मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Thursday, January 10, 2008

नितांत सुंदर वनराई ही असे गूढ, घन

बहुदा मज तो ठावे, ही वनराई ज्याची;
त्या तिथल्या खेड्यात असे झोपडी तयाची.
हिमवृष्टी होताना पाहत थांबियलेल्या
मला, न तो पाहील इथे वनराईपाशी.

"अघटित घडले?" करी विचार हा घोडा माझा
"नसे उचित जागाही येथे विश्रामाला.
गोठियलेले सरोवर तथा ही वनराई,
काळ्या रात्री काय प्रयोजन थांबायाला?"

हलकेच मान हालवून वाजवी तो घंटी
विचारी जणू "अनुचित घडली बात कोणती?"
त्या नादाविण असे चहुकडे शांत शांत; पण,
हिमकण वाजती, गर्जते हवा स्वैर वाहती

नितांत सुंदर वनराई ही असे गूढ, घन
परंतु वचने अनेक मज पाळणे अजून
आणि चालणे अखंड निजण्याआधी अंतर
आणि चालणे अखंड निजण्याआधी अंतर"स्टॉपिंग बाय वुड्स् ऑन अ स्नोई ईव्हिनिंग" ही रॉबर्ट फ़्रॉस्ट यांची कविता अनेक वर्षांपूर्वी वाचली होती. आज सहजच इंटरनेटवर ती कविता पुन्हा वाचनात आली, आणि अनुवाद करण्याचा मोह झाला. यातील यमकाचा प्रकार ( १,१,२,१; २,२,३,२; ३,३,४,३; ४,४,४,४ ) मूळ कवितेप्रमाणे आहे. स्वैर अनुवादात एक-दोन ठिकाणी थोडे बदल करावे लागले. मूळ कवितेचं उत्कृष्ट रसग्रहण इंटरनेटवर वाचल्यावर जास्त चांगल्या रीतीने आकलन झालं व अनुवाद करताना त्याची फार मदत झाली. अर्थात, रॉबर्ट फ़्रॉस्ट यांचे विचार साकारण्यात यशस्वी झालो की नाही, ते मला माहित नाही.

4 comments:

आशा जोगळेकर said...

सुंदर झालाय अनुवाद .शेवटच्या देन ओळी तर विशेष भावल्या.
आणि चालणे अखंड निजण्याआधी अंतर
आणि चालणे अखंड निजण्याआधी अंतर

प्रशांत said...

आशाताई,
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मूळ कविता इतकी सुरेख आहे की त्यापुढे अनुवादाबद्दल काही बोलवत नाही.
इदं न मम|
Hats off to Robert Frost!

-प्रशांत

Anonymous said...

aaplya kavita aavadalya .Israel madhye aamhee "mayabolee"navache
traya masik chaalaveeto.aapale
leekhan pathva.aabhaar !
Noha Massil Sampadak.
e-mail noahsnewark@bezeqint.net

नरेंद्र गोळे said...

अनुवाद सुंदरच झाला आहे. अभिवाचन वेबिनारच्या निमित्ताने इथवर पोहोचलो म्हणून पाहता आला. धन्यवाद! आपला स्नेहांकित - नरेंद्र गोळे २००९०४१५