ जवळ आली होती तेव्हाच चर्चेसाठी त्याने काळाला पाचारण केलं. काळाशी चर्चा सुरू झाली त्यावेळी द्वारपाल म्हणून लक्ष्मणाला ठेवलं होतं. त्यानंतर महर्षि दुर्वास यांचं अयोध्येत अचानक येणं, लक्ष्मणाने त्यांना आधी अडवणं, नंतर त्यांच्या श्यापापासून त्रैलोक्याला वाचवण्यासाठी रामाची आज्ञा मोडणं, आणि घडलेल्या पूर्ण प्रकाराबद्दल प्रायश्चित्त म्हणून आधी लक्ष्मणाने आणि नंतर रामाने शरयूत जलसमाधी घेणं या घटना एकापाठोपाठ घडतात तिथे रामाचं अवतारकार्य संपतं. संपूर्ण रामायणात कर्तव्यपालनाचं सूत्र तर आहेच. पण खर्‍याखुर्‍या लोकशाहीची संकल्पनादेखील दिली आहे. जिथे मंथरा, धोबी अशा सामान्य जनतेच्या शब्दाला किंमत आहे आणि जिथे राज्यकर्ता अग्निपरीक्षा देण्यास आणि वेळ पडली तर जनतेच्या इच्छेचा मान राखून पदच्युत होण्यास तत्पर आहे तिथे "रामराज्य" असणारच.

॥इति॥

Tuesday, September 29, 2009

कोपरा

एक कोपरा
स्वप्नांमध्ये रंगला
हृदयातला

हृदयातले
ते स्वप्न साकारले
तुला पाहिले

तुला पाहता
हरवलो तुझ्यात
तू हृदयात

हृदयातुनी
तूच आता स्पंदते
गुणगुणते

तू जेव्हा गाते
माझे मनही गाते
वेड लागते

वेडे हे मन
अव्यक्तच अजुन
एक कोपरा

Saturday, August 29, 2009

पश्चिमेचा गार वारा - भाग ३


(अंतिम भाग)

सेलफोन बंद झालेला. इंटरनेटपासून दूर. चारीबाजूला आहे फक्त निसर्ग. स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं की निसर्गाच्या सान्निध्यात अशा अवस्थेत कधी रात्र घालवू. असे एक ना अनेक विचार येत होते. झोप येत नव्हतीच. पण काही करूही शकत नव्हतो. त्यामुळे डोळे मिटून पडून राहिलो. अस्वल येण्याबद्दल चिंता आणि किडे-मुंग्यांमुळे झोप जागृतच होती. अधुनमधुन घड्याळ पाहत होतो. साधारणपणे पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास डोळा लागला असावा.

---------
साडेपाच-सहा वाजता उजाडलं तशी जाग आली. एरवी कमी झोप झाली तर सुस्तावल्यासारखं होतं, पण आज मात्र फ़्रेश वाटत होतं. कुणास ठाऊक, पण काल रात्री असलेली अस्वस्थता, टेन्शन नाहीसं झालं होतं, किंवा जाणवेनासं झालं होतं. आज आपण नक्की घरी पोहोचणार असं कुठेतरी वाटत होतं. आतला आवाज यालाच म्हणतात का? थोडावेळ तिथेच बसून विचार करत बसलो. "काल हाईक एंजॉय करायला सगळे आलो होतो, आणि माझ्या अशा हरवण्यामुळे लॅबमधल्या सगळ्यांचा रसभंग झाला असणार. मी इथे सुखरूप आहे, पण त्यांना हे कळवणार तरी कसं? कदीर सुखरूप आहे नं? की तोही मला शोधत असेल? ते काही नाही. आता पूर्ण दिवस पडला आहे. तेव्हा, कसंही करून इथून बाहेर रस्त्यापर्यंत पोहोचायचं. ए.टी.एम कार्ड आहेच. शिवाय तीस-पस्तीस डॉलर्सची कॅश आहे. लॉस ऍन्जेलिसपर्यंत पोहोचायला एवढी कॅश सहज पुरेल."

तेवढ्यात आकाशातून एक हेलिकॉप्टर माझ्या जागेच्या भोवती फिरताना दिसलं. "हे मलाच तर शोधत नसतील?...कसं शक्य आहे? त्यांना काय माहित की मी हरवलोय?...पण ९११ला फोन केला असेल तर पाठवलं असेलही हेलिकॉप्टर... बाप रे!..केवढं रामायण घडलंय हे माझ्यामुळे!.." मी टॉर्च सुरू करून हेलिकॉप्टरचा वेध घेत दिवा दाखवू लागलो. पण काही फरक पडला नव्हता. "मला उगीचच वाटलं की हे आपल्याला शोधताहेत. कदाचित या माउंटन्सच्या मेंटेनन्सचाच भाग असेल हा. दररोज अशा फेर्‍या मारत असतीलही. आपल्याला काय माहित? पण हे इथे फेर्‍या मारताहेत तोवर पाणी मिळतंय का कुठे, ते पाहून घेऊ पटकन. यांचा वेध घेत घेत पुन्हा या जागेवर येता येईलच." असा विचार केला आणि जवळपास कुठे पाणी मिळतंय का ते शोधू लागलो. "काल रस्ता चुकलो तेव्हा एक झरा दिसला होता. कुठल्या बाजूला होता तो?... इथे असेल कदाचित.." मी झरा शोधण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.

पंधरा-वीस मिनिटं फिरून पुन्हा कालच्या जागेवर जायला निघालो. तेवढ्यात काही माणसांची चाहूल लागली. मी इकडे तिकडे पाहिलं. "बहुतेक आपण ट्रेलच्या जवळच आहोत. हे लोकं ट्रेलवर असणार. त्यांना विचारता येईल मॅरियन माउंटनला परतण्याचा रस्ता." मी त्या चाहुलीचा वेध घेत चालायला लागलो. साधारणपणे तीस-चाळीस फुटांवर दोन माणसं युनिफ़ॉर्ममध्ये दिसले. मी त्यांना रस्ता विचारण्यासाठी "हॅलो" केलं, त्यांनी चमकून माझ्याकडे पाहिलं. ते माझ्याकडे येत होते, मी त्यांच्याकडे चालत होतो. क्षणाचाही विलंब न करता मी बोललो. "हाय, गुड मॉर्निंग. इज धिस द ट्रेल फ़ॉर सॅन हॅसिंटो पीक? ऍक्च्युली आय हॅड कम हियर यस्टर्डे, बट लॉस्ट माय वे बॅक टु मॅरियन माउंटन." मी हे पूर्ण बोलेपर्यंत "हाच तो हरवलेला मनुष्य" असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर दिसले. त्यांनी माझी चौकशी केली आणि तो मीच असल्याची त्यांना खात्री पटली. रिव्हरसाईड माउंटन रेस्क्यु युनिटचे सदस्य होते ते. माझी विचारपूस केली. ट्रेलमिक्स, कुकीज मला ऑफ़र केल्या. मला तहान लागली असल्यामुळे ते काही न घेता मी पाणी प्यायलो. त्यांचे आभार मानले आणि सांगितलं, की मी फ़्रेश आहे आणि चालत चालत खालपर्यंत मला जाता येईल, फक्त रस्ता सांगा.

