मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Thursday, February 1, 2007

निरोप

सासरी जाणार्‍या नवविवाहित मुलीला

मनी लागे हुरहुर मुली जाशी आज दूर
जाउनिया सासरी तू उभारशील संसार
अस्तित्वाने तुझ्या होवो आनंदित तुझे घर
"मुली सुखी हो" इतुका माहेरचा हा आहेर

-----------------------------------
शिक्षण/व्यवसाय इत्यादिंसाठी स्थलांतर करणार्‍या मित्राला/मैत्रिणीला

भैरवीत आजच्या, नांदी उद्याची,
मावळला रवी; उद्या उजळेल प्राची!
गरुडझेप घेउनी वाट चालावी यशाची;
सोबतीस शिदोरी जुन्या आठवणींची.

Sunday, January 7, 2007

शास्त्र आणि कला

दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अध्ययनाच्या दृष्टिकोणातून, ज्योतिषशास्त्राला "शास्त्र" म्हणून विद्यापीठांत मान्यता मिळावी किंवा मिळू नये, या विषयावर बरीच चर्चा झाली. त्यात दोन्ही बाजूंनी अनेक मान्यवरांचे विचार प्रकाशात आलेत. शेवटी ती मान्यता मिळाली नाही.

तसं पाहिलं, तर बहुतांश व्यक्तींचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असल्याचंच आढळेल. ज्योतिषशास्त्राला कटाक्षाने न मानणारे दुर्मीळच आहेत. दैनिक भविष्यावर अगदी विसंबून राहणारे कदाचित कमी असतील. पण कुतुहल म्हणून तरी अनेकजण वर्तमानपत्रातील भविष्य आवर्जून वाचतात. अर्थात, राशिभविष्यात काही अर्थ नसतो, त्यासाठी सूक्ष्म अभ्यास आवश्यक आहे असं अनेक नामवंत ज्योतिषी सांगतात. त्यातील अनेक ज्योतिषांनी अनेकदा आश्चर्यकारक अशी अचूक भविष्यं सांगितल्याचेही अनेक दाखले आहेत.

मग नेमका प्रश्न काय आहे? या कुतुहलापोटी, मी, ज्योतिषशास्त्रावरील काही पुस्तकं वाचायचा निर्णय घेतला. वाचन करता करता त्यातल्या अनेक गोष्टी आवडायलाही लागल्यात. उदाहरणार्थ, कुंडलीतील केवळ सूर्य व चंद्र या ग्रहांच्या स्थितीवरून महिना (मराठी), तिथी व वेळ यांचा सहज बोध होतो. त्यात गुरू, शनी, हर्शल, नेपच्युन, इत्यादि संथगती ग्रहांच्या राशिगत स्थितीवरून नेमके वर्षही कळू शकेल. असो. वाचनानंतर कळलं, की ज्योतिषशास्त्र हा एक अत्यंत व्यापक आणि तितकाच गुंतागुंतीचा विषय आहे. फार पूर्वीच त्यात खगोलशास्त्राचा अत्यंत सखोल अभ्यास झाल्याचं समजतं. केवळ सूर्यमालिकाच (Solar system) नव्हे, तर त्याही पलिकडली सविस्तर माहिती त्यात मिळते. त्यामुळे, ज्योतिषशास्त्रातील निदान हा भाग तरी जनसामान्यांपर्यंत पोहचावा असं राहून राहून वाटतं. "फलज्योतिष" हा या शास्त्राचा केवळ एक भाग आहे. त्यातही ग्रहांना राशींचं स्वामित्व देताना पूर्वीच्या ज्योतिषांनी बराच अभ्यास केल्याचं दिसतं. त्यात तर्कशास्त्राचा भागही आहेच.

