मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Saturday, April 19, 2008

सीताबाई

सीताबाई कुंभरे म्हणजे पूर्वी आमच्या घरची मोलकरीण. पूर्वी, म्हणजे अगदी माझ्या जन्माच्याही आधीपासून, ती आमच्या घरी - खरं तर अनंत भुवनमधल्या सगळ्या बिर्‍हाडांमध्ये धुण्या-भांड्यांपासून दळण आणण्यापर्यंत सगळी कामं करायची. मी लहान असताना सीताबाईनी मला कडेवरही घेतलं असेल! असेल कशाला? घेतलं होतंच की! तसा फोटोही होता एक. महिन्याच्या पगाराबरोबर दुपारचं जेवण, चहा आणि काही अन्न उरलं असल्यास रात्रीचं जेवण तसंच अधुनमधुन कोणाकडून नऊवारी साडी-चोळी (जुनं किंवा नवं) हे तिचे अलाऊअन्सेस. लग्न-मुंजीच्या वेळी मात्र नेहमीच्या तुलनेत भारी कपडेलत्ते मिळत.

घरातला अविभाज्य सदस्य असलेल्या सीताबाईला एकेरी हाक मारण्यामध्ये मालक-नोकर संबंधापेक्षा आपुलकीच कारणीभूत होती. तशी ती वयानं खूपच मोठी होती. तिच्या जन्माबद्दल विचारल्यावर "कांग्रेस भरला होता तंवाचा जन्म" असं थाटात सांगायची. त्या काळच्या बहुतांश मोलकरीणींप्रमाणे तीही निरक्षर होती. सीताबाईला साक्षर करण्याचे प्रयत्न अजिबात झाले नाहीत असं नाही. दुपारच्या चहाच्या वेळी खडू घेऊन फरशीवर तिचं नांव लिहून तिच्याकडून गिरवून घेण्याचे अनेक प्रयत्न आमच्या आजीने अधुन-मधुन केलेत. पण काही उपयोग झाला नाही. एकही अक्षर कळत नसलं, तरी तिला तिचा पगार माहित होता. मी लहान असल्यामुळे तिच्या पगाराचा आणि माझा काडीमात्र संबंध नव्हता, पण कोणे एके काळी तो दरमहा रु. ७० होता हे नक्की. नीट लक्ष्यात नाही, पण कोणीतरी तिची परीक्षा घेण्यासाठी पगार किती म्हणून विचारलं असताना "वीस अधिक पन्नास" असं काहीसं ती बोलल्याचं आठवतंय. हे "वीस अधिक पन्नास" म्हणजे पैसा मोजण्याची सीताबाई स्पेशल पद्धत. सीताबाई निरक्षर असूनही हिचं काहीच कसं अडत नाही याचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं.

पुसटसं आठवतंय. घरात लोखंडी पलंग आल्यापासून लाकडी खाट धूळ खात पडून होती. ती खाट सीताबाईला देण्यात आली तेव्हा तिला खूप आनंद झाला होता. काही दिवसांनी आजीने तिला विचारलं, "खाट वापरतेस की नाही?" त्यावर ती उत्तरली, "घरात खाट ठेवायले जागा कुटं हाय?" "मग कुठे ठेवलीस खाट?" - आजी. "जळणाला वापरली." - सीताबाई. खाटेचा हा उपयोग आमच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचा असल्यामुळे आम्ही कपाळाला हात लावला.

सीताबाईचं लग्न झालं होतं पण नवरा वारला किंवा नवर्‍याने तिला टाकून दिलं असं काहीतरी होतं. त्यामुळे ती वडिलांबरोबरच राहत असे. तिची आई पूर्वी अनंत भुवनमध्ये कामाला होती, ती वारल्यावर सीताबाई येऊ लागली हे मला आजीकडून कळलं. एकदा सीताबाईचं तिच्या वस्तीतल्या कुणाशी तरी भांडण झालं - इति सीताबाई. नक्की काय झालं कुणास ठाऊक, पण तेव्हापासून तिला त्या व्यक्तीचे भास होत व ती मोठमोठ्यानं शिव्या देऊ लागली. सीताबाईच्या या शिव्यांमुळे अनेक बिर्‍हाडांकडील तिची नोकरी सुटली. तिच्या शिव्यांचा खरंतर आम्हालाही त्रास व्हायचा पण तिच्या पोटा-पाण्याचा प्रश्न असल्यामुळे आजीने तिला कामावर राहू दिलं.

सीताबाईचे वडील वारले तो दिवस आठवतोय. ती संध्याकाळी रडत रडत ही बातमी द्यायला स्वत: आली होती. तेव्हा तिची अवस्था पाहून खूप अस्वस्थ वाटलं होतं. त्या दिवशी कुणाकडे तरी लग्नाच्या रिसेप्शनला जायचं होतं. रिसेप्शनमध्ये सतत सीताबाईचा शोकाकुल चेहरा आठवत होता. वडिलांच्या निधनानंतर ती भावाकडे राहू लागली. तिचा भाऊ रिक्षाचालक(सायकल रिक्षा) होता. दारू पिऊन पिऊन तोही संपला. नंतर भावजयेला तिची अडचण होऊ लागली. "जोवरी पैसा तोवरी बैसा" - दुसरं काय? त्यामुळे तिला पैसा कमवणं अनिवार्य होतं. दुसरीकडे तिच्या शिव्यांमुळे त्रस्त झालेल्या लोकांकडून तक्रारींचं प्रमाण वाढू लागलं. काहीतरी तोडगा काढणं प्राप्त होतं. सीताबाईसुद्धा दिवसेंदिवस थकत चालली होती. पण तिला कामावरून कसं काढणार? म्हणून मग पगार कमी न करता भांडी घासायला सीताबाई आणि कपडे धुवायला दुसरी मोलकरीण ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सीताबाईला झालेलं दुःख आजही आठवतं. अशा परिस्थितीत पैशावरून आरडाओरडा होतो. सीताबाईला मात्र "अविश्वास" दाखवल्याचं दुःख झालं होतं. शेवटी तिला कसंबसं पटवून दिलं, की तुला पगार मिळणारच आहे, पण तू थकत चालली आहेस म्हणून तुझ्या मदतीला दुसरी मोलकरीण आहे.