माझ्या हातापायांवर खरचटलेलं पाहून त्यांनी मात्र मला तसं करू दिलं नाही. एक हेलिकॉप्टर येऊन मला इथून योग्य ठिकाणी घेऊन जाईल असं त्यांनी मला सांगितलं..."बाप रे! हेलिकॉप्टर!..मला परवडणार नाही.." मी ही समस्या सांगितली. शिवाय, मी चालण्याच्या स्थितीत आहे हे समजावण्याचा प्रयत्न केला. पण मला इष्टस्थळी सुखरूप पोहोचवण्याची त्यांची जबाबदारी होती त्यामुळे त्यांनी ऐकलं नाही. मलाही गिल्टी वाटत असल्यामुळे मी फार ताणलं नाही. त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये कसं चढायचं, इ. गोष्टी सांगितल्या. हेलिकॉप्टर आलं, मला त्यात चढवलं आणि ते सुरू झालं. मघाशी आकाशात फेर्‍या मारणारं हेलिकॉप्टर माझ्या शोधातच होतं असं तेव्हा कळलं. काल माझ्या सेलफोनवर आलेल्या कॉल्सवरून ते मला ट्रेस करण्याचा प्रयत्न प्रयत्न करत होते हेही तेव्हा कळलं. हेलिकॉप्टरमध्येही माझ्या तब्येतीची, तहान-भुकेची आस्थेनं चौकशी केली आणि जवळच्याच शेरिफ़ ऑफ़िसबाहेर हेलिकॉप्टर थांबलं.

तिथे एक शेरिफ़ मला रिसीव्ह करायला सज्ज होता. त्यांनीही माझी विचारपूस केली, "डु यु वॉंट टु टॉक टु ऍना क्रिलाव?" इति शेरिफ़. मी - "येस श्युअर. थँक यु सो मच!" प्रो. क्रिलाव यांच्याशी फोनवर बोललो, तेव्हा त्यांनीच माझी माफ़ी मागितली! मलाच इतकं गिल्टी वाटत होतं. मीसुद्धा त्यांची माफ़ी मागितली, आणि माझी चिंता करू नका, मी सुखरूप आहे असं सांगितलं. मी हरवलो होतो म्हणून त्या आणि त्यांचा बॉय फ़्रेंड (ज्ये) जवळच्याच शहरात थांबले होते रात्रभर. त्यांनी शेरीफ़शी बोलून मला रिसीव्ह करण्याचं ठिकाण ठरवलं. मग तिथून मुख्य शेरिफ़ कार्यालयात मला नेलं. तिथे प्रो. क्रिलाव येईपर्यंत मला आराम करायला एका खोलीत बसवलं. "थंडी वाजत असल्यास त्यातलं एक जॅकेट घाला" असं जॅकेट्सकडे बोट दाखवून तिथल्या ऑफ़िसरने मला सांगितलं. मला ज्यूस ऑफ़र केला. "भूक लागली आहे का?" अशी चौकशी केली. ज्यूस घेऊन मी बसल्या जागी झोपी गेलो.

तासाभरात प्रो. क्रिलाव आणि ज्ये तिथे पोहोचले. मला सुखरूप पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला. माझ्याही जीवात जीव आला. त्यांनी आल्या आल्या मला हग केलं आणि माझी माफ़ी मागितली. "खरंतर मीच तुमची माफ़ी मागायला हवी. माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास झाला, सगळ्यांनाच त्रास झाला." असं मी त्यांना म्हणालो. "तू सुखरूप आहेस, हेच माझ्यासाठी खूप आहे," - प्रो. क्रिलाव. तिथल्या ऑफ़िसर्सचे आभार मानून आम्ही तिघं तिथून बाहेर पडलो.

त्यानंतर प्रो. क्रिलाव व ज्ये मला जेवायला घेऊन गेले. मी शाकाहारी असल्यामुळे एका शाकाहारी रेस्टोरंटमध्ये ते घेऊन गेले. तिथून प्रो. क्रिलाव यांनी लॅबमध्ये फोन लावला आणि सर्व लॅबमेट्सशी माझ्या गप्पा करून दिल्या. कदीरशी बोलणं झालं. त्याची माफ़ी मागितली. माझ्यामुळे तो आणि एलिज़ा किती चिंतित असतील याची कल्पना होती. सगळ्यांशी बोलून हायसं वाटलं. जेवणानंतर मला घरापर्यंत सोडून नंतर ते घरी गेले. घरी पोहोचल्यावर मी सेलफोन चार्ज करायला लावला आणि अंघोळीला गेलो. अंघोळीनंतर काल रात्रभर न जाणवलेल्या जखमा, थकवा आपलं अस्तित्व दाखवू लागले आणि तब्बल चार तास झोपलो. झोपून उठलो तेव्हा लॅबमेट्स आणि युनिव्हर्सिटीतली मित्रमंडळी यांचे बरेच व्हॉईस मेसेजेस सेलफोनमध्ये आले होते. त्यांना सर्वांना संपर्क करून मी परतल्याची बातमी दिली.

माउंटन रेस्क्यु युनिट, शेरीफ़, प्रो. क्रिलाव, माझे लॅबमेट्स आणि मित्रमंडळी, या सर्वांनी या दोन दिवसांत ज्या आस्थेनं माझ्यासाठी एवढं सगळं केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. ते नसते, तर कदाचित आज मी नसतो. "अमेरिकेत काय आवडलं?" असं कुणी विचारलं तर "तिथली लोकं, त्यांचं प्रेम आणि त्यांच्या वागण्याबोलण्यातली तेहजीब, अदब" हे आणि हेच उत्तर असेल माझं.

सलाम अमेरिका!


(समाप्त)

Friday, August 28, 2009

पश्चिमेचा गार वारा - भाग २

खरंतर मी, कदीर आणि एलिज़ाही खूप थकलो होतो. पण हत्ती गेला, शेपूट राहिलं अशी स्थिती असल्यामुळे थांबत थांबत का होईना, पण शिखरापर्यंत पोहोचायचंच, असं आम्ही ठरवलं. मग उरलेलं पाणी संपवून, दर चार-पाच मिनिटांनी एक-दोन मिनिटांची विश्रांती घेत घेत सॅन हॅसिंटो या साडेचार हजार फूट उंचावर असलेल्या शिखरावर एकदाचे पोहोचलो. थकलो होतो, पण इतक्या उंचावर पोहोचल्याचा आनंदही होता.
---------
इतर मंडळी तिथे आधीच पोहोचली होती. आम्ही साधारणपणे शिखरापासून वीस फूट अंतरावर असताना प्रो. क्रिलाव यांनी आम्हाला फोटोमध्ये टिपले. शिखरापाशी पोहोचल्यावर पुन्हा एक फोटोसेशन झालं. मग पाणी भरून घेतलं आणि थोडी विश्रांती घेतली. आधी पोहोचलेल्या मंडळींनी परतायला सुरुवात केली. मी, कदीर आणि एलिज़ा थोडावेळ थांबलो. पायातला त्राण अगदी गेला होता. पण चढण्यापेक्षा उतरताना कष्ट कमी लागतात, त्यामुळे साधारणपणे वीसएक मिनिटांच्या विश्रांतीनंतर आम्हीही खाली उतरणं सुरू केलं.

