मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Tuesday, June 23, 2009

दोन वाटा













वळणदार ही रम्य वाट, घनदाट तरू चहुकडे; दुभंगे जाता इथुनी पुढे
वाट एक त्यांतली ही, हिच्या दोबाजूंना लांब; पसरले पहा दिव्याचे खांब
दुसर्‍या वाटेवरी न पथिक न गाड्याही धावल्या; परि तिथे काटे आणिक कळ्या
दोन्ही वाटा अखेर मिळती एका रस्त्याला; जाई जो माझ्या गावाला

दुवा दिव्यांचा ह्या वाटेवर पांथिक बहु चालले; धरावी ही हे मी ठरविले
प्रवास इथला सुलभ, फक्त चालणे अखंडितपणे; आणि निजधामाला पोचणे
धरली त्याने वाट, जी न वहिवाट, चालला पुढे; फुलांचे जेथे पडले सडे
पाचोळा अन् काटेही पण वाटेवर त्याच्या; आणि ना दिशा ओळखीच्या

गावी मी पोचलो, जणू मिळवले सर्व सर्व; मला जाहला असा गर्व
स्वतःभोवती फिरत राहिलो, विसरलो जगाला; येइ अंधारी नयनांना
"तो न पोचला गावी अजुनी? फसला काट्यांत!"; गर्जलो मीऽ मदासक्त
"वहिवाटेवर तो न चालला, पोचला न गावी; न झाले कार्यही वेळेवरी"

अवचित आला एके दिवशी माझ्या गावाला; तो मला सहज भेटण्याला,
तो येता मी कुत्सित वदलो, "उशीर बहु झाला; तुजला गावी पोचण्याला!"
आणिक वदलो काहीबाही टाकुनि त्यां अतिउणे; परी ना लक्ष्य दिले त्याने
प्रेमे मग पाहुनी तयाने मंदस्मित केले; आणि मज वदला शांतपणे

"उशीर झाला मला खरोखर तुला भेटण्याला; मागतो क्षमा तयाची तुला
वाटेवर काटे होते, होती पण तेथे फुले; ज्यांमध्ये मन हे माझे झुले
तिथे एक वठलेले होते वृक्ष, तयापासुन; शिल्प मी घडवियले तासुन
शिल्पाच्या भोवती पसरले वन्यफुलांचे सडे; गंध त्यांचा पसरे चहुकडे

मी न निवडल्या चालण्यास त्या वाटा नित्याच्या; नि धरिला रस्ता काट्यांचा
परि उभारला जीव ओतुनी स्वर्ग मन्मनीचा; न वर्णवे आनंद तयाचा"

कुसुमाग्रजांची "कोलंबसाचे गर्वगीत" ही कविता वाचल्यापासून त्या वृत्तात कविता करून पाहण्याची इच्छा होती. मध्यंतरी रॉबर्ट फ़्रॉस्ट यांची "द रोड नॉट टेकन" ही कविता इंटरनेटवर वाचली. त्या कवितेतल्या पहिल्या ओळीत वनराईमध्ये दुभंगून रस्ते दूर जाण्याची कल्पना आवडली आणि ही कविता सुचली. या कवितेचा आशय मात्र, "द रोड नॉट टेकन"पासून पूर्णपणे निराळा आहे. काही ओळींमध्ये मात्रा थोड्या कमीजास्त झाल्या आहेत. तसेच, यमकांचा पॅटर्न मी थोडा बदलला आहे.

Wednesday, June 17, 2009

मराठीचा विकास - प्रतिशब्दांनी की शब्दांच्या मराठीकरणाने?

"मराठी वाचवा - कोणती?" या शीर्षकाचा निबंध शांता शेळके यांच्या "गुलाब काटे कळ्या" या पुस्तकात काही वर्षांपूर्वी वाचला होता. मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल आणि विकासाबद्दल आस्था असलेल्यांनी अवश्य वाचावा असाच निबंध होता तो. आज मराठी साहित्याच्या संगणकीय युगाचा उगम आणि विकास झाला असल्यामुळे त्याबद्दल लिहिणं अप्रस्तुत ठरणार नाही.

