वळणदार ही रम्य वाट, घनदाट तरू चहुकडे; दुभंगे जाता इथुनी पुढे
वाट एक त्यांतली ही, हिच्या दोबाजूंना लांब; पसरले पहा दिव्याचे खांब
दुसर्या वाटेवरी न पथिक न गाड्याही धावल्या; परि तिथे काटे आणिक कळ्या
दोन्ही वाटा अखेर मिळती एका रस्त्याला; जाई जो माझ्या गावाला
दुवा दिव्यांचा ह्या वाटेवर पांथिक बहु चालले; धरावी ही हे मी ठरविले
प्रवास इथला सुलभ, फक्त चालणे अखंडितपणे; आणि निजधामाला पोचणे
धरली त्याने वाट, जी न वहिवाट, चालला पुढे; फुलांचे जेथे पडले सडे
पाचोळा अन् काटेही पण वाटेवर त्याच्या; आणि ना दिशा ओळखीच्या
गावी मी पोचलो, जणू मिळवले सर्व सर्व; मला जाहला असा गर्व
स्वतःभोवती फिरत राहिलो, विसरलो जगाला; येइ अंधारी नयनांना
"तो न पोचला गावी अजुनी? फसला काट्यांत!"; गर्जलो मीऽ मदासक्त
"वहिवाटेवर तो न चालला, पोचला न गावी; न झाले कार्यही वेळेवरी"
अवचित आला एके दिवशी माझ्या गावाला; तो मला सहज भेटण्याला,
तो येता मी कुत्सित वदलो, "उशीर बहु झाला; तुजला गावी पोचण्याला!"
आणिक वदलो काहीबाही टाकुनि त्यां अतिउणे; परी ना लक्ष्य दिले त्याने
प्रेमे मग पाहुनी तयाने मंदस्मित केले; आणि मज वदला शांतपणे
"उशीर झाला मला खरोखर तुला भेटण्याला; मागतो क्षमा तयाची तुला
वाटेवर काटे होते, होती पण तेथे फुले; ज्यांमध्ये मन हे माझे झुले
तिथे एक वठलेले होते वृक्ष, तयापासुन; शिल्प मी घडवियले तासुन
शिल्पाच्या भोवती पसरले वन्यफुलांचे सडे; गंध त्यांचा पसरे चहुकडे
मी न निवडल्या चालण्यास त्या वाटा नित्याच्या; नि धरिला रस्ता काट्यांचा
परि उभारला जीव ओतुनी स्वर्ग मन्मनीचा; न वर्णवे आनंद तयाचा"
कुसुमाग्रजांची "कोलंबसाचे गर्वगीत" ही कविता वाचल्यापासून त्या वृत्तात कविता करून पाहण्याची इच्छा होती. मध्यंतरी रॉबर्ट फ़्रॉस्ट यांची "द रोड नॉट टेकन" ही कविता इंटरनेटवर वाचली. त्या कवितेतल्या पहिल्या ओळीत वनराईमध्ये दुभंगून रस्ते दूर जाण्याची कल्पना आवडली आणि ही कविता सुचली. या कवितेचा आशय मात्र, "द रोड नॉट टेकन"पासून पूर्णपणे निराळा आहे. काही ओळींमध्ये मात्रा थोड्या कमीजास्त झाल्या आहेत. तसेच, यमकांचा पॅटर्न मी थोडा बदलला आहे.