उतरताना वाटेत बुटांची लेस सुटली. तिथल्या खडकाळ भागात लेसमध्ये पाय अडकून पडलो असतो तर कपाळमोक्ष व्हायला वेळ लागला नसता. लेस बांधायला क्षणभर थांबलो. खडकाच्या या बाजूला मी आणि पलिकडे कदीर आणि एलिज़ा होते. लेस बांधून मी चालायला सुरुवात केली तेव्हा हे दोघं मला दिसले नाहीत त्यामुळे मी इकडे तिकडे शोधू लागलो. खडक असल्यामुळे इथेच कुठेतरी असतील असा विचार करून मी हाका मारत मारत पुढे गेलो. मी लेस बांधायला वाकलो होतो तेव्हा खडकामागे लपल्यामुळे तेही मला शोधत होते आणि हाका मारत होते. पण एकमेकांना शोधता शोधता एकमेकांचे आवाज ऐकू न येण्याइतकं आमच्यातलं अंतर वाढलेलं लक्ष्यातच आलं नाही. दरम्यानच्या कालावधीत एलिज़ा रेस्टरूममध्ये गेली असताना कदाचित मी तिथे पोहोचून पुढे गेलो असेन अशी एक शंका कदीरला आली त्यामुळे मला शोधत शोधत ते दोघं पुढे जायला लागले. मी त्यांना खडकामागे शोधत होतो, त्या दरम्यान केव्हातरी माझा रस्ता चुकला. नक्की केव्हा, ते कळलं नाही. पण वाटेत पाण्याचा झरा लागला तेव्हा मी वाट चुकलोय हे ध्यानात आलं आणि थोडी चिंता, थोडी भीती वाटली. मागे जाण्याचा प्रयत्न केला. पण खडकाळ भागात एकसारख्या दिसणार्‍या इतक्या वाटा होत्या, की कुठे जायचं ते कळेना. मी सेलफोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो, पण कदीरच्या सेलफोनला रेंज मिळत नव्हती. अधूनमधून माझ्याही सेलफोनची रेंज जात होती. मग हळूहळू आलो तसंच परत जाण्याचा प्रयत्न करताना एका खडकावरून पाय निसटला आणि बाजूला असलेल्या झाडीत मी पडलो.

झाडी असल्यामुळे मार लागला नाही, पण हातापायाला बरंच खरचटलं होतं. त्या झाडीमधून वर कसं पोहोचायचं, हाच मोठा प्रश्न होता. जवळ जवळ दहा फुटांचं ते अंतर होतं आणि पुढे उंच खडक चढायचा होता. शेवटी झाडीवरूनच कसेबसे पाय टाकत पंधरा-वीस मिनिटांत त्याच जागेवर पोहोचलो. आता मात्र मी प्रचंड घाबरलो होतो. रस्ताही माहित नव्हता, कदीर मला शोधत असेल याची जाणीव होती आणि त्याला फोनवरूनही संपर्क होत नाहीये याची चिंता होती. त्या खडकावरून पुढे चालून व्यवस्थित उभं राहता येईल अशा ठिकाणी पोहोचलो आणि काय करावं याचा विचार करू लागलो. पाणी पिण्यासाठी बॅकपॅक पाठीवरून काढल्यावर लक्ष्यात आलं, की झिप उघडंच होतं! पाणी प्यायलो आणि प्रो. क्रिलाव यांना संपर्क करण्याचं ठरवलं. सुदैवाने त्यांच्याशी फोनवर संपर्क झाला. झालेल्या प्रकारातला मला ध्यानात आलेला भाग त्यांना सांगितला. मी नेमका कुठे पोहोचलोय हे मात्र मला त्यांना सांगता येईना. आता मात्र माझं टेन्शन खूपच वाढलं होतं. त्यांचंही टेन्शन वाढलं होतं. पुरेसं पाणी आणि खाण्याचं सामान असेल तर सॅन हॅसिंटो शिखरापाशीच जाण्याचा पर्याय त्यांनी सुचवला. कारण तिथे इमर्जन्सीमध्ये रात्री थांबण्याची आणि जेवण्याची व्यवस्था असते.

पण संध्याकाळचे चार वाजले होते. पायात त्राण नसल्यामुळे आतापर्यंतचं अंतर पार करून पीकपर्यंत पोहोचेपर्यंत तीन-चार तास सहज लागले असते आणि अंधार झाला असता. त्यात शिखर शोधण्यापासून सुरुवात होती. भलतीकडेच पोहोचलो आणि तिथे सेलफोनची रेंजही मिळाली नाही, तर पंचाईत. त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी मला "काळजी करू नकोस. आम्ही तुला शोधण्याची व्यवस्था करतो." असं सांगितलं. थोडंसं हायसं वाटलं, पण प्रो. क्रिलाव यांना त्रास दिल्याबद्दल गिल्टी वाटत होतं. ते मला शोधणार तरी कसे? कारण मी कुठे आहे हे मलाच माहिती नाही. आणि प्रो. क्रिलाव यांना मी केवळ मी टेकडीच्या पश्चिमेकडे आहे आणि दूरवर एक फ़्रीवे दिसतोय असं मोघम बोललोय, तेव्हा त्या तरी कोणाला काय सांगू शकणार? असे अनेक प्रश्न चिंता वाढवत होते. मला शोधायला किती वेळ लागेल, काही सांगता येत नव्हतं. मी स्वतः जरी वाट शोधत शोधत खाली उतरायचा विचार केला, तरी थकल्यामुळे आणि हातापायांना खरचटल्यामुळे आज संध्याकाळी ते शक्य नव्हतं. थोडक्यात, एक रात्र तरी इथेच काढावी लागणार! या दरम्यान लॅबमेट्सचे फोन येऊ लागले. त्यांनी ९११ला संपर्क करणार असल्याचं सांगितलं.

या दरम्यान सेलफोनची रेंज अधूनमधून कमी होत असल्यामुळे चोवीस तासांपूर्वी पूर्णपणे चार्ज्ड असलेली बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाली. मला संपर्क साधण्याचं एकमेव साधनही आता बंद पडण्याच्या मार्गावर होतं. पण मी इथे उभं राहून बोलतोय याचा अर्थ निदान सेलफोन कंपनीला तरी माझं लोकेशन समजण्याला वाव आहे असं एकदम क्लिक झालं. मग मी सेलफोन सुरूच ठेवला. कॉल कट झाला, तरी मला संपर्क झाल्याच्या नोंदी होतील आणि मला शोधणं थोडंसं का होईना, पण सोपं होईल, असं वाटलं.
सूर्य मावळला. देवाचं नाव घेऊन कसाबसा धीर गोळा केला. किंबहुना दुसरा पर्यायच नव्हता. जवळ पिझ्झा आणि शिरा होता. पण उद्यापर्यंत जर सापडलो नाही, तर उद्यासाठी काहीतरी जवळ असायला हवं असं वाटलं. शिवाय या टेन्शनमध्ये भूक मेलीच होती. आज निदान पाणी तरी आहे. उद्या पाण्याचा साठा शोधेपर्यंत तरी हेच पुरवायचं आहे.

