मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Tuesday, May 27, 2008

निसर्ग, मन, सुटीचा दिवस आणि आळस

निळ्याभोर नवलाईने पानोपान बहरली झाडे
घालित वाटेवर पायघड्या पडले कुसुमांचे सडे

अंगावर ग्रीष्मात ऊन पडता ही वसुंधरा तापे
लाल, धवल, पिवळ्या, गुलाबी रंगांनी परी नटली रोपे

मध्येच कधी येऊन जाई हळूच एक पावसाची सर
पुन्हा होई आकाश मोकळे पुन्हा पडे ऊन प्रखर

असेच रम्य वातावरण घेऊन आला एक सुटीचा दिवस
भटकंती वाटे करावी, पहावा निसर्ग, फिरावे सहज

क्षणैक होई विचार ऐसा परी मन देई प्रचंड आळस
"शांतपणे बैस घरातच" म्हणे, "कशाला तो उन्हाचा प्रवास?

निसर्ग तो का पळून जाई? होते की दर्शन प्रतिदिन!
गंध फुलांचा दरवळे तोच, काय आज त्यामध्ये नवीन?

नाही आज कामावर जाणे, निवांत मग घ्यावी झोप
रंगीबेरंगी फुलांची स्वप्नातच पहावी महिरप"

Wednesday, May 21, 2008

वीकांतातला बोनस

काही काही गोष्टी अपघातानेच आयुष्यात घडत असतात. नाही का? बर्‍याचदा आपण एखादं काम हाती घेतो किंवा एखादी वस्तू मिळवण्याच्या मागे लागतो तेव्हा आपण अपेक्षा करतो एक आणि होतं भलतंच. थोडक्यात सांगायचं तर आपले अंदाज चुकतात. चुकतात म्हणजे ते काम अजिबात होतच नाही किंवा ती वस्तू मिळतच नाही असंच मात्र नाही. एखादी वस्तू शोधता शोधता आपण कल्पनाही केली नसेल असं काही तरी आपल्याला सापडतं आणि ते अनपेक्षित असल्यामुळॆ "बोनस" मिळाल्यासारखं वाटतं. असंच काहीसं मध्यंतरी माझ्या दैनंदिन आयुष्यात झालं.

"अल्मंड बटर"बद्दल ऐकल्यापासून तो काय प्रकार आहे हे पाहण्याची इच्छा झाली होती. इथे घराजवळच्या दुकानांमध्ये बराच शोध घेतला. तिथे पीनट-बटर, अल्मंड-मिल्क इत्यादि प्रकार सापडलेत पण अल्मंड बटर सापडे ना. व्हिगन स्टोअरमध्ये अल्मंड बटर हमखास मिळेल असं वाटल्याने इंटरनेटवर व्हिगन स्टोअर्स शोधून काढलीत. त्यात लॉस एन्जेलिस् डाऊनटाऊनमधला एक पत्ता शोधत निघालो. ते दुकान सापडलं, पण अल्मंड-बटर काही मिळालं नाही. पण या भटकंतीमुळे अलिबाबाची गुहा सापडावी तसं झालं आणि डाऊनटाऊनमधलं ग्रँड सेंट्रल मार्केट सापडलं.

हे मार्केट १९१७ सालापासून म्हणजे तब्बल ९१ वर्षांपासून अस्तित्वात आहे, तेव्हा त्याला लॉस एन्जेलिसचा "सांस्कृतिक ठेवा" म्हटलं तर वावगं ठरू नये. मेट्रो रेड लाईन लोकलच्या पेर्शिंग स्क्वेअर स्टेशनपासून उत्तरेकडे अगदी पायी चालण्याच्या अंतरावर असलेल्या या बाजारात हिल स्ट्रीट व ब्रॉडवे या दोन्ही रस्त्यांवरून जाता येतं. या बाजाराचं वैशिष्ठ्य असं, की तो "शॉपिंग मॉल" नाही. भाज्या, फळांची दुकानं अगदी भारतातल्या मंडईची आठवण करून देतात. विविध प्रकारची धान्ये, मसाले, इत्यादींची स्वतंत्र दुकानं तिथे आहेत. तसंच बेसमेंटमध्ये गृहोपयोगी वस्तुभंडार आहे. एवढंच नव्हे, तर खाण्यापिण्याची सोयसुद्धा आहे. चायनीज, मंगोलियन, जपानी, मेक्सिकन, इत्यादि विविध प्रकारच्या पदार्थांचे स्वतंत्र स्टॉल्स जत्रेची आठवण करून देतात. ताज्या फळांचे रस (रासायनिक किंवा इतर कुठलीही प्रक्रिया न केलेले) उत्तम मिळतात.

