मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Monday, May 14, 2007

सावली

कालच "सावली" हा मराठी चित्रपट पाहण्याचा योग आला. या चित्रपटाबद्दल अनेक लोकांकडून ऐकलं होतं. खरं तर हा चित्रपट बर्‍याच दिवसांपूर्वी चित्रपटगृहांत लागला होता. माझा पाहण्याचा योग इतका उशिरा आला, कारण आळस! आज जाऊ, उद्या जाऊ, करता करता कालचा रविवार उजाडला. काल बर्‍याच दिवसांनंतर मोकळा रविवारही होता, त्यामुळे चित्रपट पाहण्याचा निर्णय पक्का झाला.

स्वरांच्या रम्य प्रवासात या चित्रपटानं एक गंभीर विषय अत्यंत समर्थपणे हाताळला आहे. संगीताची तपश्चर्या करून लोकप्रिय, नव्हे - लोकमान्य झालेल्या कलाकाराचं अपत्य यात केंद्रस्थानी आहे. एखाद्या कीर्तिमान कलाकाराचं अपत्य जर त्या कलाकाराच्याच मार्गदर्शनाखाली मोठं होत असेल, तर लोक स्वाभाविकपणे या नव्या कलाकाराची तुलना त्याच्या गुरूशी करू लागतात. ही तुलना जरी गुरू-शिष्यांमध्ये असली, तरी या संदर्भात निसर्गत: असलेलं माता-कन्या हे नातं अधिक नाजुक व महत्त्वाचं आहे. माता गुरू असल्यामुळे आपली कन्या आपल्यासारखीच मोठी व्हावी या आईच्या भावनेला गुरूच्या ज्ञानाची जोड मिळते. त्यामुळे मायेच्या ओलाव्यापेक्षा गुरूचा कठोरपणाच वरचढ होतो. कलेत योग्य तर्‍हेने प्रगती होत असूनही मुलीच्या पाठीवर आईची शाबासकी मिळण्याऐवजी या शिष्याच्या वाट्याला गुरूची करडी नजरच येते. इतर समवयस्क गुरूभगिनींना मात्र आईचं प्रेम घरी मिळत असल्यामुळे गुरूचा कठोरपणा इतका जाणवत नाही. शिवाय गुरूचं अपत्य नसल्यामुळे अशी तुलनाही होत नाही. गुरूचं अपत्य असलेल्या या शिष्यावर या सर्वांचा परिणाम होऊन या कलेविषयी मनात एक प्रकारचा तिटकारा जन्म घेतो. हा शिष्य आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतो त्यावेळी गुरूला दुःख होणं स्वाभाविक आहे. पण शिष्याची प्रगती व्हावी हीच गुरूची इच्छा असल्यामुळे, बाहेरून कठोर झालेला गुरू आतून मात्र आपल्या शिष्य असलेल्या अपत्याच्या यशाने सुखावतो व मनातल्या मनात शिष्याला आशिर्वादही देतो.

शिवेन्दु अगरवाल यांची निर्मिती व रजेंद्र तालक यांचं दिग्दर्शन असलेल्या २००६ सालच्या या चित्रपटाची पटकथा प्रतिमा कुलकर्णी यांची आहे. रिमा लागू, अमृता सुभाष, प्रदीप वेलणकर, उर्मिला कानेटकर, स्वप्नील बांदोडकर व अमिता खोपकर हे मुख्य कलाकार आहेत. अशोक पत्की यांचं संगीत दिग्दर्शन, देवकी पंडित यांचा स्वर म्हटल्यावर स्वरांची मेजवानी असणार हे सांगावं लागलं तरंच नवल. शिवाय स्वप्नील बांदोडकर यांचाही पार्श्वगायनात सहभाग आहेच. आरती नायक व जानकी अय्यर यांनी गायलेल्या "सुरजन सो मिला .." या हमीर रागातल्या बंदिशीमुळे सुरवातीपासूनच एक वातावरण निर्मिती होते. आणि या स्वररूपी मंदिराचा सुवर्ण कळस म्हणजे आरती अंकलीकर-टिकेकर व सावनी शेंडे यांनी प्रस्तुत केलेल्या बंदिशी. बंदिशी ऐकताना मनातल्या मनात वाह वा! देत होतो. हा चित्रपट संपू नये असंच वाटत होतं. एका गंभीर विषयाचं इतकं सुरेल प्रस्तुतीकरण खरोखरच अविस्मरणीय आहे. उत्तम कलाकृती दिल्याबद्दल "सावली"च्या संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन.

Sunday, April 22, 2007

अनंत भुवन

आज बर्‍याच दिवसांनी ऑर्कुटचा समाचार घेतला तेव्हा स्क्रॅपबुकमध्ये सौरभचं "अनंत भुवन" कम्युनिटीत प्रवेश करण्याचं आमंत्रण दिसलं. "अनंत भुवन" नावाची कम्युनिटी सौरभमुळे ऑर्कुटवर अस्तित्वात आली हे पाहून अत्यंत आनंद झाला.

