अव्याहत केले तू आम्हाला ज्ञानदान
देतसे सुगंध जैसे झिजूनिया चंदन
आज गुरुपौर्णिमा असे सोनियाचा दिन
मन हे झाले अधीर करण्या तव पूजन
मनोगत
नमस्कार मंडळी.
"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.
आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Sunday, July 29, 2007
Wednesday, July 25, 2007
सरल्या सरी वर्षेच्या
सरल्या सरी वर्षेच्या अन् लख्ख जाहले आकाश
पुन्हा नव्याने प्राची उजळे, पडला सूर्यप्रकाश
बागेमध्ये सुवासिक फुले रंगीबेरंगी फुलती
फुलपाखरे विहार आता स्वैरपणे त्यांवर करती
आकाशाची अथांग निळाई नयनांना नित तृप्त करी
नक्षी त्यावर करण्यासाठी पक्षी उडती अंबरी
कृष्णमेघ ते सरले आता मोद पसरला चोहिकडे
सोनेरी कोवळ्या उन्हाचा धरणीवर या वर्ख चढे

Tuesday, July 10, 2007
थांब पावसा, मला जाऊ दे घराकडे
मेघ दाटले नभात, तिमिर होई चहुकडे
थांब पावसा, मला जाऊ दे घराकडे
जाहला असे उशीर
मन हे झाले अधीर
पाहूनिया वाट माझी, बाळ माझे रडे
थांब पावसा, मला जाऊ दे घराकडे
बरसलास अविश्रांत
आता तरी होई शांत
बुडली पाण्यात वाट, पाऊलही अडखळे
थांब पावसा, मला जाऊ दे घराकडे
थांब पावसा, मला जाऊ दे घराकडे
जाहला असे उशीर
मन हे झाले अधीर
पाहूनिया वाट माझी, बाळ माझे रडे
थांब पावसा, मला जाऊ दे घराकडे
बरसलास अविश्रांत
आता तरी होई शांत
बुडली पाण्यात वाट, पाऊलही अडखळे
थांब पावसा, मला जाऊ दे घराकडे
Saturday, June 23, 2007
नवं कोरं
नुकतंच एन्.सी.एल्.मध्ये नवं कॅन्टीन सुरू झालं. बर्याच दिवसांपासून या नव्या कॅन्टीनबद्दल एन्.सी.एल्.च्या साइंटिफिक व नॉन्-साइंटिफिक स्टाफमध्ये चर्चा सुरू होती. अर्थात, बहुतांश लोक त्याबद्दल उत्सुक होते हे वेगळं सांगायला नको. तसं एन्.सी.एल्.मध्ये कॅन्टीन नव्हतं अशातला भाग नाही. पण, एकंदरीत तिथल्या सेवेचा दर्जा पाहिला की खाण्यापिण्याच्या बाबतीत आकर्षणापेक्षा अनासक्तीच निर्माण होत असे. वैज्ञानिक संशोधनात भारतात आघाडीवर असलेली ही प्रयोगशाळा तिच्या कर्मचार्यांच्या जेवणाखाण्याच्या बाबतीत मात्र संपूर्ण उदासीन! सरकारी कचेरीतलं "लोएस्ट कोटेशन"चं तत्व म्हटलं की आणखी काय अपेक्षा करणार?
पण, या नव्या कॅन्टीनचं तसं नाहीये. नवं कॅन्टीन दिवसभर सुरू राहणार असून रात्रीचं जेवणही तिथे उपलब्ध असल्यामुळे इथे कॉलनीत पेइंग गेस्ट म्हणून राहणार्या रिसर्चच्या विद्यार्थ्यांची खूप मोठी सोय झाली आहे. खाजगी पार्टीकडे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे चहापासून जेवणापर्यंत सगळ्याचा दर्जा उत्कृष्ठ आहे. एकंदरीतच स्वच्छता, नीटनेटकेपणा व टापटीप म्हणून गेल्या दोन-तीन दिवसांपासून या कॅन्टीनमध्ये लोकांनी गर्दी करायला सुरवात केली. काचेच्या भिंती असल्यामुळे कॅन्टीनच्या बाहेरची हिरवळ प्रसन्न करून जाते. त्यात पाऊस पडत असेल तर... क्या बात है! .... हातात चहाचा कप, समोर डिशमध्ये गरमगरम बटाटावडा .... दिवसभरातला कामाचा शीण कसा एका झटक्यात पळून जाईल! केवळ "खाण्यापिण्याची उत्तम सोय" म्हणून या घटनेला महत्त्वं नाहीये. दिवस-रात्र एक करून संशोधन करणार्या विद्यार्थ्यांना (विशेषत: बाहेरगावांहून आलेल्यांना) यापूर्वी जेवणासाठी बराच खर्च करूनही तडजोड करावी लागायची. जुन्या कॅन्टीनमध्ये दुपारचं जेवण ज्यांनी केलंय त्यांना हे विशेषत: जाणवेल. त्यांच्या कष्टाला न्याय मिळाला हे निश्चितच महत्त्वाचं आहे.