इंटरनेटवरील मराठी साहित्यासाठी व्यासपीठ निर्माण करणार्‍या मायबोली, मनोगत, उपक्रम, मिसळपाव व गुगल, याहू, वर्डप्रेसने ब्लॉगलेखनासाठी उपलब्ध करून दिलेली माध्यमं लोकप्रिय होऊन अनेक वर्षे झालीत. मी तसा या मराठी-ई-विश्वात फार नवीन नसलो, तरी फारसा जुनाही नाही. ब्लॉगलेखन वगळल्यास इतर ठिकाणी फारसा सक्रिय नाही. (मायबोलीवरील दोन वर्षाच्या काळात दोन हायकू, तीन प्रतिक्रिया आणि तीन सदस्यांची विचारपूस केल्याने कोणी मायबोलीकर होत नाही.) या काळात मराठी संकेतस्थळांवरची शितं वेचल्यावर "महाजाला"वरील भाताबद्दल जे ज्ञान झालं, ते शांता शेळके यांनी उपरोक्त निबंधात मांडलेल्या विचारांपेक्षा फारसं वेगळं नाही. "उद्घाटन"ऐवजी "विमोचन", "साजरा होणे"ऐवजी "संपन्न होणे", इत्यादि वाक्प्रचारांचा भडिमार होत असल्याबद्दल शांताबाईंनी त्यांच्या निबंधात चिंता व्यक्त केली होती.

इंटरनेटवरील इंग्रजी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द सुचवताना बर्‍याच प्रमाणात असं होतंय असं मला वाटतं. मराठीच्या नावाखाली संस्कृत शब्दांचा भडिमार होतोय. उदा. महाजाल, जालनिशी, इत्यादि. विरोप ह्या शब्दाचं मूळ मात्र समजलं नाही. हा शब्द शब्दबंधच्या सदस्यांच्या पत्रव्यवहारांअंतर्गत मीसुद्धा वापरला होता एकदा, पण मला तो पटला नव्हता. त्यापेक्षा "ई-पत्र" हा शब्द जास्त सुटसुटीत वाटतो. मायबोलीवरील "वीकांत" हा शब्द मात्र मनापासून आवडला. "वीक एंड" या इंग्रजी शब्दाला मराठीत कौशल्याने रुजवल्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. "वीकांत" हा धेडगुजरी शब्द वापरण्यापेक्षा "सप्ताहांत" हा शब्द जास्त सरस आहे असं काही दिवसांपूर्वी एका ब्लॉगर सदस्याने ई-पत्राद्वारे सुचवलं होतं, पण मी त्याकडे (सोयीस्करपणे ;) ) दुर्लक्ष्य केलं. "सप्ताहांत" शब्दात इंग्रजीचा अंश नसला, तरी "सप्ताह" आणि "अंत" या दोन्ही संस्कृत(च) शब्दांपासून निर्माण झालेला हा शब्द (संस्कृतभाषेत वापरायला चांगला असला तरी) मराठी भाषेला सगोत्र विवाहित दांपत्याच्या पोटी जन्मणार्‍या जनुकीय दोषयुक्त अपत्याप्रमाणे खिळखिळं करणारा वाटतो.

संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, पैशाची, अर्धमागधी, पाली या सहा मूळ भाषांपासून जन्मलेल्या व फार्सी, अरबी व इतर अनेक भाषांच्या संस्कारांनी बाळसं धरलेल्या मराठीला संस्कृत शब्द भविष्यात गिळणार की काय, अशी भीती वाटते. "संस्कृत ही भाषांची जननी आहे" किंवा भाषा गंगेच्या पाण्यासारखी निर्मळ, पवित्र असावी, वगैरे गोष्टी मलाही पटतात. पण, गंगा नदी गंगोत्रीतून उगम पावते, तिला पुढे असंख्य झरे सामील होतात आणि अशाप्रकारे वाढत वाढत ती सतत पुढे वाहत समुद्राला जाऊन मिळते म्हणून मोठी आणि पवित्र होते. मात्र, ती जर उलट्या दिशेनं गंगोत्रीकडे वाहू लागली, तर गंगोत्रीतच लोप पावेल. संतकवी दासगणू यांनी म्हटल्याप्रमाणे "ओहोळ पोटी घे गोदावरी | म्हणुनी म्हणती तीर्थ तिला ||" .