ज्योतिषशास्त्राचे नवीन ग्रंथ वाचता वाचता सुप्रसिद्ध ज्योतिषी श्रीयुत् व. दा. भट यांचा "असे ग्रह अशा राशी" हा ग्रंथ हाती लागला. त्यात, प्रत्यक्ष अभ्यासाच्या दृष्टीने कुंडली कशी पहावी? याबद्दल उहापोह केला आहे. प्रत्येक कुंडलीसाठी ज्योतिषशास्त्राचे नियम जरी सारखेच असले, तरी ते अचूकपणे वापरणे ही एक कला आहे, असं लेखकानं त्यात म्हटलं आहे. (ज्योतिषशास्त्राबद्दल अधिकारवाणीने बोलण्याची माझी पात्रता नाही, त्यामुळे काही चुकलं असेल तर गुणिजनांनी कृपया क्षमा करावी.) पण या मुद्यावरून एक विचार चमकून गेला. कला म्हणून ज्योतिषशास्त्राकडे बघितलं तर..? "शास्त्र" या शब्दाऐवजी "कला" ही संज्ञा वापरणं कितपत योग्य आहे? इत्यादि. इत्यादि. विचारांचं चक्र सुरू झालं....

भारतात एकूण चौसष्ट कला प्रचलित होत्या, असं म्हटलं जातं. त्या सर्वांची नावं माहित नाही. पण, निदान आजच्या काळात त्यापैकी संगीत, नाट्य, चित्र, शिल्प, इत्यादि अनेक कला प्रचलित आहेत. [आधुनिक कलांमध्ये प्रचार (publicity) हीदेखील एक कला (??) आहे, व ती पासष्टावी नसून पहिल्या कलेलाही मागे सारणारी आहे असंही कुठल्याशा दिवाळी अंकात वाचल्याचं मला आठवतंय. असो.] प्रत्येक कलेचं एक शास्त्र आहेच. संगीताचंच पहा ना. रागातील वादी-संवादी स्वर, वर्ज्य स्वर, आरोह, अवरोह, न्यासस्वर, ताल, लय, यांच्या अभ्यासासाठी संगीतशास्त्राचे अनेक ग्रंथ आहेत. पण तास-दीडतास मैफलीत रंग भरणं, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणं, खिळवून ठेवणं, ही कला आहे. संगीतातच काय? प्रत्येक कलेतच शास्त्र आहे, नव्हे - प्रत्येक शास्त्रात कला आहे. रांगोळीत रंग भरण्याचं शास्त्र आहे. तरीही, रांगोळी काढणं एक कला आहे. अन्न शिजवण्यासाठी पाकशास्त्र आहे, त्यातही कला आहे. म्हणून, काही स्त्रियाच "सुगरण" असतात. मानवजन्मात धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी शास्त्र आहे. असं असलं, तरी जीवन जगणं ही कलाच आहे.

तात्पर्य, शास्त्र आणि कला या दोन वृत्ती आहेत. "फलज्योतिष" या विषयाकडे कलेच्या दृष्टिकोणातून पाहिले तर "ज्योतिषकला" नामक पासष्टावी (किंवा सहासष्टावी) कलासुद्धा लवकरच जनसामान्यात घर करू शकेल, असं वाटतं.


Monday, January 1, 2007

नव्या वर्षाचे स्वागत

दोन वर्षांचे मीलन, संगम जुन्या-नव्याचा;
साजरा करिती जन, क्षण हा आनंदाचा.

सरले जुने वर्ष, दिन कष्टाचे सरले;
नवे संवत्सर आता, भाग्य घेऊनिया आले.

नव्या वर्षाची चाहूल, नव्या आशा, स्वप्ने नवी;
वठलेल्या वृक्षा आता, फुटेल नवी पालवी.

नव्या वर्षाचा आरंभ, उगवला सूर्य नवा;
घेऊनि आकाशझेप, उडे पाखरांचा थवा.

नव्या वर्षाच्या स्वागता, शीळ घालितसे वारा;
आनंदोत्सवी नाहला, आज आसमंत सारा.

