मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Friday, September 12, 2008

साखळी हायकू

मागच्या आठवड्यात संवेदनी काव्यमय खो खो सुरु केला. सागरनी सुमेधाच्या कवितेवर कवितारुपी प्रतिक्रिया धाडली आणि या सगळ्यातून साखळी हायकूची (हाईकूची?) कल्पना तिला सुचली.

"साखळी हायकू"साठी नियम:
१) खाली दिलेल्या सुमेधाच्या हायकूप्रमाणे तीन ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम. शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा.
३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्‍या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सूचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्‍त होणार्‍या भावनेनुसार किंवा अजून काही असेल!
४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास सुमेधाच्या ब्लॉगवर तिला कळवायचं. कळवायचा हेतू इतकाच की ती सगळ्या कड्या एकत्र करू शकेल.
५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय (ज्याच्याकडून/जिच्याकडून खॊ मिळालाय त्याची/तिची कडी) ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगचा दुवा द्या.

मला चक्रपाणिकडून खो मिळालाय. तो स्वीकारून त्यात माझी कडी ओवण्यापूर्वी सुमेधाच्या हायकूपासून माझ्यापर्यंत आलेली हायकूंची साखळी मी देत आहे. शेवटची हायकू माझी आहे. हायकू या काव्यप्रकाराबद्दल सईने तिच्या ब्लॉगवर छान माहिती दिली आहे. त्याचा उपयोग अवश्य करून घ्यावा.

माझ्यापर्यंत हायकूची साखळी आली आहे ती खालीलप्रमाणे:

रस्त्यातल्या फुलांचा
धुंद गंध दरवळला
मुक्कम तिथेच हरवला!
(इति सुमेधा)


जुन्या शर्टाच्या खिशात सापडली
रस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी
(इति चक्रपाणि)


आणि आता हायकूच्या या साखळीतली माझी कडी:

कोमेजलेली फुलं
गंध तसाच कायम तरी
तुझ्या अथांग प्रेमापरी


आणि माझा खॊ आशाताई, आनंदसौरभ यांना

2 comments:

आशा जोगळेकर said...

प्रशांत ब-याच दिवसांनी आले, ब्लॉग वर तुझा खो मिळाला . ब्लॉग वर टाकली हे पुढची कडी. मी ज्यांना खो दिलाय ती शब्दबंध मधे नव्हती. Hope this is ok.
Idea is great.

यशोधरा said...

प्रशांत, चक्क माझ्याही ब्लॉगची लिंक 'वाचित जावे' मधे बघून आनंदीआनंद झाला!! धन्यवाद!

हायकू सुरेख..