मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Friday, August 28, 2009

पश्चिमेचा गार वारा - भाग २

खरंतर मी, कदीर आणि एलिज़ाही खूप थकलो होतो. पण हत्ती गेला, शेपूट राहिलं अशी स्थिती असल्यामुळे थांबत थांबत का होईना, पण शिखरापर्यंत पोहोचायचंच, असं आम्ही ठरवलं. मग उरलेलं पाणी संपवून, दर चार-पाच मिनिटांनी एक-दोन मिनिटांची विश्रांती घेत घेत सॅन हॅसिंटो या साडेचार हजार फूट उंचावर असलेल्या शिखरावर एकदाचे पोहोचलो. थकलो होतो, पण इतक्या उंचावर पोहोचल्याचा आनंदही होता.
---------
इतर मंडळी तिथे आधीच पोहोचली होती. आम्ही साधारणपणे शिखरापासून वीस फूट अंतरावर असताना प्रो. क्रिलाव यांनी आम्हाला फोटोमध्ये टिपले. शिखरापाशी पोहोचल्यावर पुन्हा एक फोटोसेशन झालं. मग पाणी भरून घेतलं आणि थोडी विश्रांती घेतली. आधी पोहोचलेल्या मंडळींनी परतायला सुरुवात केली. मी, कदीर आणि एलिज़ा थोडावेळ थांबलो. पायातला त्राण अगदी गेला होता. पण चढण्यापेक्षा उतरताना कष्ट कमी लागतात, त्यामुळे साधारणपणे वीसएक मिनिटांच्या विश्रांतीनंतर आम्हीही खाली उतरणं सुरू केलं.

उतरताना वाटेत बुटांची लेस सुटली. तिथल्या खडकाळ भागात लेसमध्ये पाय अडकून पडलो असतो तर कपाळमोक्ष व्हायला वेळ लागला नसता. लेस बांधायला क्षणभर थांबलो. खडकाच्या या बाजूला मी आणि पलिकडे कदीर आणि एलिज़ा होते. लेस बांधून मी चालायला सुरुवात केली तेव्हा हे दोघं मला दिसले नाहीत त्यामुळे मी इकडे तिकडे शोधू लागलो. खडक असल्यामुळे इथेच कुठेतरी असतील असा विचार करून मी हाका मारत मारत पुढे गेलो. मी लेस बांधायला वाकलो होतो तेव्हा खडकामागे लपल्यामुळे तेही मला शोधत होते आणि हाका मारत होते. पण एकमेकांना शोधता शोधता एकमेकांचे आवाज ऐकू न येण्याइतकं आमच्यातलं अंतर वाढलेलं लक्ष्यातच आलं नाही. दरम्यानच्या कालावधीत एलिज़ा रेस्टरूममध्ये गेली असताना कदाचित मी तिथे पोहोचून पुढे गेलो असेन अशी एक शंका कदीरला आली त्यामुळे मला शोधत शोधत ते दोघं पुढे जायला लागले. मी त्यांना खडकामागे शोधत होतो, त्या दरम्यान केव्हातरी माझा रस्ता चुकला. नक्की केव्हा, ते कळलं नाही. पण वाटेत पाण्याचा झरा लागला तेव्हा मी वाट चुकलोय हे ध्यानात आलं आणि थोडी चिंता, थोडी भीती वाटली. मागे जाण्याचा प्रयत्न केला. पण खडकाळ भागात एकसारख्या दिसणार्‍या इतक्या वाटा होत्या, की कुठे जायचं ते कळेना. मी सेलफोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो, पण कदीरच्या सेलफोनला रेंज मिळत नव्हती. अधूनमधून माझ्याही सेलफोनची रेंज जात होती. मग हळूहळू आलो तसंच परत जाण्याचा प्रयत्न करताना एका खडकावरून पाय निसटला आणि बाजूला असलेल्या झाडीत मी पडलो.

झाडी असल्यामुळे मार लागला नाही, पण हातापायाला बरंच खरचटलं होतं. त्या झाडीमधून वर कसं पोहोचायचं, हाच मोठा प्रश्न होता. जवळ जवळ दहा फुटांचं ते अंतर होतं आणि पुढे उंच खडक चढायचा होता. शेवटी झाडीवरूनच कसेबसे पाय टाकत पंधरा-वीस मिनिटांत त्याच जागेवर पोहोचलो. आता मात्र मी प्रचंड घाबरलो होतो. रस्ताही माहित नव्हता, कदीर मला शोधत असेल याची जाणीव होती आणि त्याला फोनवरूनही संपर्क होत नाहीये याची चिंता होती. त्या खडकावरून पुढे चालून व्यवस्थित उभं राहता येईल अशा ठिकाणी पोहोचलो आणि काय करावं याचा विचार करू लागलो. पाणी पिण्यासाठी बॅकपॅक पाठीवरून काढल्यावर लक्ष्यात आलं, की झिप उघडंच होतं! पाणी प्यायलो आणि प्रो. क्रिलाव यांना संपर्क करण्याचं ठरवलं. सुदैवाने त्यांच्याशी फोनवर संपर्क झाला. झालेल्या प्रकारातला मला ध्यानात आलेला भाग त्यांना सांगितला. मी नेमका कुठे पोहोचलोय हे मात्र मला त्यांना सांगता येईना. आता मात्र माझं टेन्शन खूपच वाढलं होतं. त्यांचंही टेन्शन वाढलं होतं. पुरेसं पाणी आणि खाण्याचं सामान असेल तर सॅन हॅसिंटो शिखरापाशीच जाण्याचा पर्याय त्यांनी सुचवला. कारण तिथे इमर्जन्सीमध्ये रात्री थांबण्याची आणि जेवण्याची व्यवस्था असते.

