मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Sunday, March 15, 2009

धार्मिक कृत्ये व पंचांग - भाग ४: गुढीपाडवा

मराठी, हिंदी, पंजाबी, कन्नड व तेलगु भाषीय हिंदू चैत्र महिन्याच्या शुक्लपक्षापासून नववर्षाचा प्रारंभ* मानतात. हिंदू कालगणनेमध्ये महिन्यांची नावं ठरवताना सूर्य-चंद्रांच्या निरयन राशींना फार महत्त्व आहे. अमावस्या म्हणजे सूर्य-चंद्र युतियोग. अमावस्येच्या प्रारंभी या ग्रहांमधील पूर्व-पश्चिम अंशात्मक अंतर बारा अंशांइतकं असतं व ते शून्य अंश होतं, त्यावेळी अमावस्या संपून प्रतिपदा तिथी सुरू होते. ही युती मीन राशीतून झाल्यावर येणार्‍या प्रतिपदेपासून चैत्र महिना सुरू होतो. याच दिवसापासून नव्या शालिवाहन शकाचा प्रारंभ होतो.

सध्या १९३०वे शालिवाहन शक सुरू असून "सर्वधारी" असं त्याचं नाव आहे. १९३१व्या शालिवाहन शकाचं नाव "विरोधी" असेल. (संवत्सरांची एकूण ६० नावे असून त्याबद्दल कृ.वि.सोमण यांच्या सुलभ ज्योतिषशास्त्र या ग्रंथात सविस्तर माहिती दिली आहे.) या दोन्ही वर्षांच्या दाते पंचांगांमध्ये सांगितल्यानुसार भारतात दि. २७ मार्च २००९ रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा येत असल्यामुळे त्या दिवशी तैलाभ्यंग, ध्वजारोपण, कडुनिंबाच्या पानांचं भक्षण इत्यादि गुढीपाडव्याशी निगडित गोष्टी केल्या जातील.
"महाभारत - काही नवीन विचार" या ब्लॉगवर फडणीसकाकांनी एका स्फुट प्रकरणात गुढीपाडव्याशी निगडित एका गोष्टीबद्दल आकर्षक माहिती दिली आहे, ती इथे अवश्य वाचा.

सुलभ ज्योतिषशास्त्र हा ग्रंथ व कालनिर्णयची ऑनलाईन आवृत्ती यांच्या सहाय्याने, अमेरिकेत गुढीपाडवा केव्हा साजरा होईल, हे आता पाहू. सुलभ ज्योतिषशास्त्रात सांगितल्यानुसार वर्षारंभासाठी चैत्र शुक्ल प्रतिपदा सूर्योदयव्यापिनी असावी. दोन दिवस सूर्योदय व्यापिनी असल्यास किंवा प्रतिपदेचा क्षय झाला असल्यास (प्रतिपदेचा क्षय म्हणजे सूर्योदयानंतर प्रतिपदा सुरू होऊन पुढल्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वीच द्वितीया प्रारंभ होणे.) पहिल्या दिवशीची तिथी घ्यावी, अन्यथा, दुसर्‍या दिवशीची तिथी वर्षारंभासाठी गृहित धरावी. कालनिर्णयच्या ऑनलाईन आवृत्तीनुसार न्युयॉर्क, शिकागो, व सॅन फ़्रॅन्सिस्को या शहरांमध्ये गुरुवार दि. २६ मार्च २००९ सूर्योदयानंतर काही तासांनी प्रतिपदा प्रारंभ होत असून, २७ तारखेला सूर्योदयानंतर काही वेळाने ती संपते आहे. याचाच अर्थ, सूर्योदयव्यापिनी प्रतिपदा या तिन्ही ठिकाणी २७ तारखेलाच आहे. त्यामुळे या भागांमध्ये नववर्षप्रारंभ २७ तारखेला नववर्षप्रारंभ मानावा.

सूर्योदयास्ताच्या वेळा अक्षांश-रेखांशानुसार बदलत असल्या, तरी, तिथी बदलण्याची वेळ एकच असल्यामुळे प्रतिपदा संपण्याच्या वेळा केवळ टाईमझोन बदलल्यामुळे भिन्न अंक आहेत हे कालनिर्णय पाहिल्यास सहज लक्ष्यात येईल. अलास्का व हवाई बेटांमध्ये मात्र, पॅसिफ़िक वेळेपेक्षा सूर्योदय ढोबळमानाने अनुक्रमे एक व दोन तासांनी उशीरा होत असल्यामुळे गणित थोडं किचकट आहे. हवाईमध्ये सूर्योदयापूर्वीच प्रतिपदा संपेल हे निश्चित असल्यामुळे तिथे २६ तारखेला वर्षारंभ मानावा लागेल. परंतु, अलास्कामध्ये २७ तारखेला स्पष्ट सूर्योदय जर तिथल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ६:०५ च्या आधी होणार असेल, तर अमेरिका मेनलँडप्रमाणे, अन्यथा हवाई बेटांप्रमाणे वर्षारंभ मानावा लागेल. एवढ्या खोलात शिरायचं नसल्यास, अलास्कामध्ये बहुतांश प्रतिपदा २६ तारखेला असल्यामुळे, त्या दिवशी गुढीपाडवा साजरा करणं जास्त योग्य होईल, असं वाटतं.


*गुजराथमध्ये बलिप्रतिपदेपासून वर्षारंभ मानतात (गुजराथी व जैन संवत् बलिप्रतिपदेला सुरू होतात), पश्चिमबंगालमध्ये वैशाख महिन्यापासून (बैसाखी) वर्षारंभ मानतात, तर तामीळनाडूमध्ये सौरमानाप्रमाणे वर्षारंभ मानतात, असं या प्रांतातल्या माझ्या ओळखीतल्या व्यक्तींकडून कळलं, पण त्याबद्दल सविस्तर माहिती नाही.चांद्र-सौरमानाने वर्षारंभ मानणार्‍या प्रांतांत (तामीळ नाडू सोडून इतर प्रांतात) वर्षारंभ वेगवेगळ्या वेळी मानत असले, तरी इतर सर्व सण, एकाच वेळी साजरे होतात. उदा. दिवाळी सर्वत्र एकाच वेळी साजरी होते - गुजराथी व मारवाडी लोक बलिप्रतिपदेला वर्षारंभ मानतात, एवढाच फरक. तसेच, पौर्णिमांत मासपद्धतीनुसार होळीपौर्णिमेनंतरच्या दिवसापासून वर्षारंभ मानतात असंही कुठेसं वाचलं आहे, पण महिन्यांची नावं कशी ठरतात, ते माहिती नाही. जाणकारांनी माझ्या ज्ञानात भर घालावी ही विनंती.भाग ४ चे संदर्भ:

१. श्री. कृ. वि. सोमण - सुलभ ज्योतिषशास्त्र
२. दाते पंचाग (शालिवाहन शक १९३०-३१ - सर्वधारीनाम/विरोधीनाम संवत्सर)
३. http://kalnirnay.com/

2 comments:

Unknown said...

Dhanyavad, ata gudi padvyacha prashna sutala. mi magchya athavdyat sankashti chaturthi baddal mahiti baghayala gele hote panchang pahayala, pan toparyanta Feb mahinyachya pudhacha update kelach navhata.

आशा जोगळेकर said...

गुढी पाडव्या च्या शुभेच्छा . इथे भारतात ही 27 लाच आहे गुझीपाडवा.