मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Thursday, February 10, 2011

मोहोरी


















दूरवर विस्तारला
गावाच्या बाहेर
मोहोरीच्या मोहराचा
पिवळा आहेर

पानोपान बहरली
फुलांनी मोहोरी
जणु हिरव्या शालूला
काठ जरतारी

पुनवेच्या रात्री पडे
चांदी सुवर्णात
वाऱ्यासवे अन् मोहोरी
आनंदे डोलत

सूर्योदयी नभ जणु
केशरात न्हाले
सांडलेले ओज होई
मोहोरीची फुले

Thursday, September 30, 2010

तुझ्या-माझ्यात

शांतता हवेत
शांतता नभात
अशा रम्य वेळी
आणि तुझी साथ

आकाश निरभ्र
रात्र चांदण्याची
अन् तुझा चेहरा
आभा चंद्रमाची

एक हास्य तुझे
गालावर खळी
मिटता पापणी
गुलाब-पाकळी

मंद वाहे वारा
हवेत गारवा
आणि तुझा स्पर्श
सुगंधी मरवा

तू माझ्या मनात
मी तुझ्या मनात
आणि तुझे माझे
हातांमध्ये हात

Monday, August 30, 2010

पाऊस-कविता

"पाऊस" या विषयावर अनेक कवींनी अनेक कविता केल्या असल्या, तरी पाऊस जसा हवाहवासा वाटतो तशा कविताही हव्या हव्याशा वाटतात. दोन-तीन वेळा पावसावर एक-दोन ओळी सुचल्या, पण सलग कविता काही सुचली नाही. :( मग विचार केला, की मराठी ब्लॉगबांधवांची मदत घ्यायला काय हरकत आहे? या पूर्वी "जे जे उत्तम", "आवडलेले थोडे काही", "साखळी हायकू" किंवा अगदी अलिकडच्या "मावसबोलीतल्या कविता" अशा अनेक उपक्रम मराठी ब्लॉगजगतात छानच प्रतिसाद मिळाला. त्यातून असा विचार आला, की पावसावरील कडव्यांची साखळी का करू नये?

तेव्हा, ब्लॉगबंधु-भगिनींनो, "पाऊस-कविता" पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम -

१. शक्यतो छंदबद्ध कडवे तयार करू. अगदीच नाही जमलं तर मुक्तछंद चालेल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? कविता गुंफ़ायची असल्यामुळे आधीचा कडव्याशी थोडासा तरी संबंध असावा.

२. छंदाचं नाव माहिती असल्यास ते कळवावे. त्याबद्दल माहिती दिली तर छानच. अर्थात नाही दिली तरी चालेल.

३. किमान एक व जास्तीत जास्त चार ब्लॉगबांधवांना खो देता येईल. संबंधित ब्लॉगलेखकास प्रतिसाद देऊन तसे कळवावे.

४. खो मिळाल्यावर ज्याच्या/जिच्याकडून खो मिळाला आहे त्या ब्लॉगलेखकाच्या पोस्टाचा दुवा आपल्या पोस्टात द्यावा व शक्य असल्यास आधीची कडवीही उतरवावीत. तसेच आपण खो स्वीकारल्यावर त्या पोस्टाचा दुवा खो देणाऱ्या पोस्टाच्या प्रतिसादात कळवावा, जेणेकरून आधीच्या लोकांनाही नोंद ठेवता येईल.

५. हे नियम सर्वांच्या सोयीसाठी डकवावे.

६. बस्स. आणखी काही नियम नाही. :-) आता फक्त पाऊस-कविता....

मग करायची‌ सुरुवात?

माझं कडवं - (भुजंगप्रयात छंद)

न क्रोधी असा पावसा रे सख्या रे
तुझी वाट पाहे सखी मी तुझी रे
झणी येउनी वर्ष रे थेंब थेंब
तुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब


माझा खो -चक्रपाणि, क्रांती, गायत्री, सेन मन यांना

Saturday, July 31, 2010

शुभं करोति

जाहली सांज
दिवेलागण होई
घराघरांत

नंदादीपाचा
देव्हाऱ्यात पडला
मंद प्रकाश

दारात लक्ष्मी
सोनपावली येते
आशिष देते

देव्हाऱ्यातली
सांजवात म्हणते
शुभं करोति

Wednesday, June 30, 2010

पाच तीन दोन

काल रात्री बऱ्याच दिवसांनी घरी जेवणानंतर पत्ते खेळत बसलो होतो. लहानपणी शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली की भावंडांमध्ये आणि बालमित्र-मैत्रिणींमध्ये खेळलेले पत्ते शाळा सुटल्यापासून दूर गेले होते ते अनेक वर्षांनी काल आयुष्यात आले. या बावन पत्त्यांमधून किती खेळ निर्माण झाले असतील कोणास ठाऊक! पाच-तीन-दोन, सात-आठ, लॅडिस, तीनशे चार, बदाम सात/सत्ती लावणी, झब्बू, भिकार-सावकार, पेनल्टी, गुलाम चोर, जजमेंट, नॅट-ऍट-होम, रमी, ब्लफ, बिझिक, ब्रिज..... संपणारी यादी आहे. यातले काही खेळ लहानपणी खेळलो होतो तर काहींची नुसती नावं ऐकली होती.

