आयुष्य असतं सुगंधी पुष्प
बागेमध्ये फुलणारं
देवाला प्रिय होऊन
निर्माल्य बनणारं
आयुष्य असते चंद्रकोर
नयनांना मोहवणारी
पूर्ण बिंब होण्यासाठी
कलेकलेनं वाढणारी
खरंच असतं का आयुष्य
इतकं रेखीव आणि सुंदर?
की असतं ते एक तुटलेलं स्वप्न
दुःखदायक वरचेवर?
आयुष्य असेल कदाचित् समुद्रलाट
किनार्याला लागणारी
स्पर्श होताच मागे फिरून
अंतर्धान पावणारी
आयुष्य असावा गंधार
तानपुर्यातून बोलणारा
सुरेल तारा छेडल्यावर
स्वतःहून प्रगटणारा
होवो त्याची फुलवात
निरांजनात तेवणारी
स्वत: पूर्ण जळून
परिसर प्रकाशमान करणारी
2 comments:
आयुष्य सुंदर असतं अन् भासतं तारुण्यात. बालपणी ते मस्त धमाल असतं. म्हातारपणी तेच आयुष्य कंटाळा आणतं. पण चाकोरी सोडून वेगळं कांही करायला घेतलं कि वेळ पुरेनासा होतो. कविता छानच जमलीय.
आशाताई आणि हरेकृष्णजी,
अभिप्रायांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
-प्रशांत
Post a Comment