तात्पर्य, मराठी प्रतिशब्द शोधण्यात काहीच गैर नाही. पण मराठी प्रतिशब्दांपेक्षा जर इतर भाषांमधल्या शब्दांचं मराठीकरण करता आलं, तर ते मराठीच्या भव्यतेचं व समृद्धतेचं एक प्रतीक होईल. नाही का?

Sunday, May 10, 2009

प्रेम आईचे

शांत शीतल
चांदणे पुनवेचे
प्रेम आईचे

Friday, April 10, 2009

मन

मना होता बाधा | सहा विकारांची | ओढ ऐहिकाची | तया लागे ||१||

कामवासनेत | मन मग्न झाले | रसातळा गेले | तत्चारित्र्य ||२||

विनाशाची ओढ | मना लागे सत्य | क्रोधे ज्यास नित्य | व्यापियले ||३||

नश्वराचा लोभ | ग्रासतो मनास | नासते सुख़ास | मोहमाया ||४||

मन अहंकारी | मदात दंगले | मत्सरी रंगले | आत्ममग्न ||५||

चंचळ हे मन | प्रपंचास भाळे | एक त्यां सांभाळे | वक्रतुंड ||६||

मनास लागता | ओढ विकटाची | संपेल जीवाची | तगमग ||७||

मायाजालातूनी | जीव मुक्त व्हावा | म्हणोनी स्मरावा | एकदंत ||८||

Wednesday, April 8, 2009

लोपला स्वयंभू गंधार













तंबोर्‍याची तुटली तार
मैफलीत झाला अंधार
भैरवीविना सभा संपली
निमाला स्वरांचा दरबार
लोपला स्वयंभू गंधार

सुरेल गाणे रंगी रंगले
मंत्रमुग्ध रसिकांना केले
आज अचानक मात्र थांबला
कशास तारांचा झंकार?
लोपला स्वयंभू गंधार

सूर लोपले ताल थांबला
स्थायीतच अंतराही शमला
आलापांचा अन् तानांचा
आज का कुंठला विस्तार?
लोपला स्वयंभू गंधार

Sunday, March 15, 2009

धार्मिक कृत्ये व पंचांग - भाग ४: गुढीपाडवा

मराठी, हिंदी, पंजाबी, कन्नड व तेलगु भाषीय हिंदू चैत्र महिन्याच्या शुक्लपक्षापासून नववर्षाचा प्रारंभ* मानतात. हिंदू कालगणनेमध्ये महिन्यांची नावं ठरवताना सूर्य-चंद्रांच्या निरयन राशींना फार महत्त्व आहे. अमावस्या म्हणजे सूर्य-चंद्र युतियोग. अमावस्येच्या प्रारंभी या ग्रहांमधील पूर्व-पश्चिम अंशात्मक अंतर बारा अंशांइतकं असतं व ते शून्य अंश होतं, त्यावेळी अमावस्या संपून प्रतिपदा तिथी सुरू होते. ही युती मीन राशीतून झाल्यावर येणार्‍या प्रतिपदेपासून चैत्र महिना सुरू होतो. याच दिवसापासून नव्या शालिवाहन शकाचा प्रारंभ होतो.