नागपूरहून पुण्याला आल्यापासून सीताबाईचा संपर्क कमी होत गेला. कालांतराने सीताबाईला सक्तीचं रिटायरमेंट देऊन तिच्या गरजेनुसार आर्थिक मदत होत असल्याचं कळलं. तसं अनंत भुवनमध्ये तिला दररोज कुणाकडे तरी अन्न मिळायचं, दळण आणून दिल्याचे थोडेथोडके पैसे मिळत, त्यामुळे तिचं येणं जाणं चालू होतं. एन्.सी.एल्.मध्ये पी.एच्.डी.ची फेलोशिप सुरू झाली त्यानंतर नागपूरला गेलो असताना सीताबाईसाठी काहीतरी भेटवस्तू घ्यावी अशी इच्छा होती. पण काय द्यावं हा प्रश्न होता. शेवटी काहीतरी वस्तू देऊन पडून राहण्यापेक्षा तिच्यासाठी काही खायला आणावं असं वाटलं. तिला खाऊ घातल्याचं समाधान वेगळंच होतं. ते शब्दांत किंवा पैशात नाही मोजता येणार.

नंतर एक-दोन वर्षात सीताबाईच्या निधनाची बातमी पुण्याला असतानाच कळली. ती बातमी कळली तेव्हा "सुटली बिचारी" म्हणून निश्वास टाकला, पण दुसर्‍या क्षणी सर्व आठवणी डोळ्यासमोरुन गेल्या. कारण सीताबाई मोलकरीणीपेक्षाही घरातला सदस्य होती. नागपूरहून गावाला जाताना, तसंच, अनंत भुवनवसीयांना लिहिलेल्या पत्रांत नमस्कारांमध्ये एक नमस्कार सीताबाईलाही ठरलेला असायचा. १९८९ ते १९९५ या काळात अनंत भुवन मध्ये दरवर्षी जुन्या पिढीतला एक एक सदस्य कमी होत गेला. तेव्हा मृतव्यक्तीच्या घरच्यांइतकंच दुःख सीताबाईच्या अश्रूंमधून व्यक्त झालं होतं.

खरंच निरक्षरतेचा सुसंस्कृतपणाशी संबंध असतो का? नोकरीवरून काढल्यावर पगार बंद होण्याच्या विचारापेक्षा "कार्यपद्धतीवर अविश्वास दाखवला" असा विचार करणारी सीताबाई प्रामाणिकपणातली विशालता किती लीलया सांगून जाते! इदं न मम म्हणत आलो तरी दान केलेल्या खाटेचा जळणासाठी झालेला वापर मान्य न करणारा सुसंस्कृत की उगाचच्या उगाच वस्तू साठवून न ठेवता वापरून संपवून मोकळं होणारी सीताबाई सुसंस्कृत?

हल्ली नागपूरच्या दौर्‍यात "तुम्ही कसे आहात?" आणि परतीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी "कवा येणार?" असं मनापासून विचारणार्‍या सीताबाईची उणीव नेहमीच भासते. अशा या कुटुंबातल्या दिवंगत सदस्याला विनम्र अभिवादन.7 comments:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

पूर्वी असे संबंध बऱ्याच कुटुंबातून पहायला मिळत. आता जमाना मोलकरिणींची युनियन असण्याचा आहे. वेतनवाढ मिळते पण वैयक्तिक भावबंध विसरले जात आहेत. तुमचा लेख चांगला झाला आहे.

A woman from India said...

लेख छान जमला आहे. भिन्न आर्थिक पातळीवरील लोकांची आयुष्य आपल्या आयुष्याला छेद देऊन जातात ती परस्परांच्या गरजेतून. काम करणारी व्यक्ती रोज घरात वावरत असल्यानी अदृष्य नाते संबंध विणले जातात.
मी ही आमच्या येसाबाईवर एक लेख लिहीला होता पूर्वी.

Anonymous said...

prashant, You made me remember sitabai after ages and it made me so nostalgic.
Swati Dixit

आशा जोगळेकर said...

प्रशांत लेख खरंच भावनांना हात घालणारा आहे . अशा सीता बाई आता दिसणं कठिणच . खूप दिवसांनी आले ब्लॉग वर .

Prasad Manohar said...

are sitabai cha post vachala, it was done really nicely ...
keep it up !!!!!!!!!!!!!

Dinesh Gharat said...

अप्रतिम शिवाय शब्द सापडत नाही इतका मनाला भिडला. लेख वाचत असतांना आमच्या भुरकाबाईची आठवण झाली. भुरकाबाईला जावून बरेच वर्ष झालीत पण तीला विसरणे शक्य नाही.
असेच लिहीत रहा.
दिनेश.
http://www.sarvottam-marathi-vinod.blogspot.com

प्रशांत said...

फडणीस काका, कसंकाय, स्वातीताई, प्रसाद, आशाताई, दिनेश,

अभिप्रायांबद्दल तुम्हा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.