मी सध्या थिसिस जमा होऊन व्हायवाची वाट पाहणार्या व्यक्तींपैकी एक असल्यामुळे आवराआवर हेच सध्याचं माझं मुख्य काम आहे. लॅबमधल्या नव्या सदस्यांना मदत करणे, लॅबमधले प्रोग्रॅम्स, प्रोग्रॅमिंग स्ट्रॅटेजी, समजावून सांगणे इत्यादि गोष्टीही आहेतच. काल असंच एका ज्युनिअरला एक डेरिव्हेशन समजावण्यासाठी बसायचं होतं. रुचिपालट म्हणून आज नव्या कॅन्टीनमध्ये बसायचं ठरलं. दुपारची वेळ असल्यामुळे कॅन्टीनमध्ये गर्दी अजिबात नव्हती. चहा बनायला अजून वेळ होता. त्यामुळे त्या प्रसन्न वातावरणात मस्त काम झालं. खरंच! निसर्गाच्या सान्निध्यात चहा पितानाही महत्त्वाची कामं हसत खेळत होऊ शकतात! हे कॅन्टीन पूर्वीही असतं तर माझ्यासारख्या थिअरॉटिकल - कॉम्प्यूटेशनल केमेस्ट्रीच्या संशोधन-विद्यार्थ्यांनी त्याचा किती तरी उपयोग करून घेतला असता या विचारातून मला त्या ज्युनिअरचा हेवा वाटला. कामाविषयीची चर्चा झाल्यावर आम्ही दोघांनी चहा घेतला आणि बाहेर पडलो.
लॅबमध्ये परतताना जुन्या कॅन्टीनकडे लक्ष्य गेलं आणि अनेक विचार मनात आले. पूर्वी चहा-नाश्ता करण्याचं आमचं एकमेव ठिकाण असलेलं हे कॅन्टीन आज नव्या कॅन्टीनमुळे रिकामं रिकामं वाटतंय. तिथे अगदीच कुणी जात नाही असं नाही, पण नेहमीपेक्षा गर्दी कमी झाली आहे. काल तर त्या कॅन्टीनमध्ये व्हेज-कटलेट असूनही गर्दी कमी होती! व्हेज-कटलेट हा त्या कॅन्टीनमध्ये मिळणार्या चांगलं म्हणावं अशा काही निवडक पदार्थांपैकी एक होता. पूर्वी कॅन्टीनमध्ये उशिरा जाणारे व्हेज-कटलेटपासून वंचित असायचे, आणि काल, व्हेज-कटलेट लोकांपासून वंचित होतं! तिथला चहासुद्धा खूप चांगला नसला, तरी म्हणावा तेवढा वाईटही नसायचा. त्यामुळे, त्या कॅन्टीनची ही अवस्था पाहून थोडं दुःख झालं. पण, नव्या कॅन्टीनमुळे लोकांसाठी पर्याय उपलब्ध झाल्यामुळे "आता दोन्ही कॅन्टीन आपापल्या सेवेचा दर्जा उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करतील" अशी आशा करून कामाला लागलो.
नवीन कॅन्टीनच्या स्वागताला पावसाळाही सुरू झाला आहे. त्यानं कॅन्टीनचा परिसरच नव्हे, तर सर्वांची मनंही प्रसन्न केली आहेत. हा नवा पाऊस मला नेहमी बालपणात घेऊन जातो. उन्हाळ्याची सुटी संपून पुन्हा शाळा सुरु होते. शाळेतल्या मित्रांची पुन्हा नव्यानं भेट, नवीन वर्ग, नवीन बाक, नवीन वह्या-पुस्तकं, सगळं कसं नवं कोरं. नवीन सुरवात करायला हा पावसाळा दरवर्षी एक नवा उत्साह घेऊन येत असतो.