रात्री इतक्या उंचीवर थंडीही खूप असते त्यामुळे झोपायचं तरी कसं हा प्रश्न होता. थोडा शोध घेतला आणि एका खडकाच्या खाली पोकळ जागा होती तिथे उताणं आडवं झाल्यास वार्‍याला पूर्ण अडोसा जरी मिळत नसला, तरी निदान एकाबाजूने तरी प्रोटेक्शन. झोपायची जागा पक्की केल्यावर पिझ्झा आणि शिरा त्या जागेपासून साधारणपणे वीस-तीस फुटांच्या अंतरावर ठेवून आलो. त्या झाडीत अस्वल असतात आणि खाद्यपदार्थांचा वास आल्यास ते तिथे पोहोचतात असं आदल्या दिवशी कळलं होतं.
त्यामुळे अस्वलापासून बचावासाठीचा एक तोकडा प्रयत्न केला. मग काही वेळ टॉर्च सुरू केला आणि समोर दूरवर दिसणार्‍या फ़्रीवेपाशी, आकाशात फिरवू लागलो. पण टॉर्चचा प्रकाश तिथपर्यंत पोहोचत नसेल. आणि असला, तरी मी तो कशासाठी फिरवतोय, हे कसं कळणार लोकांना?

बॅकपॅकमध्ये शोध घेतल्यावर टॉवेल नसल्याचं लक्ष्यात आलं. झाडीमध्ये पडलो तेव्हा झिप उघडंच होतं! तेव्हा नेमका टॉवेलच पडला की काय? म्हणजे आता पांघरायलाही काही नाही. शेवटी बॅकपॅकमधल्या कपड्यांनाच "अर्धवट" चढवून हात, पाय झाकण्याचा प्रयत्न केला. तिथले किडे-मुंग्या त्रास देत होते. त्यांना अडवायला काहीच नव्हतं. मग बॅगेतलं सनस्क्रीन लोशनच चेहर्‍याला आणि हातापायांना लावलं. सेलफोन बंद झालेला. इंटरनेटपासून दूर. चारीबाजूला आहे फक्त निसर्ग. स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं की निसर्गाच्या सान्निध्यात अशा अवस्थेत कधी रात्र घालवू. असे एक ना अनेक विचार येत होते. झोप येत नव्हतीच. पण काही करूही शकत नव्हतो. त्यामुळे डोळे मिटून पडून राहिलो. अस्वल येण्याबद्दल चिंता आणि किडे-मुंग्यांमुळे झोप जागृतच होती. अधुनमधुन घड्याळ पाहत होतो. साधारणपणे पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास डोळा लागला असावा.

(क्रमशः)

Thursday, August 27, 2009

पश्चिमेचा गार वारा - भाग १

दिवस किती पटापट निघून जातात! नाही? इथे पिलाणीला येऊन महिना होत आला, कळलंसुद्धा नाही. सध्याच्या काळात इथे प्रचंड उकडतं. हवामानशास्त्रीय भाषेत बोलायचं, तर वातावरण उष्ण आहे आणि हवेत आर्द्रता आहे. त्यामुळे दुपारी अर्ध्या मिनिटासाठी जरी पंखा बंद झाला, तरी "घर्मस्नान" घडतं. आज मात्र रोजच्यापेक्षा थोडं थंड वाटलं. इथली सवय झाल्यामुळेही असेल कदाचित. संध्याकाळी घरी आल्यावर सगळ्या खिडक्या उघडल्या तेव्हा मस्त गार वारा अंगावर आला. तसा तो रोजच येतो. पण आज तो जाणवला. अमेरिकेत माझ्या घरातल्या स्वयंपाकघराचं दार उघडं ठेवल्यावर असाच वारा यायचा पश्चिमेकडून.

दोन महिन्यांपूर्वी मी अमेरिकेच्या घरातच होतो. पॅकिंग सुरू होतं आणि रिझाइन करूनही झालं होतं. त्यामुळे पाहुणेपणाची जाणीव मनाला सतावत होती. त्याच्या आधीच्या महिन्यात लॅबमधलं काम संपण्याच्या मार्गावर आलं होतं. काम पूर्ण होण्याचा आनंद, भारतात परतणार याचा आनंद, इ. इ. त्याच्या आधी?... असं करत करत अमेरिकेत घालवलेल्या पावणे दोन वर्षांमध्ये मन दोन मिनिटांत फिरून आलं. आपण जिथे काम करतो, जिथे आपलं वास्तव्य असतं, तिथल्या आठवणी मनात घर करून जातातच. पण अमेरिकेच्या आठवणींचा थोडा जास्त नॉस्टॅल्जिया आहे आज. त्याचं कारण, तिथल्या आठवणी आहेत मन भारावणार्‍या, मनात कोरल्या गेलेल्या.

अमेरिकेतली माझ्या स्मरणात कायम राहील ती गोष्ट म्हणजे ऑगस्ट २००८ मध्ये लॅबमधल्या सहकार्‍यांबरोबरचं हाईक. शनिवार दि. ९ ऑगस्ट रोजी प्रो. ऍना क्रिलाव त्यांचा बॉय फ़्रेंड आणि आम्हीसर्व लॅबमेट्स रिव्हरसाईड काउंटीतल्या मॅरियन् माउंटनपाशी ठरल्याप्रमाणे दुपारी चारच्या सुमारास पोहोचलो. सगळे जण जेवण करूनच तिथे पोहोचले होते, त्यामुळे थोडे स्नॅक्स घेऊन आपापले तंबू ठोकले. आसपासच्या परिसरात थोडंसं फिरून संध्याकाळी बार बी क्यूच्या तयारीला लागलो. ग्रुपबरोबर लॅबच्या बाहेर असं पहिल्यांदाच गेलो असल्यामुळे गप्पा भरपूर एंजॉय केल्या. त्यात सगळे अमेरिकेबाहेरचे. त्यामुळे कॅंप फ़ायरच्या वेळी, त्या विस्तवात मार्शमेलोज वितळवून कुकीजवर लावून खाण्यापासून "हे सप्तर्षी, हा ध्रुवतारा, ही उत्तरदिशा"पर्यंत सांस्कृतिक गाठोडी उघडून बरीच देवाणघेवाण झाल्यामुळे जास्त मजा आली. दुसर्‍या दिवशी (दि. १० ऑगस्ट २००८ रोजी) तिथून सव्वापाच मैलांवर व साडेचार हजार फूट उंच असलेल्या सॅन हॅसिंटो (San Jacinto) या शिखरापाशी पोहोचायचं असल्यामुळे सकाळी लवकरच हाइकिंगला सुरुवात करायची होती. त्यामुळे साधारणपणे रात्री साडेदहा-अकरा वाजता आपापल्या तंबूत जाऊन निद्रादेवीची आराधना केली.

सकाळ झाली. तेव्हा अलार्म न लावताही जाग आली. निसर्गाच्या सान्निध्यात झोप तर छान होतेच, शिवाय, सकाळी उजाडल्यावरचं वातावरण इतकं प्रसन्न असतं, की त्यावेळी लोळत पडल्याने खूप काहीतरी मिस करतोय असं वाटतं. एकापाठोपाठ सगळेजण उठले. प्रातर्विधी उरकून चहा, कॉफ़ी, नाश्ता करण्यासाठी तयारी झाली. आणि हे सगळं उरकून साधारणपणे सकाळी साडेआठच्या सुमारास सगळेजण हाइकसाठी सज्ज झाले. नकाशांचं वाटप झालं आणि कुठून कसं जायचं, कुठे हॉल्ट घ्यायचे, इ. चर्चा करून हाईकला सुरुवात झाली. "सव्वापाच मैल म्हणजे साधारण आठ किलोमिटर. चार तासात हे अंतर पार करायचं असल्यास अर्ध्या तासात एक किलोमिटर चालायला हवं. तीस मिनिटांऐवजी चाळीस मिनिटं लागली तर मधले हॉल्ट वगैरे पकडून सहा तासांत तरी पोहोचू...." अशी कॅल्क्युलेशन्स माझ्या मनात ताबडतोब सुरू होतात. आणि ते करत करत चाललं, की वेळ पटपट जातो आणि अंतर सरलेलं कळतही नाही. (अर्ध्यातासात एक किलोमिटर म्हणजे अती हळू चालणं होईल पण आधीच जास्त वेळ गृहित धरला की लवकर पोहोचल्यावर जास्त आनंद होतो. ;) )

