मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Tuesday, January 29, 2008

अभिनेते, नेते, तरुणपिढी आणि विडी

तंबाखूसेवन व धूम्रपानास चित्रपट अभिनेत्यांबरोबर आता राजकीय नेत्यांनाही प्रतिबंध लागू होणार असल्याची बातमी वाचली. धूम्रपान करून आरोग्य गमावणार्‍या जनतेबद्दल आरोग्य मंत्रालयाला वाटणारा कळवळा(?) पाहून मन भरून आलं. नुकतंच, शाहरुख ख़ान आणि अमिताभ बच्चन यांना चित्रपटात धूम्रपानाची दृश्ये देऊ नयेत असं आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केलं. चित्रपटात धूम्रपानाची दृश्ये नसावीत असं खरंतर पूर्वीच सरकारनं आवाहन केलं होतं. चित्रपटात पाहिल्यामुळे ५२ टक्के तरुणवर्ग धूम्रपानास उद्युक्त होतो असा कुठलासा अहवाल सांगतो. असा प्रतिबंध घातल्याने धूम्रपान आटोक्यात येईल यावर ज्याचा विश्वास असेल.... देव त्याचं भलं करो.

दोन वर्षांपूर्वीची एक गोष्ट आठवली. मी पुण्याहून बडोद्याला खाजगी कंपनीच्या बसने जात होतो. माझ्या शेजारच्या सीटवर एक गुजराथी मनुष्य होता. साधारणपणे माझ्याच वयाचा. नाशीकजवळ एका 'रेस्टोरंट अँड बार'पाशी जेवणासाठी बस थांबली. तेव्हा "डु यु टेक ड्रिंक्स?" असा थेट प्रश्न मला या सहप्रवाशानं विचारला तेव्हा मी अवाक् झालो. माझी त्याची ओळखही नव्हती. पुणे ते नाशीक प्रवासातल्या चार तासांमध्ये आम्ही एकमेकांना 'हाय, हॅलो' सुद्धा म्हटलं नव्हतं आणि एकदम हा प्रश्न! मी पीत नाही हे कळल्यावर त्याला विलक्षण आश्चर्य वाटलं. "महाराष्ट्रात दारू प्यायला मनाई नसतानाही दारू पीत नाही! हे म्हणजे जणु हरिद्वारला राहून गंगास्नान न करणं....." इत्यादि चेहर्‍यावर भाव करून तो स्वत: मनसोक्तपणे आचमन करायला गेला.

कुणी काय खावं किंवा प्यावं, यावर मी भाष्य करू इच्छित नाही. मद्यपान/धूम्रपान/तंबाखूसेवन चांगले का वाईट यावरही मत मांडू इच्छित नाही. पण अशी सक्ती करून काही साध्य होणार आहे का?

साध्य होणार तर! कारण ज्या गोष्टीची मनाई आहे, ती करून पाहणे हा माणसाचा स्वभाव आहे. त्यामुळे, जे साध्य करायचंय त्यावर बंदी आणणे याहून सोपा मार्ग नाही. आणि मी, भारतीय मनुष्य, सगळं काही अगदी सोयीस्करपणे पदरात पाडून घेतो. मोलकरिणीचं काम खालच्या दर्जाचं मानणार. पण मला घरकामासाठी मोलकरीण हवी. वेश्या-व्यवसाय अधिकृत करायचा? छे! छे! .. पण मी वेश्येकडे जाणार. 'संसारा उध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू'च्या जाहिराती देऊन दारुबंदी करणार(?) आणि खास वाईन उत्पादनासाठी द्राक्षांची शेती करणार. 'सिगारेट स्मोकिंग इज इंज्यूरिअस टु हेल्थ' चा प्रचार करणार आणि हे ब्रीदवाक्य छापण्यासाठी सिगारेट विकणार...... चलता है! .....

6 comments:

A woman from India said...

खरंय.
"मी, भारतीय मनुष्य, सगळं काही अगदी सोयीस्करपणे पदरात पाडून घेतो."
तुम्ही दाखवलेले डबल स्टॅंडर्डस अगदी भिनले आहेत आपल्यात.
सिगरेट नं पिणार्‍यांनी पॅसिव्ह स्मोकिंग करायला लावणार्‍यांना विरोध करायला हवा. तसेच तंबाखु सेवन करणार्‍यांना कॅन्सर-बिन्सर झाला तर सरकारी दवाखान्यात त्यांच्यावर मुळीच फुकट उपचार करू नयेत. विशिष्ट वर्तनाचे परिणाम ज्यानी त्यानी स्वतः भोगायला हवे. दुसर्‍यांचे आरोग्य बिघडवण्याचा किंवा सरकारी तिजोरीवर भार टाकण्याचा या लोकांना काही अधिकार नसावा.

प्रशांत said...

तुमचे विचार पटतात. पण, दुर्दैवानं तसं काहीही होणं शक्य नाही. अगदी सरकारनं ठरवलं तरी प्रत्येक गोष्टीत जाती-धर्म संरक्षणाच्या नावाखाली नियम मोडण्याच्या 'सवलती'नामक पळवाटा आहेत. लोकसंख्येचा प्रश्न जिथे अजूनही सतावतो, तिथे अमुक करण्यावर बंदी, तमुक केल्यास दंड, इत्यादि गोष्टी केवळ कागदोपत्री राहतात. चीन देशातही लोकसंख्येची समस्या होती. पण, चीनी नागरिकांनी काटेकोरपणे कायदे पाळून लोकसंख्या नियंत्रणात आणली. धर्म, जात, लिंग, इत्यादि पळवाटांवरून न चालता प्रत्येक भारतीय नागरिक ज्या दिवशी कायदा पाळेल त्यादिवशी देशातल्या बहुतांश समस्या आपोआप सुटतील.

Unknown said...

खरंय. तसं काहीही होणार नाही.काही तरी थातुर मातुर मलमपट्टी करायची आणि प्रश्नं सोडवल्यासारखे दाखवायचे. काही दिवसानी नविन प्रश्नं तयार होतातच, तिकडे लक्ष वेधायचं म्हणजे जुन्या प्रश्नांचा विसर पडतो. असं सुरू आहे आपल्या लोकशाहीत.

आशा जोगळेकर said...

किती खरं लिहीलय प्रशांत, दारूबंदी चा प्रचार करायचा अन् वाइन साठी द्राक्षांची शेती करायची. बरोबर हेच असतं सरकारी धोरण. असं कुणी सांगून काही सिगरेट किंवा दारू बंद होत नाही ज्याचं त्यालाच ते कळाव लागतं.

Vaishali Hinge said...

जे साध्य करायचंय त्यावर बंदी आणणे याहून सोपा मार्ग नाही. आणि मी, भारतीय मनुष्य, सगळं काही अगदी सोयीस्करपणे पदरात पाडून घेतो>>. khaas lihilay..!!!:)

A woman from India said...

Please check my blog. I have started a new series with the information that you asked for.