पण कालांतरानं सगळं सवयीचं होऊन जातं. वह्या-पुस्तकांचा कोरेपणा चार-पाच दिवसांतच नाहीसा होतो. रोजच्या गोष्टींमधलं नाविन्यही जाणवेनासं होतं. पावसातली प्रसन्नता संपते आणि मागे उरते फक्त चिखल. चौकांतले महात्म्यांचे पुतळे जसे रोजचे झाल्यामुळे दुर्लक्षित होतात तसं काहीसं होतं. खरंच, नव्या कॅन्टीनचं हे कौतुक किती दिवस राहील? कदाचित जुनं कॅन्टीन - नवं कॅन्टीन असे दोन्ही पर्याय लोक निवडू लागतील व जुन्या कॅन्टीनला पुन्हा थोडी उभारी येईल. किंवा लोकांनी पाठ फिरवल्यामुळे जुनं कॅन्टीन बंद पडेल व नवीन कॅन्टीन हाच भविष्यातला एकमेव पर्याय असेल. सवयीचं झाल्यावर नवीन कॅन्टीनचाही दर्जा खालावणार नाही असं खात्रीपूर्वक म्हणता येईल? कॅन्टीनचं काय किंवा आयुष्याचं काय? त्यातलं नाविन्य व कोरेपणा अबाधित ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असायला हवं. तरंच त्यात चहातला ताजेपणा व पावसाचा ओलावा टिकून राहणार.

Thursday, June 21, 2007
अर्थ एकाकीपणाचा
अर्थ एकाकीपणाचा दाव ना आतातरी
यासवे का चालणे मज वाट आता जीवनी?
सांग का मी दूर राहू, दूर तुझियावाचुनी
पोकळी सलते तुझी जी जाहलीसे मन्मनी
भावना खचल्या मनीच्या शब्दि व्यक्त करू कसे
प्रेमरक्ताळल्या नयनां शल्य त्यांचे ना दिसे
व्यथा ते मज सांगता हा श्वासही मग अडखळतसे
मजसवे तू चल जरा, मग रात्री या सरतीलही
स्वैर त्या अन् मुक्त होतिल, सूर्य नभ उजळेलही
"कामना तव पूर्ण होतील" ते मला जणु सांगती
चालते जीवन पुढे जणु अंत त्या नच सापडे
लोचने ही दगड होउनि छटा त्याच्या पाहती
ते न काही बोलती मजला परी न्याहाळती
ये कधी अपराधि भाव, कधी निरंतर प्रेमही
मजसवे आहेस ना तू, थांग ना लागे तरी

टीप: "बॅक स्ट्रीट बॉईज" या इंग्रजी गाण्यांच्या अल्बममधील "शो मी द मीनिंग ऑफ बीईंग लोनली" या गाण्याचा मला सुचलेला स्वैर अनुवाद. अर्थ लागण्याच्या दृष्टिकोणातून त्यात मला आवश्यक वाटलेले बदल केले आहेत.
यासवे का चालणे मज वाट आता जीवनी?
सांग का मी दूर राहू, दूर तुझियावाचुनी
पोकळी सलते तुझी जी जाहलीसे मन्मनी
भावना खचल्या मनीच्या शब्दि व्यक्त करू कसे
प्रेमरक्ताळल्या नयनां शल्य त्यांचे ना दिसे
व्यथा ते मज सांगता हा श्वासही मग अडखळतसे
मजसवे तू चल जरा, मग रात्री या सरतीलही
स्वैर त्या अन् मुक्त होतिल, सूर्य नभ उजळेलही
"कामना तव पूर्ण होतील" ते मला जणु सांगती
चालते जीवन पुढे जणु अंत त्या नच सापडे
लोचने ही दगड होउनि छटा त्याच्या पाहती
ते न काही बोलती मजला परी न्याहाळती
ये कधी अपराधि भाव, कधी निरंतर प्रेमही
मजसवे आहेस ना तू, थांग ना लागे तरी
"कामना तव पूर्ण होतील" ते मला जणु सांगती
Wednesday, June 6, 2007
वर्षेची चाहूल
Monday, May 14, 2007
सावली
कालच "सावली" हा मराठी चित्रपट पाहण्याचा योग आला. या चित्रपटाबद्दल अनेक लोकांकडून ऐकलं होतं. खरं तर हा चित्रपट बर्याच दिवसांपूर्वी चित्रपटगृहांत लागला होता. माझा पाहण्याचा योग इतका उशिरा आला, कारण आळस! आज जाऊ, उद्या जाऊ, करता करता कालचा रविवार उजाडला. काल बर्याच दिवसांनंतर मोकळा रविवारही होता, त्यामुळे चित्रपट पाहण्याचा निर्णय पक्का झाला.
