मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Wednesday, December 19, 2007

हॅपी बर्थ डे

सप्रेम नमस्कार.

वाचकहो, या ब्लॉगला आज एक वर्ष पूर्ण झालं याचा मला अत्यंत आनंद होतोय. आज माझ्या लेखणीतून उमटलेल्या शाईकडे पाहतो, तेव्हा अनेक गोष्टी आठवतात.

"ब्लॉग लिहिणे" ही कल्पना जरी जुनी असली, तरी मला त्याबद्दलचं ज्ञान जरा उशिराच झालं. या ब्लॉगचा जन्म अचानकच झाला. या ब्लॉगच्या जन्माची गंमत आठवते. ऑर्कुटवरील "टेस्टिमोनियल" हा प्रकार मला आवडायचा. (अजूनही आवडतो.) आपल्या मित्रमैत्रिणींबद्दल आपल्याला जे काही वाटतं ते त्यात लिहायचं असतं. पण, ते टेस्टिमोनियल केवळ ऑर्कुटवर प्रोफाईल असणार्‍यांसाठी लिहिता येतं व ते लिहिणारे व वाचणारेही ऑर्कुटचे सदस्य असावे लागतात. एकदा आर्कुटमध्ये माझ्या "फ्रेंडलिस्ट" मधील तुहिना केळकर (एन्. सी. एल्. मधील माझी लॅबमेट) हिचा ब्लॉग सापडला व "आपले विचार मांडण्यासाठी असंही काही अस्तित्वात आहे" हे कळलं. पण तो ब्लॉग इंग्लिशमध्ये आहे. मराठीत (देवनागरीत) असं काही असल्याचा बोध योगेश दामले यांच्या "आयुष्यातील काही पाने" या ब्लॉगमुळे झाला. त्यातलं वैविध्य पाहून उत्साह, मत्सर, महत्वाकांक्षा, इत्यादींनी त्यावेळी मी ग्रासलो होतो हे कबूल करतो. मग, कुणाबद्दल लिहिण्यापेक्षा एखाद्या विषयावर लिहिणं सोपं म्हणून मग "व्यक्तिरेखा" लिहिण्याचा विचार मागे पडला. आपण काहीतरी लिहायला हवं असं सारखं वाटत होतं. काय लिहावं?..... माझे व्हायोलिनक्लासचे गुरुबंधु, डॉ. मुकुंद जोगळेकर यांच्याकडे गेलो असताना एक विषय मिळाला व कुण्या एका भाग्यवेळी "वाहनयोग" हा विषय घेऊन दोन तासात "ऑन लाईन" लेखन केलं. ते "सेव" करून ठेवण्यासाठी "पब्लिश" वर टिचकी मारली. याहूच्या जिओसिटीजवर पूर्वी वेबपेज करून पाहिलं होतं. तेवढ्या तोडक्या ज्ञानाच्या आधारे माझं हे ब्लॉगलेखन प्रत्यक्षात इंटरनेटवर उपलब्ध होण्यासाठी एच.टी.एम.एल. चं प्रोग्रॅमिंग वगैरे काहीतरी करावं लागेल असं वाटलं होतं. पण नंतर लक्ष्यात आलं, की ते लेखन त्या क्षणीच इंटरनेटवर उपलब्ध झालं होतं. ब्लॉगलेखन इतकं सोपं असेल असं वाटलं नव्हतं. तर अशाप्रकारे, अपघाताने लेखणीतली शाई उमटली.

लहानपणी मी कविता करायचो. पण मधल्या काळात माझा तो छंद बंद पडला होता. या ब्लॉगमध्ये लिहिण्याच्या हेतूने का होईना, पुन्हा मी कविता करू लागलो. या ब्लॉगचे वाचक म्हणजे केवळ माझ्या संपर्कातील व्यक्ती असा माझा पूर्वी समज होता. पण, कालांतराने, मला अपरिचित असलेल्या व्यक्तींकडून प्रतिक्रिया मिळाल्या तेव्हा हुरूप वाढला.

या ब्लॉगवरील लेखनाची नोंद करण्यासाठी "मराठीब्लॉग विश्व"सारखी संकेतस्थळं असल्याची माहिती मात्र फार उशिरा झाली. एक दिवस सहज गुगल सर्च इंजिनमध्ये "लिस्ट ऑफ पब्लिकेशन्स" शोधता येतात का? ते पाहण्यासाठी माझं नाव टाकलं असताना हा बोध झाला. हा शोध लागल्यावर जणु काही अलिबाबाची गुहा हाती लागली असं वाटलं. माझ्यासारखं ब्लॉगलेखन करणारे इहलोकी कितीतरी आहेत हे कळलं आणि त्यांचे ब्लॉग वाचण्याची सवय लागली. त्यातून माझ्या ज्ञानात भर पडली आणि माझी विचारक्षमताही वृद्धिंगत होत गेली. मग, अभिप्रायांची देवाण-घेवाण सुरू झाली व वर्गमित्र, ई-मित्र, यांप्रमाणे "ब्लॉगमित्र" निर्माण झाले.

