मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Saturday, September 27, 2008

आवडलेले थोडे काही

संवेदने सुरु केलेला खो-खो चा उपक्रम आवडला व त्यात सहभागी होण्याची इच्छा त्याच्या ब्लॉगवर व्यक्त केल्यावर विरोपाद्वारे त्याने मला खो दिला. तो स्वीकारून मला आवडलेल्या कविता इथे देत आहे, त्यापूर्वी संवेदने दिलेले खो-खोचे नियम इथे सर्वांच्या सोयीसाठी देतो.

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा.
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेवढ्या कविता तेवढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सार्‍यांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तिचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा.
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही.
५. अजून नियम नाहीत :)

संवेदने "एक से मेरा क्या होगा" सिंड्रोमबद्दल सांगितलं. मला तर "दो से मेरा क्या होगा" सिंड्रोमही आहे. पण तरी त्याला आवरतो आणि मला आवडणार्‍या दोन कविता इथे देतो.

पहिली कविता -

"वीज म्हणाली धरतीला" या नाटकातली आहे.
कवी -कुसुमाग्रज

चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार कंठी बांधलेली एक होती साखळी

दोन होत्या त्यांत हंसी, राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती

शुभ्र पंखांतून त्यांच्या वीज होती साठली
ना कळे एकीस की माझी लियाकत कोठली

तोडुनी आंधी तुफाने चालल्या, ती चालली
तीन होत्या दीपमाला एक होती सावली

बाण आला एक कोठुन, जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली, जात माझी कोकिळा

कोकिळेने काय केले, गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपली
साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली

ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर झाले यात सारे पावले


(ता.क. संपूर्ण कविता "आठवणीतली गाणी" या संकेतस्थळावर अत्ताच सापडली. त्यानुसार वरील कवितेत बदल केले आहेत.
-प्रशांत, २१ जून २००९)

दुसरी कविता -

कोठेही जा!
कवी - सुरेश भट

कोठेही जा दूरदूर तू माझ्यापासुन ...
माझे गीत तुला तेथेही काढिल शोधुन!

न्हाउन जेव्हा केस मोकळे देशिल सोडुन
दरवळेल हा मंदमंदसा सुगंध होउन

सहज अहेतुक तू एकांती करशिल गुणगुण ...
तुझिया नकळत स्वरात मिसळत जाइल हे पण-

वा गाण्याचा होता आग्रह सखीजनांतुन
अनाहुतासम तुझिया ओठी बसेल जाउन

आणि शेवटी असाच तुजला येता अनुभव,
तुजला माझ्या ह्या असण्याचा होइल आठव


आणि आता वेळ आली खो देण्याची -
माझा खो नीरजाआदित्य यांना.

9 comments:

ऍडी जोशी said...

kho ghyaycha mhanje nakki kay karaycha? navin 2 kavita padaychya ka ki aavadalelya takaychya?

प्रशांत said...

आपल्याला आवडलेल्या (इतर कवींच्य) कविता द्यायच्या आहेत. संपूर्ण कविता आठवत नसेल तर जेवढी आठवते तेवढी. पण कवीचं नाव देणं आवश्यक आहे. कमीत कमी एक व जास्तीत जास्त दोन कविता देता येतील. व जितक्या कविता दिल्या आहेत, तितक्या व्यक्तींना खो देता येईल.

ऍडी जोशी said...

kiti divasat takaychya?

प्रशांत said...

असं काही बंधन नाहीये. पण शक्य तितक्या लवकर...

Samved said...

धन्यवाद मित्रा...आणि हो, तो शब्दबंधचा उपक्रमही खुप अपील झाला

नीरजा पटवर्धन said...

तू मला खो दिलास असं म्हणालायस म्हणजे काय? ते कुठे आहे? आणि आता मी २ कविता ब्लॊगवर टाकू का? कवी प्रसिद्ध असायला हवा की खूप प्रसिद्ध नसला तरी चालेल?

प्रशांत said...

संवेद,
धन्यवाद कशाबद्दल? उलट मला यात सहभागी होता आलं त्याबद्दल मीच आभारी आहे. शब्दबंधची पुढीलसभा मोठ्या प्रमाणात व्हावी असं वाटतं. त्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा.

नीरजा,
संवेदच्या ब्लॉगवर (व माझ्या ब्लॉगवर तसेच माझ्याप्रमाणे खो मिळालेल्या इतर ब्लॉगकारांच्या ब्लॉगवर) त्याबद्दल माहिती दिली आहे. इतर कवींच्या आपल्याला आवडलेल्या कुठल्याही दोन कविता द्यायच्या आहेत - संपूर्ण आठवत नसल्यास आठवतील तेवढ्या; मात्र कवीचं नाव देणं आवश्यक आहे. कवी सुप्रसिद्ध असला पाहिजे असं नियमांत तरी दिलेलं नाही त्यामुळे बहुदा कमी प्रसिद्ध असलेल्या कवींच्या कविताही चालत असतील. याबद्दल संवेदने प्रकाश टाकावा.

आशा जोगळेकर said...

प्रशांत छानच आहे ही पण कल्पना । व तुझ्या आवडत्या कविता ही सुंदर आहेत .
मी ऋतुरंग ह्या ब्लॉग वर माझ्या भावाच्या कविता टाकते आहे. आता पर्यंत ३ टाकल्या आहेत. हे पुस्तक प्रसिध्द झालं आहे (१९९७ कल्पना मुद्रणालय, पुणे ) पण त्याचा अधिक प्रचार व्हावा ही इच्छा आहे. तुझा अभिप्राय आवडेल. त्यांत ऑडियो पण आहे .

नीरजा पटवर्धन said...

असे काही जीवघेणे वर २ कविता टाकल्यात आणि खो पण दिलाय. बघ एकदा.