स्वरांच्या रम्य प्रवासात या चित्रपटानं एक गंभीर विषय अत्यंत समर्थपणे हाताळला आहे. संगीताची तपश्चर्या करून लोकप्रिय, नव्हे - लोकमान्य झालेल्या कलाकाराचं अपत्य यात केंद्रस्थानी आहे. एखाद्या कीर्तिमान कलाकाराचं अपत्य जर त्या कलाकाराच्याच मार्गदर्शनाखाली मोठं होत असेल, तर लोक स्वाभाविकपणे या नव्या कलाकाराची तुलना त्याच्या गुरूशी करू लागतात. ही तुलना जरी गुरू-शिष्यांमध्ये असली, तरी या संदर्भात निसर्गत: असलेलं माता-कन्या हे नातं अधिक नाजुक व महत्त्वाचं आहे. माता गुरू असल्यामुळे आपली कन्या आपल्यासारखीच मोठी व्हावी या आईच्या भावनेला गुरूच्या ज्ञानाची जोड मिळते. त्यामुळे मायेच्या ओलाव्यापेक्षा गुरूचा कठोरपणाच वरचढ होतो. कलेत योग्य तर्हेने प्रगती होत असूनही मुलीच्या पाठीवर आईची शाबासकी मिळण्याऐवजी या शिष्याच्या वाट्याला गुरूची करडी नजरच येते. इतर समवयस्क गुरूभगिनींना मात्र आईचं प्रेम घरी मिळत असल्यामुळे गुरूचा कठोरपणा इतका जाणवत नाही. शिवाय गुरूचं अपत्य नसल्यामुळे अशी तुलनाही होत नाही. गुरूचं अपत्य असलेल्या या शिष्यावर या सर्वांचा परिणाम होऊन या कलेविषयी मनात एक प्रकारचा तिटकारा जन्म घेतो. हा शिष्य आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतो त्यावेळी गुरूला दुःख होणं स्वाभाविक आहे. पण शिष्याची प्रगती व्हावी हीच गुरूची इच्छा असल्यामुळे, बाहेरून कठोर झालेला गुरू आतून मात्र आपल्या शिष्य असलेल्या अपत्याच्या यशाने सुखावतो व मनातल्या मनात शिष्याला आशिर्वादही देतो.
शिवेन्दु अगरवाल यांची निर्मिती व रजेंद्र तालक यांचं दिग्दर्शन असलेल्या २००६ सालच्या या चित्रपटाची पटकथा प्रतिमा कुलकर्णी यांची आहे. रिमा लागू, अमृता सुभाष, प्रदीप वेलणकर, उर्मिला कानेटकर, स्वप्नील बांदोडकर व अमिता खोपकर हे मुख्य कलाकार आहेत. अशोक पत्की यांचं संगीत दिग्दर्शन, देवकी पंडित यांचा स्वर म्हटल्यावर स्वरांची मेजवानी असणार हे सांगावं लागलं तरंच नवल. शिवाय स्वप्नील बांदोडकर यांचाही पार्श्वगायनात सहभाग आहेच. आरती नायक व जानकी अय्यर यांनी गायलेल्या "सुरजन सो मिला .." या हमीर रागातल्या बंदिशीमुळे सुरवातीपासूनच एक वातावरण निर्मिती होते. आणि या स्वररूपी मंदिराचा सुवर्ण कळस म्हणजे आरती अंकलीकर-टिकेकर व सावनी शेंडे यांनी प्रस्तुत केलेल्या बंदिशी. बंदिशी ऐकताना मनातल्या मनात वाह वा! देत होतो. हा चित्रपट संपू नये असंच वाटत होतं. एका गंभीर विषयाचं इतकं सुरेल प्रस्तुतीकरण खरोखरच अविस्मरणीय आहे. उत्तम कलाकृती दिल्याबद्दल "सावली"च्या संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन.

Subscribe to:
Posts (Atom)