सध्या १९३०वे शालिवाहन शक सुरू असून "सर्वधारी" असं त्याचं नाव आहे. १९३१व्या शालिवाहन शकाचं नाव "विरोधी" असेल. (संवत्सरांची एकूण ६० नावे असून त्याबद्दल कृ.वि.सोमण यांच्या सुलभ ज्योतिषशास्त्र या ग्रंथात सविस्तर माहिती दिली आहे.) या दोन्ही वर्षांच्या दाते पंचांगांमध्ये सांगितल्यानुसार भारतात दि. २७ मार्च २००९ रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा येत असल्यामुळे त्या दिवशी तैलाभ्यंग, ध्वजारोपण, कडुनिंबाच्या पानांचं भक्षण इत्यादि गुढीपाडव्याशी निगडित गोष्टी केल्या जातील.
"महाभारत - काही नवीन विचार" या ब्लॉगवर फडणीसकाकांनी एका स्फुट प्रकरणात गुढीपाडव्याशी निगडित एका गोष्टीबद्दल आकर्षक माहिती दिली आहे, ती इथे अवश्य वाचा.

सुलभ ज्योतिषशास्त्र हा ग्रंथ व कालनिर्णयची ऑनलाईन आवृत्ती यांच्या सहाय्याने, अमेरिकेत गुढीपाडवा केव्हा साजरा होईल, हे आता पाहू. सुलभ ज्योतिषशास्त्रात सांगितल्यानुसार वर्षारंभासाठी चैत्र शुक्ल प्रतिपदा सूर्योदयव्यापिनी असावी. दोन दिवस सूर्योदय व्यापिनी असल्यास किंवा प्रतिपदेचा क्षय झाला असल्यास (प्रतिपदेचा क्षय म्हणजे सूर्योदयानंतर प्रतिपदा सुरू होऊन पुढल्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वीच द्वितीया प्रारंभ होणे.) पहिल्या दिवशीची तिथी घ्यावी, अन्यथा, दुसर्‍या दिवशीची तिथी वर्षारंभासाठी गृहित धरावी. कालनिर्णयच्या ऑनलाईन आवृत्तीनुसार न्युयॉर्क, शिकागो, व सॅन फ़्रॅन्सिस्को या शहरांमध्ये गुरुवार दि. २६ मार्च २००९ सूर्योदयानंतर काही तासांनी प्रतिपदा प्रारंभ होत असून, २७ तारखेला सूर्योदयानंतर काही वेळाने ती संपते आहे. याचाच अर्थ, सूर्योदयव्यापिनी प्रतिपदा या तिन्ही ठिकाणी २७ तारखेलाच आहे. त्यामुळे या भागांमध्ये नववर्षप्रारंभ २७ तारखेला नववर्षप्रारंभ मानावा.

सूर्योदयास्ताच्या वेळा अक्षांश-रेखांशानुसार बदलत असल्या, तरी, तिथी बदलण्याची वेळ एकच असल्यामुळे प्रतिपदा संपण्याच्या वेळा केवळ टाईमझोन बदलल्यामुळे भिन्न अंक आहेत हे कालनिर्णय पाहिल्यास सहज लक्ष्यात येईल. अलास्का व हवाई बेटांमध्ये मात्र, पॅसिफ़िक वेळेपेक्षा सूर्योदय ढोबळमानाने अनुक्रमे एक व दोन तासांनी उशीरा होत असल्यामुळे गणित थोडं किचकट आहे. हवाईमध्ये सूर्योदयापूर्वीच प्रतिपदा संपेल हे निश्चित असल्यामुळे तिथे २६ तारखेला वर्षारंभ मानावा लागेल. परंतु, अलास्कामध्ये २७ तारखेला स्पष्ट सूर्योदय जर तिथल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ६:०५ च्या आधी होणार असेल, तर अमेरिका मेनलँडप्रमाणे, अन्यथा हवाई बेटांप्रमाणे वर्षारंभ मानावा लागेल. एवढ्या खोलात शिरायचं नसल्यास, अलास्कामध्ये बहुतांश प्रतिपदा २६ तारखेला असल्यामुळे, त्या दिवशी गुढीपाडवा साजरा करणं जास्त योग्य होईल, असं वाटतं.