मला सर्वात जास्त आनंद झाला तो या बाजारात मिळणार्‍या कोथिंबिरीमुळे. स्वयंपाकात कोथिंबीर वापरल्याचं जाणवेल असा मस्त स्वाद त्या कोथिंबिरीला असल्यामुळे घराजवळच्या दुकानांमधून कोथिंबिरीसारखं दिसणारं गवत आता अजिबात विकत घेत नाही. कोथिंबीरच नव्हे; सर्वच भाज्या अगदी ताज्या मिळतात. लहान आकारातले कांदे, बटाटे, लिंबू - सगळंकाही ताजं, प्रक्रिया विरहित व त्यामुळे स्वस्त आणि मस्त. खरंतर फार्मर्स मार्केटमध्येही अशा भाज्या मिळातात, पण तिथे अशी मजा नाही. तिखट, तमालपत्र, काळी मिरी इत्यादि मसाले; तसेच राजमा, वाटाणे, चणे, इत्यादि पदार्थही तिथे मिळतात. हे पदार्थ भारतीय दुकानांमध्येही मिळत असले, तरी ग्रँड सेंट्रल मार्केटमध्ये जाऊन ते पदार्थ विकत घेण्यात एक वेगळीच मजा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इथे क्रेडिट/डेबिट कार्ड चालत नाही. रोख रक्कमच स्वीकारली जाते.

प्रत्येक गावाचं एक वैशिष्ठ्य असतं. लोक लॉस् एन्जेलिस् मध्ये युनिव्हर्सल सिटी, गेटी विला किंवा अनेक लोकांनी भेट दिल्यामुळे प्रसिद्धीस आलेली इतर प्रेक्षणीय स्थळं पाहायला येतात. पण सांस्कृतिक ठेवा असलेला हा बाजार खरोखर पाहण्यासारखा आहे.

असो. तर, या बाजाराविषयी माहिती मिळाल्यापासून आठवडाभराची भाजी आणायच्या निमित्ताने त्या पुरातन वास्तूचं दर्शन घेणे हा माझा सध्याचा वीकांतातला मुख्य उद्योग बनलाय. एकंदरीत, वीकांतातला हा बोनस फारच उपयुक्त ठरलाय.


विशेष सूचना: "वीकांत" हा शब्द मी प्रथम सुमेधाकडून ऐकला व तो आवडल्यामुळॆ तत्परतेने वापरू लागलो. :)

Saturday, April 19, 2008

सीताबाई

सीताबाई कुंभरे म्हणजे पूर्वी आमच्या घरची मोलकरीण. पूर्वी, म्हणजे अगदी माझ्या जन्माच्याही आधीपासून, ती आमच्या घरी - खरं तर अनंत भुवनमधल्या सगळ्या बिर्‍हाडांमध्ये धुण्या-भांड्यांपासून दळण आणण्यापर्यंत सगळी कामं करायची. मी लहान असताना सीताबाईनी मला कडेवरही घेतलं असेल! असेल कशाला? घेतलं होतंच की! तसा फोटोही होता एक. महिन्याच्या पगाराबरोबर दुपारचं जेवण, चहा आणि काही अन्न उरलं असल्यास रात्रीचं जेवण तसंच अधुनमधुन कोणाकडून नऊवारी साडी-चोळी (जुनं किंवा नवं) हे तिचे अलाऊअन्सेस. लग्न-मुंजीच्या वेळी मात्र नेहमीच्या तुलनेत भारी कपडेलत्ते मिळत.