पण संध्याकाळचे चार वाजले होते. पायात त्राण नसल्यामुळे आतापर्यंतचं अंतर पार करून पीकपर्यंत पोहोचेपर्यंत तीन-चार तास सहज लागले असते आणि अंधार झाला असता. त्यात शिखर शोधण्यापासून सुरुवात होती. भलतीकडेच पोहोचलो आणि तिथे सेलफोनची रेंजही मिळाली नाही, तर पंचाईत. त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी मला "काळजी करू नकोस. आम्ही तुला शोधण्याची व्यवस्था करतो." असं सांगितलं. थोडंसं हायसं वाटलं, पण प्रो. क्रिलाव यांना त्रास दिल्याबद्दल गिल्टी वाटत होतं. ते मला शोधणार तरी कसे? कारण मी कुठे आहे हे मलाच माहिती नाही. आणि प्रो. क्रिलाव यांना मी केवळ मी टेकडीच्या पश्चिमेकडे आहे आणि दूरवर एक फ़्रीवे दिसतोय असं मोघम बोललोय, तेव्हा त्या तरी कोणाला काय सांगू शकणार? असे अनेक प्रश्न चिंता वाढवत होते. मला शोधायला किती वेळ लागेल, काही सांगता येत नव्हतं. मी स्वतः जरी वाट शोधत शोधत खाली उतरायचा विचार केला, तरी थकल्यामुळे आणि हातापायांना खरचटल्यामुळे आज संध्याकाळी ते शक्य नव्हतं. थोडक्यात, एक रात्र तरी इथेच काढावी लागणार! या दरम्यान लॅबमेट्सचे फोन येऊ लागले. त्यांनी ९११ला संपर्क करणार असल्याचं सांगितलं.

या दरम्यान सेलफोनची रेंज अधूनमधून कमी होत असल्यामुळे चोवीस तासांपूर्वी पूर्णपणे चार्ज्ड असलेली बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाली. मला संपर्क साधण्याचं एकमेव साधनही आता बंद पडण्याच्या मार्गावर होतं. पण मी इथे उभं राहून बोलतोय याचा अर्थ निदान सेलफोन कंपनीला तरी माझं लोकेशन समजण्याला वाव आहे असं एकदम क्लिक झालं. मग मी सेलफोन सुरूच ठेवला. कॉल कट झाला, तरी मला संपर्क झाल्याच्या नोंदी होतील आणि मला शोधणं थोडंसं का होईना, पण सोपं होईल, असं वाटलं.
सूर्य मावळला. देवाचं नाव घेऊन कसाबसा धीर गोळा केला. किंबहुना दुसरा पर्यायच नव्हता. जवळ पिझ्झा आणि शिरा होता. पण उद्यापर्यंत जर सापडलो नाही, तर उद्यासाठी काहीतरी जवळ असायला हवं असं वाटलं. शिवाय या टेन्शनमध्ये भूक मेलीच होती. आज निदान पाणी तरी आहे. उद्या पाण्याचा साठा शोधेपर्यंत तरी हेच पुरवायचं आहे.

रात्री इतक्या उंचीवर थंडीही खूप असते त्यामुळे झोपायचं तरी कसं हा प्रश्न होता. थोडा शोध घेतला आणि एका खडकाच्या खाली पोकळ जागा होती तिथे उताणं आडवं झाल्यास वार्‍याला पूर्ण अडोसा जरी मिळत नसला, तरी निदान एकाबाजूने तरी प्रोटेक्शन. झोपायची जागा पक्की केल्यावर पिझ्झा आणि शिरा त्या जागेपासून साधारणपणे वीस-तीस फुटांच्या अंतरावर ठेवून आलो. त्या झाडीत अस्वल असतात आणि खाद्यपदार्थांचा वास आल्यास ते तिथे पोहोचतात असं आदल्या दिवशी कळलं होतं.
त्यामुळे अस्वलापासून बचावासाठीचा एक तोकडा प्रयत्न केला. मग काही वेळ टॉर्च सुरू केला आणि समोर दूरवर दिसणार्‍या फ़्रीवेपाशी, आकाशात फिरवू लागलो. पण टॉर्चचा प्रकाश तिथपर्यंत पोहोचत नसेल. आणि असला, तरी मी तो कशासाठी फिरवतोय, हे कसं कळणार लोकांना?

बॅकपॅकमध्ये शोध घेतल्यावर टॉवेल नसल्याचं लक्ष्यात आलं. झाडीमध्ये पडलो तेव्हा झिप उघडंच होतं! तेव्हा नेमका टॉवेलच पडला की काय? म्हणजे आता पांघरायलाही काही नाही. शेवटी बॅकपॅकमधल्या कपड्यांनाच "अर्धवट" चढवून हात, पाय झाकण्याचा प्रयत्न केला. तिथले किडे-मुंग्या त्रास देत होते. त्यांना अडवायला काहीच नव्हतं. मग बॅगेतलं सनस्क्रीन लोशनच चेहर्‍याला आणि हातापायांना लावलं. सेलफोन बंद झालेला. इंटरनेटपासून दूर. चारीबाजूला आहे फक्त निसर्ग. स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं की निसर्गाच्या सान्निध्यात अशा अवस्थेत कधी रात्र घालवू. असे एक ना अनेक विचार येत होते. झोप येत नव्हतीच. पण काही करूही शकत नव्हतो. त्यामुळे डोळे मिटून पडून राहिलो. अस्वल येण्याबद्दल चिंता आणि किडे-मुंग्यांमुळे झोप जागृतच होती. अधुनमधुन घड्याळ पाहत होतो. साधारणपणे पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास डोळा लागला असावा.

(क्रमशः)

1 comment:

Anonymous said...

अरे बापरे...
काय ट्विस्टावर थांबलाहात!