एक दोन ठिकाणी हॉल्ट झाला तेव्हा मी, कदीर, एलिज़ा, झेनिया, लॉरा, मेलानिया आणि रेहाना रेंगाळत रेंगाळत २-३ मिनिटं उशीरा पोहोचलो. आम्ही "पाणी"ग्रहण करतोय न करतोय तोवर प्योटर, लुकाज़, वॅदीम, विताली, स्टॅस, किरिल आणि प्रो. क्रिलाव आणि जे ह्यांची विश्रांती झालेली असायची. त्यामुळे पुढल्या हॉल्टांच्यावेळी आम्ही क्रमाक्रमाने मागे पडत गेलो. रेहाना आणि मेलानिया यांना आपल्याला पाच मैल चालणं जमणार नाही असं केव्हातरी वाटलं आणि त्या मॅरियन माउंटनपाशी परतल्या. अत्तापर्यंत साधारण तीन-साडेतीन मैल आणि दोन-तीन हॉल्ट पार पडले होतो. यानंतर दर दहा मिनिटांनी मी आणि कदीर अंतर किती संपलं याचा अंदाज घेऊ लागलो. आणखी थोडं, आणखी थोडं करत करत आणखी एक मैल पार पडला.

या काळात पाठीवरील साडेचार लिटर पाण्यापैकी चार-सव्वाचार लिटर संपलं होतं. पण सोबत घेतलेली सँडविचेस तशीच होती. माझ्याजवळ तर आदल्या दिवशी "इंडियन डेझर्ट" म्हणून आणलेला आणि अर्ध्याच्या वर उरलेला शिरा होता एका डब्यात. पण तहान इतकी लागली होती, की काही खाण्याची इच्छाच होत नव्हती. आता फक्त अर्धा मैल अंतर राहिलं होतं. झेनिया आणि लॉरा थकले होते आणि त्यांनी तिथेच काहीवेळ थांबून परतण्याचा निर्णय घेतला. खरंतर मी, कदीर आणि एलिज़ाही खूप थकलो होतो. पण हत्ती गेला, शेपूट राहिलं अशी स्थिती असल्यामुळे थांबत थांबत का होईना, पण शिखरापर्यंत पोहोचायचंच, असं आम्ही ठरवलं. मग उरलेलं पाणी संपवून, दर चार-पाच मिनिटांनी एक-दोन मिनिटांची विश्रांती घेत घेत सॅन हॅसिंटो या साडेचार हजार फूट उंचावर असलेल्या शिखरावर एकदाचे पोहोचलो. थकलो होतो, पण इतक्या उंचावर पोहोचल्याचा आनंदही होता.

(क्रमशः)

Saturday, July 25, 2009

आळस

एक वीकांत
आळसाने भरला
आणि सरला

श्रावणसरी

मेघ दाटले
आणिक बरसल्या
श्रावणसरी

Tuesday, June 23, 2009

दोन वाटा













वळणदार ही रम्य वाट, घनदाट तरू चहुकडे; दुभंगे जाता इथुनी पुढे
वाट एक त्यांतली ही, हिच्या दोबाजूंना लांब; पसरले पहा दिव्याचे खांब
दुसर्‍या वाटेवरी न पथिक न गाड्याही धावल्या; परि तिथे काटे आणिक कळ्या
दोन्ही वाटा अखेर मिळती एका रस्त्याला; जाई जो माझ्या गावाला

दुवा दिव्यांचा ह्या वाटेवर पांथिक बहु चालले; धरावी ही हे मी ठरविले
प्रवास इथला सुलभ, फक्त चालणे अखंडितपणे; आणि निजधामाला पोचणे
धरली त्याने वाट, जी न वहिवाट, चालला पुढे; फुलांचे जेथे पडले सडे
पाचोळा अन् काटेही पण वाटेवर त्याच्या; आणि ना दिशा ओळखीच्या

गावी मी पोचलो, जणू मिळवले सर्व सर्व; मला जाहला असा गर्व
स्वतःभोवती फिरत राहिलो, विसरलो जगाला; येइ अंधारी नयनांना
"तो न पोचला गावी अजुनी? फसला काट्यांत!"; गर्जलो मीऽ मदासक्त
"वहिवाटेवर तो न चालला, पोचला न गावी; न झाले कार्यही वेळेवरी"

अवचित आला एके दिवशी माझ्या गावाला; तो मला सहज भेटण्याला,
तो येता मी कुत्सित वदलो, "उशीर बहु झाला; तुजला गावी पोचण्याला!"
आणिक वदलो काहीबाही टाकुनि त्यां अतिउणे; परी ना लक्ष्य दिले त्याने
प्रेमे मग पाहुनी तयाने मंदस्मित केले; आणि मज वदला शांतपणे

"उशीर झाला मला खरोखर तुला भेटण्याला; मागतो क्षमा तयाची तुला
वाटेवर काटे होते, होती पण तेथे फुले; ज्यांमध्ये मन हे माझे झुले
तिथे एक वठलेले होते वृक्ष, तयापासुन; शिल्प मी घडवियले तासुन
शिल्पाच्या भोवती पसरले वन्यफुलांचे सडे; गंध त्यांचा पसरे चहुकडे

मी न निवडल्या चालण्यास त्या वाटा नित्याच्या; नि धरिला रस्ता काट्यांचा
परि उभारला जीव ओतुनी स्वर्ग मन्मनीचा; न वर्णवे आनंद तयाचा"

कुसुमाग्रजांची "कोलंबसाचे गर्वगीत" ही कविता वाचल्यापासून त्या वृत्तात कविता करून पाहण्याची इच्छा होती. मध्यंतरी रॉबर्ट फ़्रॉस्ट यांची "द रोड नॉट टेकन" ही कविता इंटरनेटवर वाचली. त्या कवितेतल्या पहिल्या ओळीत वनराईमध्ये दुभंगून रस्ते दूर जाण्याची कल्पना आवडली आणि ही कविता सुचली. या कवितेचा आशय मात्र, "द रोड नॉट टेकन"पासून पूर्णपणे निराळा आहे. काही ओळींमध्ये मात्रा थोड्या कमीजास्त झाल्या आहेत. तसेच, यमकांचा पॅटर्न मी थोडा बदलला आहे.

Wednesday, June 17, 2009

मराठीचा विकास - प्रतिशब्दांनी की शब्दांच्या मराठीकरणाने?

"मराठी वाचवा - कोणती?" या शीर्षकाचा निबंध शांता शेळके यांच्या "गुलाब काटे कळ्या" या पुस्तकात काही वर्षांपूर्वी वाचला होता. मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल आणि विकासाबद्दल आस्था असलेल्यांनी अवश्य वाचावा असाच निबंध होता तो. आज मराठी साहित्याच्या संगणकीय युगाचा उगम आणि विकास झाला असल्यामुळे त्याबद्दल लिहिणं अप्रस्तुत ठरणार नाही.