अनंत भुवन
टिकेकर रोड
धनतोली
नागपुर ४४००१२

हा चार ओळींचा पत्ता. इथेच मी लहानाचा मोठा झालो. या पत्त्यात माझ्याच नव्हे, तर अनंत भुवनातल्या सर्वांच्याच अनेक आठवणी दडल्या आहेत. सौरभचं आमंत्रण स्वीकारलं तेव्हा त्या सर्व आठवणी उचंबळून आल्यात. उत्स्फूर्तपणे त्या कवितेच्या रूपात प्रकटल्यात. ती कविता -




आठवांत जिच्या खोळंबले मन
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन

कितीदा वास्तूने ऐकली अंगाई
आणि लग्नांतील चौघडा सनई
पाहिल्या मुंजी, पाहिली उष्टावणं
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन

मित्रमंडळी अन् आप्त इष्ट सारे
वाड्यात कितींदा पाहुणचार झाले
झाली जिथे कितीतरी केळवणं
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन

दिन मास आणिक वर्षेही सरली
किती झाले दसरे आणि दीपावली
आणिक कोजागिरीची झाली जागरणं
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन

कोसळले कधी दुःख कुणाकडे
वाड्याचीच सार्‍या झोप तेव्हा उडे
थोर लहानांचे करिती सांत्वन
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन

कुणी कधी जर सापडले संकटात
मदतीचे त्वरित पुढे येती हात
कुठल्याकुठे संकट जाई ते पळून
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन

चर्चासत्रे क्रिकेट, राजकारणाची
विषयांना बंदी न कधी कशाची
सहभागी होती थोर अन् लहान
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन

कुणी प्रवासास चालला बाहेर
वडीलधार्‍यांना करी नमस्कार
देण्या निरोप भरे जेथे अंगण
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन

ही वास्तू साक्षात् आमुची जननी
मायेचा हात फिरवला अंगावरुनी
दिधला जिने आम्हाला स्वाभिमान
त्या वास्तूचे नाव अनंत भुवन






Friday, April 13, 2007

उषःकाल

मी शाळेत (हडस हायस्कूल, नागपुर) शिकत असताना शाळेच्या एका स्मरणिकेत प्रकाशनासाठी दिलेली कविता आज अचानक आठवली. ती इथे देत आहे.

प्रभातसमयी दिसले मजला निळे गगनमंडल,
त्यामध्ये दिसती काही ते शुभ्र पांढरे मेघ.

कसे केशरी जाहले हे पूर्वेकडिल नभ?
इंद्राने नेसले काय हे भरजरी पीतांबर?

सोनेरी दागिने घातले काय कुबेराने?
गगनमंडली प्रवास केला का या तेजाने?

उदयगिरीवर तेजस्वी हा भव्य सूर्य आला;
तळ्यामध्ये कमळ उमलले उषःकाल झाला!


(१९९१-१९९२)

Friday, March 23, 2007

लेखणीतली शाई

लेखणीतली शाई रसिका तुझ्याचसाठी
विचारसुमनांची ही मालिका तुझ्याचसाठी

नभोमंडली अखंड फिरती ग्रहनक्षत्रे
पुनवेचे हे टिपुर चांदणे तुझ्याचसाठी

ग्रीष्मातिल तव तृषार्त आणिक शिणलेले मन
प्रसन्न करण्या वाहे सरिता तुझ्याचसाठी

अहर्निश जरी कष्ट जीवनी असतिल मोठे
आनंदाचे मौल्यवान क्षण तुझ्याचसाठी

शब्द नव्हे, हे अमृत विधिच्या कमलदलातिल
श्रींच्या इच्छेने अवतरले तुझ्याचसाठी

Wednesday, March 14, 2007

सूर्यरथाचा श्लोक

या ब्लॉगमध्ये पूर्वी 'वाहनयोग' या माझ्या लेखात सूर्यरथाचा उल्लेख केला होता, त्यावेळी मला आजोबांनी शिकवलेला श्लोक आठवला नव्हता. काल बाबांनी तो लेख वाचला आणि तो श्लोक मला सांगितला -
-----
रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्तसुरग: ।
निरालम्बो मार्ग: चरणविकल: सारथिरपि ।
रविर्गच्छत्यन्तं प्रतिदिनमपारस्य नभसः ।
क्रियासिद्धिर्सत्वे भवति महतां नौपकरणे ।।
-----
अर्थ:
सूर्याच्या रथाला एक चाक सात आंधळे घोडे आहेत व सारथी पांगळा आहे. असं असूनही आकाशातलं अमर्याद अंतर खंड न करता सूर्यदेव दररोज पार करतात. तात्पर्य, कसोटीला उतरल्यामुळे थोर माणसांची कार्ये तडीस जातात, उपकरणांमुळे नव्हे!

-----



Tuesday, March 13, 2007

तू

लावण्य तू, सौंदर्य तू, विश्वास तू;
आयुष्यातिल अखंडित श्वास तू.

स्वर्गाच्या नगरीची आरास तू;
मोहरल्या कुसुमांत सुवास तू.

पौर्णिमेचे मोहक आकाश तू;
चंद्राचा मंद मंद प्रकाश तू.

अथांग सागरी लाटांची गाज तू;
किरणांचा सप्तरंगी साज तू.

वावरते सदा आसपास तू;
सत्य आहे की मनीचा भास तू?

Thursday, February 1, 2007

निरोप

सासरी जाणार्‍या नवविवाहित मुलीला

मनी लागे हुरहुर मुली जाशी आज दूर
जाउनिया सासरी तू उभारशील संसार
अस्तित्वाने तुझ्या होवो आनंदित तुझे घर
"मुली सुखी हो" इतुका माहेरचा हा आहेर

-----------------------------------
शिक्षण/व्यवसाय इत्यादिंसाठी स्थलांतर करणार्‍या मित्राला/मैत्रिणीला

भैरवीत आजच्या, नांदी उद्याची,
मावळला रवी; उद्या उजळेल प्राची!
गरुडझेप घेउनी वाट चालावी यशाची;
सोबतीस शिदोरी जुन्या आठवणींची.