Sunday, December 24, 2006

त्या संगीतकलेने नटली अवघी ही सृष्टी

मी नागपुरला पं. प्रभाकरराव घारे यांच्याकडे व्हायोलिनवादन शिकत होतो, तेव्हा ही कविता मला सुचली होती. इ.स. १९९५-१९९७ हा त्या क्लासमधला सुवर्णकाळ होता. या काळात क्लासमधील जेष्ठ विद्यार्थ्यांनी "विद्यार्थी कृती समिती" स्थापन केली होती. दर महिन्यात एखद्या विद्यार्थ्याच्या घरी किंवा क्लासमध्ये संगीतसभा भरवून त्यात प्रत्येकानं आपल्या तयारीनुसार कला प्रस्तुत करायची हे या समितीचं उद्दिष्ट होतं. या विद्यार्थ्यांमध्ये रितु दवे नावाची माझी गुरुभगिनी होती. ती व्ययोलिन वाजवते, शिवाय उत्तम चित्रकारही आहे. तिच्या घरी एकदा गेलो असताना एक चित्र पाहिलं. ज्वालामुखीतून अग्नि बाहेर पडत असून त्यात एका गोलात तानपुरा, तबला, व्हायोलिन, इत्यादि वाद्ये होती. तिला विचारल्यावर याचा अर्थ समजला; व ही कविता सुचली.






नमन करुनि गणराया आणिक गुरूमाउलीला
सुस्वर ही स्वरसुमनांजलि अर्पुनि वागीश्वरीला
परब्रह्मकृत स्थिरचर सृष्टीस मनात वंदुनिया
तीन कलांच्या त्रिवेणीचा हा महायज्ञ केला.

सूर-ताल-लय यांची दिधली आहुती यज्ञात
सुरस स्वर आळविले तेव्हा यथान्याय सात
धुमसत त्या गेल्या स्वरधारा मिसळुनि गगनात
गुप्त होउनी विलीन झाल्या त्या त्रैलोक्यात!

स्वरधारा ठेविल्या विधीने तालबद्ध करुनी
प्रगट होउनी विश्वी ही लयकारी अवतरली
त्या लयकारीनेच एकदा नृत्यकला घडविली
तीन कलांची त्रिवेणी होउनि एकरूप झाली.

तीन कलांचा संगम तो देवांना पोहोचला
यज्ञाच्या ज्वालांद्वारे तो सर्वत्र पसरला
पसरता तदा विश्वी झाला काय चमत्कार
ब्रह्मांडातिल महाशक्तिचा झाला साक्षात्कार!!

प्रसन्न होउनि तदा भक्तिला देव तिथे प्रगटले
यज्ञातुन निज प्रसादरूपी अमृत हे दिधले
गीत-वाद्य-नृत्यादि कला या जिथे एकवटती
त्या संगीतकलेने नटली अवघी ही सृष्टी.

(९ ऑक्टोबर १९९७)

अमोल जीवनगाणे

विविधरंगी हे विविधरसांचे आहे जीवनगाणे!
कृष्णधवल कणभर क्षणांचे अमोल जीवनगाणे!!

कधी गायन सुखकमलांचे
मोहक मंजुळ स्वरमाधुरीचे
शिशिरातिल कोवळ्या उन्हाचे
सुवर्णक्षण हे घेऊनि आले अमोल जीवनगाणे!

कधी कहाणी या दुःखाची
अश्रु गळती करुण स्वरांनी
गूढ मनातिल काळोखाचे
कठोर क्षण हे घेऊनि आले अमोल जीवनगाणे!

क्षण आणुनिया सुखदुःखांचे
धवलकृष्ण कण जीवनगाणे
कधी आनंदी दिवस फुलविते
कधी दुःखात मनास रडविते
विविधतेतचि समाधान रे
म्हणोनि आहे हे सर्वांचे अमोल जीवनगाणे!


(सप्टेंबर १९९४)