घरातला अविभाज्य सदस्य असलेल्या सीताबाईला एकेरी हाक मारण्यामध्ये मालक-नोकर संबंधापेक्षा आपुलकीच कारणीभूत होती. तशी ती वयानं खूपच मोठी होती. तिच्या जन्माबद्दल विचारल्यावर "कांग्रेस भरला होता तंवाचा जन्म" असं थाटात सांगायची. त्या काळच्या बहुतांश मोलकरीणींप्रमाणे तीही निरक्षर होती. सीताबाईला साक्षर करण्याचे प्रयत्न अजिबात झाले नाहीत असं नाही. दुपारच्या चहाच्या वेळी खडू घेऊन फरशीवर तिचं नांव लिहून तिच्याकडून गिरवून घेण्याचे अनेक प्रयत्न आमच्या आजीने अधुन-मधुन केलेत. पण काही उपयोग झाला नाही. एकही अक्षर कळत नसलं, तरी तिला तिचा पगार माहित होता. मी लहान असल्यामुळे तिच्या पगाराचा आणि माझा काडीमात्र संबंध नव्हता, पण कोणे एके काळी तो दरमहा रु. ७० होता हे नक्की. नीट लक्ष्यात नाही, पण कोणीतरी तिची परीक्षा घेण्यासाठी पगार किती म्हणून विचारलं असताना "वीस अधिक पन्नास" असं काहीसं ती बोलल्याचं आठवतंय. हे "वीस अधिक पन्नास" म्हणजे पैसा मोजण्याची सीताबाई स्पेशल पद्धत. सीताबाई निरक्षर असूनही हिचं काहीच कसं अडत नाही याचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं.

पुसटसं आठवतंय. घरात लोखंडी पलंग आल्यापासून लाकडी खाट धूळ खात पडून होती. ती खाट सीताबाईला देण्यात आली तेव्हा तिला खूप आनंद झाला होता. काही दिवसांनी आजीने तिला विचारलं, "खाट वापरतेस की नाही?" त्यावर ती उत्तरली, "घरात खाट ठेवायले जागा कुटं हाय?" "मग कुठे ठेवलीस खाट?" - आजी. "जळणाला वापरली." - सीताबाई. खाटेचा हा उपयोग आमच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचा असल्यामुळे आम्ही कपाळाला हात लावला.

सीताबाईचं लग्न झालं होतं पण नवरा वारला किंवा नवर्‍याने तिला टाकून दिलं असं काहीतरी होतं. त्यामुळे ती वडिलांबरोबरच राहत असे. तिची आई पूर्वी अनंत भुवनमध्ये कामाला होती, ती वारल्यावर सीताबाई येऊ लागली हे मला आजीकडून कळलं. एकदा सीताबाईचं तिच्या वस्तीतल्या कुणाशी तरी भांडण झालं - इति सीताबाई. नक्की काय झालं कुणास ठाऊक, पण तेव्हापासून तिला त्या व्यक्तीचे भास होत व ती मोठमोठ्यानं शिव्या देऊ लागली. सीताबाईच्या या शिव्यांमुळे अनेक बिर्‍हाडांकडील तिची नोकरी सुटली. तिच्या शिव्यांचा खरंतर आम्हालाही त्रास व्हायचा पण तिच्या पोटा-पाण्याचा प्रश्न असल्यामुळे आजीने तिला कामावर राहू दिलं.