पण पत्त्यांचे घरगुती खेळ म्हटल्यावर माझ्या मेंदूच्या रॅम मेमरीत फ़्लॅश होणारा खेळ म्हणजे पाच-तीन-दोन. दोघंच असले तर रमी, किंवा अगदीच टुकारपणा करायचा असल्यास सात-आठ किंवा भिकार-सावकार, चार भिडू असल्यास लॅडिस, जास्त डोकं चालवायचं असल्यास तीनशे चार, पाच किंवा जास्त मंडळी असल्यास बदाम सात, झब्बू, गुलाम चोर, नॉट-ऍट-होम किंवा जजमेंट, . अनेक खेळ असले, तरी पाच-तीन-दोन ची सर यांपैकी कुठल्याच खेळाला नाही. या खेळाइतकी आयुष्याशी जवळीक साधणारा दुसरा खेळ (पत्त्यांचा) नाही.

पूर्ण जोड वापरता खेळल्या जाणाऱ्या इतर खेळांहून असलेला या खेळाचा वेगळेपणाही अगदी ठळकपणे जाणवणारा आहे. तीन सदस्यांना प्रत्येकी दहा पत्ते यानुसार एकूण तीस पत्ते वापरले जात असल्यामुळे अठ्ठी, नेहली, देहली, गुलाम, राणी, राजा,एक्का यांची चारही रंगांची पानं, तर सत्तीची फक्त बदाम आणि इस्पिकची पानं यात वापरली जातात. तीन भिडूंच्या पत्ते-वाटपात समानता साधतानाच पत्ते निवडीतला हा वर्णभेद मात्र अपरिहार्य आहे! दोन, तीन पाच हात बनवण्याची जबाबदारी असलेले हे तीन भिडू समाजातल्या श्रीमंत, मध्यमवर्गीय गरीब जनतेचे प्रतिनिधित्व करतात.

दोन हात बनवणारा भिडू सर्वात सुखवस्तू - श्रीमंत. पत्ते वाटण्यापलिकडे फारशी कटकट डोक्याला नाही. इतर भिडूंप्रमाणे याला दहा पत्ते मिळत असले, तरी जबाबदारी फक्त दोन हातांची. ती सहज पार पडते. एवढंच नव्हे, तर क्षमता जास्त असल्यामुळे जास्त हातही साधतात. हे 'अतिरिक्त' हात अर्थातच इतर (तुलनात्मक गरीब) भिडूंचे ओढलेले. हे साधले नाहीत, तरी भविष्यात फक्त एका हाताची जबाबदारी वाढणार. म्हणजे गर्भश्रीमंती टिकली नाही, तरी भीक मागण्याची पाळी नजीकच्या भविष्यात नसणार हे नक्की.

पाच हात बनवणारा भिडू हा मात्र गरीब बिचारा आहे. दहा पत्त्यांपैकी पाचांपासून हात बनवण्याची जबाबदारी असते बिचाऱ्यावर. शिवाय हुकूमही यानेच बोलायचा. तोही पहिल्या पाच पानांच्या आधारे! पहिल्या पावसावरून शेतीचा अंदाज बांधावा लागतो तसंच सगळं राम भरौसे! शिवाय, कदाचित पूर्वी सावकाराकडून कर्ज घेतलेलं असल्यास पाचांपेक्षा अधिक हात बनवून ते कर्ज फेडणेही आलंच.

तीन हात बनवणारा तसा भाग्यवानच म्हणावा लागेल. याच्या वाट्याला 'पाच'वाल्यासारखं राबणंही नाही आणि 'दोन'वाल्यासारखा 'आराम'ही नाही. तीन हात बनवावे निवांत रहावं. पूर्वी जर गुंतवणूक केलेली असेल (स्वतः 'दोन'वाला असताना) तर त्यातून झालेल्या लाभांचा उपभोगही घेता येतो. हा पत्ते वाटत नाही आणि हुकूमही बोलत नाही. मध्यमवर्गीयाप्रमाणे बहुतांशांना हवीहवीशी वाटणारी जीवनशैली असलेला पण वैयक्तिक 'आवाज' नसलेला.

कालमानापरत्वे परिस्थिती बदलल्यामुळे किंवा अध्यात्मिक विचारप्रणालीनुसार जन्म बदलल्यामुळे आलटून पालटून दोन, तीन आणि पाच हातांच्या जबाबदाऱ्या येतात, त्या जबाबदाऱ्या कधी पार पडतात, तर कधी पार पडल्यामुळे भविष्याबद्दलची चिंता वाढवतात. आणि 'पाच-तीन-दोन'च्या डावांचं हे चक्र अखंड चालू राहतं.

Thursday, May 27, 2010

रेशिमगाठी

दारांमधल्या भिंती आणिक भिंतींमधली दारे
लपंडाव हा सुखदुःखाचा व्यापे जीवन सारे

गावामधले रस्ते आणिक रस्त्यांलागत गावे
कुठवर चालावे थांबावे कधी, कुणाला ठावे?

शब्दांमधले अंतर आणिक अंतरातले शब्द
अवचित येती, मना स्पर्शिती अन् करती निःशब्द

नात्यांमधले प्रेम अलौकिक अन् प्रेमाची नाती
नात्यांच्या गुंत्यात हरवल्या नाजुक रेशिमगाठी

हसावे की रडावे?

आज दै. सकाळच्या ई-पेपरवर एक बातमी वाचली आणि हसावे की रडावे ते कळले नाही. त्या बातमीचं कात्र पहा -आता तरी सरकार जागे होईल का?

सूचना: कात्रण दै. सकाळ (-पेपर) वरून साभार तयार केले.