Tuesday, December 19, 2006

वाहनयोग

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या संभाषण कौशल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी माझे व्हायोलिन क्लासचे गुरुबंधु डॉ. मुकुंद जोगळेकर (जोगळेकर काका) यांच्या घरी गेलो होतो. बोलता बोलता वाहनांचा आणि वाहतुकीचा विषय निघाला अणि मला सध्याच्या वाहनांवर व वाहतुकव्यवस्थेवर बोलण्याचं सांगण्यात आलं. भाषेचं बंधन नव्हतं, पण केवळ दहा मिनिटांत विचार करून बोलायचं होतं. तिथे मी पाच-सात मिनिटांसाठी समयस्फूर्त आणि स्वयंस्फूर्त बोललो. त्यानंतर त्यातले बरे-वाईट मुद्दे चर्चिले गेले व काही महत्वाच्या सूचनाही मिळाल्यात. त्यांचा फारच उपयोग झाला, आजही होतोय. माझ्या मनात, तेव्हापासून हा वाहनांचा विषय पुन:पुन्हा येत राहिला आणि प्रत्येकवेळी काहीतरी नवं सुचत गेलं. त्यामुळे, या विषयावर काहीतरी लिहावं असं मला वाटलं, म्हणून हा लेखनप्रपंच.

दळणवळणाच्या साधनांचा इतिहास चाळला तर मानवाच्या इतिहासाइतकाच तो प्राचीन असल्याचा प्रत्यय येतो. प्राचीन काळी जमिनीवरील प्रवासासाठी विविध प्राणी, पक्षी व प्राणीचालित वाहने असत. रामायणात विमानाचा उल्लेख मिळतो. जलप्रवासासाठी प्राचीन काळीही नौका वापरली जाई. याचा अर्थ, अगदी वैदिक काळापासून आपल्या भारतात वाहने अस्तित्वात होती. अगदी सुरवातीला, प्राण्यांचा वाहन म्हणून उपयोग होत असल्याचा उल्लेख हिंदूंच्या अनेक धार्मिक ग्रंथांत मिळतो. देवदेवतांनी विशिष्ट प्राण्यांवरून प्रवास करता करता जीवन जगण्यातील अनेक लहान-सहान तत्त्वे किती सहजपणे मांडली आहेत हे लक्ष्यात येतं. उदाहरणार्थ, आदिपूज्य गणपतीबाप्पांनी उंदीरासारख्या लहानशा प्राण्याला आपलं वाहन म्हणून निवडलं. कोणत्याही बाबतीत आपल्याहून लहान असणार्‍यांना कमी लेखू नये, त्यांच्याबद्दल मनात सदैव आदर असूं द्यावा हा यातून बोध होतो. त्याप्रमाणेच, शरीराने (किंवा ताकदीने) लहान असणार्‍यांनी न्यूनगंड बाळगू नये हा संदेशही मिळतो. वाग्देवी सरस्वतीने मोरासारख्या नयनरम्य पक्ष्याचं वाहन बनवलं. विद्वत्ता ही सौंदर्यावर आरूढ होते, कारण, आयुष्यातील खरे सौंदर्य अनुभवण्याचा दृष्टिकोण विद्वत्तेतूनच प्राप्त होऊ शकतो; हेच तर यातून सांगायचं नसेल? याखेरीज, विष्णुचे वाहन गरूड, इंद्राचा ऐरावत, इत्यादि अनेक संदर्भ धार्मिक ग्रंथांत मिळतात.

चक्राकार वस्तू हलवण्यास अगदी कमी कष्ट लागतात, हे सत्य त्या काळीच ज्ञात असावे. त्याशिवाय 'रथ' हे वाहन अस्तित्वात आलं नसतं. क्षत्रियाच्या पराक्रमानुसार त्याला 'रथी', 'महारथी', इत्यादि विशेषणांनी संबोधिले जाई. यावरून त्या काळातलं रथाचं महत्त्व स्पष्ट होतं. महाभारतात धर्मयुद्धात भगवंतांनी अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले. यातून, सारथी किंवा सारथीपुत्र यांना कमी दर्जाचे लेखू नये, हा अर्जुनाला संदेश आहेच. तसेच, कुणी 'सारथीपुत्र' म्हणून संबोधिल्यानं क्रोधित होण्याचं कारण नाही, हा संदेशही जाता जाता श्रीकृष्ण कर्णाला देऊन गेला.