सीताबाईचे वडील वारले तो दिवस आठवतोय. ती संध्याकाळी रडत रडत ही बातमी द्यायला स्वत: आली होती. तेव्हा तिची अवस्था पाहून खूप अस्वस्थ वाटलं होतं. त्या दिवशी कुणाकडे तरी लग्नाच्या रिसेप्शनला जायचं होतं. रिसेप्शनमध्ये सतत सीताबाईचा शोकाकुल चेहरा आठवत होता. वडिलांच्या निधनानंतर ती भावाकडे राहू लागली. तिचा भाऊ रिक्षाचालक(सायकल रिक्षा) होता. दारू पिऊन पिऊन तोही संपला. नंतर भावजयेला तिची अडचण होऊ लागली. "जोवरी पैसा तोवरी बैसा" - दुसरं काय? त्यामुळे तिला पैसा कमवणं अनिवार्य होतं. दुसरीकडे तिच्या शिव्यांमुळे त्रस्त झालेल्या लोकांकडून तक्रारींचं प्रमाण वाढू लागलं. काहीतरी तोडगा काढणं प्राप्त होतं. सीताबाईसुद्धा दिवसेंदिवस थकत चालली होती. पण तिला कामावरून कसं काढणार? म्हणून मग पगार कमी न करता भांडी घासायला सीताबाई आणि कपडे धुवायला दुसरी मोलकरीण ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सीताबाईला झालेलं दुःख आजही आठवतं. अशा परिस्थितीत पैशावरून आरडाओरडा होतो. सीताबाईला मात्र "अविश्वास" दाखवल्याचं दुःख झालं होतं. शेवटी तिला कसंबसं पटवून दिलं, की तुला पगार मिळणारच आहे, पण तू थकत चालली आहेस म्हणून तुझ्या मदतीला दुसरी मोलकरीण आहे.

नागपूरहून पुण्याला आल्यापासून सीताबाईचा संपर्क कमी होत गेला. कालांतराने सीताबाईला सक्तीचं रिटायरमेंट देऊन तिच्या गरजेनुसार आर्थिक मदत होत असल्याचं कळलं. तसं अनंत भुवनमध्ये तिला दररोज कुणाकडे तरी अन्न मिळायचं, दळण आणून दिल्याचे थोडेथोडके पैसे मिळत, त्यामुळे तिचं येणं जाणं चालू होतं. एन्.सी.एल्.मध्ये पी.एच्.डी.ची फेलोशिप सुरू झाली त्यानंतर नागपूरला गेलो असताना सीताबाईसाठी काहीतरी भेटवस्तू घ्यावी अशी इच्छा होती. पण काय द्यावं हा प्रश्न होता. शेवटी काहीतरी वस्तू देऊन पडून राहण्यापेक्षा तिच्यासाठी काही खायला आणावं असं वाटलं. तिला खाऊ घातल्याचं समाधान वेगळंच होतं. ते शब्दांत किंवा पैशात नाही मोजता येणार.

नंतर एक-दोन वर्षात सीताबाईच्या निधनाची बातमी पुण्याला असतानाच कळली. ती बातमी कळली तेव्हा "सुटली बिचारी" म्हणून निश्वास टाकला, पण दुसर्‍या क्षणी सर्व आठवणी डोळ्यासमोरुन गेल्या. कारण सीताबाई मोलकरीणीपेक्षाही घरातला सदस्य होती. नागपूरहून गावाला जाताना, तसंच, अनंत भुवनवसीयांना लिहिलेल्या पत्रांत नमस्कारांमध्ये एक नमस्कार सीताबाईलाही ठरलेला असायचा. १९८९ ते १९९५ या काळात अनंत भुवन मध्ये दरवर्षी जुन्या पिढीतला एक एक सदस्य कमी होत गेला. तेव्हा मृतव्यक्तीच्या घरच्यांइतकंच दुःख सीताबाईच्या अश्रूंमधून व्यक्त झालं होतं.

खरंच निरक्षरतेचा सुसंस्कृतपणाशी संबंध असतो का? नोकरीवरून काढल्यावर पगार बंद होण्याच्या विचारापेक्षा "कार्यपद्धतीवर अविश्वास दाखवला" असा विचार करणारी सीताबाई प्रामाणिकपणातली विशालता किती लीलया सांगून जाते! इदं न मम म्हणत आलो तरी दान केलेल्या खाटेचा जळणासाठी झालेला वापर मान्य न करणारा सुसंस्कृत की उगाचच्या उगाच वस्तू साठवून न ठेवता वापरून संपवून मोकळं होणारी सीताबाई सुसंस्कृत?