इंटरनेटवरील मराठी साहित्यासाठी व्यासपीठ निर्माण करणार्‍या मायबोली, मनोगत, उपक्रम, मिसळपाव व गुगल, याहू, वर्डप्रेसने ब्लॉगलेखनासाठी उपलब्ध करून दिलेली माध्यमं लोकप्रिय होऊन अनेक वर्षे झालीत. मी तसा या मराठी-ई-विश्वात फार नवीन नसलो, तरी फारसा जुनाही नाही. ब्लॉगलेखन वगळल्यास इतर ठिकाणी फारसा सक्रिय नाही. (मायबोलीवरील दोन वर्षाच्या काळात दोन हायकू, तीन प्रतिक्रिया आणि तीन सदस्यांची विचारपूस केल्याने कोणी मायबोलीकर होत नाही.) या काळात मराठी संकेतस्थळांवरची शितं वेचल्यावर "महाजाला"वरील भाताबद्दल जे ज्ञान झालं, ते शांता शेळके यांनी उपरोक्त निबंधात मांडलेल्या विचारांपेक्षा फारसं वेगळं नाही. "उद्घाटन"ऐवजी "विमोचन", "साजरा होणे"ऐवजी "संपन्न होणे", इत्यादि वाक्प्रचारांचा भडिमार होत असल्याबद्दल शांताबाईंनी त्यांच्या निबंधात चिंता व्यक्त केली होती.

इंटरनेटवरील इंग्रजी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द सुचवताना बर्‍याच प्रमाणात असं होतंय असं मला वाटतं. मराठीच्या नावाखाली संस्कृत शब्दांचा भडिमार होतोय. उदा. महाजाल, जालनिशी, इत्यादि. विरोप ह्या शब्दाचं मूळ मात्र समजलं नाही. हा शब्द शब्दबंधच्या सदस्यांच्या पत्रव्यवहारांअंतर्गत मीसुद्धा वापरला होता एकदा, पण मला तो पटला नव्हता. त्यापेक्षा "ई-पत्र" हा शब्द जास्त सुटसुटीत वाटतो. मायबोलीवरील "वीकांत" हा शब्द मात्र मनापासून आवडला. "वीक एंड" या इंग्रजी शब्दाला मराठीत कौशल्याने रुजवल्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. "वीकांत" हा धेडगुजरी शब्द वापरण्यापेक्षा "सप्ताहांत" हा शब्द जास्त सरस आहे असं काही दिवसांपूर्वी एका ब्लॉगर सदस्याने ई-पत्राद्वारे सुचवलं होतं, पण मी त्याकडे (सोयीस्करपणे ;) ) दुर्लक्ष्य केलं. "सप्ताहांत" शब्दात इंग्रजीचा अंश नसला, तरी "सप्ताह" आणि "अंत" या दोन्ही संस्कृत(च) शब्दांपासून निर्माण झालेला हा शब्द (संस्कृतभाषेत वापरायला चांगला असला तरी) मराठी भाषेला सगोत्र विवाहित दांपत्याच्या पोटी जन्मणार्‍या जनुकीय दोषयुक्त अपत्याप्रमाणे खिळखिळं करणारा वाटतो.

संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, पैशाची, अर्धमागधी, पाली या सहा मूळ भाषांपासून जन्मलेल्या व फार्सी, अरबी व इतर अनेक भाषांच्या संस्कारांनी बाळसं धरलेल्या मराठीला संस्कृत शब्द भविष्यात गिळणार की काय, अशी भीती वाटते. "संस्कृत ही भाषांची जननी आहे" किंवा भाषा गंगेच्या पाण्यासारखी निर्मळ, पवित्र असावी, वगैरे गोष्टी मलाही पटतात. पण, गंगा नदी गंगोत्रीतून उगम पावते, तिला पुढे असंख्य झरे सामील होतात आणि अशाप्रकारे वाढत वाढत ती सतत पुढे वाहत समुद्राला जाऊन मिळते म्हणून मोठी आणि पवित्र होते. मात्र, ती जर उलट्या दिशेनं गंगोत्रीकडे वाहू लागली, तर गंगोत्रीतच लोप पावेल. संतकवी दासगणू यांनी म्हटल्याप्रमाणे "ओहोळ पोटी घे गोदावरी | म्हणुनी म्हणती तीर्थ तिला ||" .

तात्पर्य, मराठी प्रतिशब्द शोधण्यात काहीच गैर नाही. पण मराठी प्रतिशब्दांपेक्षा जर इतर भाषांमधल्या शब्दांचं मराठीकरण करता आलं, तर ते मराठीच्या भव्यतेचं व समृद्धतेचं एक प्रतीक होईल. नाही का?

Sunday, May 10, 2009

प्रेम आईचे

शांत शीतल
चांदणे पुनवेचे
प्रेम आईचे

Friday, April 10, 2009

मन

मना होता बाधा | सहा विकारांची | ओढ ऐहिकाची | तया लागे ||१||

कामवासनेत | मन मग्न झाले | रसातळा गेले | तत्चारित्र्य ||२||

विनाशाची ओढ | मना लागे सत्य | क्रोधे ज्यास नित्य | व्यापियले ||३||

नश्वराचा लोभ | ग्रासतो मनास | नासते सुख़ास | मोहमाया ||४||

मन अहंकारी | मदात दंगले | मत्सरी रंगले | आत्ममग्न ||५||

चंचळ हे मन | प्रपंचास भाळे | एक त्यां सांभाळे | वक्रतुंड ||६||

मनास लागता | ओढ विकटाची | संपेल जीवाची | तगमग ||७||

मायाजालातूनी | जीव मुक्त व्हावा | म्हणोनी स्मरावा | एकदंत ||८||

Wednesday, April 8, 2009

लोपला स्वयंभू गंधार













तंबोर्‍याची तुटली तार
मैफलीत झाला अंधार
भैरवीविना सभा संपली
निमाला स्वरांचा दरबार
लोपला स्वयंभू गंधार

सुरेल गाणे रंगी रंगले
मंत्रमुग्ध रसिकांना केले
आज अचानक मात्र थांबला
कशास तारांचा झंकार?
लोपला स्वयंभू गंधार

सूर लोपले ताल थांबला
स्थायीतच अंतराही शमला
आलापांचा अन् तानांचा
आज का कुंठला विस्तार?
लोपला स्वयंभू गंधार

Sunday, March 15, 2009

धार्मिक कृत्ये व पंचांग - भाग ४: गुढीपाडवा

मराठी, हिंदी, पंजाबी, कन्नड व तेलगु भाषीय हिंदू चैत्र महिन्याच्या शुक्लपक्षापासून नववर्षाचा प्रारंभ* मानतात. हिंदू कालगणनेमध्ये महिन्यांची नावं ठरवताना सूर्य-चंद्रांच्या निरयन राशींना फार महत्त्व आहे. अमावस्या म्हणजे सूर्य-चंद्र युतियोग. अमावस्येच्या प्रारंभी या ग्रहांमधील पूर्व-पश्चिम अंशात्मक अंतर बारा अंशांइतकं असतं व ते शून्य अंश होतं, त्यावेळी अमावस्या संपून प्रतिपदा तिथी सुरू होते. ही युती मीन राशीतून झाल्यावर येणार्‍या प्रतिपदेपासून चैत्र महिना सुरू होतो. याच दिवसापासून नव्या शालिवाहन शकाचा प्रारंभ होतो.