*गुजराथमध्ये बलिप्रतिपदेपासून वर्षारंभ मानतात (गुजराथी व जैन संवत् बलिप्रतिपदेला सुरू होतात), पश्चिमबंगालमध्ये वैशाख महिन्यापासून (बैसाखी) वर्षारंभ मानतात, तर तामीळनाडूमध्ये सौरमानाप्रमाणे वर्षारंभ मानतात, असं या प्रांतातल्या माझ्या ओळखीतल्या व्यक्तींकडून कळलं, पण त्याबद्दल सविस्तर माहिती नाही.चांद्र-सौरमानाने वर्षारंभ मानणार्‍या प्रांतांत (तामीळ नाडू सोडून इतर प्रांतात) वर्षारंभ वेगवेगळ्या वेळी मानत असले, तरी इतर सर्व सण, एकाच वेळी साजरे होतात. उदा. दिवाळी सर्वत्र एकाच वेळी साजरी होते - गुजराथी व मारवाडी लोक बलिप्रतिपदेला वर्षारंभ मानतात, एवढाच फरक. तसेच, पौर्णिमांत मासपद्धतीनुसार होळीपौर्णिमेनंतरच्या दिवसापासून वर्षारंभ मानतात असंही कुठेसं वाचलं आहे, पण महिन्यांची नावं कशी ठरतात, ते माहिती नाही. जाणकारांनी माझ्या ज्ञानात भर घालावी ही विनंती.



भाग ४ चे संदर्भ:

१. श्री. कृ. वि. सोमण - सुलभ ज्योतिषशास्त्र
२. दाते पंचाग (शालिवाहन शक १९३०-३१ - सर्वधारीनाम/विरोधीनाम संवत्सर)
३. http://kalnirnay.com/

Wednesday, February 18, 2009

धार्मिक कृत्ये व पंचांग - भाग ३: महाशिवरात्री

माघ महिन्यात कृष्णपक्षातल्या चतूर्दशीच्या दिवशी शिवपूजन केलं जातं. सृष्टीच्या प्रारंभी याच तिथीला मध्यरात्री ब्रह्मातून शंकराचा रुद्रावतार सुरू होऊन प्रलयाचे वेळी याच तिथीला मध्यरात्री शंकर भगवान ब्रह्मांडाचा संहार करतात असं मानलं जातं. शंकर भगवानांशी व मध्यरात्रीशी निगडित असलेल्या या तिथीला 'महाशिवरात्री' म्हणतात. कृ.वि. सोमण यांनी सुलभ ज्योतिषशास्त्र या ग्रंथात सांगितल्यानुसार महाशिवरात्रीसाठी चतूर्दशी 'निशीथकालव्यापिनी' असावी. [रात्रकालाचे म्हणजे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या वेळेचे समान पंधरा भाग केल्यास आठव्या (मधल्या) भागाला 'निशीथकाल' म्हणतात.] सोमणशास्त्रींनी पुढे सांगितल्याप्रमाणे -
१. दोन दिवस अर्धरात्रव्यापिनी चतूर्दशी असल्यास
२. दोन्ही दिवस अर्धरात्रव्यापिनी नसल्यास
३. पहिल्या दिवशी अंशतः निशीथकालव्यापिनी व दुसर्‍या दिवशी पूर्णतः निशीथकालव्यापिनी असल्यास
दुसर्‍या दिवशी शिवपूजन करावं. परंतु, पहिल्या दिवशी पूर्णतःनिशीथकालव्यापिनी चतूर्दशी असून दुसर्‍या दिवशी ती अंशतः निशीथकालव्यापिनी असल्यास पहिल्या दिवशी शिवपूजन करावं.
भारतात यंदा सोमवार दि. २३ फेब्रुवारी २००९ रोजी महाशिवरात्री असल्याचं पंचांगात दिलं आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार माघ वद्य चतूर्दशी सोमवारी पहाटे ४:२४ वाजता (पंचांगातील 'वार' हे अंग सूर्योदयापासून सुरू होत असल्यामुळे पंचांगाच्या दृष्टीकोणातून पाहिल्यास रविवारी २८ :२४ वाजता - व्यवहारातल्या सोमवारी सूर्योदयापूर्वीचा काळ रविवारचा मानला जातो) सुरू होत असून ती मंगळवारी सकाळी ६:०० वाजता (पंचांगानुसार सोमवारी ३०:०० वाजता) संपते. निशीथकाल सोमवारच्या मध्यरात्री १२:२७ पासून १:१७ वाजेपर्यंत आहे असं दाते पंचांगात सांगितलं आहे.