हल्ली नागपूरच्या दौर्‍यात "तुम्ही कसे आहात?" आणि परतीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी "कवा येणार?" असं मनापासून विचारणार्‍या सीताबाईची उणीव नेहमीच भासते. अशा या कुटुंबातल्या दिवंगत सदस्याला विनम्र अभिवादन.



Tuesday, March 25, 2008

बर्‍याच दिसांनी

बर्‍याच दिसांनी तानपुर्‍यातुन
उमटला आज स्वयंभू गंधार
बर्‍याच दिसांनी प्रसन्न मनाने
आराधना केली साधावया सूर

बर्‍याच दिसांनी अनुभवले की
सकाळी पडले आज लख्ख ऊन
बर्‍याच दिसांनी थंडी ती विरली
आणि झाले वसंताचे आगमन

बर्‍याच दिसांनी आस्वाद घेऊन
यथेच्छ जेवलो सुग्रास भोजन
बर्‍याच दिसांनी आज लोचनांनी
घेतले जगाचे सौंदर्य टिपून

बर्‍याच दिसांनी होऊन बेभान
नाच नाचलो मी रंगात रंगून
बर्‍याच दिसांनी आनंदाचे डोही
नाहले होऊनी दंग आज मन

Friday, February 29, 2008

आयुष्य (१)

आयुष्य असतं सुगंधी पुष्प
बागेमध्ये फुलणारं
देवाला प्रिय होऊन
निर्माल्य बनणारं

आयुष्य असते चंद्रकोर
नयनांना मोहवणारी
पूर्ण बिंब होण्यासाठी
कलेकलेनं वाढणारी

खरंच असतं का आयुष्य
इतकं रेखीव आणि सुंदर?
की असतं ते एक तुटलेलं स्वप्न
दुःखदायक वरचेवर?

आयुष्य असेल कदाचित् समुद्रलाट
किनार्‍याला लागणारी
स्पर्श होताच मागे फिरून
अंतर्धान पावणारी

आयुष्य असावा गंधार
तानपुर्‍यातून बोलणारा
सुरेल तारा छेडल्यावर
स्वतःहून प्रगटणारा

होवो त्याची फुलवात
निरांजनात तेवणारी
स्वत: पूर्ण जळून
परिसर प्रकाशमान करणारी

Monday, February 11, 2008

अमोल

काळाच्या पडद्याआड जेव्हा निघून जाती सगेसोयरे,
आठवणींच्या मालिकेत त्यां शोधीतसे हे मन बावरे.

पुत्र कुणाचा, मित्र कुणाचा, बंधू, दीर कुणाचा तो;
सोडुन गेला एकाएकी, जैसा नभी तारा तुटतो.

तत्पर होता मदत कराया, नच ठाऊक त्याला थकणे;
आसपास झळकतसे त्याचे असणे, दिसणे, वावरणे.

दृष्ट लागली कुणाची तरी या लाखातील एकाला,
निर्घृणपणे कोणी केले काळ्या रात्री ठार त्याला.

जन्माला येणार्‍या जीवां अटळ मरण हे सत्य जरी,
अकाली का ते यावे, देण्या अंध:कार कुणाच्या दारी?

सग्यासोयर्‍यांमध्ये आता एक जागा सदैव रिक्त;
असणे त्याचे आता राहे त्याच्या आठवणींतच फक्त.




माझा मावसभाऊ, (स्व.) अमोल बुधवार, दि. ६ फेब्रुवारी २००८ रोजी अचानक आम्हा सर्वांना सोडून गेला. त्याच्या अस्तित्वात इतका उत्साह आणि जिवंतपणा होता, की तो आमच्यात नाही हे स्वीकारायला मन तयार होत नाहीये. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो आणि मावशी, काका, आजी, अनंत, अक्षय, सौ. योगिनी वहिनी, चि. रुची व चि. अनन्या, तसेच अमोलच्या सर्व आप्तस्वकीयांना धीर देवो.