आज या लेखणीतल्या शाईचा वर्धापनदिन असल्यामुळे, या ब्लॉगला सामावून घेणार्‍या "मराठी ब्लॉगविश्व"चे अभिवादन करण्यासाठी माझ्या कुवतीप्रमाणे लहानशी कविता केली आहे. ("सॉनेट" या काव्यप्रकारासारखा "१,२,२,१ ; ३,४,४,३ ; ५,६,६,५ ; ७,७" या क्रमानुसार यमक जुळवण्याचा अत्यंत ओबडधोबड प्रयत्न केला आहे.) त्यात मराठी ब्लॉगविश्वात नोंद झालेल्या ब्लॉगांना गुंफण्याचा लहानसा प्रयोग आहे.

बसलो होतो चाळत माझ्या आयुष्यातली काही पानं
नकळत केव्हातरी उमटली लेखणीतली शाई एकदा
मराठी ब्लॉगविश्व भेटलं स्वैरपणे ती चालत असता
तिच्या मनातलं विश्व मग कधी तिचं तिला उलगडलं

कसं काय? म्हणाली शाईला हळूच झुळुक वार्‍याची,
ती उत्तरली, "माझी कोहम?ची शोधयात्रा चाले."
कथापौर्णिमा कुणाच्या अन् विखुरलेले मोती कुणाचे
संदिग्ध अर्थाचे उखाणे नित विचारांना प्रगल्भ करती

ब्लॉगविश्वी कुणी प्रकाशित करी 'माझे शब्द माझे गाणे'
विडंबन मग करण्या त्यांचे उपजली तेंडूची पाने
घडविला माझ्यातील लेखक..!! या लेखणीतल्या शाईने
दिलखुलास साहित्य चाळता होऊनी वाचक मनसोक्तपणे

अनुदिनी अनुतापे करी मनोमंथन लेखणीतली शाई
आनंद क्षण हा अस्तित्वास तिच्या आज वर्ष पुरे होई


कविता रटाळ न होऊ देता शक्य तितके ब्लॉग कवितेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्तही अनेक ब्लॉगांची नावं यात गुंफण्याची इच्छा होती. पण, माझ्या कल्पनाशक्तीच्या मर्यादांमुळे ते शक्य झालं नाही. या सर्वांकडून अशीच साहित्यिक मेजवानी मिळत राहो. आज मागे वळून पाहिल्यावर या ब्लॉगमित्र-मैत्रिणींच्या ऋणाची जाणीव होते. त्यातून मुक्त व्हावं अशी अजिबात इच्छा नाही. पण या ठिकाणी त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक वाटतं. तुमच्यापैकीही काही त्यांतले असाल. वाचक म्हणून तुमचेही मनःपूर्वक आभार. असं प्रेम करत रहा.

धन्यवाद.

आपला
प्रशांत उदय मनोहर


ता. क.
आपल्या माहितीतील व्यक्तींबद्दल काहीतरी लिहावं ही इच्छा अजूनही मनात आहे. योग्य वेळ आल्यावर तीही पूर्ण होईल असा विश्वास आहे.

-प्रशांत

8 comments:

Unknown said...

Hey tu bhari lihitos hyat kahich waad nahi.. tyamuley sarvaat adhi tuze Aabhinandan on completing one year ..

we definatley look fwd to u 4 writing more and more..

All The Best Wishes..

Pawan said...

कविता छान जमली आहे. पुढच्या ब्लॉग वाढदिवसापर्यंत आणखी सुंदर ब्लॉग शोधून त्यांनासुद्धा कवितांमध्ये गुंफण्यासाठी शुभेच्छा!

- पवन

Anonymous said...

Hello Prashant, hats off to your creativity!!! You are a doubtlessly genious writer. I would just like to advise you to be a little aggressive than being more balanced in your writing though I actually appreciate your humbleness and hospitality towards your readers.

प्रशांत said...

अनुराधा आणि पवन,
शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

placid78,
Thank you for the feedback. I have noted your point.

-प्रशांत(Prashant)

A woman from India said...

तुमच्या ब्लॉगच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. ही इतर ब्लॉगला गुंफुन केलेली कविता छानच जमली आहे.
आपले लेखन व कविता वाचन असेच सुरू राहील ही कामना.
तुम्ही आधी लिहिलेल्या एका लेखात ज्योतिषविद्येला शास्त्र समजण्याऐवजी कला समजावे अशा आशयाचे काही लिहिले होते. माझ्या वाचण्यात आलेल तो तुमचा पहिला लेख, त्याला मी प्रतिक्रियाही दिली होती.
त्यानंतर इतर लेख कविता तसेच तुमच्या आईच्या कविताही मी वाचत आले आहे व पुढेही वाचत राहिन...
नविन वर्षाच्या शुभेच्छा.

प्रशांत said...

कसंकाय,
तुमच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ब्लॉगद्वारे लेखन, वाचन व वैचारिक देवाण-घेवाण अशीच चालू राहो. तुम्हालापण नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
-प्रशांत

आशा जोगळेकर said...

सगळ्या ब्ल़ॉग्स ची नावें गुंफून केलेली ही कविता छानच जमली आहे.

प्रशांत said...

धन्यवाद आशाताई.
-प्रशांत