अमेरिकेत न्यूयॉर्क, शिकागो व सॅनफ़्रॅन्सिस्को या तीन शहरांचे सूर्योदयास्त व चतूर्दशी तिथीचे प्रारंभ व शेवट कालनिर्णयच्या इंटरनेट आवृत्तीमध्ये दिले आहेत. त्यानुसार, या तीन शहरांमध्ये चतूर्दशीप्रारंभ रविवार दि. २२ रोजी अनुक्रमे सायं ५:५३, सायं. ४:५३ व दुपारी २:५३ वाजता होत असून ही तिथी रविवारी अनुक्रमे सकाळी ७:३०वाजता, सकाळी (पहाटे) ६:३० वाजता व पहाटे ४:३० वाजता संपते. सोमवारी या शहरांमध्ये सूर्योदय अनुक्रमे (सकाळी) ६:४० वाजता, ६:३०वाजता व ६:५० वाजता होत आहेत. याचा अर्थ, पंचांगाच्या परिभाषेनुसार केवळ न्यूयॉर्कमध्ये सोमवारी काही वेळ चतूर्दशी आहे व ती सूर्यास्तापूर्वीच संपत असल्यामुळे सोमवारी अर्धरात्रव्यापिनी नाही. या तीन शहरांमधल्या रविवारी सूर्यास्त अनुक्रमे (सायं) ५:३९ वाजता, ५:३२ वाजता व ५:५६ वाजता होत आहेत. शिकागो व सॅनफ़्रॅन्सिस्को या शहरांमध्ये (व मधल्या सर्व भागामध्ये) केवळ रविवारीच चतूर्दशी असल्यामुळे महाशिवरात्री निसंदिग्धपणे रविवारी साजरी करावी. न्यूयॉर्कमध्ये सोमवारी काही काहीवेळ चतूर्दशी व अर्धरात्रव्यापिनी नसल्यामुळे रविवारी निशीथकालव्यापिनी असणं-नसणं याला महत्त्व आहे. रविवार-सूर्यास्त व सोमवार-सूर्योदय यांच्या वेळांवरून न्यूयॉर्कमध्ये चतूर्दशी तिथी रविवारी निश्चित निशीथकालव्यापिनी आहे हे सहज लक्ष्यात येतं. त्यामुळे न्यूयॉर्कमध्येसुद्धा रविवारीच महाशिवरात्री साजरी होईल. याचाच अर्थ, अमेरिकेत सर्व ठिकाणी रविवारीच महाशिवरात्री साजरी करणं योग्य होईल. वरील तीन शहरांच्या सूर्यास्त-सूर्योदय वेळांवरून निशीथकाल सहज काढता येईल. न्यूयॉर्क, शिकागो व सॅनफ़्रॅन्सिस्कोमध्ये साधारणतः हा काळ अनुक्रमे (रविवार मध्यरात्री) ११:४३-१२:३६, ११:३८-१२:३० व ११:५७-१२:४९ असा राहील.

भाग ३ चे संदर्भ:

१. श्री. कृ. वि. सोमण - सुलभ ज्योतिषशास्त्र
२. दाते पंचाग (शालिवाहन शक १९३० - सर्वधारीनाम संवत्सर)
३. http://kalnirnay.com/
४. विकिपिडिया