Tuesday, January 29, 2008

अभिनेते, नेते, तरुणपिढी आणि विडी

तंबाखूसेवन व धूम्रपानास चित्रपट अभिनेत्यांबरोबर आता राजकीय नेत्यांनाही प्रतिबंध लागू होणार असल्याची बातमी वाचली. धूम्रपान करून आरोग्य गमावणार्‍या जनतेबद्दल आरोग्य मंत्रालयाला वाटणारा कळवळा(?) पाहून मन भरून आलं. नुकतंच, शाहरुख ख़ान आणि अमिताभ बच्चन यांना चित्रपटात धूम्रपानाची दृश्ये देऊ नयेत असं आरोग्यमंत्र्यांनी आवाहन केलं. चित्रपटात धूम्रपानाची दृश्ये नसावीत असं खरंतर पूर्वीच सरकारनं आवाहन केलं होतं. चित्रपटात पाहिल्यामुळे ५२ टक्के तरुणवर्ग धूम्रपानास उद्युक्त होतो असा कुठलासा अहवाल सांगतो. असा प्रतिबंध घातल्याने धूम्रपान आटोक्यात येईल यावर ज्याचा विश्वास असेल.... देव त्याचं भलं करो.

दोन वर्षांपूर्वीची एक गोष्ट आठवली. मी पुण्याहून बडोद्याला खाजगी कंपनीच्या बसने जात होतो. माझ्या शेजारच्या सीटवर एक गुजराथी मनुष्य होता. साधारणपणे माझ्याच वयाचा. नाशीकजवळ एका 'रेस्टोरंट अँड बार'पाशी जेवणासाठी बस थांबली. तेव्हा "डु यु टेक ड्रिंक्स?" असा थेट प्रश्न मला या सहप्रवाशानं विचारला तेव्हा मी अवाक् झालो. माझी त्याची ओळखही नव्हती. पुणे ते नाशीक प्रवासातल्या चार तासांमध्ये आम्ही एकमेकांना 'हाय, हॅलो' सुद्धा म्हटलं नव्हतं आणि एकदम हा प्रश्न! मी पीत नाही हे कळल्यावर त्याला विलक्षण आश्चर्य वाटलं. "महाराष्ट्रात दारू प्यायला मनाई नसतानाही दारू पीत नाही! हे म्हणजे जणु हरिद्वारला राहून गंगास्नान न करणं....." इत्यादि चेहर्‍यावर भाव करून तो स्वत: मनसोक्तपणे आचमन करायला गेला.

कुणी काय खावं किंवा प्यावं, यावर मी भाष्य करू इच्छित नाही. मद्यपान/धूम्रपान/तंबाखूसेवन चांगले का वाईट यावरही मत मांडू इच्छित नाही. पण अशी सक्ती करून काही साध्य होणार आहे का?

साध्य होणार तर! कारण ज्या गोष्टीची मनाई आहे, ती करून पाहणे हा माणसाचा स्वभाव आहे. त्यामुळे, जे साध्य करायचंय त्यावर बंदी आणणे याहून सोपा मार्ग नाही. आणि मी, भारतीय मनुष्य, सगळं काही अगदी सोयीस्करपणे पदरात पाडून घेतो. मोलकरिणीचं काम खालच्या दर्जाचं मानणार. पण मला घरकामासाठी मोलकरीण हवी. वेश्या-व्यवसाय अधिकृत करायचा? छे! छे! .. पण मी वेश्येकडे जाणार. 'संसारा उध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू'च्या जाहिराती देऊन दारुबंदी करणार(?) आणि खास वाईन उत्पादनासाठी द्राक्षांची शेती करणार. 'सिगारेट स्मोकिंग इज इंज्यूरिअस टु हेल्थ' चा प्रचार करणार आणि हे ब्रीदवाक्य छापण्यासाठी सिगारेट विकणार...... चलता है! .....