सध्या १९३०वे शालिवाहन शक सुरू असून "सर्वधारी" असं त्याचं नाव आहे. १९३१व्या शालिवाहन शकाचं नाव "विरोधी" असेल. (संवत्सरांची एकूण ६० नावे असून त्याबद्दल कृ.वि.सोमण यांच्या सुलभ ज्योतिषशास्त्र या ग्रंथात सविस्तर माहिती दिली आहे.) या दोन्ही वर्षांच्या दाते पंचांगांमध्ये सांगितल्यानुसार भारतात दि. २७ मार्च २००९ रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा येत असल्यामुळे त्या दिवशी तैलाभ्यंग, ध्वजारोपण, कडुनिंबाच्या पानांचं भक्षण इत्यादि गुढीपाडव्याशी निगडित गोष्टी केल्या जातील.
"महाभारत - काही नवीन विचार" या ब्लॉगवर फडणीसकाकांनी एका स्फुट प्रकरणात गुढीपाडव्याशी निगडित एका गोष्टीबद्दल आकर्षक माहिती दिली आहे, ती इथे अवश्य वाचा.

सुलभ ज्योतिषशास्त्र हा ग्रंथ व कालनिर्णयची ऑनलाईन आवृत्ती यांच्या सहाय्याने, अमेरिकेत गुढीपाडवा केव्हा साजरा होईल, हे आता पाहू. सुलभ ज्योतिषशास्त्रात सांगितल्यानुसार वर्षारंभासाठी चैत्र शुक्ल प्रतिपदा सूर्योदयव्यापिनी असावी. दोन दिवस सूर्योदय व्यापिनी असल्यास किंवा प्रतिपदेचा क्षय झाला असल्यास (प्रतिपदेचा क्षय म्हणजे सूर्योदयानंतर प्रतिपदा सुरू होऊन पुढल्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वीच द्वितीया प्रारंभ होणे.) पहिल्या दिवशीची तिथी घ्यावी, अन्यथा, दुसर्‍या दिवशीची तिथी वर्षारंभासाठी गृहित धरावी. कालनिर्णयच्या ऑनलाईन आवृत्तीनुसार न्युयॉर्क, शिकागो, व सॅन फ़्रॅन्सिस्को या शहरांमध्ये गुरुवार दि. २६ मार्च २००९ सूर्योदयानंतर काही तासांनी प्रतिपदा प्रारंभ होत असून, २७ तारखेला सूर्योदयानंतर काही वेळाने ती संपते आहे. याचाच अर्थ, सूर्योदयव्यापिनी प्रतिपदा या तिन्ही ठिकाणी २७ तारखेलाच आहे. त्यामुळे या भागांमध्ये नववर्षप्रारंभ २७ तारखेला नववर्षप्रारंभ मानावा.

सूर्योदयास्ताच्या वेळा अक्षांश-रेखांशानुसार बदलत असल्या, तरी, तिथी बदलण्याची वेळ एकच असल्यामुळे प्रतिपदा संपण्याच्या वेळा केवळ टाईमझोन बदलल्यामुळे भिन्न अंक आहेत हे कालनिर्णय पाहिल्यास सहज लक्ष्यात येईल. अलास्का व हवाई बेटांमध्ये मात्र, पॅसिफ़िक वेळेपेक्षा सूर्योदय ढोबळमानाने अनुक्रमे एक व दोन तासांनी उशीरा होत असल्यामुळे गणित थोडं किचकट आहे. हवाईमध्ये सूर्योदयापूर्वीच प्रतिपदा संपेल हे निश्चित असल्यामुळे तिथे २६ तारखेला वर्षारंभ मानावा लागेल. परंतु, अलास्कामध्ये २७ तारखेला स्पष्ट सूर्योदय जर तिथल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ६:०५ च्या आधी होणार असेल, तर अमेरिका मेनलँडप्रमाणे, अन्यथा हवाई बेटांप्रमाणे वर्षारंभ मानावा लागेल. एवढ्या खोलात शिरायचं नसल्यास, अलास्कामध्ये बहुतांश प्रतिपदा २६ तारखेला असल्यामुळे, त्या दिवशी गुढीपाडवा साजरा करणं जास्त योग्य होईल, असं वाटतं.


*गुजराथमध्ये बलिप्रतिपदेपासून वर्षारंभ मानतात (गुजराथी व जैन संवत् बलिप्रतिपदेला सुरू होतात), पश्चिमबंगालमध्ये वैशाख महिन्यापासून (बैसाखी) वर्षारंभ मानतात, तर तामीळनाडूमध्ये सौरमानाप्रमाणे वर्षारंभ मानतात, असं या प्रांतातल्या माझ्या ओळखीतल्या व्यक्तींकडून कळलं, पण त्याबद्दल सविस्तर माहिती नाही.चांद्र-सौरमानाने वर्षारंभ मानणार्‍या प्रांतांत (तामीळ नाडू सोडून इतर प्रांतात) वर्षारंभ वेगवेगळ्या वेळी मानत असले, तरी इतर सर्व सण, एकाच वेळी साजरे होतात. उदा. दिवाळी सर्वत्र एकाच वेळी साजरी होते - गुजराथी व मारवाडी लोक बलिप्रतिपदेला वर्षारंभ मानतात, एवढाच फरक. तसेच, पौर्णिमांत मासपद्धतीनुसार होळीपौर्णिमेनंतरच्या दिवसापासून वर्षारंभ मानतात असंही कुठेसं वाचलं आहे, पण महिन्यांची नावं कशी ठरतात, ते माहिती नाही. जाणकारांनी माझ्या ज्ञानात भर घालावी ही विनंती.



भाग ४ चे संदर्भ:

१. श्री. कृ. वि. सोमण - सुलभ ज्योतिषशास्त्र
२. दाते पंचाग (शालिवाहन शक १९३०-३१ - सर्वधारीनाम/विरोधीनाम संवत्सर)
३. http://kalnirnay.com/