एक किंवा अधिक घोड्यांच्या सहाय्याने रथ चालविला जाई. अनेक देवांचे तसेच योध्यांचे अनेक रथ लोकश्रुत आहेत. त्यात अर्जुनाचा पाच घोड्यांचा, कुंतीचा सहा घोड्यांचा, इत्यादि रथ लोकप्रिय असतील. त्याहूनही रुबाबदार असा कुठला रथ असेल, तर तो सूर्याचा. तब्बल सात घोड्यांनी युक्त असा हा रथ प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळाली तर डोळ्यांचं पारणं फिटेल यात शंका नाही. सूर्यरथावरून कुठलासा एक श्लोक, मी लहान असताना, अजोबांनी सांगितल्याचं आठवतंय. तो श्लोक या क्षणी आठवत नसला, तरी त्यात म्हटलेलं आठवतंय - "सूर्याच्या रथाला सात घोडे असून त्याचा सारथी पांगळा आहे. असं असूनही खंड न करता सूर्यदेव युगानुयुगे दररोज वेळेवर उदयास येतात व वेळेवर अस्ताला जातात." वेळेचं बंधन पाळावं हा विचार किती आकर्षकपणे कवीने त्या श्लोकातून मांडला आहे!

कावळ्यापासून राजहंसापर्यंतचे पक्षी पूर्वी संदेशवाहक म्हणून कामं करीत असल्याचेही अनेक संदर्भ आहेत. पण हे सगळं प्राचीन काळातील वाहनांचं झालं. रथाची प्रथा पुढे सरकत सरकत, बग्गी आली, टांगे आलेत. घोड्याऐवजी इतर प्राण्यांचा समावेश झाला, त्यात गावांतील भागात खेचर, गाढव, बैल, इत्यादि प्राण्यांचा वापर सुरु झाला, बैलगाडी आली; व वाळवंटांत उंटासारख्या रुबाबदार प्राण्याचा दळणवळणासाठी उपयोग होऊ लगला. नंतर यांत्रिक व तांत्रिक प्रगती होता होता सायकल, मोटारगाड्या, आगगाडी, विमान, जहाज, इत्यादि स्वयंचालित वाहनांचा शोध लागला. सार्वजनिक वाहनांप्रमाणेच वैयक्तिक वाहनांच्या विश्वातही वेगाने क्रांती झाली. त्यात मोपेड गाड्या, स्कूटर, मोटरसायकली आल्यात, कार आली, जीप आली. वाहनांची रेलचेल झाली, जग जवळ आलं.

वाहनांप्रमाणे जीवनातील इतर गोष्टींसाठीही अनेक सुखसुविधा आल्यात. पण या सर्व प्रगतीमुळे मनुष्य पांगळा होतोय असं वाटतं. फोन आल्यामुळे जग तर जवळ आलं, पण माणसं दुरावली. सुविधा वाढल्या, त्या सोबतीने स्पर्धाही फोफावली. फोनमुळे पत्रलेखन मागे पडलं, इंटरनेटमुळे वाचनसंस्कृती लोप पावत गेली. वाहनांमुळे चालणं कमी झालं, दूरचित्रवाणीमुळे मनोरंजनासाठी घराबाहेर पडणंही कमी झालं. कामाच्या ताणामुळे दैनंदिन व्यायामालाही वेळ उरला नाही. लोकांत मिसळणं कमी होत गेलं व मनुष्य एकलकोंडा होत गेला. अर्थातच, याचा परिणाम माणसाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होऊ लागला. बौद्धिक बाबतीत प्रगती केलेला मनुष्य पैशाने श्रीमंत झाला खरा, पण हे ऐश्वर्य उपभोगण्याची पात्रता हरवून बसला. मधुमेह, रक्तदाब, इत्यादि म्हातारपणीच्या मानल्या गेलेल्या व्याधी आता वयाच्या पंचविसाव्या, तीसाव्या वर्षी डोकवू लागल्या; हा या आधुनिक जीवनशैलीचा झालेला गंभीर परिणाम. कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात मनुष्याचं सरासरी आयुर्मान पंचवीस वर्षे असेल व वयाच्या सहाव्या वर्षी गर्भधारणेला सुरवात होईल, असा काहीसा मुद्गल पुराणात उल्लेख आहे. आधुनिक काळचा हा वाहनयोग त्याचीच नांदी तर नसेल?