Wednesday, February 18, 2009

धार्मिक कृत्ये व पंचांग - भाग ३: महाशिवरात्री

माघ महिन्यात कृष्णपक्षातल्या चतूर्दशीच्या दिवशी शिवपूजन केलं जातं. सृष्टीच्या प्रारंभी याच तिथीला मध्यरात्री ब्रह्मातून शंकराचा रुद्रावतार सुरू होऊन प्रलयाचे वेळी याच तिथीला मध्यरात्री शंकर भगवान ब्रह्मांडाचा संहार करतात असं मानलं जातं. शंकर भगवानांशी व मध्यरात्रीशी निगडित असलेल्या या तिथीला 'महाशिवरात्री' म्हणतात. कृ.वि. सोमण यांनी सुलभ ज्योतिषशास्त्र या ग्रंथात सांगितल्यानुसार महाशिवरात्रीसाठी चतूर्दशी 'निशीथकालव्यापिनी' असावी. [रात्रकालाचे म्हणजे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या वेळेचे समान पंधरा भाग केल्यास आठव्या (मधल्या) भागाला 'निशीथकाल' म्हणतात.] सोमणशास्त्रींनी पुढे सांगितल्याप्रमाणे -
१. दोन दिवस अर्धरात्रव्यापिनी चतूर्दशी असल्यास
२. दोन्ही दिवस अर्धरात्रव्यापिनी नसल्यास
३. पहिल्या दिवशी अंशतः निशीथकालव्यापिनी व दुसर्‍या दिवशी पूर्णतः निशीथकालव्यापिनी असल्यास
दुसर्‍या दिवशी शिवपूजन करावं. परंतु, पहिल्या दिवशी पूर्णतःनिशीथकालव्यापिनी चतूर्दशी असून दुसर्‍या दिवशी ती अंशतः निशीथकालव्यापिनी असल्यास पहिल्या दिवशी शिवपूजन करावं.
भारतात यंदा सोमवार दि. २३ फेब्रुवारी २००९ रोजी महाशिवरात्री असल्याचं पंचांगात दिलं आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार माघ वद्य चतूर्दशी सोमवारी पहाटे ४:२४ वाजता (पंचांगातील 'वार' हे अंग सूर्योदयापासून सुरू होत असल्यामुळे पंचांगाच्या दृष्टीकोणातून पाहिल्यास रविवारी २८ :२४ वाजता - व्यवहारातल्या सोमवारी सूर्योदयापूर्वीचा काळ रविवारचा मानला जातो) सुरू होत असून ती मंगळवारी सकाळी ६:०० वाजता (पंचांगानुसार सोमवारी ३०:०० वाजता) संपते. निशीथकाल सोमवारच्या मध्यरात्री १२:२७ पासून १:१७ वाजेपर्यंत आहे असं दाते पंचांगात सांगितलं आहे.

अमेरिकेत न्यूयॉर्क, शिकागो व सॅनफ़्रॅन्सिस्को या तीन शहरांचे सूर्योदयास्त व चतूर्दशी तिथीचे प्रारंभ व शेवट कालनिर्णयच्या इंटरनेट आवृत्तीमध्ये दिले आहेत. त्यानुसार, या तीन शहरांमध्ये चतूर्दशीप्रारंभ रविवार दि. २२ रोजी अनुक्रमे सायं ५:५३, सायं. ४:५३ व दुपारी २:५३ वाजता होत असून ही तिथी रविवारी अनुक्रमे सकाळी ७:३०वाजता, सकाळी (पहाटे) ६:३० वाजता व पहाटे ४:३० वाजता संपते. सोमवारी या शहरांमध्ये सूर्योदय अनुक्रमे (सकाळी) ६:४० वाजता, ६:३०वाजता व ६:५० वाजता होत आहेत. याचा अर्थ, पंचांगाच्या परिभाषेनुसार केवळ न्यूयॉर्कमध्ये सोमवारी काही वेळ चतूर्दशी आहे व ती सूर्यास्तापूर्वीच संपत असल्यामुळे सोमवारी अर्धरात्रव्यापिनी नाही. या तीन शहरांमधल्या रविवारी सूर्यास्त अनुक्रमे (सायं) ५:३९ वाजता, ५:३२ वाजता व ५:५६ वाजता होत आहेत. शिकागो व सॅनफ़्रॅन्सिस्को या शहरांमध्ये (व मधल्या सर्व भागामध्ये) केवळ रविवारीच चतूर्दशी असल्यामुळे महाशिवरात्री निसंदिग्धपणे रविवारी साजरी करावी. न्यूयॉर्कमध्ये सोमवारी काही काहीवेळ चतूर्दशी व अर्धरात्रव्यापिनी नसल्यामुळे रविवारी निशीथकालव्यापिनी असणं-नसणं याला महत्त्व आहे. रविवार-सूर्यास्त व सोमवार-सूर्योदय यांच्या वेळांवरून न्यूयॉर्कमध्ये चतूर्दशी तिथी रविवारी निश्चित निशीथकालव्यापिनी आहे हे सहज लक्ष्यात येतं. त्यामुळे न्यूयॉर्कमध्येसुद्धा रविवारीच महाशिवरात्री साजरी होईल. याचाच अर्थ, अमेरिकेत सर्व ठिकाणी रविवारीच महाशिवरात्री साजरी करणं योग्य होईल. वरील तीन शहरांच्या सूर्यास्त-सूर्योदय वेळांवरून निशीथकाल सहज काढता येईल. न्यूयॉर्क, शिकागो व सॅनफ़्रॅन्सिस्कोमध्ये साधारणतः हा काळ अनुक्रमे (रविवार मध्यरात्री) ११:४३-१२:३६, ११:३८-१२:३० व ११:५७-१२:४९ असा राहील.

भाग ३ चे संदर्भ:

१. श्री. कृ. वि. सोमण - सुलभ ज्योतिषशास्त्र
२. दाते पंचाग (शालिवाहन शक १९३० - सर्वधारीनाम संवत्सर)
३. http://kalnirnay.com/
४. विकिपिडिया

Saturday, January 24, 2009

धार्मिक कृत्ये व पंचांग - भाग २: गणेशजयंती

माघ महिन्यात शुक्लपक्षातल्या चतूर्थीला गणेशजयंती साजरी करतात. गणेशजयंतीसाठी चतूर्थी माध्यन्हकालव्यापिनी असावी असं कृ.वि. सोमण यांनी सुलभ ज्योतिषशास्त्र या ग्रंथात म्हटलं आहे. दोन दिवस चतूर्थी असून दोन्ही दिवशी संपूर्ण किंवा अंशतः माध्यन्हकालव्यापिनी असल्यास पहिल्या दिवशी, दोनपैकी एकाच दिवशी (पूर्णतः किंवा अंशतः) माध्यान्हकालव्यापिनी असल्यास त्या दिवशी, व दोन्ही दिवशी माध्यन्हकाळी अजिबात नसल्यास पहिल्या दिवशी गणेशजयंती साजरी करावी असं त्यात म्हटलं आहे. भारतात यंदा गुरुवार दि. २९ रोजी सायंकाळी ६:०१ वाजता चतूर्थी सुरू‌ होते आहे व ती शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी ६:३८ वाजेपर्यंत असेल. त्यामुळे भारतात ३० तारखेला गणेशजयंती साजरी होईल. पूर्व अमेरिकेत व पश्चिम अमेरिकेत गुरुवार दि. २९ रोजी अनुक्रमे सकाळी ७:३० व पहाटे ४:३० वाजता चतूर्थी सुरू होत असून ३० तारखेला अनुक्रमे सकाळी ८:०८ व पहाटे ५:०८ वाजेपर्यंत असेल, याचा अर्थ, माध्यान्हकालव्यापिनी चतूर्थी गुरुवार दि. २९ रोजीच आहे, त्यामुळे अमेरिकेमध्ये गुरुवारी गणेशजयंती साजरी होईल.

पंचांग पाहताना आणखी एक गोष्ट ध्यानात आली, की नुकतीच होऊन गेलेली संकष्ट चतूर्थी भारतात बुधवारी होती, परंतु, चंद्रोदयव्यापिनी चतूर्थी अमेरिकेमध्ये मंगळवारी असल्यामुळे ती अंगारकी संकष्ट चतूर्थी होती. त्या चतूर्थीपूर्वी लक्ष्यात न आल्यामुळे ब्लॉगवर प्रकाशित करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व.

भाग २ चे संदर्भ:

१. श्री. कृ. वि. सोमण - सुलभ ज्योतिषशास्त्र
२. दाते पंचाग (शालिवाहन शक १९३० - सर्वधारीनाम संवत्सर)
३. http://kalnirnay.com/

पाऊस

आले दाटून
आकाशी कृष्णघन
पडे पाऊस